esakal | डोळ्यांतील मोतीबिंदू
sakal

बोलून बातमी शोधा

MotiBindu

कलाकाराच्या किंवा रसिकाच्या दृष्टितून पाहिले तर डोळ्यांचे अनेक प्रकारे वर्णन केलेले आढळते. कमलनयन, मीनाक्षी, बदामी डोळे किंवा भोकरासारखे डोळे हे जरी वेगवेगळे प्रकार असले तरी महत्त्वाचा मुद्दा डोळे मोत्यासारखे पाणीदार असतात असा असतो. गळ्यात घातलेल्या अत्यंत किंमती मोत्याच्या माळेचे महत्त्व पाणीदार डोळ्यांनीच वाढते.

डोळ्यांतील मोतीबिंदू

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com

जे स्वतःच्या शरीराची काळजी घेऊन डोळ्यांचीही काळजी घेतात त्यांना डोळ्यांचे विकार कमी होतात आणि नंतर मोतीबिंदू झालाच तर अगदी उतारवयात होऊ शकतो. मोतीबिंदू वय कमी असताना झाला तर खरोखरच अडचणीचे असते, पण म्हातारपणाची खूण म्हणून त्याचा स्वीकार सहजपणे केला जातो. आधुनिक वैद्यकशास्त्रातील शल्यविभागातील प्रगतीमुळे सध्या मोतीबिंदूचे शस्त्रकर्म करणे अगदी सोपे झाले आहे. त्यामुळे मनात भीती न ठेवता निष्णात नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेऊन मोतीबिंदूचे शस्त्रकर्म करायला हरकत नाही.

माणसाला पाहिल्याक्षणी लक्ष जाते ते त्याच्या डोळ्यांकडे, त्याचे व्यक्‍तिमत्त्व, त्याच्याविषयीच्या आठवणी एवढेच नव्हे, तर त्याच्या मनात चालणारे विचार हे सर्व डोळ्यातच वाचता येतात. डोळ्यास डोळे भिडले की दोन हृदये जवळ येऊ शकतात आणि मित्र बनू शकतात. मैत्रीसाठी आवश्‍यक असणारा विश्वास आश्वासक स्वरूपात डोळ्यातून मिळू शकतो. प्राणशक्‍ती आणि प्रेम बाह्यजगतासाठी डोळ्यातून प्रक्षेपित होते आणि म्हणूनच सद्‌गुरुंच्या करुणार्द्र कृपादृष्टीसाठी प्रत्येक जण डोळे लावून बसलेला असतो. डोळे एकूणच चेहऱ्याची शोभा वाढवतात.

कलाकाराच्या किंवा रसिकाच्या दृष्टितून पाहिले तर डोळ्यांचे अनेक प्रकारे वर्णन केलेले आढळते. कमलनयन, मीनाक्षी, बदामी डोळे किंवा भोकरासारखे डोळे हे जरी वेगवेगळे प्रकार असले तरी महत्त्वाचा मुद्दा डोळे मोत्यासारखे पाणीदार असतात असा असतो. गळ्यात घातलेल्या अत्यंत किंमती मोत्याच्या माळेचे महत्त्व पाणीदार डोळ्यांनीच वाढते. डोळेच जर चांगले नसतील तर अलंकारांचा काय उपयोग? बसऱ्याहून मागवलेला मोठा, दुर्मिळ व अत्यंत किंमती मोती अंगठीत वा गळ्यातच शोभतो, पण निसर्गाची किमया अशी की जो मोती बनवण्यासाठी शिंपल्यातील किड्याला खूप कालावधी देऊन कष्ट घ्यावे लागतात तो मोती (नैसर्गिक व खरा बरं का!) पापण्यांच्या शिंपल्यात सहजच तयार होतो! मात्र हा मोती डोळ्यात आला की सर्व दागिने फिके पडू लागतात.

दुसऱ्याला डोळ्यात पाहण्यास अडचण येते असे नव्हे, तर मोतीबिंदू झालेल्यालाही बाह्यजगत दिसण्यास अवघड जाऊ लागते. हे सर्व टाळणे फार अवघड नाही. डोळ्याला हितकारक आहार-विहार ठेवावा आणि शरीरातील कफदोष वाढणार नाही यावर लक्ष ठेवावे. हिरव्या पालेभाज्या खाणे, नत्रयुक्त पदार्थ खाणे, ‘अ’ जीवनसत्त्व असलेल्या वस्तू खाणे याबरोबरच सकाळ संध्याकाळ दृष्टी नैसर्गिक हिरव्या वनस्पतींवर वा हिरवळीवर स्थिर ठेवून पाहणे, यामुळे पण डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवता येते. चुकीचा तेजस्वी प्रकाश किंवा निषिद्ध वस्तू पाहू नयेत आणि सारखे रडून डोळ्यात पाणी आणू नये. वय वाढत जाईल तसा सावकाशपणे शरीरात संचित झालेला दोष आणि एकंदरीत म्हातारपण हे मोतीबिंदूचे कारण असते. पण गुडघेदुखी, बहिरेपणा, प्रोस्टेटचा त्रास या म्हातारपणी होणाऱ्या त्रासापेक्षा मोतीबिंदूचा त्रास अगदीच क्षुल्लक असतो हेच समाधान.

डोळे हे जणू आरोग्याचा आरसाच आहे. ताजेतवाने आणि थकलेल्या शरीरातील बदल डोळे सहज सांगतात. तारवटलेले डोळे पाहून लांबचा प्रवास, जागरण किंवा काहीतरी थकून जाण्यासारखे कर्म घडून गेले असावे हे लगेच लक्षात येते. शरीरात येणारा आजार उष्णता वाढवत आहे याचा धोक्‍याचा लाल उजेड प्रथम डोळ्यात दिसू लागतो. वीर्यनाश आणि मैथुनाशी डोळ्यांचा संबंध शास्त्राने सांगितलेलाच आहे व सर्वांना याचा अनुभव पण येतो. जे स्वतःच्या शरीराची काळजी घेऊन डोळ्यांचीही काळजी घेतात त्यांना डोळ्याचे विकार कमी होतात आणि नंतर मोतीबिंदू झालाच तर अगदी उतारवयात होऊ शकतो. मोतीबिंदू वय कमी असताना झाला तर खरोखरच अडचणीचे असते, पण म्हातारपणाची खूण म्हणून त्याचा स्वीकार सहजपणे केला जातो. आधुनिक वैद्यकशास्त्रातील शल्यविभागातील प्रगतीमुळे सध्या मोतीबिंदूचे शस्त्रकर्म करणे अगदी सोपे झाले आहे. त्यामुळे मनात भीती न ठेवता निष्णात नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेऊन मोतीबिंदूचे शस्त्रकर्म करायला हरकत नाही. जवळची पर्स काढून घेताना डोळ्यांमध्ये मिरचीची पूड वगैरे काहीतरी टाकतात असे ऐकिवात आहे, पण डोळ्यातील मोतीबिंदू काढताना काही त्रास न होता नकळत तो काढून घेता येतो.