#FamilyDoctor वैद्यकीय संशोधन

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 2 November 2018

धूम्रपानाने वाढतो नैराश्‍याचा धोका!

धूम्रपानाने वाढतो नैराश्‍याचा धोका!
धूम्रपानाच्या व्यसनात बुडालेल्यांना नैराश्‍याचा धोका इतरांपेक्षा अधिक असतो. नैराश्‍य आणि धूम्रपानाचा जवळचा संबंध असल्याचे विज्ञानाला पूर्वीपासूनच ज्ञात होते. मात्र, धूम्रपान हेच नैराश्‍याचे कारण असावे काय याबाबत एकवाक्‍यता नव्हती. तंबाखूच्या धुरातून मिळणाऱ्या निकोटीनमुळे काही काळ तरतरी वाटत असली तरी, त्याच्या प्रदीर्घ काळ सेवनाने नैराश्‍य येऊ शकते, असे फिनलंडमधील हेलसिंकी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्यांनी चार हजार जुळे पुरूष आणि पाच हजार जुळ्या स्त्रिया यांच्या आरोग्याचा पंधरा वर्षे माग ठेवला आणि त्यातून हा निष्कर्ष काढला. बराच काळ या व्यसनाच्या अधीन असणाऱ्यांमध्ये नैराश्‍याला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढत चाललेले दिसते, असे त्यांना दिसून आले. मात्र, या विषयाशी संबंधित अन्य घटकांचा विचार केला असता, हा प्रकार फक्त पुरुषांमध्ये अधिक तीव्र असतो, असेही त्यांच्या लक्षात आले. धूम्रपानाची सवय सोडणाऱ्यांमध्येही काही काळ असा नैराश्‍याचा धोका कायम राहतो. मात्र, दीर्घ काळानंतर तो कधीही धूम्रपान न करणाऱ्यांएवढाच कमी होतो, असेही त्यांनी म्हटले आहे. धूम्रपानाचे व्यसन आणि नैराश्‍याचा त्रास असलेल्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी विशेष प्रकारच्या वर्तनोपचारांची आवश्‍यकता असते, असेही ‘सायकॉलॉजीकल मेडिसिन’ या नियतकालिकातील लेखात म्हटले आहे. 

********************************************
मुले आजारी का पडतात?
हवा, पाणी, धूळ, कचरा, सांडपाणी, जनुकीय दोष, अन्न आणि टेलिव्हीजन - ही आहे लहान मुलांना आजारी पाडणाऱ्या घटकांची त्यांच्या घटत्या प्रभावानुसार केलेली मांडणी. अमेरिकेच्या आरोग्य व पर्यावरण विभागांच्या समन्वयातून एक लाखाहून अधिक मुलांवर गेली वीस वर्षे केल्या गेलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष नुकतेच जाहीर करण्यात आले. त्यात ही क्रमवारी देण्यात आली आहे. बालवयातील अनेक व्याधींमागे एकाहून अधिक कारणे असण्याची शक्‍यता असते. अशा कारणांचा नेमका शोध घेण्याकरिता सुरू करण्यात आलेल्या या अभ्यासादरम्यानच्या काळात बालवयातील लठ्ठपणासारख्या अनेक नव्या आरोग्य समस्या उदयास आलेल्या दिसल्या, त्यांमागच्या कारणांचाही वेध घेण्यास मग सुरुवात झाली आणि त्यातून वर दिलेले आठ घटक सर्वाधिक समस्यांना कारणीभूत असल्याचे दिसून आले. या आठ घटकांबाबत पुरेशी काळजी घेतल्यास मुलांचे आरोग्य उत्तम राखता येऊ शकेल, असे हा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी म्हटले आहे. 

********************************************

‘विसरणे’  लक्षात ठेवण्यासाठीच
एटीएमचा पासवर्ड... एखाद्या मित्राचा मोबाईल नंबर... एखादी वेगळी पाककृती किंवा बराच काळ न भेटलेल्या व्यक्तीचे नाव... आपल्या विसराळूपणाला दोष देण्याची अशी अनेक कारणे दररोज आपल्यासमोर हात जोडून उभी असतात. पण, स्टॅनफोर्ड विद्यापीठातील चेतातज्ज्ञांच्या संशोधनानुसार अशा काही गोष्टी विसरणे अंतिमतः काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने हिताचेच असते. ‘नेचर न्युरोसायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या संशोधकांच्या संशोधनात त्यांनी वीस स्वयंसेवकांना लक्षात ठेवण्यासाठी अडीचशे शब्दांच्या जोड्या दिल्या आणि त्या काळातील त्यांच्या मेंदूतील हालचालींचा आलेख नोंदविला. या यादीत काही फसव्या जोड्याही होत्या. सर्वसाधारणपणे शब्द लक्षात राहण्याचे प्रमाण तीस ते ऐंशी टक्के एवढे होते. अनेक वेळा चाचण्या घेतल्यानंतर त्यांना असे लक्षात आले की, फसव्या जोड्यांतील शब्द विसरण्याचा प्रयत्न जितक्‍या वेगात केला गेला तितक्‍या प्रमाणात ‘लक्षात ठेवण्या’चे काम करणाऱ्या मेंदूच्या भागातील क्रिया अधिक वेगवान होत गेल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medical Research