दुधाचे दात 

milk-tooth
milk-tooth

दात येणे ही बालकाच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना असते. साधारणतः बाळ सहा महिन्यांचे झाले की दात येण्यास सुरवात होते. तोपर्यंत बाळासाठी स्तन्यपान हाच सर्वोत्तम आहार असतो. मात्र दात येणे हे पचनसंस्था विकसित होत असण्याचे एक लक्षण असल्याने, सहाव्या महिन्यात अन्नप्राशन संस्कार करून स्तन्यपानाव्यतिरिक्‍त इतर आहार सुरू करायचा असतो. 

आयुर्वेदात दात येण्याच्या प्रक्रियेला "दन्तोद्‌भेदन' असे म्हटलेले आहे. दात येणे हे अस्थी म्हणजे हाडे व मज्जा या दोन धातूंवर अवलंबून असते. म्हणून वयाच्या सहाव्या-सातव्या महिन्यात दुधाचे दात आले तरी इतक्‍या कमी वयात अस्थी व मज्जाधातू पूर्णपणे सशक्‍त झालेले नसल्याने ते लवकरच पडतात व त्यानंतर आलेले पक्के दात दीर्घकाळ टिकतात. फार लवकर म्हणजे चौथ्या महिन्यात किंवा त्याहून अगोदर दात येणे बालकाच्या तब्येतीच्या दृष्टीने चांगले नसते. जन्मापासून दात असणे हेसुद्धा प्रशस्त समजले जात नाही. उलट आठव्या महिन्यात दात येण्यास सुरवात होणे हे दीर्घायुष्याचे लक्षण असते, असे काश्‍यपसंहितेत सांगितलेले आढळते. 
दातांची स्थिरता, बळकटी, अशक्‍तता या गोष्टी आपापल्या वंशावर, शुक्राणू व स्त्रीबीजाच्या गर्भाधानाच्या वेळच्या स्थितीवर, आनुवंशिकतेवर, बालकाच्या शारीरिक वाढीवर व प्रकृतीवर अवलंबून असतात, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. जातिविशेषात्‌ निषेकात्‌ स्वभावात्‌ मातापित्रोरनुकरणात्‌ स्वकर्मविशेषात्‌ च इति आचक्षते महर्षयः । 

...काश्‍यपसंहिता सूत्रस्थान या सूत्रावरून हे स्पष्ट होते. 
दात येण्यास अस्थी व मज्जा हे दोन्ही धातू जबाबदार असल्याने ही प्रक्रिया अतिशय क्‍लिष्ट असते व यामुळे दात येताना मूल अस्वस्थ होणे, त्याची रोगप्रतिकारशक्‍ती कमी होणे, हिरड्या शिवशिवत असल्याने मूल चिडचिड करणे, नीट न खाणे स्वाभाविक असते. मात्र सरसकट सगळ्या मुलांना दात येताना त्रास होतोच असे नाही, विशेषतः गर्भावस्थेपासून ज्यांच्या अस्थी व मज्जाधातूचे यथायोग्य पोषण झाले आहे, जन्मानंतर ज्यांना पुरेशा प्रमाणात व शतावरी, प्रवाळ वगैरे धातुपोषक द्रव्यांनी पोसलेले स्तन्यपान मिळालेले आहे, त्यांना दात येणे हलके जाते असा अनुभव आहे. तरीही दात येण्याचा काळ बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने संवेदनशील, नाजूक असतो. 

दात येताना त्रास 
दात येताना काय त्रास होऊ शकतात हे आयुर्वेदात याप्रकारे सांगितलेले आहे, 
दन्तोद्भेदश्‍च सर्वरोगायतनम्‌ । विशेषेण तु तन्मूला ज्वराशिरोभितापस्तृष्णा-भ्रमाभिष्यन्द-कुकूणकपोत्थकीवमथु-कास-श्वास-अतिसार-विसर्पाः ।।...अष्टांगसंग्रह 
दात येणे हे अनेक विकारांना कारणीभूत ठरू शकते, विशेषतः ताप, डोके दुखणे, खूप तहान लागणे, चक्कर येणे, डोळे येणे, उलटी होणे, खोकला, दमा, जुलाब, विसर्प - त्वचाविकार वगैरे त्रास होऊ शकतात. 

मुलांच्या आपापल्या प्रकृतीनुसार, धातूंच्या शक्‍तीनुसार हे त्रास कमी-अधिक प्रमाणात होत असतात, त्यातही मुलीपेक्षा मुलाला दात येणे अधिक त्रासदायक ठरते. कारण मुलीच्या हिरड्या व दात तुलनेने मऊ व नाजूक असतात. दात येताना शिवशिवतात, त्यामुळे मूल सतत काहीतरी चावायला बघते. अशा वेळी त्याच्या तोंडात अस्वच्छ वस्तू जाणार नाही याकडे लक्ष ठेवावे लागते. अन्यथा, जंतुसंसर्ग होऊन त्रासाची तीव्रता वाढू शकते. शक्‍यतो चावण्यासाठी मुलांच्या हातात गाजर, ज्येष्ठमधाची काडी किंवा खारीक देणे योग्य असते. दात येणे सोपे जावे यासाठी आयुर्वेदाने अनेक उपायही सांगितले आहेत. 

काय कराल? 
दन्तपालो तु मधुना चूर्णेन प्रतिसारयेत्‌ । धातकीपुष्प-पिप्पल्योर्धात्रीफलरसेन वा ।।...योगरत्नाकर 
धायटीची फुले व पिंपळी यांचे चूर्ण हिरड्यांवर चोळल्याने किंवा आवळ्याच्या रस हिरड्यांना चोळल्याने दात येणे सोपे जाते. 

वेखंड, बृहती, कंटकारी, पाठा, कुटकी, अतिविषा, नागरमोथा व शतावरी वगैरे मधुर द्रव्यांनी सिद्ध केलेले तूप हेही दात येताना होऊ शकणाऱ्या त्रासावर उत्तम असते. त्रास होऊ नये म्हणून आधीपासूनच या तुपाचा वापर करण्याचाही खूप चांगला उपयोग होतो. 

दन्तोद्भेदगदान्तक रस नावाची गोळी पाण्यात उगाळून हिरड्यांवर लेप करण्याने दात सहज व चांगले यायला मदत मिळते. 

यासारखे प्रतिबंधात्मक उपाय योजले तर सहसा मुलांना दात सहजतेने येतात, तरीही जुलाब, उलट्या, त्वचेवर रॅश, खोकला, ताप वगैरे त्रास झाले, तर त्यासाठी लक्षणानुरूप उपचार करावे असे सांगतात. उदा. उलट्या-जुलाब, अपचन झाले असता मुलांना साळीच्या लाह्यांची पेज देणे उत्तम असते, आल्या-लिंबाचा रस व मध यांचे मिश्रण थोडे थोडे चाटविण्याचाही उपयोग होतो. कुडा, अतिविषा, मुरुडशेंग, नागरमोथा ही द्रव्ये उगाळून तयार केलेली गुटी देणेही चांगले. "संतुलन बाल हर्बल सिरप'सारखे सिरप घेण्याचाही अशा स्थितीत उत्कृष्ट परिणाम करू शकते. 

ताप आला असता नागरमोथा, काकडशिंगी, अतिविषा यांचे पाव चमचा चूर्ण मधासह चाटवता येते, तसेच प्रवाळपंचामृत, कामदुधा गोळी थोड्या प्रमाणात चाटविण्याचाही उपयोग होतो. गुडूची, शतावरी वगैरे रोगप्रतिकारशक्‍ती वाढविणाऱ्या द्रव्यांपासून तयार केलेली "समसॅन' सारखी गोळी दात येताना देणे उत्तम असते. याने मुलाची ताकद टिकून राहते व रोगप्रतिकारयंत्रणा सक्षम राहिली, की दात सहज येणे शक्‍य होते. 
सर्दी-खोकला झाल्यास सितोपलादी चूर्ण, "ब्रॉंकोसॅन सिरप' देण्याचा उपयोग होतो. बेहडा, ज्येष्ठमध, अडुळशाची पाने याचा काढा किंवा गवती चहा, तुळशीची पाने, ज्येष्ठमध यांपासून केलेला "हर्बल टी' देता येतो. वैद्यांच्या सल्ल्याने "श्वाससॅन' चूर्णसुद्धा घेता येते. 
बालकपरिचर्येत सांगितल्याप्रमाणे मुलाला सुरवातीपासूनच "सॅन अंजन'सारखे शुद्ध व नेत्र्य द्रव्यांनी संस्कारित केलेले अंजन लावल्यास सहसा डोळ्यांचे त्रास होत नाहीतच, तरीही डोळे आले, डोळ्यातून पाणी येत असले, तर त्रिफळा, लोध्र वगैरे द्रव्यांच्या पाण्याने डोळे पुसून घेता येतात, डोळ्यात "संतुलन दिव्यचक्षु तेला'सारखे नेत्र्य औषधांनी सिद्ध तेल टाकता येते. 

अंगावर रॅश वगैरे उठला तर संगजिऱ्याचे चूर्ण, शतधौतघृत लावता येते व बरोबरच "अनंतसॅन', "मंजिष्ठासॅन'सारखी रक्‍तशुद्धीकर औषधे देता येतात. 
एकंदरच, दात येण्याच्या या कालावधीत बालकाची ताकद कमी होत असल्याने, रोगप्रतिकारशक्‍ती खालावत असल्याने या काळात तेल लावणे, धूप देणे, "संतुलन बालामृत', "संतुलन बाळगुटी'सारखे रसायन चाटवणे उत्तम होय. मूल खेळते ती जागा तसेच मूल ज्या वस्तू किंवा खेळणी हाताळते त्या वस्तू स्वच्छ असण्याकडे विशेष लक्ष देणेही आवश्‍यक. 

दातांच्या, हिरड्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अगदी लहानपणापासून मुलाच्या हिरड्या व दात आल्यावर दात व हिरड्या नख नीट कापलेल्या बोटाने हळुवारपणे नियमितपणे स्वच्छ करणे, जेवणानंतर चूळ भरायची सवयही लवकरात लवकर लावणे, दात घासण्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेल्या बकुळ, खैर वगैरे द्रव्यांपासून बनवलेले चूर्ण वा तयार "संतुलन योगदंती' दंतमजन वापरणे श्रेयस्कर होय. हे दंतमंजन शंभर टक्के नैसर्गिक द्रव्यांपासून बनविलेले असल्याने याचे काहीही दुष्परिणाम होत नाहीत, तसेच अनवधानाने पोटात गेले तरी अजिबात त्रासदायक नसते. 

लहानपणापासून हिरड्या व दातांची अशी नीट काळजी घेतली, बालकाच्या अस्थी-मज्जा धातूंना गर्भावस्थेपासूनच योग्य पोषण मिळण्याकडे लक्ष दिले, दात येतानाच्या संवेदनशील काळात आहार-रसायन-धुरी-अभ्यंग वगैरे उपायांची योजना केली तर निरोगी दातांची साथ आयुष्यभरासाठी निश्‍चितच मिळू शकेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com