मोबाईलनं दिलेलं दुखणं! 

Mobile Pain
Mobile Pain

खरेतर कुणासमोरही मान तुकवावी लागणे म्हणजे मान-हानी होणारच. मोबाईलचा वापर वाढला आणि आपण सतत मोबाईलसमोर मान तुकवून राहू लागलो, त्यामुळेच सध्या मान‘हानी’च्या तक्रारी वाढल्या आहेत. मोबाईलचा वापर कमी करा व मानदुखीचा त्रास दूर ठेवा. 
 

मानदुखी हा सर्वत्र आढळणारा एक सामान्य त्रास आहे. आयुष्यात एकदाही मानदुखी झाली नाही, असा माणूस सापडणं शक्य नाही. 
खूप दिवसांपासून कंबर दुखते, हैराण झालो आहे, अधूनमधून गोळ्या घेतो; पण तेवढ्यापुरतं बरं वाटतं. 

टापटीप कपड्यात असलेल्या एका तरुणाने डॉक्टरांना सांगितलं. डॉक्टरांनी विचारलं, ‘‘मोबाईलचा वापर जास्त आहे का?’’ हा प्रश्न ऐकून तरुण व त्याची बायको चकित झाले आणि लगेच बायकोने विचारले, ‘‘हो, तुम्ही कसं ओळखलं?’’ मोबाईल व कॉम्प्युटरवरचं काम आणि मानदुखी हे अगदी जीवाभावाचं नातं, मणक्याच्या ओपीडीमध्ये मानुदखीसाठी येणारे ऐंशी टक्के रुग्ण मोबाईल व कॉम्प्युटरचा जास्त वापर करणारे असतात. 
मानदुखीचे महत्त्वाचे कारण शरीर घडतानाच तयार झाले आहे, ते म्हणजे मानेच्या मणक्यांची रचना, शरीराच्या मणक्यांमध्ये सर्वाधिक हालचाल मानेच्या मणक्यांमध्ये होते. जि​थे हालचाल जास्त, तिथे घर्षण आणि त्यामुळे होणारी झीजपण जास्त. मोबाईल व कॉम्प्युटरचा जास्त वापर करून मानेच्या मणक्यांवर आणि स्नायूंवर ताण पडतो. हे टाळले नाही तर मणक्यांची झीज लवकर सुरू होते, त्यामुळे मणक्यांतील चकत्या सरकणं, नसांवर दाब येणं, या गोष्टी मणक्यांना सर्वाधिक बाधित करतात.

मानेवर ओझे किती? 
आपली मान आपण किती अंशाने वाकवली की मानेवरचे ओझे कसे वाढत जाते, ते पाहा. म्हणजे, प्रत्येकवेळी मोबाईल पाहताना आपल्या मानेची स्थिती व त्यावेळी आपल्या मानेवर येणारा ताण लक्षात येईल. 
४.५ ते ५ किलो - शून्य अंश म्हणजेच ताठ मान 
१२ किलो - १५ अंशाचा कोन 
१८ किलो - ३० अंशाचा कोन 
२२ किलो - ४५ अंशाचा कोन 
२७ किलो - ६० अंशाचा कोन  

 व्यायामाकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे हे सहज घडतं. 

मुळातच मणक्याचे स्नायू प्रचंड कमकुवत असतात. व्यायाम करून त्यांची क्षमता वाढवणं गरजेचं असतं. पण व्यायामाचा अभाव आणि मोबाईल- संगणकाचा वापर यामुळे अशा रुग्णांमध्ये मानदुखी लगेच सुरू होते. मान दुखणं म्हणजे जे काम तुम्ही करता ते सहन करण्याची क्षमता मानेच्या स्नायूंमध्ये नाही असं सांगण्याचा प्रयत्न शरीर करत असतं, त्यामुळे जोपर्यंत स्नायू बळकट होत नाही, तोपर्यंत गोळी किंवा मलम हा मानदुखीवरील अंतिम उपाय असू शकत नाही. 

मनुष्याची शारीरिक हालचाल अतिशय गरजेची असते. रोज दिवसाची कमीतकमी तीस मिनिटे व्यायामासाठी दिली पाहिजेत. रोजचा व्यायाम परिणामकारक बनवण्यासाठी काही रोजच्या व काही जास्त ताकदीच्या व्यायामांचा अवलंब करावा. व्यायाम करताना जास्त वेळ बसू नये. टप्प्या-टप्प्याने विश्रांती घ्यावी. स्नायूंना आलेले जडत्व, ताठरपणा दूर करण्यासाठी योगासने नियमितपणे केली पाहिजेत. 

जर तुम्ही नियमित व्यायाम करणारे असाल तर पुढील गोष्टी साध्य होतात. 
- हार्ट अॅटॅकचा धोका खूप कमी होतो. 
- वजन नियंत्रित राहते. 
- रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. 
- टाइप २ मधुमेहाचा धोका कमी होतो. 
- रक्तदाबाचा धोका कमी होतो. 
- हाडे, स्नायू व सांधे सशक्त बनतात, त्यामुळे ओस्टिओपोरोसिसचा संभाव्य धोका कमी होतो. 
- रुग्णाचा आजारपणाच्या काळात संपूर्ण विश्रांती, तसेच रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होतो. 
- व्यायामाने झोप छान लागते, त्यामुळे दिवसभर उत्साह टिकून राहतो. ओघाने रुग्णाची मानसिक स्थितीही उत्तम राहते. 

व्यायामाने मानसिक आरोग्यही उत्तम राहते. 
विविध संशोधनांतून असे समोर आले आहे, की मानसिक तणाव असणाऱ्या रुग्णांना तणाव कमी करण्यासाठी व्यायामाचा अतिशय फायदा होतो. 

व्यायामाने आपल्या मेंदूमधील सेरोटॉनिन, एंडोरफिन्स आणि स्ट्रेस हार्मोन्स या स्रावांचे प्रमाणही बदलते. 

व्यायाम करताना कोणती काळजी घ्यावी? 
निरोगी शरीरासाठी कोणतीही शारीरिक हालचाल रुग्णाने करणे आवश्यक आहे. जर कोणताही व्यायाम तुम्ही करत नसाल, तर लवकरात लवकर सुरुवात करणे गरजेचे आहे. 
दर आठवड्याला साधारण दीडशे ते तीनशे मिनिटे आधुनिक ताकदीच्या व्यायामांसाठी किंवा पंच्याहत्तर ते दीडशे मिनिटे ताकदीच्या व्यायामांसाठी राखून ठेवा. तसेच, या दोन्हीला एकत्र करून व्यायामाची पद्धती ठरवता येईल. 
आठवड्यातून किमान दोन दिवस स्नायूंची ताकद वाढविण्यासाठी योग्य ते व्यायाम करणे आवश्यक आहे. 

‘ड’ जीवनसत्त्व 
आजकाल धकाधकीच्या जीवनात शरीराला ऊन मिळत नाही. कोवळे ऊन हे हाडांना बळकट करणाऱ्या डी-३ व्हिटॅमिनच्या निर्मितीसाठी आवश्यक असते. डी-३ व्हिटॅमिनच्या सेवनामुळे रुग्णाचा मानदुखीचा आजार कमी होतो. ‘ड’ जीवनसत्त्वांना सूर्यप्रकाशातून मिळणारी जीवनसत्त्वे असेही म्हणतात. जेव्हा रुग्ण सूर्यप्रकाशात जातो, तेव्हा शरीरामध्ये त्यांची निर्मिती होते. अन्नातून किंवा गोळ्यांमधून ‘ड’ जीवनसत्त्वाचे सेवन करता येते. 
‘ड’ जीवनसत्त्व शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचे फायदे असे : 
- ‘ड’ जीवनसत्त्वामुळे दातांचे आणि हाडांचे आरोग्य चांगले राहते. 
- ‘ड’ जीवनसत्त्वामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मज्जासंस्था तसेच मेंदूच्या आरोग्यालाही ‘ड’ जीवनसत्त्वामुळे फायदा होतो. 
- ‘ड’ जीवनसत्त्वामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. तसेच, मधुमेह असणाऱ्या रुग्णांचीही साखर नियंत्रणात राहते. 
- फुफ्फुसांची कार्यक्षमता ‘ड’ जीवनसत्त्वामुळे सुधारते. तसेच, हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आजार बरे होण्यास मदत होते. 

‘ड’ जीवनसत्त्व आपल्याला अन् पदार्थांमधूनही मिळते. पुढील गोष्टींचा समावेश रोजच्या आहारात केल्यास त्यातून शरीराला ‘ड’ जीवनसत्त्व मिळेल. 
अंडी, अंड्याचे बलक, दूध, पालक, कृत्रिम लोणी, दही इत्यादी. 
मानवी शरीराला दिवसाला दहा ते वीस मायक्रोग्रॅम ‘ड’ जीवनसत्त्व मिळणे गरजेचे आहे. 

कॅल्शियम 
कॅल्शियम हे खनिज मानवी शरीरासाठी अत्यंत गरजेचे आहे. हाडे तयार होण्यासाठी, तसेच त्यांच्या आरोग्यासाठी कॅल्शियमची गरज असते. आपल्या शरीरातील रक्ताच्या गाठी होण्यापासून कॅल्शियम मज्जाव करते. स्नायू आखडण्यापासून तसेच हृदयाची धडधड होण्यापासून कॅल्शियम आपल्याला वाचवते. 
साधारण ९९ टक्के कॅल्शियम हे आपल्या शरीरातील हाडांमध्ये, तसेच दातांमध्ये असते. दररोज आपली त्वचा, नखे, केस, घाम, लघवी, तसेच विष्ठा याद्वारे कॅल्शियमचा विसर्ग होतो. 
मानवी शरीर कॅल्शियमची निर्मिती स्वतः करू शकत नाही, त्यामुळे आपण जो आहार घेतो त्यातून शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळणे अत्यंत गरजेचे असते. आपल्या आहारातून शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळाले नाही तर शरीर हाडांमध्ये असलेल्या कॅल्शियमचा वापर करते. 
अगदी क्वचित हाडांमध्ये असलेल्या कॅल्शियमचा वापर शरीराकडून होणे ठीक आहे; परंतु असे वारंवार झाल्यास हाडे ठिसूळ होतात. कॅल्शियमच्या अभावामुळे हाडांना इजा पोचण्याची शक्यता जास्त असते. या अवस्थेला ओस्टिओपोरोसिस असे म्हणतात. वृद्ध लोकांमध्ये ही समस्या असण्याचे प्रमाण जास्त आहे. 
पुढील पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला कॅल्शियम मिळते : 
दूध, दुग्धजन्य पदार्थ, बदाम, सोयाबीन दूध, टोफू, मसूर, सार्डीन मासा, वाळवलेले अंजीर इत्यादी. 
प्रौढ व्यक्तींना दिवसाला एक हजार मिलिग्रॅम कॅल्शियमची गरज असते. सत्तर वर्षांवरील पुरुषांना, तसेच पन्नास वर्षांवरील महिलांना दिवसाला बाराशे मिलिग्रॅम कॅल्शियमची गरज असते, तर चार ते अठरा या वयोगटातील मुलांच्या शरीराला तेराशे मिलिग्रॅम कॅल्शियम गरजेचे असते. 

‘बी १२’ जीवनसत्त्व 
‘बी १२’ हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्व आहे. हे मानवी शरीरासाठी गरजेचे असणारे अतिशय महत्त्वाचे जीवनसत्त्व आहे. लघवीमधून हे शरीरातून बाहेर पडते. माणसाच्या शरीरातील पेशी तसेच शिरांच्या आरोग्यासाठी, मेंदूच्या कार्यशीलतेसाठी हे जीवनसत्त्व गरजेचे असते. त्याचप्रमाणे शरीरातील लाल पेशींच्या निर्मितीसाठी या जीवनसत्त्वाची आवश्यकता असते. या जीवनसत्त्वाला ‘कोबॉलमिन’ असेही म्हणतात. शरीरातील बी १२ जीवनसत्त्व जेव्हा कमी होते, तेव्हा त्याचे अतिशय गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. शरीराच्या मज्जातंतूंची कार्यक्षमता या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे कमी होते. मेंदूच्या कार्यशीलतेसाठी हे जीवनसत्त्व आवश्यक असते. तसेच, लाल रक्तपेशींच्या आणि डीएनएच्या निर्मितीसाठी बी १२ जीवनसत्त्व गरजेचे असते. या जीवनसत्त्वाची शरीरात कमतरता असल्यास अशक्तपणा येतो. 
चौदा वर्षांवरील व्यक्तींना दिवसाला २.४ मायक्रोग्रॅमपेक्षा जास्त बी १२ जीवनसत्त्व मिळणे गरजेचे आहे. 
मांसाहारी व्यक्तींना बी १२ जीवनसत्त्व सहज उपलब्ध होते; परंतु शाकाहारी व्यक्तींना या जीवनसत्त्वासाठी गोळ्या किंवा अन्य पूरक गोष्टींची मदत घ्यावी लागते. मानवी शरीरात बी १२ जीवनसत्त्व साठवून ठेवण्याची क्षमता असते. चार वर्षांपर्यंत आपले शरीर या जीवनसत्त्वाचा साठा करून ठेवू शकते. 
बी १२ जीवनसत्त्व असलेले अन्नपदार्थ ः 
चिकन, मटण, गोमांस, तसेच टूना आणि हेरिंग हे मासे, अंडी. 
तसेच दूध, चीज, दही इत्यादी. 

बी १२ जीवनसत्त्वाची कमतरता असल्याची लक्षणे : 
औदासीन्य येणे, ताण येणे, गोंधळ उडणे, स्मरणशक्ती कमी होणे, थकवा येणे, वजन कमी होणे, बद्धकोष्ठता इत्यादी. बी जीवनसत्त्वाची शरीरात कमतरता असल्याची लक्षणे आहेत. तसेच, काही वेळेला मुंग्या येणे, हात आणि पाय बधिर होणे, जीभ आणि तोंड बेचव होणे, जुलाब होणे, तसेच स्त्रियांना मासिक पाळीच्या समस्या उद्‍भवणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. 

उपाययोजना 
- नियमित व्यायाम, फिजिओथेरपीद्वारे मानेचे स्नायू बळकट करणे. 
- मोबाईलचा कमीत कमी व गरजेपुरताच वापर करणे. 
- कॉम्प्युटरचा वापर करताना ते डोळ्यांच्या उंचीवर ठेवणे, त्यामुळे खाली व वर पहावे लागत नाही. 
- आहारात बी १२ व डी ३ ही जीवनसत्त्वे असणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढवणे. 
- आहाराद्वारे वजन कमी करणे. 

वरील सर्व गोष्टींची काळजी घेऊनही मानदुखी कमी होत नसेल, तर मणक्यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांना भेटून, हे दु:ख मुळापासून उखडणे गरजेचे आहे. नेमकी हीच गोष्ट रुग्ण दुर्लक्षित करतो. ही मानदुखी संपवणे अगदी सहज नसलं, तरी नक्कीच शक्य आहे. ही फक्त मानदुखी आहे की एखादा गंभीर स्वरूपाचा आजार, याचे निदान होण्याची आवश्यकता आहे. 

काय घडते ? 
- मान व खांदे दुखी बळावते 
- कण्याची वक्रता बिघडते 
- चक्कर येण्याचा त्रास सुरू होतो 
- खांद्याजवळच्या मणक्यांना त्रास होतो 
- नसा चिमटीत सापडल्यासारख्या होतात 
- पाठीत ताठरता येते 
- तीव्र डोकेदुखी उद्भवते 

काय कराल? 
- जीवनशैलीत योग्य ते बदल करा 
- मोबाईल, लॅपटॉप यापासून दर पंधरा-वीस मिनिटांनी थोडा काळ दूर व्हा 
- या मधल्या काळात मानेचे, खांद्याचे व्यायाम करा 
- शक्यतो पाठ व मान ताठ ठेवून मोबाईल नजरेसमोर ठेवून वाचा 
- मान वाकवून मोबाईल, लॅपटॉपवर काम करणे टाळा 
- सूर्यनमस्कार, भुजंगासन यासारखी योगासने नियमित करा 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com