‘मोक्षम्‌ इच्छेत्‌ जनार्दनात्‌’ 

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 3 January 2020

आपल्यावरचा जबाबदाऱ्या पार पाडायच्या असल्या, पैसा, अडका, धन-समृद्धी हवी असेल, ज्या कशाची इच्छा असले ते मिळवायचे असेल तर जसे आरोग्य अत्यावश्‍यक असते तसेच मोक्ष ही सुद्धा जीवनाची गरज आहे हे समजून त्यादृष्टीने प्रयत्न करत राहणे श्रेयस्कर होय. 

आपल्यावरचा जबाबदाऱ्या पार पाडायच्या असल्या, पैसा, अडका, धन-समृद्धी हवी असेल, ज्या कशाची इच्छा असले ते मिळवायचे असेल तर जसे आरोग्य अत्यावश्‍यक असते तसेच मोक्ष ही सुद्धा जीवनाची गरज आहे हे समजून त्यादृष्टीने प्रयत्न करत राहणे श्रेयस्कर होय. 

आयुर्वेद हे आरोग्याचे शास्त्र असले तरी इतर सर्व प्राचीन भारतीय शास्त्रांप्रमाणे आयुर्वेदाचेही अंतिम लक्ष्य आत्मज्ञान, मोक्ष हेच आहे. शरीर, मन व आत्मा यांचा संयोग असतो, तोपर्यंत जीवन असते आणि जीवन-मरणाच्या चक्रातून सुटका होण्यासाठी मोक्षाची आकांक्षा असावी लागते. 
‘धर्मार्थकाममोक्षाणाम्‌ आरोग्यं मूलमुत्तमम्‌’ हे आयुर्वेदातील वचन मोक्षप्राप्तीसाठी सुद्धा, आरोग्य आवश्‍यक असते याची प्रचिती देणारे आहे. 

आयुर्वेदात दुःख हा शब्द फक्‍त मनाशी संबंधित वापरला जात नाही, तर निरनिराळे रोग, विकार यांनाही दुःख किंवा वेदना असे म्हटलेले आढळते आणि आयुर्वेदशास्त्राचे किंवा आयुर्वेदाचे उपचार करणाऱ्या वैद्याचे मुख्य कर्तव्य कोणते, तर वेदनांवर उपचार करणे. 
चरकसंहितेतील ‘कतिधापुरुषीय' अध्यायात या संबंधात गुरु-शिष्यात चाललेला संवाद दिलेला आहे. शिष्य विचारतो आहे, ‘‘वेदना भूतकाळात असू शकतात, वर्तमानात म्हणजे चालू असलेल्या काळातल्या असू शकतात किंवा भविष्यात उत्पन्न होणाऱ्या असू शकतात. वैद्य वेदनांवर उपचार करतो असे म्हणत असताना तो यापैकी नेमक्‍या कोणत्या काळातील वेदनांवर उपचार करत असतो? कारण भूतकाळातील वेदना निघून गेल्या, त्यांना उपचारांची गरज नाही, ज्या वेदना अजून उत्पन्नच झालेल्या नाहीत अशा भविष्यातील वेदनांवर आत्ता कसे काय उपचार करणार? आणि वर्तमान हा तर भूत आणि भविष्यातील केवळ क्षणापुरते अस्तित्व असणारा संधी आहे, त्यावर कसे उपचार करणार?'' शिष्याच्या या प्रश्नावर आचार्य उत्तर देतात, 
चिकित्सति भिषक्‌ सर्वास्त्रिकाला वेदना इति । ....चरक शारीरस्थान 
वैद्य भूत, वर्तमान आणि भविष्य अशा तिन्ही काळातील वेदनांवर उपचार करत असतो.

पूर्वी झालेला त्रास किंवा रोग पुन्हा झाला असता त्याला आपण भूतकाळाने संबोधतो म्हणजे आपण म्हणतो, काल डोके दुखत होते तसे पुन्हा दुःख लागले, गेल्या महिन्यात आला होता तसा ताप आला, पुन्हा पूर्वीसारखा खोकला झाला किंवा आठवड्यापूर्वी होत होत्या तशा वांत्या होऊ लागल्या. अशा वेळी पूर्वी होऊन गेलेल्या काळाला ध्यानात ठेवून उपचार करणे हे जणू भूतकाळात उपचार करण्याजोगे आहे. जसे एखादा शेतकरी विचार करतो की ज्या पुरामुळे मागच्या वर्षी पिकांचे नुकसान झाले, तो पूर येण्याची लक्षणे दिसत आहेत तेव्हा वेळीच बांध घालावेत. याचप्रमाणे वैद्यानेही पूर्वी झालेल्या रोगाची आठवण ठेवून उपचार करणे म्हणजे भूतकाळातील वेदनांवर उपचार करणे होय. 

भविष्यकाळातील वेदनांवरही उपचार करता येतात. पूर्वरूप म्हणजे रोग होण्याची प्रारंभिक लक्षणे दिसू लागली असता लगेच उपचार करणे म्हणजे अंग दुखते आहे, फार जांभया येत आहेत, अनुत्साह प्रतीत होतो आहे, अंगावर रोमांच येत आहेत याचा अर्थ भविष्यात ताप येणार आहे असे समजून लगेच तापाचे औषध घेणे ही भविष्यातील वेदनांवर केली जाणारी चिकित्सा आहे. 

वर्तमानकाळात केली जाणारी चिकित्सा ही तर सर्वांत महत्त्वाची होय. कारण यामुळे वर्तमानातील रोग तर बरा होतोच, पण बरोबरीने रोगाच्या परंपरेमुळे पुढे उद्भवणाऱ्या रोगमालेलाही प्रतिबंध करता येतो. आज पडसे झाले असताना जर त्यावर लागलीच योग्य उपचार केले तर त्यापासून पुढे खोकला, खोकल्यातून ताप, तापातून पुढे क्षयरोग अशी रोगांची साखळी टाळता येते. शरीरातील दोष व धातू यांचे समत्व कायम ठेवायचे आणि काही कारणांनी ते विषम (कमी-जास्ती) झाले तर त्यांना पुन्हा पूर्वपदावर आणायचे हे जे आयुर्वेदिक उपचारांमागचे मुख्य तत्त्व आहे ते यावरच आधारलेले आहे. 

हे झाले फक्‍त रोगाशी संबंधित वेदनेवर उपाय कसा करावा या संबंधातील वर्णन. सर्व आधी-व्याधी, सर्व ताप-संताप यांच्यामुळे उत्पन्न होणाऱ्या सर्व वेदनांवर उपचार आणि तेही मुळापासून करायचे असतील तर त्याचाही उपाय चरकाचार्य एका सूत्राद्वारे सांगतात. 
योगे मोक्षे च सर्वासां वेदनानाम्‌ अवर्तनम्‌ । 
मोक्षे निवृत्तिर्निःशेषा योगो मोक्षप्रवर्तकः ।
। 
...चरक शारीरस्थान 
योग व मोक्षामुळे सर्व वेदनांचा प्रतिबंध होत असतो. योग हा मोक्षापर्यंत पोचवणारा मार्ग आहे आणि मोक्षामुळे आत्यंतिक वेदनेचीही मुळापासून निवृत्ती होते. 
योगमार्ग म्हणजे नेमके काय आणि योगर्षि कोण असतात हे सुद्धा चरकसंहितेत सांगितले आहे. 
आत्मेन्द्रियमनोऽर्थानां सन्निकर्षात्‌ प्रवर्तते । 
सुखदुःखमनारम्भात्‌ आत्मस्थे मनसि स्थिरे ।
निवर्तते तदुभयं वशित्वं चोपजायते । 
सशरीरस्य योगज्ञास्तं योगमृषयो विदुः ।। 

आत्मा, इंद्रिय, मन आणि इंद्रियांचे विषय यांच्या संयोगातून सुख व दुःख हे दोन्ही अनुभूत होतात. जेव्हा मन आत्म्यामध्ये स्थिर होते तेव्हा मनुष्य स्वतःहून कशाचा आरंभ करत नाही (म्हणजे ज्यामुळे सुख मिळते त्याची इच्छा करत नाही किंवा ज्यामुळे दुःख होते त्याचा तिटकारा करत नाही.) अशा प्रकारे मन आणि आत्मा दोघे सुख-दुःखापासून निवृत्त झाले की आत्मा "वशी' म्हणजे स्वतः स्वतःच्या आधीन होतो, स्वतः जे अनुभवू इच्छितो तेच अनुभवण्यास स्वतंत्र होतो. या योगाला जाणणाऱ्या ऋषींना "योगर्षि' म्हणवले जाते.
 

योगर्षींच्या ठिकाणी पुढील सिद्धी असतात, 
- आवेश - दुसऱ्या व्यक्‍तीच्या शरीरात काय घडते आहे हे समजू शकणे 
- चेतसो ज्ञानम्‌ - दुसऱ्या व्यक्‍तीच्या मनात काय चालले आहे हे जाणू शकणे 
- अर्थानां छन्दतः क्रिया - शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयांना आपल्या मनानुसार परिवर्तित करू शकणे. उदा. कर्कश आवाज असणाऱ्या ठिकाणी सामान्य व्यक्‍तीला दुःख होईल मात्र योगर्षि व्यक्‍ती त्या कर्कश आवाजाचा स्वतःला त्रास होणार नाही अशा स्वरूपात परिवर्तित करू शकेल. एखाद्या ठिकाणी दुर्गंध असला तर योगर्षि त्याला सुगंधामध्ये परिवर्तित करू शकेल. 
- दृष्टिः - समोर नसणारी किंवा डोळ्यांनी न दिसणारी वस्तू बघू शकणे. 
- श्रोत्रं - कितीही दूरचा किंवा कानांनी ऐकू न येणारा आवाज ऐकू येणे 
- स्मृति - उत्तम स्मृती असणे म्हणजे सर्व भावातले मुख्य तत्त्व लक्षात येऊ शकणे. 
- कान्ति - उत्तम कांतियुक्‍त शरीर लाभणे 
या आठ सिद्धी म्हणजे योगर्षींचे बल असते, ज्याच्यायोगे ते ईश्वराची प्राप्ती करून घेऊ शकतात. हे सर्व तेव्हाच घडते जेव्हा मन शुद्ध असते, प्रसन्न असते. 
यातील पुढची अवस्था म्हणजे मोक्ष. 
मोक्षो रजस्तमोऽभावात्‌ बलवत्कर्मसंक्षयात्‌ । 
वियोगः सर्वसंयोगैः अपुनर्भव उच्यते ।। 

म्हणूनच जेव्हा रज व तम दोष निवृृत्त होतात आणि पूर्वीच्या कर्मांचा (प्रायश्चित्ताने) क्षय होतो तेव्हा सर्व कर्मबंधनांचा वियोग होतो. यालाच मोक्ष म्हणतात. एकदा मोक्ष मिळाला की पुन्हा पुन्हा जन्म-मरणाच्या चक्रात अडकावे लागत नाही. 

योगातून मोक्ष तर मिळतोच, पण त्याला सहायक असे अजूनही काही उपाय आयुर्वेदात सांगितले आहेत, 
- सद्वर्तन असणाऱ्या व्यक्‍तीचे मार्गदर्शन घेणे. 
- दुष्ट किंवा वाईट आचरण असणाऱ्यापासून दूर राहणे. 
- व्रत, उपवास व अनुशासन यांच्या योगे आत्मशुद्धीसाठी प्रयत्न करणे. 
- वेदादी शास्त्रांचा तसेच विज्ञानाचा अभ्यास करणे. 
- एकांत प्रिय असणे. 
- काम, क्रोधादी विषयात न अडकणे. 
- मोक्षप्राप्तीसाठी मनात दृढ इच्छा ठेवणे. 
- कायम धीरवृत्तीने वागणे. 
- ज्या कर्माचे बंधन होईल असे कर्म करण्यास प्रवृत्त न होणे. 
- पूर्वीच्या कर्मांचा क्षय होईल असे असे वागणे. 
- अहंकारी वृत्ती न ठेवणे. 
- सांसारिक विषयात थोडीही इच्छा नसणे. 
- मन व बुद्धी यांना समाधीत लीन करणे. 
- कोणत्याही पदार्थाचे, विषयाचे तत्त्व काय आहे हे जाणून मगच त्याचा स्वीकार करणे. 

अशा प्रकारे आपल्यावरचा जबाबदाऱ्या पार पाडायच्या असल्या, पैसा, अडका, धन-समृद्धी हवी असेल, ज्या कशाची इच्छा असले ते मिळवायचे असेल तर जसे आरोग्य अत्यावश्‍यक असते तसेच मोक्ष ही सुद्धा जीवनाची गरज आहे हे समजून त्यादृष्टीने प्रयत्न करत राहणे श्रेयस्कर होय.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Moksham Ichchet Janardanaat article written by Dr Shree Balaji Tambe