नवरात्री व शक्‍ती 

 Navratree and Shaktee
Navratree and Shaktee

बुद्धी व स्मरणशक्‍तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या विद्येची देवता म्हणजे सरस्वतीदेवी, कर्मशक्‍तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या संपत्तीची देवता म्हणजे लक्ष्मीदेवी, शरीरशक्‍तीच्या साहाय्याने दुष्ट व अभद्र गोष्टींचे नामोहरण करणारी दुर्गादेवी, संपूर्ण वैश्विक शक्‍तीवर अधिकार असणारी गायत्रीदेवी अशा सर्वच देवता शक्‍तीशी संबंधित असल्याचे सापडेल. कर्मबंधनातून सुटून स्वातंत्र्य व मुक्‍तीचा मार्ग मोकळा करण्यासाठी ज्या शक्‍तीची आवश्‍यकता असते, त्यासाठी नवरात्रोत्सव असतो. त्याचबरोबर शक्‍ती ही आपली आपण कमवावी लागते. शक्‍तीचा आभास निर्माण करता येत नाही. जीवनशक्‍ती, प्राणशक्‍ती उत्तम राहावी यासाठी रसायनांच्या बरोबरीने आहार संतुलित असणे आणि सातही धातूंचे पोषण करणारा असणे हेसुद्धा महत्त्वाचे होय. 

शिव-शक्‍ती, प्रकृती-पुरुष असे म्हणताना अस्तित्वाला शक्‍तीची गरज असते हे समजते. शक्‍ती आहे तोपर्यंत अस्तित्व आहे, आणि शक्‍तीचा ऱ्हास सुरू झाला की अस्तित्वही धोक्‍यात येते. या शक्‍तीला पुन्हा चैतन्याचा स्पर्श व्हावा, पुन्हा तजेला यावा यासाठी भारतीय संस्कृतीने "नवरात्र" या नऊ रात्रींसाठी चालणाऱ्या उत्सवाची योजना केली. 

पावसाळ्यात एकंदर वातावरण थोडे आळसावलेले असते. हवेतील दमटपणा, सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे जीवजंतूंना पोषक वातावरण तयार झालेले असते. शरीरस्थ अग्नी सुद्धा मंदावलेला असतो. पावसाळ्याच्या शेवटी शेवटी म्हणजे शरद ऋतूत ही मरगळ दूर होऊन पुन्हा उत्साह वाढायला सुरुवात होत असते. निसर्गातील या बदलाला सहकार्य मिळावे यासाठी नवरात्रात शक्‍तीची उपासना करण्याची योजना केलेली दिसते. आयुर्वेदात तर शक्‍तीला सर्वोत्तम स्थान दिलेले आहेच. शक्‍तीची रूपे गरजेप्रमाणे निरनिराळी असू शकतात, शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याला शारीरिक शक्‍तीची जास्ती आवश्‍यकता असेल, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला बौद्धिक शक्‍तीची जास्ती आवश्‍यकता असेल, एखाद्या कलाकाराला त्याच्यामधल्या प्रतिभाशक्‍तीची अधिक गरज असेल. प्राणशक्‍ती ही तर सर्वांत मोठी शक्‍ती, जिच्यामुळे आयुष्य चालू राहते. रोगप्रतिकारशक्‍तीसुद्धा महत्त्वाची, जिच्यामुळे आयुष्य निरोगी राहू शकते. 
शक्‍ती मिळवण्याच्या व अधिकाधिक टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने अनेक उपाय आयुर्वेदशास्त्रात सांगितले आहेत. आरोग्यपूर्ण जीवन जगण्यास आवश्‍यक असणाऱ्या सर्व अंगांचा विचार करून आयुर्वेदाने 'अष्टांग' संकल्पना समजावली. त्यातील दोन मुख्य अंगे म्हणजे रसायन व वाजीकरण. या दोघांचाही मुख्य उद्देश शक्‍ती संवर्धन व शक्‍तिसंरक्षण हाच आहे. कायचिकित्सा या अंगातही स्वस्थवृत्त, सद्‌वृत्ताच्या माध्यमातून शक्‍तीचा अपव्यय होणार नाही यासाठी मार्गदर्शन केलेले आहे. उदा. दिनचर्येत रोज करायला सांगितलेला अभ्यंग शरीरधातूंची शक्‍ती वाढवतो, त्यांना कणखर बनवतो, पादाभ्यंग करण्याने डोळ्यांची शक्‍ती वाढते. प्रकृतीनुरूप व्यायाम करण्याने एकंदर कार्यक्षमता वाढते, ऋतुमान व प्रकृतीनुरूप सात्त्विक व पौष्टिक आहार घेतल्याने व योग्य रसायनांचे सेवन करण्याने धातूंचे पोषण होऊन शरीरशक्‍ती मिळते. 

शक्‍ती अनाठायी खर्च होऊ नये यासाठी 'साहस' करू नये, म्हणजे शरीरशक्‍तीचा विचार न करता अत्याधिक परिश्रम करू नये असे सांगितले आहे. नदीच्या प्रवाहाविरुद्ध पोहू नये, फार उंच स्वरात फार वेळासाठी ओरडू नये, अति प्रमाणात हसू नये यासारखे नियम सांगतानाही त्यात शक्‍तीचा अपव्यय होऊ नये हाच उद्देश ठेवलेला आहे. मानसिक शक्‍तीचाही आयुर्वेदात विचार केलेला आहे. 
धारयेत्तं सदा वेगान्‌ हितैषी प्रेत्य चेह च। 
...अष्टांगहृदय सूत्रस्थान 
मानसिक वेग अर्थात राग, लोभ, असूया, दुःख, अहंकार वगैरे जे सगळे मानसिक भाव आहेत, त्यांच्यावर संयम ठेवावा. कारण या गोष्टींच्या आहारी गेल्यास शक्‍तीचा सर्वाधिक अपव्यय होऊ शकतो. कौमारभृत्यतंत्रात गर्भसंस्कारांद्वारे गर्भाची मूळ शक्‍ती अधिकाधिक विकसित होण्याच्या दृष्टीने अनेक उपाय सांगितले आहेत, 'ग्रहचिकित्सा' या अंगात अभौतिक शक्‍ती, अदृश्‍य जीवाणू, विषाणू, ग्रह वगैरेंपासून रक्षण मिळून शक्‍तिव्यय होण्यास प्रतिबंध होण्याच्या दृष्टीतून विविध उपाय सुचवलेले आहेत. 

नवरात्र हा देवीचा उत्सव. देवी या शब्दानेच तिचे सुंदर, सालंकृत, सुवर्णाचे दागिने घातलेले स्वरूप डोळ्यांसमोर येते. सुवर्ण हे श्रीमंतीचे प्रतीक नसते तर ते शक्‍तीचे मूर्तिमंत स्वरूप असते. म्हणून भारतासारख्या देशात प्रत्येक घराघरात, भले सुखसमृद्धीची इतर साधने असोत वा नसोत, परंतु थोडे तरी सोने नक्कीच असते. नवरात्रात देवीची उपासना करताना सुवर्णाचा सहवासही आपोआप मिळतो. नवरात्रीनंतर लगेच येणाऱ्या विजयादशमीच्या निमित्ताने तर सोने एकमेकांना दिले जाते. या सगळ्यांतून सुवर्णाचे शक्‍ती मिळण्यामधील योगदान अधोरेखित होत असते. 
आयुर्वेदात सुवर्णामधील शक्‍तिवर्धक गुण या शब्दात सांगितलेले आहेत, 
सुवर्णं स्वादु हृद्यं च बृंहणीयं रसायनम्‌ ।
दोषत्रयापहं शीतं चक्षुष्यं विषसूदनम्‌ ।। 

...सुश्रुत सूत्रस्थान 
सुवर्ण चवीला मधुर, हृदयासाठी हितकर, शरीरधातूंना पोषक व रसायन गुणांनी युक्‍त असते. तिन्ही दोषांना संतुलित करते, डोळ्यांसाठी हितकर असते आणि विषाचा नाश करते. 
स्वर्णं विधत्ते हरते च रोगान्करोति सौख्यं प्रबलेन्द्रियत्वम्‌ ।
शुक्रस्य वृद्धिं बलतेजपुष्टिं क्रियासु शक्‍तिं च करोति हेमम्‌ ।। 

...निघण्टु रत्नाकर 
सुवर्ण रोगांचा नाश करून सौख्य देते, इंद्रियांना सामर्थ्यवान बनवते. सुवर्णामुळे शुक्रधातू वाढतो, बल, तेज, पुष्टी यांची प्राप्ती होते व काम करण्याची शक्‍ती वाढते. 

सुवर्णामध्ये असे अनेक उत्तमोत्तम गुण असल्याने सुवर्णाचे नियमित सेवन करावे असे आयुर्वेदात सांगितले आहे. 
कानकं सेवनं नित्यं जरामृत्युविनाशनम्‌,दृढकायाग्निकरणम्‌ । 
...निघण्टु रत्नाकर 
सोन्याचे नियमित सेवन करण्याने वृद्धत्व येत नाही, अकाली मृत्यूची भीती राहात नाही, शरीर दृढ होते व जाठराग्नी उत्तम राहतो. 
सुवर्ण असो, इतर शास्त्रशुद्ध पद्धतीने बनविलेली रसायने असोत, त्यांच्या सेवनाने एकदा शक्‍ती मिळाली की मग ती हव्या त्या स्वरूपात रूपांतरित होऊ शकते. उदा. रसायन म्हणजे शुक्रधातू, ओजस वाढवणारा विशिष्ट 'औषध योग' असे समजले तर त्यापासून सर्व प्रकारच्या शक्‍ती मिळू शकतात, म्हणजे वर्ण उजळू शकतो. रोग बरा होऊ शकतो, आयुष्य वाढू शकते; स्मृती, बुद्धी, प्रज्ञासंपन्नता मिळू शकते. एवढेच नाही तर 'सौभाग्यवर्धन', 'अलक्ष्मीनाश', 'वाचासिद्धी' या गोष्टीही मिळू शकतात असे आयुर्वेदात सांगितले आहे. 

अर्थात उसनी, तात्पुरती किंवा इन्स्टंट पद्धतीने मिळवलेली शक्‍ती ही खरी शक्‍ती म्हणता येणार नाही. अनेक लोकांना दिवसभरामध्ये काम करण्यासाठी दर तीन-चार तासांनी कॉफीसारखे पेय प्यायची गरज भासते. कपभर कॉफी घेतल्यास थोडा वेळ ताजेतवाने वाटते, काम करायला हुरूप येतो हेही खरे, पण अशा तात्पुरत्या ओढून ताणून आणलेल्या शक्‍तीला खरी शक्‍ती नाही तर शक्‍तीचा केवळ आभास म्हणावा लागेल. या आभासाने कमी पडत असलेली शक्‍ती भरून निघणे तर दूरच, उलट असलेली शक्‍तीही कळत नकळत हळूहळू खर्ची पडते. आयुर्वेदाच्या नावाखाली आजकाल अशी अनेक इन्स्टंट शक्‍ती देणारी उत्पादने उपलब्ध होऊ लागली आहेत. पण जबरदस्तीने ओढून ताणून आणलेल्या क्षणिक शक्‍तीने मूळ आरोग्याचे नुकसानच होऊ शकते याचे भान ठेवणे चांगले. शक्‍ती ही आपली आपण कमवावी लागते. शक्‍तीचा आभास निर्माण करता येत नाही. 

जीवनशक्‍ती, प्राणशक्‍ती उत्तम राहावी यासाठी रसायनांच्या बरोबरीने आहार संतुलित असणे आणि सातही धातूंचे पोषण करणारा असणे हे सुद्धा महत्त्वाचे होय. आहाराची योजना उत्तम केली तरी त्याचे पचन करणारा अग्नी सुस्थितीत असणेही गरजेचे असते, त्यादृष्टीने वयाच्या पस्तिशी-चाळिशीला शास्त्रोक्‍त पद्धतीने म्हणजे आभ्यंतर स्नेहन, अभ्यंग, स्वेदन वगैरे पूर्वतयारी करून नंतर पंचकर्माच्या मदतीने शरीर शुद्ध करून घेणे आवश्‍यक. याला उत्तम जोड मिळू शकते ती प्राणायामादी श्वसनक्रियांच्या योगे. नियमित दीर्घश्वसन, अनुलोम-विलोम, ॐकार यांच्या मदतीने प्राणशक्‍ती अधिक प्रमाणात आकर्षित करता येते. वेळेवर व पुरेशा प्रमाणात झोप घेणे हे सुद्धा शक्‍तीसाठी सहायक असते. उगवत्या सूर्याचे दर्शन, सूर्योपासना, सूर्यनमस्कार हे सुद्धा शारीरिक मानसिक शक्‍तीसाठी मदत करतात. 

प्राचीन भारतीय शास्त्रात शक्‍तीला देवतास्वरूप मानले आहे. किंबहुना शक्‍तीच्या विविध स्वरूपांनाच आपण वेगवेगळ्या देवींची नावे दिलेली आहेत. बुद्धी व स्मरणशक्‍तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या विद्येची देवता म्हणजे सरस्वतीदेवी, कर्मशक्‍तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या संपत्तीची देवता म्हणजे लक्ष्मीदेवी, शरीरशक्‍तीच्या साहाय्याने दुष्ट व अभद्र गोष्टींचे नामोहरण करणारी दुर्गादेवी, संपूर्ण वैश्विक शक्‍तीवर अधिकार असणारी गायत्रीदेवी अशा सर्वच देवता शक्‍तीशी संबंधित असल्याचे सापडेल. आईवडिलांपासून किंवा पूर्वजन्माच्या इच्छा, आकांक्षांतून निर्माण झालेली कर्मबंधने जनुकांनी साठवलेली असतात आणि त्यामुळे मनुष्य बराचसा परस्वाधीन होतो. या बंधनातून सुटून स्वातंत्र्य व मुक्‍तीचा मार्ग मोकळा करण्यासाठी ज्या शक्‍तीची आवश्‍यकता असते व त्यासाठी जी उपाययोजना करायची त्यातून नवदुर्गा नवरात्र महोत्सवाची आवश्‍यकता लक्षात येऊ शकेल. 

श्रीसूक्‍त म्हणजे लक्ष्मीदेवीच्या आराधनेसाठी अथर्ववेदातील एक सूक्‍त. रसायन तयार करताना खास या श्रीसूक्‍ताच्या मंत्रांचा संस्कार करावा असा उल्लेख सुश्रुत संहितेत सापडतो. 
श्रीसूक्‍तेन नरः कल्ये ससुवर्णं दिने दिने ।
...सुश्रुत चिकित्सास्थान 
हजार वेळा श्रीसूक्‍त म्हणून त्याचा संस्कार केला व सुवर्णासह रसायन सेवन केले तर सर्व प्रकारच्या अलक्ष्मीचा नाश होतो. 

थोडक्‍यात, भारतीय संस्कृतीने योजलेला नवरात्र उत्सव हा अंतर्बाह्य शुद्धी करणारा आणि शक्‍ती वाढविणारा उत्सव होय. चला तर मग, पावसाळ्यामुळे वातावरणाला व शरीराला आलेली मरगळ झटकून देऊन 'शक्‍ती' उपासनेच्या मदतीने आरोग्याची प्राप्ती करून घेऊ या. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com