परिचारक हाच उपचार 

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Friday, 12 May 2017

वैद्यकीय वा शुश्रूषा ह्या व्यवसायात मनुष्यमात्राप्रती करुणा, दया व प्रेम स्वभावातच असणे आवश्‍यक आहे. या व्यवसायात काम करणाऱ्यांची "रुग्णसेवा ही सर्वांत मोठी परमेश्वरी उपासना आहे' ही श्रद्धा असणे आवश्‍यक असते. शुश्रूषा करण्यासाठी मनात दुसऱ्याची सोय, गैरसोय, पीडा समजून घेण्याची वृत्ती असणे आवश्‍यक असते. प्रत्येकाला कधी ना कधी कुणाची तरी शुश्रूषा करावी लागणार आहे हे उमजून फावल्या वेळात, सुट्टीत शुश्रूषा देण्याचे शिक्षण घेणे आवश्‍यक असते. शुश्रूषा करणे हा एक योग प्रकार आहे असे समजण्यास हरकत नाही. रुग्णाचा त्रास जाणून घ्यायचा असेल, तर परपीडा जाणून घेऊन मदत करणे हीच खरी आध्यात्मिक उपासना आहे, अशी श्रद्धा असणे आवश्‍यक ठरावे. 

मनुष्य आजारी पडला, हॉस्पिटलमध्ये राहावे लागले की मुख्य आजारापेक्षा परस्वाधीनता व एकटेपणा हाच मोठा आजार वाटतो. त्यावर महत्त्वाचा इलाज म्हणजे परिचारक. आपल्या पाठीशी कोणीतरी आहे, आपल्या जगण्याची कोणालातरी गरज आहे, मी बरा व्हावा अशी माझीच नव्हे तर इतरांचीही इच्छा आहे असे रुग्णाला वाटू लागते. शेवटी मन जेवढे प्रसन्न असेल तेवढी आजार मागे हटायला मदत होते. मनाची उमेद वाढली की औषधे लागू पडतात. 

शस्त्रकर्म झाले असल्यास शुश्रुषेची खूपच आवश्‍यकता असते. रोग्याला अधूनमधून कुशीवर वळविणे, त्याच्या मलमूत्रविसर्जनाची व्यवस्था करणे, त्याला अन्न, पाणी, औषधे वेळच्या वेळी देत राहणेही आवश्‍यक असते. अशा वेळी रोग्याला दिवसातून वेगवेगळ्या वेळी विशिष्ट औषधे घेणे आवश्‍यक असते. ती औषधे योग्य वेळी द्यायचे काम परिचारकच करत असतो. रोग्याला खोलीत एकटे सोडले तर त्याच्या मनात भलतेसलते विचार येऊन त्याला नैराश्‍य येऊ शकते. अशा वेळी असलेले दुःख त्याला अधिक प्रकर्षाने जाणवते. रात्री अपरात्री काही दुखणे वा तब्येतीत बदल होणे शक्‍य असल्याने रुग्णाच्या तब्येतीवर लक्ष ठेवणे आवश्‍यक असते. असा कुठला प्रसंग आला नाही तरी आपली शुश्रूषा करणारी व्यक्‍ती आपल्याजवळ आहे या विश्वासावर रुग्णाला झोप चांगली लागायला मदत होते. 

दीर्घकाळ चालणारा आजार असतो व रुग्णाला खूप दिवस अंथरुणात ठेवणे भाग असते तेव्हा तर शुश्रुषेचे महत्त्व खूप वाढते. फार दिवस आजारपण चालले तर तेच तेच काम करण्यामुळे शुश्रूषा करणाऱ्या परिचारकाला कंटाळा येणे शक्‍य असते. उपचार चालू असल्याने आपल्याला एका ठिकाणी पडून राहणे भाग आहे ह्या गोष्टीचा रोग्याने स्वीकार केला तरी परिचारकाला मात्र स्वतःला एका जागी बांधून घ्यावे लागते. शुश्रूषा करणाऱ्याला कंटाळा येऊ शकतो; पण या कारणास्तव परिचारक वारंवार बदलणे चांगले नसते. कारण रोग्याची सवय व डॉक्‍टरांच्या सूचना सगळ्यांनाच माहिती होणे अवघड असते, पण तरीही शुश्रूषा करणाऱ्याला विश्रांती मिळणे आवश्‍यक असते, जेणेकरून तो अधिक चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतो. 

रुग्ण घरी असल्यास शुश्रूषा करणाऱ्याला अधिकच काळजी घ्यावी लागते. कारण त्याला घरातील इतर व्यवधाने सांभाळावी लागत असल्याने रोग्याकडे थोडे दुर्लक्ष होण्याची शक्‍यता असते. तसेच रोग्याला भेटायला येणाऱ्यांच्या वर्दळीमुळे रोग्याकडे नीट लक्ष देणे अवघड होऊन बसते. 

रोग्याची घरात शुश्रूषा करण्याची वेळ येते, तेव्हा शुश्रूषा कशी करावी याबद्दल नीट माहिती करून घेणे खूप आवश्‍यक असते व ती माहिती रुग्णालयातील डॉक्‍टर वा नर्सेसकडून मिळू शकते. रुग्णालयात प्रशिक्षित परिचारक उपलब्ध असतो. 
औषध देताना त्याची मात्रा, अनुपान व वेळ या गोष्टी सांभाळणे आवश्‍यक असते. शिरेतून सलाईन, रक्‍त वगैरे देण्याची व्यवस्था केलेली असल्यास सलाईन, रक्‍त संपल्यावर लक्ष न दिल्यास रक्‍त उलटे येऊ शकते याचे भान शुश्रूषा करणाऱ्याने ठेवणे आवश्‍यक असते. 

रुग्णांसाठी घरी येऊन शुश्रूषा करणारे परिचारक उपलब्ध असतात. परंतु परिचारकाच्या अंगी सेवाभाव असणे आवश्‍यक असते. अशी वृत्ती असणाऱ्या परिचारकाने नंतर सर्व गोष्टी शिकून घेणे आवश्‍यक असते. बाहेर उपलब्ध असणारे परिचारक अनेकदा या कामाकडे केवळ पैसा मिळविण्याचे साधन म्हणून पाहत असतात व त्यांचे रोग्याकडे पूर्ण लक्ष राहतेच असे नाही. नर्सिंगचा व्यवसाय कायमचा पत्करल्यामुळे कधी कधी कंटाळा येणे साहजिक असते, म्हणून परिचारकाला अधूनमधून सुट्टी देणे आवश्‍यक असते. कंटाळा आल्याकारणाने रोग्याचा राग राग करणे, त्याने हाक मारली असताही लक्ष न देणे, रोग्याची गैरसोय करणे कदापि इष्ट नसते. 

काही वेळा रुग्णालयात गर्दी व आवश्‍यकतेनुसार खोल्या वाढविलेल्या असतात, परंतु नर्सेसची संख्या मात्र तेवढीच असल्याने शुश्रूषा नीट केली जात नाही. रुग्णासाठी नर्स उपलब्ध असली तरी रुग्णाच्या नातेवाईकांनी काही गोष्टी जाणून घेणे वा रुग्णाला व्यवस्थित शुश्रूषा मिळते आहे किंवा नाही, हे पाहणे आवश्‍यक असते. 
वास्तविक वैद्यकीय वा शुश्रूषा ह्या व्यवसायात मनुष्यमात्राप्रती करुणा, दया व प्रेम स्वभावातच असणे आवश्‍यक आहे. या व्यवसायात काम करणाऱ्यांची "रुग्णसेवा ही सर्वांत मोठी परमेश्वरी उपासना आहे' ही श्रद्धा असणे आवश्‍यक असते. केवळ पैसे मिळविण्यासाठी वैद्यकीय व्यवसाय पत्करलेला असल्यास डॉक्‍टरला चार पैसे मिळाले तरी रोग्याला त्रास होऊ शकतो. 

रुग्णाला भेटायला येणाऱ्यांनी रुग्णापासून किती अंतरावर बसायचे, किती वेळ बसायचे, एका वेळेला किती लोकांनी भेटायला यायचे यावरही परिचारकाने लक्ष ठेवणे आवश्‍यक असते. भेटायला येणाऱ्यांचा अनाहूत सल्ला वा नावाखातर देऊ केलेली सेवा यांचा बऱ्याच वेळा त्रास होऊ शकतो. रुग्ण बोलायच्या अवस्थेत नसल्यास यावर नियंत्रण ठेवण्याचे कामही शुश्रूषकालाच पार पाडावे लागते. रुग्णाला एका जागेहून दुसऱ्या जागी हलवत असताना विशेष काळजी घ्यावी लागते. काही वेळा रुग्णाचा उत्साह ओसंडत असला तरी त्याने खुर्चीवरून वा स्ट्रेचरवरून जाणे कसे योग्य आहे हे रुग्णाला समजावून त्यानुसार व्यवस्था करावी लागते. 

शुश्रूषा करण्यासाठी मनात दुसऱ्याची सोय, गैरसोय, पीडा समजून घेण्याची वृत्ती असणे आवश्‍यक असते. प्रत्येकाला कधी ना कधी कुणाची तरी शुश्रूषा करावी लागणार आहे हे उमजून फावल्या वेळात, सुट्टीत शुश्रूषा देण्याचे शिक्षण घेणे आवश्‍यक असते. शुश्रूषा करणे हा एक योग प्रकार आहे असे समजण्यास हरकत नाही. रुग्णाचा त्रास जाणून घ्यायचा असेल तर परपीडा जाणून घेऊन मदत करणे हीच खरी आध्यात्मिक उपासना आहे, अशी श्रद्धा असणे आवश्‍यक ठरावे. 

शुश्रूषा करण्याची संधी मिळणे ही परमेश्वराच्या सेवेची व त्याच्या जवळ जाण्याची संधी मिळाली आहे, असे समजून प्रत्येकाने शुश्रूषा करण्याची तयारी ठेवणे आवश्‍यक आहे. 

डॉ. श्री बालाजी तांबे 
आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला 410 405 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nurse family doctor balaji tambe