अन्नपानविधी

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 7 June 2019

आहार षड्‍रसपूर्ण असावा, असे आयुर्वेदात अनेक ठिकाणी सांगितलेले आहे. हे सहा रस म्हणजे मधुर, आंबट, खारट, कडू, तिक्‍त व तुरट. या प्रत्येक चवीची काही विशेषतः असते.

आहार षड्‍रसपूर्ण असावा, असे आयुर्वेदात अनेक ठिकाणी सांगितलेले आहे. हे सहा रस म्हणजे मधुर, आंबट, खारट, कडू, तिक्‍त व तुरट. या प्रत्येक चवीची काही विशेषतः असते.

आयुर्वेदात आरोग्यरक्षणासाठी जे सर्व बाजूंनी मार्गदर्शन केलेले आहे, त्याला तोड नाही. उपचार, औषधे समजावण्यासाठी आधी आयुर्वेदात अन्नपानाचे गुण-दोष विस्तारपूर्वक सांगितले आहेत. आहारयोजना करताना ज्या गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या, त्यांची माहिती आपण मागच्या वेळी घेतली. या पुढचा भाग आता पाहूया. 

द्राक्षासवो दीपयति : द्राक्षासव अग्निसंदीपन करणारे असते. भूक लागत नसेल, पचन नीट होत नसेल तर २-२ चमचे द्राक्षासव घेणे हितावह असते. 
फणितम्‌ अचिनोति : काकवी हा उसाच्या रसापासून बनविलेला एक द्रवपदार्थ. तो शरीरात दोष साठविणारा असतो. 

दधि शोफं जनयति : दही सूज निर्माण करणारे असते. त्यामुळे दही रोज खाण्याची सवय चांगली नाही. ताजे दही घुसळून त्यातील लोणी काढून टाकले की जे ताक तयार होते, ते मात्र सूज कमी करण्यासाठी औषधाप्रमाणे उपयोगी असते. म्हणून आपल्या भारतीय परंपरेत दुपारच्या जेवणानंतर ताक पिण्याची पद्धत आहे. 

पिण्याकशाकं ग्लपयति : पिण्याक म्हणजे तिळाचा कल्क किंवा तीळ वाटून केलेला गोळा. असे वाटलेले तीळ लावून केलेली भाजी ग्लानी आणणारी असते.

प्रभूतोन्तर्मलो माषसूपा : उडदापासून तयार केलेली आमटी किंवा वरण हे मळ (विष्ठा) अधिक प्रमाणात तयार करणारे असते. 

दृष्टिशुक्रघ्नः क्षार : क्षार हा दृष्टी आणि शुक्र यांचा नाश करणारा असतो. वनस्पतींवर विशेष संस्कार करून त्यातील लवणयुक्‍त भाग वेगळा करणे म्हणजे क्षार तयार करणे. आघाडा क्षार, चिंच क्षार अशा प्रकारे काही विशिष्ट वनस्पतींपासून क्षार तयार करता येतात. क्षार उत्तम पायक असतात. पण ते दृष्टी व शुक्रधातूसाठी अपायकारक असतात. 

आहार षड्‍रसपूर्ण असावा असे आयुर्वेदात अनेक ठिकाणी सांगितलेले आहे. हे सहा रस म्हणजे मधुर, आंबट, खारट, कडू, तिक्‍त व तुरट. या प्रत्येक चवीची काही विशेषतः असते. यापुढे चरकाचार्य या सहा चवींची माहिती देतात. 
प्रायः पित्तलम्‌ अम्लम्‌ अन्यत्र दाडिमामलकात्‌ : आंबट चव ही सहसा पित्तकर असते. याला अपवाद असतो तो डाळिंब व आवळ्याचा. म्हणून आहारयोजना करताना जर आंबट चव हवी असेल, पण पित्त वाढायला नको असेल तर डाळिंब व आवळ्याची योजना करता येते. 

प्रायः श्‍लेष्मलं मधुरम्‌ अन्यत्र मधुनः पुराणाच्च शालियवगोधूमात्‌ : मधुर रस हा सहसा कफवर्धक असतो याला अपवाद असतो तो मध, जुना तांदूळ, जव आणि गहू या गोष्टींचा. 

म्हणजे या गोष्टी चवीला गोड लागतात, परंतु कफदोष वाढवत नाहीत. मधुमेह असला की सहसा गोड गोष्टींवर निर्बंध येतो. अशा वेळी औषध जरी मधाबरोबर घ्यायला दिले तरी मनात शंका असते. मात्र मध गोड असला तरी कफ दोष वाढवत नसल्याने प्रमाणात घ्यायला हरकत नसते हे चरकसंहितेतील या सूत्रावरून समजते. 

प्रायः कटुकं वातलं अवृष्यं च अन्यत्र पिप्पलीभेषजात्‌ : सर्वसाधारणपणे तिखट चव वातूळ व शुक्रधातूसाठी अहितकर असते, याला अपवाद पिंपळीचा असतो. पिंपळी एक वर्ष जुनी वापरावी असेही आयुर्वेदात सांगितलेले आहे, पिंपळीचा विपाक मधुर असतो, त्यामुळे ती एक उत्तम रसायन म्हणून ओळखली जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nutrition Food Ayurved