निरोगी दीर्घायुष्यासाठी हवे ‘ओजस्‌’

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 8 December 2017

रसधातूपासून ते शुक्रधातूपर्यंत सातही धातूंमधील साररूप तेज म्हणजे ‘ओजस्‌’. ओज हे दोष, धातू या सगळ्यांपेक्षाही वरच्या पातळीवरचे अतिशय तरल व अनन्यसाधारण क्षमता असणारे तत्त्व आहे. वात-पित्त-कफ संतुलित असले, सर्व धातू निरोगी असले तरी काही कारणाने ओजक्षय झाला तर आरोग्य बिघडते.

काही व्यक्‍तींच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते, काही व्यक्‍तींच्या संपर्कात आल्यावर आपोआप प्रसन्न वाटायला लागते. उदा. लहान मुले आसपासच्या लोकांचे लक्ष आपोआप वेधून घेणारी असतात, नवीन लग्न झालेल्या स्त्रीच्या अंगावर वेगळेच तेज येते किंवा दिवस राहिले की गर्भारपणाचे तेज काही वेगळेच असते. या ठिकाणी आकर्षणामागे सौंदर्यापेक्षा तेजस्विता अधिक महत्त्वाची असते. आणि याला कारणीभूत असते ‘ओजस्‌’ हे तत्त्व. आयुर्वेदातील ही एक विशेष संकल्पना आहे जी आरोग्य, उत्साह, प्रतिकारशक्‍ती, सकारात्मकता, सुखी दीर्घायुष्य अशा अनेक गोष्टींना कारणीभूत असते.

शरीर घडविण्यासाठी, शरीर तयार होण्यासाठी सात धातू आवश्‍यक असतात. अन्नातून या सप्तधातूंचे निरंतर आणि योग्य प्रकारे पोषण व्हावे  लागते. रसधातूपासून ते शुक्रधातूपर्यंत धातू तयार होताना पुढचे पुढचे धातू अधिकाधिक शुद्ध आणि तरल होत असतात. ओजस्‌ मात्र धातूंच्याही पलीकडचे असते, म्हणूनच सर्वश्रेष्ठ समजले जाते. 

रसादीनां शुक्रान्तानां धातूनां यत्‌ परं तेजस्तत्‌ खल्वोजस्तदेव बलमित्युचते ।....सुश्रुत सूत्रस्थान

रसधातूपासून ते शुक्रधातूपर्यंत सातही धातूंमधील साररूप तेज म्हणजे ‘ओजस्‌’. ओज हे दोष, धातू या सगळ्यांपेक्षाही वरच्या पातळीवरचे अतिशय तरल व अनन्यसाधारण क्षमता असणारे तत्त्व आहे. वात-पित्त-कफ संतुलित असले, सर्व धातू निरोगी असले तरी काही कारणाने ओजक्षय झाला तर आरोग्य बिघडते. ओज हे शरीरातील सर्व अवयवांना तृप्ती देते, प्रसन्न करते म्हणजे त्यांचे कार्य व्यवस्थित व अधिकाधिक उत्तम प्रकारे चालवते.

सर्व शारीरिक, मानसिक, बौद्धिक कार्ये ओजाच्या तेजबलावरच अवलंबून असतात. सर्व इंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार या सूक्ष्म शरीरतत्त्वांनादेखील ओजाचा आधार लागतोच. मनाची स्थिरता, विवेकबुद्धी याही गोष्टी ओजावरच अवलंबून असतात. ओजामुळेच वर्ण उत्तम राहातो, स्वर संपन्न राहातो, रोगप्रतिकारशक्‍ती कार्यक्षम राहाते. अर्थात असे हे ओजतत्त्व कमी होऊ नये यासाठी दक्ष राहायला हवे.  ओज कमी कशामुळे होते याची कारणे सुश्रुतसंहितेत याप्रमाणे दिली आहेत.

अपघात, मानसिक आघात, धातुक्षय - म्हणजे कोणत्याही कारणाने रक्‍तक्षय होणे, मधुमेह, एड्‌ससारख्या व्याधींमुळे धातूंची झीज होणे, शरीरातील एखादा अवयव काढून टाकणे वगैरे, अति मैथुन, हस्तमैथुनादी सवयींमुळे होणारा वीर्यक्षय तसेच संपूर्ण अनशन (उपवास), अति श्रम, क्रोध, शोक, चिंता वगैरे मानसिक भावांमुळे ओजक्षय होतो.

‘चिंता पोखरते’ असे आपण व्यवहारात म्हणतो तेव्हा ती ओजाला पोखरत असते, ओज कमी झाले की चिंता अजूनच वाढते ज्यामुळे ओज अजूनच कमी होते. या दुष्टचक्रातून बाहेर येण्यासाठी चिंता कमी करणे या उपायाबरोबरच ‘ओज वाढवणे’ हा त्याहून महत्त्वाचा उपाय आहे. सगळ्याच मानसरोगात मनाची ताकद वाढवायची असेल तर ओज सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात.

ओजस्‌ हे संपूर्ण शरीराचे सारस्वरूप असल्याने त्याच्यात काही बिघाड झाला किंवा क्षय झाला तर शरीर, मनाचे मोठे नुकसान होते व खालील लक्षणे दिसू लागतात.

  ताकद कमी होते, शरीर व मन दोघेही पटकन थकतात.
  आत्मविश्वास राहात नाही, सतत कसली तरी भीती वाटते, काळजी वाटते.
  सर्व इंद्रिये मलूल होतात, काही करावेसे वाटत नाही, करायला घेतले तरी होत नाही.

त्वचा कोरडी पडते, कांती निस्तेज होते, काळवंडते.
  डोळे सदैव थकलेले आणि निस्तेज होतात.
  वजन अकारण कमी होते, मनुष्य खंगत जातो.
  रोगप्रतिकारशक्‍ती कमी होते.
  छोट्या छोट्या गोष्टींनी मनात शंका-कुशंका येतात, मन चिंताग्रस्त राहते.

या सर्व त्रासांना प्रतिबंध करायचा असेल किंवा यातून बाहेर पडायचे असेल तर ओजाचे वर्धन होईल, ओजाची जोपासना होईल याकडे लक्ष ठेवायला हवे. ओजवर्धनासाठी आयुर्वेदात खालील उपाय सुचविलेले आहेत. 

स्नग्धशीतानि लघूनि च हितानि च ।
र्नान्याहुः ।। ...काश्‍यपसंहिता सूत्रस्थान

स्निग्ध, शीत व पचायला हलके असे सर्व प्रकृतीला अनुकूल पदार्थ ओजाचे पोषण करतात. उदा. दूध, लोणी-साखर, तूप, पंचामृत, उत्कृष्ट वीर्यवान औषधांपासून शास्त्रीय पद्धतीने बनवलेली रसायने, जीवनीय औषधे ही ओजपोषक होत. तसेच मनाची प्रसन्नता ओजाचे पोषण करत असते. मन प्रसन्न ठेवणे म्हणजे मनाला हवे तसे वागणे नाही तर समाधानी वृत्ती, संतुष्टता व मनाला खऱ्या अर्थाने तृप्ती देणाऱ्या गोष्टींचे आचरण करण्याने ओजाचे पोषण होऊ शकते. मनःशांती देणाऱ्या उपायांनी उदा. आवडत्या विषयात मन रमवणे, योगासने, प्राणायाम, ध्यान, स्वास्थ्यसंगीत ऐकणे वगैरे उपचारांनीही ओजाचे पोषण होते.

ओजतत्त्वाला पूरक अशा काही करण्यासारख्या गोष्टी खालीलप्रमाणे सांगता येतील.

  आहार - चरकसंहितेत ओजाचे गुण मधुर, शीत, स्निग्ध, गुरु, मृदू असे सांगितले आहेत. त्यामुळे आहार मधुर, स्निग्ध, शीतवीर्य, लघू व हितकर असणे ओजासाठी हितावह असते. उदा. दूध, लोणी, तूप, पंचामृत, मनुका, बदाम, खडीसाखर, खारीक, लाह्या वगैरे 

  रसायन - आहाराला ‘रसायनां’ची जोड देण्याने ओजतत्त्वाचे उत्तम पोषण होत असते. शतावरी, आवळा, अश्वगंधा, गोक्षुर, विदारीकंद वगैरे वीर्यवान वनस्पतींपासून बनवलेले च्यवनप्राश, धात्री रसायन, आत्मप्राश, अमृतशतकरा शतावरी घृत, पद्म घृत वगैरे रसायने यादृष्टीने उत्तम असतात.
 
औषधांनी संस्कारित तेलाने अभ्यंग - आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये औषधी तेलाचे अनेक पाठ असे आहेत, ज्यांच्या फलश्रुतीमध्ये बल, वर्ण, पुष्टी, सौभाग्य यांचे वर्धन होते असा उल्लेख आहे, जे ओजतत्त्वाच्या आधीन आहेत. प्रत्यक्षातही सिद्ध तेलाचा नियमित वापर करणाऱ्यांचे आरोग्य, शक्‍ती, उत्साह टिकून राहते असे दिसते.
 
पंचकर्माद्वारा शरीरशुद्धी - वेळीच शरीरातील मलभाग, अशुद्धी, विषतत्त्वे यांचा निचरा झाला की पचन सुधारते, पर्यायाने सर्व धातू चांगल्या प्रतीचे तयार होतात आणि त्यातून धातूंच्या सारस्वरूप ओजतत्त्वाचा उत्तम परिपोष होतो. शास्त्रोक्‍त पद्धतीने पंचकर्म केल्यानंतर अनुभवाला येणारा हलकेपणा, स्फूर्ती, सतेज कांती हे याचेच प्रतीक असते. 

  व्यसन टाळणे - कोणत्याही मादक पदार्थाचे व्यसन उदा. दारू, तंबाखू, भांग, गांजा, वगैरे व्यसन असल्यास त्यापासून स्वतःची सुटका करून घेणे आवश्‍यक होय कारण मादक पदार्थ सरळसरळ ओजाचा नाश करणारे असतात. 
  पुरेशी आणि शांत झोप, प्रसन्न मन, समाधानी वृत्ती हीसुद्धा ओजवर्धनास सहायक असते. 

यस्य नाशात्‌ तु नाशोऽस्ति धारि यत्‌ हृदयाश्रितम्‌ 
यच्छरीररसस्नेहः प्राणा यत्र प्रतिष्ठिताः ।।...चरक सूत्रस्थान

या शब्दात चरकाचार्यांनी ओजाचे वर्णन केलेले आहे. अर्थात ज्याच्या नाशामुळे शरीराचा नाश होतो, जे हृदयाच्या आश्रयाने राहते, जे सर्व शरीरधातूंतील परमसारस्वरूप आहे अशा ओजाच्या ठायी प्राण प्रतिष्ठित असतात. 
तेव्हा असे ‘ओजस्‌’ शरीरात निरंतर राहील याकडे लक्ष दिले तर आरोग्यपूर्ण दीर्घायुष्याचा लाभ तर होईलच, बरोबरीने उत्साहपूर्ण व स्फूर्तियुक्‍त जीवन जगता येईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ojas for healthy longevity