कर्करोगाच्या वेदना

The pain of cancer
The pain of cancer

वेदना हा कर्करोगाच्या उपचारातील अपरिहार्यपणे सहन करण्याजोगा भाग नाही. रुग्णांनी वेदना होत असल्यास त्या दडवून ठेवण्याची गरज नाही. त्या सांगितल्या तर त्यावर वेळीच उपचार करता येतात. वेदनाविरहित जगण्याचा आनंद घेतला पाहिजे. 

अगदी काल-परवाचीच गोष्ट आहे. एक काका हताश, उदास होऊन माझ्या केबिनमध्ये येऊन बसले. त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांना आयुष्यात कोणताही रस, उत्साह उरला नसावा, असे वाटले. थोडे फार औपचारिक बोलणे झाले आणि त्यांच्या एका वाक्यावर मी थबकले. ‘‘आता काय मॅडम, मरेपर्यंत हा त्रास आणि दुखणे सहन करण्याशिवाय काही पर्याय नाही. रोज काहीतरी नवीन दुखणे. तीव्र वेदना होतात. कॅन्सरची भीती नाही; पण दुखण्यामुळे मन कशात लागत नाही. कोणाला रोज किती काय काय सांगणार?’’ असे केवळ ते काकाच सांगतात असे नाही तर, अनेक रुग्ण येऊन बोलतात. वेदनांपासून आजीवन सुटका होणार नाही, अशीच त्यांची समजूत असते. 

 

कर्करोगाचा साधा उल्लेख केला तरी भल्याभल्यांच्या जीवाचा थरकाप उडतो. जगभरात दरवर्षी साधारण एक कोटी ८० लक्ष लोकांना कर्करोगाचा सामना करावा लागतो. भारतामध्ये २०१८ मध्ये कर्करोगाच्या साडेअकरा लाख नवीन घटना समोर आल्या. जन्माला येणारे प्रत्येक शरीर हे कोशिका, पेशींनी बनलेले असते. जन्मापासून मृत्यूपर्यंत या पेशींमध्ये आमूलाग्र बदल घडत असतात. जुन्या आणि मृत झालेल्या पेशी आणि कोशिकांच्या जागी आपले शरीर नव्या पेशी तयार करीत असते. जनुकीय रचनेची ही साखळी नियंत्रित ठेवण्याचे काम शरीर अव्याहतपणे करीत असते. किंबहुना त्यावरच मानवी आरोग्याची घडी अवलंबून असते. पण, मृत पेशींच्या तुलनेत कितीतरी पट अधिक वेगाने नव्या पेशींची वाढ जेव्हा नियंत्रणाबाहेर होते, तेव्हा शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी पडते. पेशींची अनियंत्रित, अमर्याद वाढ नियंत्रणात ठेवण्यात शरीर प्रतिसाद देत नाही. ही अवस्था म्हणजेच कर्करोग, हे आधी समजून घेतले पाहिजे. या अनियंत्रित वाढीव पेशींमधील द्रव्ये, घटक हे गाठ वा ट्यूमरमध्ये रूपांतरित होतात. याच गाठी शरीरातल्या अंतर्गत अवयवांवर आक्रमण वा त्यांच्या कार्यात ढवळाढवळ करून शरीरावर ताण आणतात वा एखाद्या अवयवाचे कार्यही बंद पाडण्यास कारणीभूत ठरतात. हल्लीच्या उपचारतंत्राने यावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. आजाराचे वेळीच निदान झाले, तर यावरही मात करता येणे शक्य आहे.  
 

कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वेदना हा अतिशय गंभीर मुद्दा असतो. कर्करोगाच्या बहुतांश रुग्णांना तीव्र वेदनांना सामोरे जावे लागते. या क्षेत्रात आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा तसेच औषधांचा वापर केला जातो. त्यामुळे अनेक प्रकारचे कर्करोगांचे निदान व उपचार तुलनेने लवकर होणे शक्य झाले आहे. ओघाने दर वर्षी पूर्णपणे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. वेगवेगळ्या संशोधनामधून सिद्ध झाले आहे की, अनेक रुग्णांना कर्करोगाशी निगडित किंवा उपचारांसंबंधित वेदनांचा त्रास होतो. कर्करोगाच्या वेदनांमुळे रुग्णाला मानसिक, शारीरिक तसेच सामाजिक खच्चीकरण होते. हालचालींवर मर्यादा येतात, अवलंबत्व वाढते. 
कर्करोगाचा सामना करणे हे केवळ रुग्णापर्यंत मर्यादित नसते. रुग्णाचे कुटुंब, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांनाही या परिस्थितीला सामोरे जावे लागते. रुग्णाची काळजी घेणाऱ्या सर्वांनाच या परिस्थितीचा ताण येतो. आपल्या जवळच्या व्यक्तीला कर्करोग झालेला पाहून इतर सर्व लोक मानसिकदृष्ट्या दुर्बल होतात. रुग्णाच्या आजूबाजूच्या लोकांना रुग्णाला सर्वतोपरी सहकार्य करावे लागते. रुग्णाला औषधे देणे, त्याला हालचाल करण्यास मदत करणे, रुग्णावर झालेल्या दुष्परिणामांना हाताळणे, रुग्णाची काळजी घेणे, डॉक्टरांबरोबर संपर्क ठेवणे अशी अनेक महत्त्वाची कामे रुग्णाच्या जवळच्या व्यक्तींना करावी लागतात. कर्करोगाच्या वेदना या आजारामुळे असतात. काही घटनांमध्ये उपचारांमुळे रुग्णाला वेदना होतात, तर काही वेळेला या दोन्हीशी संबंध नसताना रुग्णाला वेदनांचा त्रास होतो. 

कर्करोगामुळे होणाऱ्या वेदना 
शरीरात ट्यूमरची वाढ होते. त्याचा ताण आजूबाजूच्या पेशींवर येतो. त्यामुळे रुग्णाला वेदना सुरू होतात. डोक्याच्या, मानेच्या तसेच मूत्राशयाच्या, जननेंद्रिये व मूत्रमार्ग या दोन्हीशी संबंधित, गर्भाशयाच्या, स्तनाच्या आणि स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांना या वेदनांना जास्त प्रमाणात सामोरे जावे लागते. 

उपचारांमुळे होणाऱ्या वेदना 
यामध्ये शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या वेदना, रेडिएशनमुळे होणाऱ्या वेदना, केमोथेरपीमुळे होणाऱ्या वेदना, तसेच हार्मोनल थेरपीदरम्यान होणाऱ्या वेदना यांचा समावेश होतो. 

हाडांच्या वेदना 
कर्करोग शरीरातील हाडांमध्ये पसरत जातो. हाडांच्या पेशींना त्यामुळे इजा पोचते. 

मृदू पेशींच्या वेदना 
शरीरातील स्नायूंना किंवा अवयवांना होणाऱ्या वेदना म्हणजे मृदू पेशींच्या वेदना होय. स्नायूत पेटका येणे (क्रॅम्प येणे), धडधड येते, दुखणे यातून मृदू पेशींच्या वेदना लक्षात येतात. 

नसांमध्ये होणाऱ्या वेदना 
आग होणे, अचानक होणाऱ्या वेदना, झिणझिण्या येणे, अवयव सुन्न होणे, एखादा कीटक त्वचेखाली फिरत असल्याची भावना अशा प्रकारच्या वेदना या प्रकारात मोडतात. कर्करोगाच्या शस्त्रक्रियेमुळे किंवा रेडिओथेरपी तसेच केमोथेरपीमुळे अशा प्रकारच्या वेदना उद्भवू शकतात. 

कर्करोग किंवा त्याच्या उपचारांसंबंधित नसलेल्या वेदना 
स्लिप डिस्क, डायबेटिक न्यूरोपॅथी या आजारांमुळे होणाऱ्या वेदनांचा या प्रकारात समावेश होतो. 

फँटम पेन 
रुग्णाच्या शरीरातील एखादा भाग काढून टाकला असेल तर त्या काढून टाकलेल्या भागात होणाऱ्या वेदनांना फँटम पेन असे म्हणतात. 

तोंड येणे 
केमोथेरपीमुळे रुग्णाच्या तोंडात इजा होण्याची शक्यता असते. ही इजा तोंड येणे म्हणजेच तोंडात जखमा होणे या स्वरूपात असू शकते. त्यामुळे रुग्णाला तोंडात आणि घशात वेदना जाणवतात. कित्येक घटनांमध्ये या वेदना इतक्या तीव्र असतात, की रुग्णाला अन्नपदार्थांचे ग्रहण करताना तसेच बोलताना त्रास होतो. 

रेडियोथेरपीनंतर होणाऱ्या वेदना 
रेडियोथेरपी हा कर्करोगाच्या उपचारांचा एक भाग आहे. रेडियोथेरपीमुळे रुग्णाची त्वचा भाजल्यासारखी होणे, तोंड येणे तसेच त्वचेवर व्रण उठणे या इजांना रुग्णाला सामोरे जावे लागते. यामुळे रुग्णाला वेदना होतात. रेडियोथेरपीमुळे रुग्णाच्या घसा, आतडे आणि मूत्राशयावरसुद्धा परिणाम होण्याची शक्यता असते. 
वेदना व्यवस्थापन करताना काही वेळा अडथळे येण्याची शक्यता असते. त्याची मुख्य कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 

 

- वेदनाशमन होण्यासाठी (ओपिऑइड्स) दिल्या जाणाऱ्या औषधांचा डोस कमी प्रमाणात दिला जातो. कारण, या औषधांची भीती रुग्ण, डॉक्टर, रुग्णाचे कुटुंबीय, नर्सेस यांच्या मनात असते. 
 

- वेदनाशमन गोळ्यांवर सरकारचा प्रतिबंध असणे. 
 

- रुग्णाची आर्थिक परिस्थिती व मर्यादा काही वेळेला अडथळा ठरते. 
 

- काही घटनांमध्ये रुग्ण वेदना लपवून ठेवतात. यामागे काही चुकीच्या समजुती असतात. सर्वांना मी सहनशील रुग्ण आहे असे वाटावे, अशी भावना यामागे असते. 
 

- वेदना या रोगाचा अपरिहार्य भाग आहे, असा रुग्णांचा समज वेदना व्यवस्थापनातील अडथळा ठरतो. 
 

- आजाराच्या सुरवातीच्या काळात वेदनाशमन गोळ्यांचा वापर केल्यास आजाराच्या नंतरच्या काळात गोळ्यांचा परिणाम होणार नाही, असा गैरसमज असणे. 
 

- वेदनाशमन गोळ्यांची सवय लागण्याची भीती असणे. 
 

- वेदनाशमन गोळ्यांचे दुष्परिणाम होण्याची भीती असणे. 
 

- कर्करोगाच्या वेदनांचा संबंध थेट रुग्णाच्या मानसिक परिस्थितीशी जोडला गेला आहे. या वेदनांमुळे रुग्णाला मानसिक अस्वास्थ्य, उदासीनता, औदासीन्य याचा त्रास होतो. वेदना व्यवस्थापनाचा उपयोग रुग्णाला आपली मानसिक स्थिती सुधारण्यासाठीही होतो. 

काही घटनांमध्ये आजूबाजूची परिस्थिती रुग्णाच्या वेदना नियंत्रण करण्याच्या क्षमतेवर थेट परिणाम करते. असे काही घटक पुढीलप्रमाणे ः 
- ताण, उदासीनता असे मानसिक घटक 
- रुग्णाची सहनशीलता 
- रुग्ण आशादायी नसणे 
- मानसिक अस्वास्थ्य 
- कौटुंबिक आधार नसणे 

दैनंदिन कामांमध्ये थोडा बदल करून औषधे आणि फिजिओथेरपी यांचा उपयोग करून वेदनाशमन अतिशय योग्य प्रकारे करता येते. जागतिक आरोग्य संघटनेने साध्या वेदनाशमन गोळ्यांपासून उत्तेजित नसांना शांत करण्यासाठीच्या गोळ्यांचे सूत्र तयार केले आहे. रुग्णाच्या वेदना व्यवस्थापनेमध्ये याचा अतिशय उपयोग होतो. काही घटनांमध्ये रुग्णाच्या वेदना केवळ औषधाने कमी होत नाहीत. अशा वेळी इंजेक्शन्स तसेच शस्त्रक्रिया हासुद्धा पर्याय विचारात घेतला जातो. अत्याधुनिक उपचार पद्धतीमध्ये रुग्णाच्या मणक्यात औषधी द्रव्य सोडले जाते. त्यामुळे वेदना व्यवस्थापनाची परिणामकारकता वाढते. या औषधी द्रव्यांचे प्रमाण अतिशय कमी असते. जेणेकरून त्याची सवय लागणार नाही. वेदना जाणवू लागल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. लवकर निदान झाल्यास रुग्णाला या खर्चीक उपचारांपासून सुटका मिळते. तसेच रुग्ण पूर्वस्थितीत येण्याची शक्यताही जास्त असते. 

विनावैद्यकीय उपचार आणि वेदना 
वेदनाशमन औषधांबरोबरच इतरही अनेक पद्धतींचा वापर करून वेदना कमी करता येतात. यामध्ये रुग्णाची विश्रांती, रुग्णाला आवडत्या गोष्टीत मन रमवणे, बायोफीडबॅक, डोळ्यांपुढे चित्रे उभी राहतील अशी वर्णनशैली, संमोहन, अॅक्युपंक्चर, व्यायाम, फिजिओथेरपी, रुग्णाला मानसिक आधार देणे, समुपदेशन या पद्धतींचा समावेश होतो. 

आजच्या घडीला कोणत्याही कर्करोगाच्या वेदना योग्यप्रकारे व्यवस्थापन करून कमी करता येतात. रुग्ण वेदनांच्या बाबतीत थोडा सजग राहिल्यास त्याचा कर्करोग वेदनाविरहित ठरू शकतो. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com