दुखणे कंबरेचे 

डॉ. आरती साठे
Friday, 4 October 2019

ज्याला एकदाही कंबरदुखी झाली नाही असा माणूस विरळाच. कंबरपट्ट्याचा साज लेणे कोणाला रुचतही नाही. पण जेव्हा कंबरदुखी असताना थोड्याशा हालचालीनेही दुखरी चमक आली की रुग्ण हतबल होतो. 
 

ज्याला एकदाही कंबरदुखी झाली नाही असा माणूस विरळाच. कंबरपट्ट्याचा साज लेणे कोणाला रुचतही नाही. पण जेव्हा कंबरदुखी असताना थोड्याशा हालचालीनेही दुखरी चमक आली की रुग्ण हतबल होतो. 
 
‘‘डॉक्टर, हे माझे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत, तरीही कंबरदुखी दोन वर्षे सतत आहेच. सगळे उपाय करून मी थकलो.’’ चाळीस वर्षांचे हे पुरुष रुग्ण ठरावीक दिवसानंतर येणाऱ्या कंबरदुखीमुळे त्रस्त होते. एकदा डाव्या तर एकदा उजव्या बाजूला कंबरदुखी जाणवे. रोजचा रिक्षाने प्रवास, सतत बैठे आणि ताणतणावाचे कार्यालयातील काम. अॅक्युपंक्चरच्या दहा सीटिंगमध्ये त्यांना जवळजवळ सत्तर टक्के आराम मिळाला. कंबरदुखीची तीव्रता, सकाळी उठतानाचा पाठीतील ताठरपणा आणि दुखीचा कालावधी कमी झाला. 

एका ऐंशी वर्षाच्या स्त्री रुग्णाला कंबरदुखीमुळे चालताना काठी घ्यावी लागे. दुखीमुळे त्यांना रात्रीची झोप लागत नसे. नऊ सीटिंगनंतर त्या विनाकाठी चालू लागल्या आणि त्यांना रात्रीची झोप लागू लागली. 

आपला पाठीचा कणा अनेक मणक्यांनी बनलेला आहे. मानेपासून ते कंबरेच्या खाली अशी मणक्यांची विभागणी केलेली आहे. त्यांची रचना त्यांच्या कार्याशी निगडित आहे. कंबरेचे मणके हे शरीराचे वजन पेलणारे असल्या कारणामुळे महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच कंबरदुखीचे रुग्ण जास्त असतात. कंबरदुखी ही एकाच हाडाशी, एकाच मणक्याशी किंवा एकाच स्नायूशी निगडित नसून कंबरेचे मणके व आजूबाजूचे स्नायू, नसा किंवा मणक्यांमधील चकती इत्यादी सर्वांशी संबंधित असते. त्यामुळे रुग्णाची कंबर नक्की कुठे दुखते हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. त्या भागातील सूज, ताठरपणा, हालचालीतील मर्यादा व वेदना, विश्रांती घेताना वेदना वाढते का याची दखल घ्यावी लागते. 

काय असतात कारणे? 
- बसण्याच्या, चालण्याच्या, झोपण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे कंबरेच्या मणक्यांवर वजनाचा जास्त ताण येतो. 
- वाढीव वजन व वाढलेले पोट पाठीच्या स्नायूंना जास्त पुढे आणि खाली ओढते. सततच्या ताणामुळे वेदना एकदम चालू होते व स्पाझम येऊन शरीराची हालचाल करणे अशक्य होऊ शकते. 
- मऊ गादी, खुर्ची, सोफा इत्यादी बैठकीच्या वापरामुळे पाठीच्या स्नायूंना पुरेसा आधार मिळत नाही. मणक्याची नैसर्गिक स्थिती बिघडते. त्यामुळे स्नायूंचे आकुंचन होऊन वेदना सुरू होते. 
- पोटावर किंवा पालथे किंवा एक पाय पोटाशी व एक पाय खाली असे झोपल्याने स्नायू आक्रसून वेदना चालू होते. 
- कंबरेच्या मणक्यांना अपघात, इजा, पाठीच्या स्नायूंचा अनैसर्गिक सतत वापर, धक्का बसणे, थंड हवा, उंचीवरून पडणे, मणक्यांमध्ये गाठ किंवा क्षयरोग असणे, मणक्यांमध्ये सूक्ष्म अस्थिभंग, मानसिक ताण, अस्वस्थता, वैफल्य, भावनांचा उद्रेक, यामुळे स्नायूंना मुरडा येऊ शकतो. 
- स्त्रियांच्या बाबतीत ओटीपोटाचे आजार किंवा सूज याने कंबरदुखी उद्भवते. 
- दोन मणक्यांमधील मऊ, संरक्षक चकतीची झीज अथवा अपघाताने ती चकती मणक्याबाहेर घसरणे किंवा तुटणे. 
एक्स-रे व एम. आर. आय.च्या मदतीने, रक्त तपासणी व लक्षणांवरून निदान केले जाते. 

लक्षणे 
- बसताना आणि उठताना त्रास होणे. 
- जमिनीवर बसता न येणे. 
- वाकण्याच्या हालचाली मोकळेपणी करता न येणे. 
- स्नायूंमध्ये ताठरपणा येणे. ताठरपणा असल्याने हालचालींना मर्यादा येणे. कंबरेचा पट्टा लावून विश्रांती घेतल्यास जरा बरे वाटते. 
- चालताना त्रास होतो. 
- वजन उचलता येत नाही. 

उपचार 
अॅक्युपंक्चर उपचार पद्धतीमध्ये निर्जंतुक केलेल्या सुया योग्य त्या बिंदूंवर लावून त्यातून सुरक्षित विद्युत प्रवाह मशीनद्वारे काही मिनिटांसाठी देण्यात येतो. गेट कंट्रोल थेअरी आणि एंडोर्फिन्स रिलीज या शास्त्रीय आधारावर अॅक्युपंक्चरचे परिणाम मिळतात. 
सूज व वेदना कमी होणे, लवचिकता वाढणे, हलकेपणा वाटणे हा आराम रुग्णाला वाटू लागतो. कंबरदुखीच्या कारणपरत्वे तीव्रता व दुखणे किती जुने आहे त्याप्रमाणे अॅक्युपंक्चरचा फायदा मिळतो. स्नायूंचा ताठरपणा कमी झाल्यामुळे रुग्ण मोकळी हालचाल करू शकतो. 
माळशेज घाटामध्ये अनेक फुटांवरून खाली पडलेले एक पुरुष रुग्ण कंबरदुखीमुळे व्यायामशाळेमध्ये प्रशिक्षण देऊ शकत नव्हते अथवा स्वतः व्यायाम करू शकत नव्हते. अॅक्युपंक्चर उपायांमुळे त्यांची कंबरदुखी बरीच कमी झाली. स्क्वाट मारताना त्यांना जो त्रास होत असे तो नाहीसा झाला. 
रिक्षा चालवण्याचा व्यवसाय असणारा एक रुग्ण खुर्चीवरदेखील बसू शकत नव्हता. त्यांना रात्री अपरात्री वेदनाशामक इंजेक्शने घ्यावी लागत असत. अॅक्युपंक्चर पहिल्या सीटिंगनंतर ते स्वतः खुर्चीवर येऊन बसले. सर्व सीटिंग्स पूर्ण केली आणि रात्री अपरात्रीच्या कंबरदुखीतून मुक्त झाले. 
पुरेशी विश्रांती, योग्य आहार व व्यायाम, कंबर दुखत असताना थोड्याशा कडक अंथरुणावर पाठीवर झोपून पाय गुडघ्यात दुमडून घेणे ही स्थिती स्नायूंना आराम देते. जमिनीवर काहीही न अंथरता झोपणे व पंखा जोरात ठेवून झोपणे टाळावे. 
जर शरीराचे वजन जास्त असेल तर वजन कमी करणे आवश्यक आहे. उंच टाचांच्या चपला सतत वापरू नयेत. 

अॅक्युपंक्चरचा उपयोग चांगल्या पद्धतीने करून घेता येतो. पूर्वीच्या काळी आपल्याकडे मर्मावर खूप चांगले काम केले जात होते. ही विद्या आपल्याकडून फारशी पुढे नेली गेली नाही. त्याचाच विकसित प्रकार म्हणजे अॅक्युपंक्चर. 
१) पाठदुखी, सायटिका, स्लिप डिस्क आणि शरीरातील वेगवेगळ्या सांध्यातील दुखी 
२) पेशीदाह (सेल्युलायटिस) 
३) पाणीधारणा (वॉटर रिटेन्शन) 
४) धुळीची, हवेची अॅलर्जी 
५) रक्तातील ट्रायग्लिसराईडची पातळी वाढणे 
६) वजन कमी करणे 
७) व्हेरिकोज व्हेन्स 
या आजारातही अॅक्युपंक्चरचा उपयोग होऊ शकतो.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pain of Waist article written by Dr Aratee Sathe