esakal | पंचकर्म कसे व कधी ?
sakal

बोलून बातमी शोधा

पंचकर्म कसे व कधी ?

पंचकर्म कसे व कधी ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

-डॉ. मालविका तांबे

आजारांपासून संरक्षण मिळण्यासाठी, तसेच काही आजार झाल्यास पुन्हा स्वास्थ्यप्राप्ती व्हावी यासाठी आयुर्वेदात उपाययोजना सांगितलेली आहे. ती म्हणजे, ‘शास्त्रोक्त पंचकर्म’. शरीरात जमलेली अशुद्धी, न पचलेल्या आहारातून तयार झालेला आम, इतर प्रकारचे मल वगैरेंमुळे आजार होऊ शकतात. शरीरातील जमलेली अशुद्धी शरीराबाहेर काढून शरीर शुद्ध करणे म्हणजेच पंचकर्म. आपण घरात आवराआवरी करतो, घर स्वच्छ ठेवतो, तसेच शरीर आतून स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे असते.

पंचकर्म म्हणजे पाच कर्मे असे समज असलेला दिसतो. पंचकर्मातील मुख्य थेरपीज्‌ करण्यापूर्वी तयारी (पूर्वकर्म) करावे लागते, तसेच थेरपी झाल्यानंतर काळजी घ्यावी लागते (पश्र्चात् कर्म). हे सगळे पाहिले तर पंचकर्मादरम्यान करण्यात येणाऱ्या थेरपीज् चा आकडा बराच मोठा असतो. आजार व आजारी व्यक्तीच्या आवश्यकतेनुसार अंगाला तेल लावणे (अभ्यंग), तूप पाजणे, विरेचन, वमन, हृद् बस्ती, उत्तरबस्ती, षष्ठीशाळी मसाज, शिरोधारा, शिरोबस्ती वगैरे अनेक योजना पंचकर्मादरम्यान केल्या जातात. पंचकर्मात कोणाला कुठल्या थेरपी कराव्या, कशा प्रकारे कराव्या, किती दिवस कराव्या हे रोग्याच्या प्रकृतीनुसार तज्ज्ञ ठरवितात.

पंचकर्म कधी करावे?

याचे उत्तर आहे शक्य असेल तेव्हा. तहान लागल्यावर विहीर खोदू नये असे म्हणतात, त्याचप्रमाणे पंचकर्म हा उपचार करून घेण्यासाठी शरीरात व्याधीने ठाण मांडण्याची, आजारी पडण्याची वाट पाहू नये. पंचकर्म शरीरातील सर्व धातूंचे नियमन करण्यासाठी, पचन तसेच शरीरातील सर्व चयापचय क्रिया (मेटॅबोलिक क्रिया) सुरळीत व्हाव्यात यासाठी मदत करते. पंचकर्म हे खूप व्यापक आहे, ते कोणीही केलेले चांगलेच असते.

पंचकर्माने शरीरात बरेच आवश्यक बदल घडत असतात. पंचकर्म ही प्रक्रिया वर वर पाहता सोपी वाटली तरी पंचकर्मादरम्यान शरीरात बऱ्याच घडामोडी होत असतात. म्हणूनच पंचकर्म करताना नियम पाळणे गरजेचे असते. प्रवास, जागरण, राग करणे, खूप चालणे, अति व्यायाम अशा सर्व गोष्टी पंचकर्मामध्ये वर्ज्य सांगितलेल्या आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली, नियम पाळून, एका जागी राहून पंचकर्म करण्याचा खूप उपयोग होताना दिसतो.

वयाचा विचार केला तर अगदी लहान मुलांपासून ते ८०-८५ वर्षांच्या आजोबांपर्यंत कार्ला येथे संतुलन पंचकर्म केलेले आहे, अनेकांच्या अनेक प्रकारच्या आजारांवर मात करण्यात यश मिळालेले आहे. पंचकर्म करते वेळी आजार व वय याच्याबरोबर व्यक्तीचे बल, पचनशक्ती, प्रकृती, आहार-आचरणाच्या सवयी, त्याच्यात आलेल्या आनुवंशिकता अशा अनेक गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते. त्यामुळे पंचकर्म करवणाऱ्या वैद्याच्या अनुभवालाही खूप महत्त्व असते.

वातावरणात होणाऱ्या बदलांनुसार, ऋतुंनुसार आपल्या शरीरातही अनेक बदल होत असतात. म्हणूनच आयुर्वेदामध्ये ऋतुचर्येला खूप महत्त्व दिलेले आहे, ऋतुंनुसार आहार-आचरण कसे असावे हे सांगितलेले आहे. ऋतुनुसार शरीरातील काही दोष वाढतात तर काही कमी होतात. त्यामुळे वाढलेल्या दोषांच्या शमनासाठी काही उपचार सुचवलेले आहेत. शोधन व्हावे या दृष्टीनेही काही पंचकर्माचे उपचार सुचवले जातात. सध्याच्या काळात प्रत्येक ऋतूत वेगवेगळे पंचकर्म करवून घेणे शक्य नसते. अमुक ऋतूत पंचकर्म करून चालते का अशी काही व्यक्तींच्या मनात शंका असते. काही ठराविक आजार, ठराविक प्रकृती किंवा दोष वगळता पंचकर्माला ऋतूची मर्यादा नसते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तसेच आपल्याला असलेल्या सवडीनुसार वर्ष-दोन वर्षातून पंचकर्म करून घेणे श्रेयस्कर ठरते.

पंचकर्माचा फायदा

स्वास्थ्य टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने रसायनचिकित्सा व वाजीकरणचिकित्सा या दोन चिकित्सा आयुर्वेदात सांगितलेल्या आहेत. या दोन्ही चिकित्सा करण्यापूर्वी पंचकर्म करून शरीरशुद्धी करून घेतलेली असली तर अधिक फायदा होताना दिसतो. या दोन्ही चिकित्सांचा उपयोग व्याधीमुक्त होण्यासाठी होतोच, बरोबरीने शरीरात बल व आयु यांची स्थापना होते असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. दीर्घ आजारानंतर रसायनचिकित्सा करायची असल्यास त्याआधी पंचकर्म करून घेतलेले असल्यास अधिक परिणाम मिळतात गर्भसंस्काराच्या दृष्टीने वाजीकरणचिकित्सा करायची असल्यास ती पंचकर्मानंतर केल्यास वंध्यत्वासारख्या भेडसावून टाकणाऱ्या त्रासावर पटकन मात करता येते, असा आत्मसंतुलनमधील संतुलन पंचकर्माचा अनुभव आहे. एकंदर सध्याची स्वास्थ्याची पातळी बरीच खालावलेली आहे. पंचकर्मयुक्त गर्भसंस्काराचा ठेवा बाळाला देण्याचा निश्र्चय प्रत्येक दांपत्याने करायला हरकत नाही, असे मला वाटते.

शरीराचे स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी पंचकर्मातील काही उपचार रोज करण्याचा सल्ला आयुर्वेदात दिलेला आहे. ‘अभ्यंगं आचरेत् नित्यम्’ म्हणजे अभ्यंग रोज करावा असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. यामुळे शरीराची ताकद टिकवून राहण्यासाठी मदत मिळते. घरच्या घरी रोज उद्वर्तन (शरीराला उटणे लावणे) करता येते. अवास्तव वजन वाढले असल्यास रोज उद्वर्तन करण्याचा फायदा होताना दिसतो. नियमाने नस्य केल्यास बऱ्याच त्रासांना प्रतिबंध होताना दिसतो. कवल, गंडूष हेही उपचार नित्य करावेत असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. या छोट्या छोट्या उपचारांचा आपल्या आयुष्यात नित्य समावेश करून घेतला तर स्वास्थ्य टिकून राहायला तर मदत मिळते, पण मला वाटते पंचकर्माचे महत्त्व कळायलाही मदत मिळू शकते. पंचकर्माने पचन सुधारते, असलेला आजार कमी होतो, स्वास्थ्य मिळते, मन-बुद्धी-इंद्रियांचा कार्यक्षमता वाढते, कांती सुधारते, बल वाढते, मैथुनशक्ती वाढते, वार्धक्याकडे जाण्याची गती कमी होते आणि व्यक्ती चिरायू होते असे आयुर्वेदात सांगितलेले आहे.

शास्त्रोक्त पंचकर्म करून घेण्यासाठी वेळ काढण्याची आवश्यकता असते. दैनंदिन जीवनातून थोडेसे बाहेर निघून, आत्मसंतुलनसारख्या शांत व निसर्गसुंदर वातावरणात पंचकर्म करून घेण्याचा अनुभव अनोखा असतो. सध्याच्या पॅन्डेमिकच्या काळात अनेकांना वर्क फ्रॉम होमची सुविधा आहे. आपले शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्याच्या दृष्टीने अशा प्रकारे हाताशी असलेल्या वेळेचा सदुपयोग शास्त्रोक्त पंचकर्म करून घेण्याचा विचार करणे योग्य नाही का ठरणार?

loading image
go to top