गाठ आहे मणक्‍याशी! 

डॉ. जयदेव पंचवाघ
Friday, 27 December 2019

वैद्यकशास्त्रातील आधुनिक उपकरणे रुग्णांसाठी वरदान आहेत. आजाराचे स्वरूप समजून घ्यायला, त्याचे नेमके कारण व त्याची जागा निश्चित करायला त्यांचा खूप उपयोग होतो. 
 

वैद्यकशास्त्रातील आधुनिक उपकरणे रुग्णांसाठी वरदान आहेत. आजाराचे स्वरूप समजून घ्यायला, त्याचे नेमके कारण व त्याची जागा निश्चित करायला त्यांचा खूप उपयोग होतो. 
 
‘‘दिलीप, तुमच्या मानेच्या मणक्‍याच्या आत एक गाठ आली आहे.'' माझ्या या वाक्‍यानंतर दिलीप आणि संध्या दोघेही काही काळ हबकून माझ्याकडे बघत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बघून मला माझी चूक लक्षात आली. दिलीपरावांना होणाऱ्या त्रासाचे कारण मी फारच सहज आणि शुष्कपणे त्यांना सांगत होतो. अर्थात, असे करण्याचा माझा हेतू नव्हता; पण अगदी सावध असतानासुद्धा माझ्यातील न्यूरो सर्जनकडून हे नकळत घडले होते. ज्या आजारावर तुम्ही रात्रंदिवस उपचार करत असता, तो तुमच्या आयुष्याचा भागच बनलेला असतो खरा; परंतु प्रत्येक रुग्णासाठी मात्र त्याचा आजार एकमेवच असतो. त्या दोघांच्या चेहऱ्यांवरचा भाव बघून मी माझी चूक सुधारत पटकन म्हणालो, ‘‘पण त्यात फारसे काळजी करण्यासारखे काही नाही.’’ आता गाठही आहे आणि काळजीचे कारणही नाही, या माझ्याच दोन विधानांचा अर्थ स्पष्ट करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. 

या सर्व गोंधळाचे कारणही तसेच होते. दिलीपरावांना दोन्ही पाय दुखण्याचा व कंबरदुखीचा त्रास अनेक वर्षांपासून होत होता. त्या आजाराचे निदान करण्यासाठी ते वेगवेगळ्या डॉक्‍टरांकडे जाऊन आलेले होते. गेल्या महिन्या-दोन महिन्यांत मात्र पायात विचित्र संवेदना त्यांना जाणवायला लागली होती आणि म्हणूनच एका डॉक्‍टरने त्यांना कंबरेचा एमआरआय करायला सांगितला होता. सध्या एमआरआय करण्याची जी यंत्रे उपलब्ध आहेत, त्यातील नवीन मशिनवर संपूर्ण मणक्‍याचा एक फोटो घेतात. अगदी मानेपासून माकडहाडापर्यंत (Whole spine scanning). यानंतर ज्या विशिष्ट भागाची तपासणी करायची आहे, त्या भागाचा बारकाईने अभ्यास करता येईल असे स्कॅन फोटो घेतात. या पद्धतीचा अनेक वेळा अपेक्षित व काही वेळा अनपेक्षित उपयोग आम्हाला झालेला आहे. मणक्‍याच्या आजारात जरी रुग्णाची लक्षणे एकाच भागात असली, तरी मणक्‍याच्या इतर भागातसुद्धा त्या आजाराचे मूळ असू शकते. उदाहरणार्थ, भारतात कंबरेच्या स्पॉंडिलोसिसच्या अकरा टक्के रुग्णांमध्ये मानेचा स्पॉंडेलोसिससुद्धा असतो असे 1998 मध्ये आम्ही केलेल्या संशोधनात सिद्ध झालेले आहे. त्याचप्रमाणे क्षयरोग, कर्करोग किंवा साध्या प्रकारच्या गाठी इत्यादी आजार मणक्‍याच्या अनेक भागांत एकाच वेळी उद्‌भवू शकतात. त्यामुळे संपूर्ण मणका स्कॅन करणाऱ्या फोटोचा अनेक वेळा फायदा होतो. 

आता हेच पाहा, दिलीपरावांच्या बाबतीत कंबरेच्या स्पॉंडिलोसिससाठी स्कॅन केला होता आणि मानेच्या मणक्‍याच्या आत मज्जारज्जूंवर दाब आणणारी गाठ दिसत होती. दोनही अगदी भिन्न आजार आणि म्हणूनच संध्या व दिलीप पूर्णपणे गोंधळले होते. 

‘‘दिलीप, तुम्हाला एमआरआय कंबरेच्या मणक्‍यासाठी करायला सांगितला गेला होता हे मला माहीत आहे; पण तुमच्या पायात गेल्या दोन महिन्यांत ज्या विचित्र संवेदना येत आहेत, त्यांना ‘पॅरेस्थेशिया’ म्हणतात. या संवेदना मज्जारज्जूवरील दाबामुळे येऊ शकतात. तुमच्या मानेच्या मज्जारज्जूवर जो दाब येतो आहे, त्यामुळे ही नवीन लक्षणे तुम्हाला सुरू झाली आहेत आणि या दाबाचे कारण म्हणजे ही गाठ आहे. 

अगदी महत्त्वाच्या दोन गोष्टी तुम्ही समजून घ्या. पहिली म्हणजे, ही गाठ कर्करोगाची नाही आणि दुसरी म्हणजे, ही गाठ सध्याच्या न्यूरो सर्जरीतील आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने पूर्णपणे काढून टाकता येते. एकदा काढली की, आयुष्यभरासाठी तुम्ही निर्धोक होऊ शकता.’’ 
यातील वाक्‍य न्‌ वाक्‍य खरे होते; पण या गोष्टी रुग्णांना मुद्दाम सांगाव्या लागतात.
शस्त्रक्रियेच्या आधीचे रुग्णांचे मनोधैर्य आणि सकारात्मक दृष्टिकोन याच माहितीतून निर्माण होऊ शकतो. ज्ञान ही रुग्णांसाठी एक अद्‌भुत शक्ती ठरते. 

‘‘दिलीप, तुम्ही या घटनेकडे सकारात्मक दृष्टीने बघा. ही गाठ जर उशिरा लक्षात आली असती, तर अवघड परिस्थिती आली असती. फार लक्षणे नसतानाच अशा गाठी काढून टाकल्या, तर उत्कृष्ट परिणाम आपण साधू शकतो.’’ 

दिलीपरावांची गाठ ही मज्जारज्जूच्या बाहेर; पण त्याच्या आवरणाच्या आत होती. या गाठीची शस्त्रक्रिया करण्याआधी आम्ही त्या भागाचा एमआरआय करून घेतला. कारण आधीचा एमआरआय कंबरेचा होता. या नव्या एमआरआयच्या अभ्यासाचा शस्त्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचा उपयोग होतो.
मज्जारज्जूतून बाहेर पडणाऱ्या नसा हाताच्या स्नायूंना चेतापुरवठा करतात. त्यांना धक्का लागला तर, हातातील एखाद्या स्नायूसमूहातील शक्ती कमी होऊ शकते. गाठीमुळे या नसा नेमक्‍या कुठल्या भागात ढकलल्या गेल्या आहेत, याचा निश्‍चित अंदाज या एमआरआयने येऊ शकतो. त्याचप्रमाणे मज्जारज्जूची महत्त्वाची रक्तवाहिनी या गाठीच्या कुठल्या बाजूला आहे, याचा सुगावा या एमआरआयमुळे आधीच लागतो.
दिलीपरावांच्या शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशी या एमआरआयवरून प्रत्यक्ष गाठ, मज्जारज्जू, नसा व रक्तवाहिनी यांची रचना कशी असेल याचा अंदाज बांधणारे चित्र आम्ही काढले. 

‘विटनेस’ने सांगितलेल्या माहितीवरून पोलिस एखाद्या चोराचे चित्र काढतात ना, तसेच हे आहे. यात एमआरआय हा आमचा ‘विटनेस’ असतो आणि आजार हा ‘चोर’. मेंदू व मणक्‍याच्या अवघड शस्त्रक्रियांच्या आधी अशी चित्रे काढण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. (‘आपण अशा हजारो शस्त्रक्रिया केल्या आहेत. आता काय हा तर हातचा मळ आहे’ असे वाटण्यापासून स्वतःला वाचविण्याचासुद्धा हा उत्तम मार्ग आहे.) आजाराचा प्रकार जरी एकच असला, तरी प्रत्येक केस ही वेगळी असते. प्रत्येक व्यक्तीची रचना ही अनेक दृष्टींनी निराळी असते. मणक्‍याच्या आतील जागा, रक्तवाहिन्यांची रचना यात फरक असतोच. त्यामुळे एकाच प्रकारची गाठ तिच्या भोवतीच्या महत्त्वाच्या भागांवर विविध प्रकारे परिणाम करू शकते. शरीरातील रक्तवाहिन्या, नसा यांच्या जागांची, स्थितीची आधीच कल्पना येत असल्याने या चित्रांकित नियोजनाचा शस्त्रक्रियेत फार उपयोग होतो. 
प्रत्यक्ष शस्त्रक्रियेच्या वेळी दिलीपरावांच्या मानेच्या मणक्‍याच्या मागच्या बाजूने मायक्रोड्रिल वापरून आम्ही मार्ग तयार केला. मज्जारज्जू आणि गाठीभोवती ‘ड्युरा मेटर’चे आवरण असते, ते उघडल्यावर पिवळट नारंगी रंगाची गाठ दिसायला लागली. खूप मोठ्या आकाराचे द्राक्ष असते, तेवढा तिचा आकार होता आणि तिच्याभोवती निळसर रक्तवाहिन्यांचे जाळे होते. नसांचा एक पुंजका त्या गाठीच्या वरच्या भागाला चिकटलेला होता आणि एमआरआय बघून काढलेल्या चित्रावरून मज्जारज्जूची महत्त्वाची रक्तवाहिनी गाठीच्या पुढच्या भागात बाहेरून चिकटलेली होती. म्हणजे आता ही गाठ काढण्याच्या प्रक्रियेतील तीन उद्दिष्टे स्पष्ट होती. 

- गाठीला चिकटलेल्या व डाव्या हाताच्या महत्त्वाच्या स्नायूसमूहाला चेतापुरवठा करणाऱ्या नसेला धक्का न लावता गाठीपासून अलग करणे. 

- मज्जारज्जू व त्याच्या महत्त्वाच्या रक्तवाहिनीला अबाधित ठेवणे. 

- आणि अर्थातच गाठ पूर्णपणे काढून टाकणे. 
शरीराच्या इतर भागातल्या गाठी काढण्याची पद्धत म्हणजे संपूर्णच्या संपूर्ण गाठ इतर भागापासून कात्रीने किंवा इतर आधुनिक उपकरणांनी (उदा. हार्मोनिक स्काल्पेल) अलग करून संपूर्ण काढून टाकणे. मेंदू व मणक्‍यातील गाठी मात्र वेगळ्या तंत्राने काढाव्या लागतात. याचे कारण म्हणजे येथे जागा खूपच मर्यादित असते व अतिशय महत्त्वाची अशी केंद्रे या गाठीला चिकटलेली असतात. तीसुद्धा सर्व बाजूंनी. हार्वे कुशिंग या जगप्रसिद्ध न्यूरो सर्जनने यावर तोडगा म्हणून ‘प्रोग्रेसिव्ह इंटर्नल डीबल्किंग’चे तंत्र वापरले. याचा थोडक्‍यात अर्थ असा, की एखाद्या फळाचा ‘गर’ जर आपण आतून काढत गेलो, तर फळाचा गोलाकार घट्टपणा निघून गेल्यानंतर सरतेशेवटी फक्त त्याची साल शिल्लक राहते आणि ती लुळी होऊन आत पडते. त्याचप्रमाणे गाठीच्या आतील भाग कोरून काढून घेतला तर गाठीची साल शिल्लक राहते. मग ही साल सर्व बाजूंनी बघून तिला चिकटलेले महत्त्वाचे भाग हळूहळू अलग करता येतात आणि सर्वात शेवटी ती सालही पूर्णपणे काढून टाकता येते. हे साधे वाटणारे, पण अतिशय महत्त्वाचे तंत्र कुशिंगने प्रस्थापित करून 1910 ते 1930 या काळात मेंदू व मणक्‍याच्या शस्त्रक्रियेच्या परिणामांमध्ये आमूलाग्र फरक घडवला होता. 
तर सांगायचा मुद्दा म्हणजे, याच तंत्राने आम्ही ती गाठ हळूहळू काढत गेलो. गाठीच्या वरच्या भागाला जो नसांचा समूह चिकटला होता, तो प्रथम अलग केला. नसेच्या एका अगदी लहान तंतूला ही गाठ चिकटलेली होती.
‘न्यूरोमायक्रोस्कोपची लेन्स’ त्या भागावर ‘झूम’ करून त्या तंतूपासून ही गाठ आम्ही अलग केली. गाठीच्या पुढच्या भागातील रक्तवाहिनीसुद्धा गाठीच्या सालीसारख्या राहिलेल्या भागापासून आम्ही दूर केली व गाठ पूर्णपणे काढून टाकली. गाठीच्या बाजूच्या मज्जारज्जूंची स्पंदने आता स्पष्टपणे दिसत होती. दिलीपरावांची गाठ आता पूर्णपणे नेस्तनाबूत झाली होती. मज्जारज्जूभोवतीचे उघडलेले ‘ड्युरा मेटर’ अगदी बारीक (केसाच्या आकाराच्या) धाग्यांनी शिवून बंद करून आम्ही शस्त्रक्रिया संपवली. 

शस्त्रक्रियेनंतर तिसऱ्या दिवशी दिलीप आणि संध्या यांना घरी जाण्याची परवानगी द्यायला मी त्यांच्या खोलीत गेलो. त्यांचा हसरा चेहरा पाहूनच मी निश्‍चिंत झालो. 
‘‘डॉक्‍टर, पाठीच्या कण्याच्या एका भागाचा एमआरआय करायला गेलो आणि वेगळ्याच भागातील आजार सापडला,’’ संध्याताई म्हणाल्या. 
‘‘पण वेळेतच निदान झाले. कारण काही का असेना! देव दयाळू आहे,’’ दिलीपराव म्हणाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Paresthesia article written by Dr Jaydev Panchwagh