#FamilyDoctor अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व) 

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 24 August 2018

शरीराला अतिपरिश्रम होणे किंवा मनावर अतिताण येणे हा अनारोग्याला कारण ठरतो. वाताचा प्रकोप होणार असेल तर आधीच काळजी घेणे आवश्‍यक आहे.

ज्या  प्रमाणे हुकुमाचा एक्का हातात आला की बाकी छोट्या-मोठ्या पत्त्यांची काळजी करावी लागत नाही, त्याप्रमाणे चरकसंहितेतील अग्र्यसंग्रह एकदा नीट समजून घेतला तर काय उत्तम आणि कोणती गोष्ट टाळायला हवी हे नेमकेपणाने समजू शकते. मागच्या वेळी आपण निंदनीय म्हणजे उपचार करण्यास अवघड विकार होण्यामागे विरुद्ध आहार हे मुख्य कारण असते हे पाहिले. आता या पुढचा भाग पाहू या. 

प्रशमः पथ्यानाम्‌ - आरोग्यासाठी हितावह गोष्टींमध्ये ‘प्रशम’ म्हणजे शारीरिक व मानसिक शांती सर्वांत महत्त्वाची होय. 

शरीर काय किंवा मन काय हे दोघांनाही आपापली कामे करावी लागतातच, पण यामुळे शरीरावर किंवा मनावर अतिरिक्‍त ताण येणार नाही, अतिश्रम होणार नाहीत याकडे लक्ष देणेही गरजेचे असते. म्हणून शारीरिक श्रम झाले तरी आहार, रसायन, विश्रांती मदतीने पुन्हा शरीराला शक्‍ती देणे, मानसिक श्रम झाले तर ध्यान, प्रार्थना, सत्संग यांच्या मदतीने मनाला शांत करणे हे महत्त्वाचे होय. वेळच्या वेळी झीज किंवा ऱ्हास भरून काढला नाही तर कालांतराने त्याचे रूपांतर मोठ्या मोठ्या समस्येत होऊ शकते. 

आयासः सर्व अपथ्यानाम्‌ - अत्यधिक श्रम हे आरोग्यासाठी हानिकारक गोष्टींमध्ये अग्रणी होय. 

या ठिकाणी अतिपरिश्रम हे शरीर आणि मनालाही लागू होतात. अतिताण हा शरीरावर आला किंवा मनावर आला तर तो आरोग्यालाही कारण ठरतोच.

बह्वायासकृतः कष्टः श्रमः म्हणजे पुष्कळ काम केल्याने सामर्थ्य कमी होऊन आलेला थकवा म्हणजे श्रम असे सांगितलेले आहे. आपल्या सर्वांना काम करणे भाग असतेच, पण त्यामुळे थकवा येऊन शारीरिक दौर्बल्य येऊ नये यासाठी प्रयत्न निश्‍चित करता येतात. अति व्यायाम, अति शारीरिक श्रम, अतिशय चालणे, पळणे, ओझी वाहून नेणे, प्रवास करणे ही सर्व कारणे वाताचा प्रकोप करणारी असतात

प्रभावी उपाय
काम व व्यवसायानिमित्त या गोष्टी जर अपरिहार्य असल्या तर यामुळे वात वाढणार आहे हे लक्षात घेऊन वेळीच त्याला कमी करणे गरजेचे होय. या दृष्टीने काही साधे प्रभावी उपाय याप्रमाणे होत. 
रोज रात्री झोपण्यापूर्वी अंगाला तेल लावून झोपणे. शारीरिक श्रमामुळे वाढणारा वात यामुळे संतुलित राहायला मदत मिळते. यामुळे थकवा कमी होतो, अतिश्रमाने अंग दुखू शकते ते टाळता येते आणि एकंदर शरीराचा श्रम करण्याचा स्टॅमिना वाढू शकतो. तेल जिरविण्याने मांसपेशींचे पोषण होते, हाडांना व सांध्यांना उचित स्निग्धता मिळते आणि त्यामुळे शरीररुपी यंत्राची कार्यक्षमता उत्तम राहते.

बौद्धिक श्रम करणाऱ्यांनी बदाम, अक्रोड, मध, तूप वगैरे मेंदूला उपयुक्‍त असणाऱ्या वस्तूंचा आहारात समावेश असू देणे, त्याच बरोबरीने प्राणायाम, ध्यानधारणा करणे, आरोग्यसंगीत नित्य ऐकणे हितावह होय. 

शरीर व मन या दोघांनाही आराम देऊन पुन्हा स्फूर्तिवान करण्याचे काम रात्री शांत, गाढ झोपण्यामुळे होऊ शकते. म्हणूनच झोपेला ’निद्रादेवी’ असे संबोधले जाते व ’जगद्धात्री‘ म्हणून ओळखले जाते. 

आपल्या सर्व शारीरिक हालचाली उदा. चालणे, पळणे, वाकणे, लिहिणे, पाठीतून वाकणे वगैरे सर्व क्रिया सांधे, मांसपेशी, स्नायू वगैरेंकडून होत असतात. प्रत्येक हालचालीच्या वेळी घर्षणामुळे उष्णता निर्माण होते, त्या ठिकाणचे रक्‍ताभिसरण वाढते. एका ठराविक मर्यादेपर्यंत शरीर अवयवांकडून या गोष्टी सहज केल्या जातात. पण नंतर मात्र वाढलेली उष्णता शरीरात असंतुलन उत्पन्न करू शकते, शरीराला थकवून शरीराच्या विविध कार्यात अडथळा निर्माण करू शकते. जसे गाडी घाट चढून आली की इंजिनावर नेहमीपेक्षा अधिक ताण पडल्यामुळे इंजिन तापते. अशा वेळेस थोडा वेळ थांबून रेडिएटर मधले पाणी थंड झाले किंवा गरम पाणी काढून टाकून थंड पाणी टाकले की मगच पुढचा प्रवास करता येतो. शरीराचेही अगदी तसेच आहे. शरीरक्रियांतून निर्माण झालेली उष्णता शांत व्हावी, रुक्षता भरून यावी व श्रांत झालेल्या शरीरावयवांना, शरीरधातूंना आराम मिळावा म्हणून वेळीच विश्रांती घेणे आवश्‍यक आहे. अन्यथा गरम झालेली गाडी जशी बंद पडते तशी शरीराची गाडी बिघडणे किंवा बंद पडणे सहज शक्‍य आहे. 

म्हणून प्रत्येकाने स्वतःची शक्‍ती ओळखून असणे, सहज सोसवेल एवढेच शारीरिक, मानसिक काम करणे आणि थकण्याच्या पूर्वीच योग्य विश्रांती घेणे श्रेयस्कर होय. 

अग्र्यसंग्रहातील यापुढचा भाग आपण पुढच्या वेळी पाहू या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Physical and mental peace are the most important