‘उशी’चा योग्य मान 

डॉ. शरद हर्डीकर, डॉ. सचिन नागापूरकर 
Friday, 21 February 2020

मानेला आराम मिळावा, असे वाटत असेल तर उशीला योग्य तो मान दिलाच पाहिजे. उशी वापरावी का इथपासून कोणती उशी कधी वापरावी? इथपर्यंत विचार करायचा असतो. 

 

खरेच दैनंदिन जीवनात लहानपणापासून आपल्या आयुष्यात उशीला खूप महत्त्व आहे. जन्म झाल्यापासून लहान बाळाची मान व्यवस्थित राहावी, बाळाच्या डोक्‍याचा आकार व्यवस्थित राहावा म्हणून बाळाच्या डोक्‍याभोवती उशी लावली जाते. झोपताना गादी अथवा चादर नसली तरी चालेल, पण झोप व्यवस्थित येण्यासाठी उशी ही हवीच असे म्हणणारी मंडळी खूप आहेत. 

मानेला आराम मिळावा, असे वाटत असेल तर उशीला योग्य तो मान दिलाच पाहिजे. उशी वापरावी का इथपासून कोणती उशी कधी वापरावी? इथपर्यंत विचार करायचा असतो. 

 

खरेच दैनंदिन जीवनात लहानपणापासून आपल्या आयुष्यात उशीला खूप महत्त्व आहे. जन्म झाल्यापासून लहान बाळाची मान व्यवस्थित राहावी, बाळाच्या डोक्‍याचा आकार व्यवस्थित राहावा म्हणून बाळाच्या डोक्‍याभोवती उशी लावली जाते. झोपताना गादी अथवा चादर नसली तरी चालेल, पण झोप व्यवस्थित येण्यासाठी उशी ही हवीच असे म्हणणारी मंडळी खूप आहेत. 

खरेच दैनंदिन जीवनात या उशीचे एक वेगळेच महत्त्व आहे. वैद्यकीय व अस्थिरोग तज्ज्ञांच्या दृष्टीने विचार केला तर खरेच ‘उशीला योग्य तो मान’ जर मिळाला तर आपल्या मानेचा त्रास नक्कीच कमी होतो. 

उशीबद्दलचे प्रश्न 
चला तर मग, उशीबद्दल थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न करू. 
* दवाखान्यात येणाऱ्या मानदुखीच्या बऱ्याच रुग्णांना शंका असते ती म्हणजे झोपताना उशी घ्यावी की नको? 
* घेतली तर जाड घ्यावी की पातळ? 
* मानदुखीचा त्रास होत असेल तर उशी घेणे बंद करावे का? 
* गादीवर झोपावे की नको? 
* रोज उशी घेऊन झोपायची सवय आहे. उशीशिवाय झोप येत नाही, पण अमूक कोणीतरी सांगितले म्हणून उशी घेणे बंद केले. हे योग्य ते अयोग्य? 

असे बरेच समज-गैरसमज, शंका-कुशंका ‘उशीला’ घेऊन झोपावे का? या सर्व प्रश्‍नांना उत्तर एकच आहे, की शंका-कुशंकांना ‘उशी’ला घेऊन कशाला झोपायचे? त्याऐवजी, नीट उशी घेऊनच झोपावे. आपल्याला ज्या प्रकारच्या उशीची सवय आहे, ती घेऊन झोपावे. 
- डोके, मान व शरीराचा भाग एका विशिष्ट कोनामध्ये राहावा हे महत्त्वाचे आहे. साधारणपणे भारतीय लोक ज्या गाद्यांवर झोपतात, त्या गाद्या ह्या मध्यम ते कडक प्रकारातच मोडतात, त्यामुळे मध्यम ते थोडी कडक प्रकारात मोडणारी उशीच वापरावी. 
- उशी ही आपल्या मानेला आधार देणारी पाहिजे. उशी ही आपल्या मानेनुसार हालणारी, आकार घेणारी असावी. फार कडक असेल तर उशीनुसार मानेची ठेवण करावी लागते, परिणामी मानदुखी वाढते. 
- पाठीवर झोपण्याची सवय असणाऱ्या लोकांनी, थोडी मानदुखीचा त्रास असलेल्या लोकांनी किंवा मानेमध्ये मणक्‍यांतील अंतर कमी झालेल्या रुग्णांनी उशीसोबत मानेच्या खाली थोडी जी जागा राहते, त्या ठिकाणी एखादी मऊ चादर किंवा टॉवेलची छोटी घडी करून ठेवावी. 
- ज्या लोकांना डाव्या किंवा उजव्या बाजूला तोंड करून झोपण्याची सवय असते त्यांनी थोडी कडक उशीचा वापर करावा. ज्यायोगे डोके, मान व शरीर एका विशिष्ट कोनामध्ये राहील व मानेवर कोणताही ताण येणार नाही. 
- ज्या लोकांना पोटावर झोपण्याची सवय असते त्यांनी व ज्यांना मानदुखी आहे त्यांनी प्रथम ही पोटावर झोपण्याची सवय बदलावी. कारण या पद्धतीत झोपल्यामुळे मानेच्या स्नायूंवर खूप ताण येतो व ज्यायोगे दुखणे वाढण्याची शक्‍यता जास्त होते. तरी सवय जात नसेल तर योग्य त्या आकाराची उशी वापरावी व मान एका बाजूला करून मानेखाली मऊ चादर अथवा टॉवेल घेऊन दोन्ही गुडघ्यांमध्ये उशी घेऊन झोपावे. 
- ज्या लोकांना दररोज प्रवास करावा लागतो, त्यांनी तर प्रवासात मानेचा योग्य तो मान राखलाच पाहिजे. आपण बघतो दररोज प्रवास करावा लागणारे अथवा मानदुखीचा त्रास असणारे रुग्ण ज्या वेळी प्रवासात गाडीमध्ये झोपतात, त्या वेळी झोपेत मान किती तरी वेळा अयोग्य पद्धतीने हालत असते. मानेला असंख्यवेळा धक्के बसतात. त्यामुळे मानदुखीचा त्रास सुरू होण्याची अथवा वाढण्याची शक्‍यता असते. त्यामुळे ज्या लोकांना कोणत्या ना कोणत्या कारणाने दररोजच प्रवास करावा लागतो, त्या सर्वांनी व ज्या लोकांना मानदुखीचा त्रास आहेच, पण प्रवास करावयाचा आहे त्यांनी प्रवासात मानेची योग्य ती काळजी घेतलीच पाहिजे. वैद्यकीय दुकानात सहज मिळणाऱ्या व योग्य तो मापाचा मानेचा मऊ पट्टा प्रवासात वापरलाच पाहिजे. विमानात असो किंवा अजून कोठेही प्रवास करताना बाजारात मिळणारी मानेची मऊ उशी जरी आपण वापरलीत ना तरी मानेचा त्रास कमी होण्याची शक्‍यता असते. 
- ज्या लोकांना मानेचा त्रास आहे व मानेमध्ये, मणक्‍यांमध्ये अंतर कमी झालेले आहे, अशा रुग्णांनी आपल्या डॉक्‍टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. सल्ल्यानुसार व वैद्यकीय उपचारासोबत योग्य त्या आकाराची उशी वापरावी. 

खरेच, दैनंदिन जीवनात छोटीशी पण अत्यंत महत्त्वाची अशी ही ‘उशी’ आहे. म्हणूनच म्हणतो, ‘‘उशीला योग्य तो मान दिला तर नक्कीच मानेला आराम मिळणार आहे.’’ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pillow and the neck article written by Dr Sharad Hardikar, Dr Sachin Nagapurkar