प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग

वयाची साठी गाठल्यावर दरवर्षी किमान एकदा युरॉलॉजिस्टला भेटून प्रोस्टेट ग्रंथीचा आकार तपासून घेणे गरजेचे आहे. कारण, प्रोस्टेटचा आकार वाढणे आणि प्रोस्टेट कर्करोग होणे यात गल्लत होऊ शकते. या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वृद्धत्वाकडे वाटचाल करणाऱ्या सर्व पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढतो, पण अगदी काही जणांनाच प्रोस्टेट कर्करोग होतो.

प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग

दोनशेहून अधिक प्रकारचे कर्करोग आहेत. हे सर्व प्रकार घातक ठरतात, असे नाही. कर्करोग सुरवातीच्या अवस्थेत असेल, तर त्यावर संपूर्ण इलाज होऊ शकतो. काही प्रकारचे कर्करोग सावकाश पसरतात. त्यामुळे रुग्ण दीर्घकाळापर्यंत निरोगी जीवन जगू शकतो. पुर:स्थ ग्रंथींच्या आजारातही वेळीच उपचार झाले तर वर्षानुवर्षे आजार काबूत ठेवता येतो. बहुतेकदा आजारापेक्षा तत्संबंधीच्या भीतीमुळेच माणूस अर्धमेला होतो. त्यामुळे घाबरून न जाता आजाराविषयी माहिती मिळविणे ही आवश्‍यक व महत्त्वाची गोष्ट आहे. ज्ञान हे प्रकाशासारखे असल्यामुळे मनातील भीतीचा अंधार दूर होतो आणि स्वाभाविकच आत्मविश्वास वाढतो. परिणामी, जीवन सुसह्य होते.

 कर्करोग हा पेशींचा विकार असतो. आपल्या शरीरातील इंद्रिये ऊतींची बनलेली असतात. ऊती ही पेशींची बनलेली असते. सामान्यपणे पेशींचे विभाजन शिस्तबद्ध पद्धतीने होत असते; पण काही कारणामुळे पेशींमध्ये विकृत भाव निर्माण होऊन तिचे विभाजन बेशिस्तपणे व भरमसाट होऊ लागते. अशाने तेथे गाठ निर्माण होते. अशा पेशींच्या गाठी काही वेळा निरुपद्रवी असतात; पण कधी कधी त्या उपद्रवी असतात. उदाहरणार्थ, आवाळू येणे ही निरुपद्रवी गाठ म्हणता येईल, तर कर्करोगाची गाठ ही उपद्रवी गाठ असते. निरुपद्रवी गाठ एकाच जागी वाढते व ती पसरत नाही. कर्करोगासारखी उपद्रवी गाठ लवकर वाढते व पसरतही जाते. कर्करोगांवर उपचार न केल्यास या विकृत पेशी शेजारच्या ऊतींवर हल्ला करून नाश करतात. कर्करोगाच्या पेशी मूळ जागेपासून सुटून रक्ताच्या प्रवाहाद्वारे किंवा लसिका संस्थेद्वारे(लिफॅटिक सिस्टीम) इतर इंद्रियातही पोचतात व तेथे उपद्रव निर्माण करतात. सर्व कर्करोगांवर एकच उपचार नसतो.  रोगाचे निदान करणे, उपचारांची दिशा ठरविणे हे फक्त तज्ज्ञ डॉक्‍टर करू शकतात. 

प्रोस्टेट ग्रंथी वाढली असण्याची शंका डॉक्‍टरांना आल्यावर काही तपासण्या केल्या जातात. पोटाची, ओटीपोटाची सोनोग्राफी ही प्रोस्टेट ग्रंथीच्या दृष्टीने फार महत्त्वाची तपासणी असते. ग्रंथीचा आकार व मूत्रविरेचनावर प्रोस्टेट ग्रंथी वाढण्याचा परिणाम हे तर सोनोग्राफीत कळतेच; शिवाय प्रोस्टेट ग्रंथीत कर्करोग असावा अशीही शंका सोनोग्राफीत येऊ शकते. अशा वेळी रक्ताची एक विशिष्ट तपासणी उपयोगी पडते. कर्करोगाचे नक्की निदान प्रोस्टेट ग्रंथीतून एक सूक्ष्म तुकडा काढून (बॉयॉप्सी) तपासून करतात. प्रत्येक वेळी पीएसए वाढलेला असला म्हणजे कर्करोग असतोच असे मानण्याचे कारण नसते; परंतु पीएसए वाढत चालले असेल तर कर्करोग असण्याची शक्‍यता वाढत जाते; पण आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे, पीएसए सर्वसाधारण असतानाही कर्करोग असू शकतो. काही वेळा केवळ पाठदुखी उद्भवते. आपण ती सर्वसाधारण पाठदुखी म्हणून पाहात असतो, मात्र ते प्रोस्टेटच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. अशावेळी अन्य कोणतीही लक्षणे दिसतीलच असे नाही.

कोणाला होतो कर्करोग?
प्रोस्टेटचा कर्करोग कोणाला होऊ शकतो? या रोगाची नक्की कारणे कोणती, यासंबंधी सांगणे आजवर शक्‍य झालेले नाही. तरीही हा रोग पन्नाशीच्या आधी पुरुषात आढळलेला नाही. ज्यांच्या घरात जवळच्या नातेवाइकांमध्ये म्हणजे वडील, काका, मामा, आजोबा, भाऊ अशा नातेवाइकांमध्ये प्रोस्टेटचा कर्करोग झाल्याची घटना असेल तर त्यांना हा आजार होण्याची दाट शक्‍यता असते. मधुमेही, स्थूल, धूम्रपान करणारे, नसबंदी झालेले पुरुष यांनाही प्रोस्टेटचा कर्करोग होऊ शकतो. किरणोत्सर्ग हेही प्रोस्टेटच्या कर्करोगाचे एक कारण असू शकते. अर्थात, या सर्व शक्‍यता आहेत, हे ध्यानी घ्यावे. प्रोस्टेट ग्रंथीच्या निरुपद्रवी वाढीमुळे होणारा त्रास आणि कर्करोगाच्या प्रादुर्भावाने होणारा त्रास हा बहुतांशी सारखाच आहे. तरीही प्रोस्टेटच्या कर्करोगात बीपीएचमुळे होणाऱ्या लघवीच्या त्रासासमवेत इतरही काही लक्षणे आढळून येतात. त्यापैकी लघवीतून रक्त जाणे हे लक्षण सर्वांत महत्त्वाचे असते. कर्करोगग्रस्त पेशी रक्तातून शरीराच्या अन्य भागात पसरतात. उदा. मणक्‍याची हाडे, यकृत. त्यामुळे या रुग्णांमध्ये कंबर, मांडीची हाडे, खुबा, बरगड्या यामध्ये कमालीच्या वेदना जाणवू लागतात. कर्करोग वाढून तो हाडांमध्ये पसरल्याची ही लक्षणे असतात.  

निदान करताना..
पर रेक्‍टल (पी.आर.) तपासणी -
प्रोस्टेटची वाढ झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी हातात रबरी मोजा घालून डॉक्‍टर तर्जनी रुग्णाच्या गुदद्वारात घालतात. या तपासणीत कर्करोगग्रस्त प्रोस्टेट बोटाला दगडासारखी कडक लागते.

पी.एस.ए. - रक्ताची ही विशेष तपासणी असते. रक्तात पीएसए (प्रॉस्टेट स्पेसेफिक अँटिजेन) मोजले जाते. कर्करोग नसणाऱ्या व्यक्तीत ते ०.२ ते ४ एवढे असते. ४ ते १० प्रमाण असल्यास कर्करोगाची थोडी शक्‍यता असते. १० किंवा जास्त प्रमाण असल्यास कर्करोग असण्याची शक्‍यता अधिक बळावते. प्रोस्टेटच्या कर्करोगाच्या निश्‍चितीसाठी ही ‘स्क्रीनिंग‘ मानली जाते. 

अल्ट्रासाउंड रेखाचित्रण : कर्करोगाची शक्‍यता वाटल्यास केवळ बाह्यभागातून केलेल्या सोनोग्राफीवर अवलंबून न राहता ट्रान्स रेक्‍टल सोनोग्राफी केली जाते. त्यामुळे अधिक नेमकी माहिती मिळू शकते. एक लहान प्रोब गुदद्वारात घालून ही तपासणी केली जाते. टीव्हीसारख्या पडद्यावर चित्र उमटते. या तपासणीद्वारे पुर:स्थ ग्रंथीचा नेमका आकार, बदल समजू शकतो.  

उती परीक्षा (बायॉप्सी) - सोनोग्राफी यंत्रासोबत असलेल्या विशेष प्रोबच्या मदतीने गुदद्वारातून सुई घालून प्रोस्टेटची बायॉप्सी करतात. ग्रंथीचा एक तुकडा काढून सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासला जातो. या हिस्टोपॅथॉलॉजिकल तपासणीत (एचपीई) कर्करोगांच्या पेशींचे अस्तित्व असल्यास समजू शकते.

हाडांची क्ष-किरण तपासणी : कर्करोगाचा प्रसार हाडात झालेला असल्यास क्ष-किरण तपासणीने समजते.
 
सीटी स्कॅन : ही खास क्ष-किरण तपासणी असते. कर्करोग शरीरात इतरत्र पसरलेला असल्यास समजू शकते.

एम.आर.आय. स्कॅन : ही सीटी स्कॅनप्रमाणेच तपासणी असते. मात्र इथे क्ष-किरणांऐवजी चुंबकीयतत्वाचा वापर केला जातो. प्रत्येक रुग्णाला या सर्व तपासण्या कराव्या लागतातच असे नाही.

उपचार
शस्त्रक्रिया - रुग्णाचे वय, प्रकृती, कर्करोगाची अवस्था, उपचारांचे परिणाम- दुष्परिणाम या सर्वांचा विचार करून मगच उपचार ठरविले जातात. शस्त्रक्रिया : प्रोस्टेटच्या कर्करोगाचे निदान झाल्यावर कर्करोग पुर:स्थ ग्रंथीपुरताच मर्यादित स्वरूपात असेल तर रॅडिकल प्रोस्टेटेक्‍टॉमी म्हणजे पुर:स्थ ग्रंथी उच्छेदन ही शस्त्रक्रिया करून संपूर्ण ग्रंथी काढून टाकली जाते. अलीकडे केल्या जाणाऱ्या ‘रोबोटिक कीहोल’ या प्रकारच्या शस्त्रक्रिया अधिक परिणामकारक, रक्तस्त्राव अगर जंतुसंसर्ग यादृष्टीने कमी जोखमीच्या आहेत. साधारणत- दहा दिवस रुग्णालयात राहिल्यावर रुग्ण घरी पाठवला जातो. सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत तो बरा होतो. 

विकरण उपचार (रेडिओथेरेपी / ब्रॅकीथेरपी) : कर्करोगाच्या पेशींचा नाश करण्यासाठी उच्च ऊर्जा किरणांचा वापर केला जातो. हे करताना सुदृढ पेशींना हानी पोचणार नाही, याची काळजी घेतली जाते. विकिरण उपचारामुळे कर्करोग आटोक्‍यात येतो, तसेच वेदनाही कमी होतात. मळमळणे, थकवा येणे असे उपद्रव विकिरण उपचारांमुळे उद्‌भवतात हे खरे, पण ते कधी सौम्य असतात, तर कधी तीव्र असतात. पौष्टिक अन्न पदार्थ, भरपूर पेये व विश्रांती घेतल्यास आणि उपद्रवांसाठी दिलेली औषधे घेतल्यास आराम वाटतो. 

एडीथेरपी : ॲण्ड्रोजेन्स पद्धतीची पुरुषी संप्रेरके ( हॉर्मोन्स) प्रोस्टेटच्या कर्करोगाच्या वाढीस कारणीभूत समजली जातात. त्यामुळे काही रुग्णांमध्ये ॲण्ड्रोजेन्सना दबवणारे हॉर्मोन्स वापरले जातात. याला एडीटी (ॲण्ड्रोजेन्स डीप्रायव्हेशन थेरपी) म्हणतात. हा उपचार दीर्घकाळ घ्यावा लागतो. 

केमोथेरपी : कर्करोगाच्या पेशींचा नाश करणारी काही रसायने आहेत. इतर कर्करोगांप्रमाणेच काहीवेळा पुर:स्थ ग्रंथीच्या कर्करोगातही या रसायनांचा वापर केला जातो. प्रोस्टेटच्या ग्रंथीचे आजार दुर्लक्षिले गेले; पण वैद्यकीय निदानाची अधिकाधिक उपलब्धी आणि उपचारांची सुविधा वाढल्यामुळे या आजारांचे वेळेतच निदान करणे आणि उपचार करून घेता येणे शक्‍य झाले आहे.

प्रोस्टेट  कर्करोगाला  प्रतिबंध 
स्वास्थ्य आहार : जास्त प्रमाणात फळे व पालेभाज्या खाणे आवश्‍यक आहे. जीवनसत्त्वे व खनिजयुक्त आहार आपणास कर्करोगापासून वाचवू शकतो का, हे अजूनही पूर्णपणे सिद्ध झाले नाही. तरी योग्य आहार आपली शारीरिक स्थिती नक्कीच सुधारून कर्करोगासारख्या आजारापासून वाचवते.

योग्य व्यायाम : व्यायाम करणाऱ्या पुरुषांमध्ये पीएसएचे प्रमाण कमी राहते, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. नियंत्रित योग्य वजन आपणास प्रोस्टेटच नव्हे, तर अनेक प्रकारच्या कर्करोगांपासून वाचवते.

प्रा. डॉ. सुरेश पाटणकर (www.aceremedy.in)
संतोष शेणई (santshenai@gmail.com)