#FamilyDoctor सोरायसिस झाला तर ?

डॉ. प्रद्युम्न वैद्य
Sunday, 18 November 2018

सोरायसिसकडे केवळ त्वचा विकार म्हणून पाहता नये. अन्य आजारांच्या जोडीने सोरायसिस होण्याची शक्‍यता अधिक असते. किंबहुना इतर आजारांचा परिणाम म्हणून त्वचेच्या पेशींवर परिणाम झालेला असतो. 

सोरायसिस ही एक ‘स्वयंप्रतिरोधक’ (ऑटो-इम्युन) आजाराची अवस्था आहे. तिचे लक्षण म्हणून त्वचेवर परिणाम दिसून येतो. मात्र, सोरायसिसकडे केवळ एक त्वचेचा विकार म्हणून बघितले जाऊ नये. यासोबत सोरायटिक संधिवात, हृदयविकार, मधुमेह आणि नैराश्‍य यांसारखे अनेकविध आजार जोडलेले असतात. अलीकडील काळात, सोरायटिक संधिवाताचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. म्हणजेच कुठच्या तरी आजाराच्या परिणामामुळे त्वचेच्या पेशींवर परिणाम होतांना दिसतो आहे. 

त्वचेच्या पेशींचे सामान्य आयुष्यचक्र बिघडते तेव्हा सोरायसिसची लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. त्वचेच्या पेशी सामान्यपणे त्वचेच्या खोल स्तरांमध्ये वाढतात आणि  दिवसांतून एकदा त्या त्वचेच्या पृष्ठभागावर येतात. सोरायसिसमध्ये रोगप्रतिकारक यंत्रणा चुकीने त्वचेच्या निरोगी पेशींवर हल्ला करते, ही प्रक्रिया वेगाने सुरू झाली की, मृत पेशी त्वचेच्या पृष्ठभागावर जमा होतात. त्यामुळे त्वचेवर सूज, लाली, खवले दिसू लागतात. ती कोरडी होते, खाज सुटू लागते. सोरायसिस पूर्ण बरा होऊ शकत नसल्याने योग्य उपचारांच्या माध्यमातून विकाराचे व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे. घरगुती उपायांनी या लक्षणांपासून तात्पुरता आराम मिळू शकतो, पण सोरायसिस बरा होत नाही हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. खरे तर उपचाराचा हा पर्याय फारसा प्रभावी नसतो, कारण त्यामध्ये रोगप्रतिकार यंत्रणेला लक्ष्य करून काहीच केले जात नाही.

काहीवेळा ॲपल सायडर व्हिनेगर आणि टी ट्री ऑइल यांसारखे पदार्थ त्वचेवर लावण्याचा सल्ला दिला जातो. पण त्यामुळे खाज सुटणे किंवा कोरडेपणा यापासून आराम मिळतो.  मात्र, त्वचेवर भेगा असतील तर या घरगुती उपायांमुळे त्वचेची आग होणे किंवा वेदना यासारखा त्रास होऊ शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे. काही वनस्पतींपासून तयार केलेल्या औषधींची सोरायसिसच्या औषधांसोबत घातक आंतरक्रिया (इंटरॲक्‍शन) होऊ शकते. त्याचबरोबर गरोदर स्त्रिया किंवा स्तन्यपान करणाऱ्या माता, तसेच पूर्वीपासून मधुमेह किंवा उच्च रक्तदाब अशा वैद्यकीय अवस्थांमधून जाणाऱ्यांनी घरगुती उपाय न करणेच योग्य ठरेल.

सोरायसिसच्या रुग्णांची त्वचा संवेदनशील झालेली असते. त्यामुळे त्यांनी साबण, मॉश्‍चुरायझर, त्वचेची काळजी घेणारी उत्पादने, एवढेच नाही तर त्वचेशी थेट संपर्क येणाऱ्या वस्त्राचा प्रकार निवडताना काळजी घेतली पाहिजे. असे न केल्यास लक्षणे अधिक तीव्र होऊ शकतात. डॉक्‍टरांनी तपासणीनंतर दिलेली औषधे लक्षणांपासून आराम देणारी असतात. तसेच सोरायसिसच्या जोडीने येणाऱ्या विकारांचा धोका कमी करण्यात ही औषधे मदत करतात. डॉक्‍टरांनी सुचवलेल्या औषधांच्या जोडीने सोरायसिसच्या रुग्णांना उपयुक्त ठरू शकतील अशा काही घरगुती व्यवस्थापनाच्या सूचना पुढे दिल्या आहेत :

खूप गरम पाण्याने आंघोळ करणे टाळा, कारण, यामुळे त्वचा कोरडी पडू शकते. कोमट पाण्याने आंघोळ करा.

त्वचा कोरडी करण्याकरिता हलक्‍या हाताने टॉवेल फिरवा आणि आंघोळीनंतर स्वत:ला पूर्ण कोरडे करा.

सौम्य साबण वापरा. बेबी सोप्स हा पर्याय चांगला आहे.

लूफा वापरणे किंवा एक्‍सफोलिएशन टाळावे, कारण, यामुळे त्वचेच्या पेशींची हानी होऊ शकते.

आंघोळीनंतर मॉश्‍चुरायझरचा वापर करा. त्वचा दिवसभर आर्द्र राहील याची काळजी घ्या.

डोक्‍याच्या त्वचेला सोरायसिस झाल्यास कोल टार किंवा सॅलिसिलिक ॲसिडपासून तयार केलेला शाम्पू वापरा.

 सुती कपडे वापरा. त्यामुळे त्वचेतून हवा खेळती राहते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Psoriasis diseases Skin disorder