सोरायटिक संधिवाताचा  हिवाळी दाह 

डॉ. सुशांत शिंदे
Friday, 20 December 2019

हिवाळ्यात सोरायटिक आर्थरायटिसच्या रुग्णांना खूप त्रास होतो. या रुग्णांनी योग्य काळजी घेतल्यास हिवाळ्यातही ते आनंदी राहू शकतात. 

हिवाळ्यात सोरायटिक आर्थरायटिसच्या रुग्णांना खूप त्रास होतो. या रुग्णांनी योग्य काळजी घेतल्यास हिवाळ्यातही ते आनंदी राहू शकतात. 

हिवाळा हा आपल्यापैकी बहुतेकांसाठी सर्वाधिक प्रतिक्षित ऋतू असतो. सुट्या साजऱ्या करण्यापासून ते कौटुंबिक स्नेहसंमेलनापर्यंत कितीतरी कारणांनी आपण या ऋतूचा आनंद पुरेपूर लुटतो. मात्र, तापमानाचा पारा घसरला की सोरायटिक आर्थरायटिस असलेल्या अनेकांच्या सांध्यांमधील दाह आणखी वाढतो. या विकाराने ग्रस्त रुग्ण त्यांच्या लक्षणांवर नियमित नियंत्रण ठेवू शकत नाहीत तेव्‍हा हा दाह आणखी वाढतो. सोरायसिसचा त्रास असलेल्यांपैकी सुमारे तीस टक्के रुग्णांना सोरायटिक आर्थरायटिसचाही त्रास होतो. या प्रकारचा संधिवात सोरायसिस नसलेल्यांनाही होऊ शकतो. थंड व कोरडे हवामान, तसेच कमी आर्द्रता यामुळे लक्षणे अधिक तीव्र होतात, असा सोरायटिक आर्थरायटिसच्या अनेक रुग्णांचा अनुभव आहे. 

एका अभ्यासानुसार, तापमान दर दहा अंशांनी घटले की, संधिवाताच्या वेदनांमध्ये तेवढी तेवढी वाढ होत जाते. त्याचप्रमाणे वातावरणाचा कमी दाब आणि पर्जनवृष्टीमुळेही पीएसए रुग्णांमधील सांधेदुखी वाढू शकते. सूर्यप्रकाश अंगावर घेत नसल्याने ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होऊ शकते. ‘नॅशनल सोरायसिस फाउंडेशन’च्या मते, हिवाळ्यात कमी झालेल्या सूर्यप्रकाशामुळे ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता होते आणि त्यामुळे सोरायटिक आर्थरायटिसमधील सांध्यांचा दाह वाढू शकतो. 

हिवाळ्यात सोरायटिक आर्थरायटिसचा त्रास रोखण्यासाठी काही सर्वांत प्रभावी मार्ग आहेत, ते असे- 

गरम पाण्याने अंघोळ ः गरम पाण्याने अंघोळ केल्यामुळे दुखऱ्या सांध्यांवरील दाब कमी होतो आणि त्यांचा दाहही कमी होतो. आदर्श परिस्थितीत पाण्याचे तापमान ९२-१०० अंश फॅरनहाइट (३३-३८ अंश सेल्सिअस) असले पाहिजे. या तापमानाचे पाणी फार थंडही नसते आणि फार गरमही नसते. सुमारे वीस मिनिटे पाणी शरीराला लागेल असे बघा. अंघोळीनंतर शरीर सौम्य ताणले जाईल असे व्यायाम करण्याचा प्रयत्न करा आणि सांधे व स्नायूंची लवचिकता कायम राखा. 

योग्य कपडे : सोरायटिक आर्थरायटिसच्या रुग्णांना सुती कपड्यांसारखे नैसर्गिक, मऊ आणि श्वास घेण्याजोगे कपडे घालण्याचा सल्ला तज्ज्ञ नेहमी देतात. गार वारे लागल्यास सांधेदुखी वाढू शकते. तसेच त्वचा शुष्क पडते. म्हणूनच थंड हवामानात योग्य ते कपडे वापरणे महत्त्वाचे आहे. हिवाळ्यात सर्वांत आतमध्ये सुती कपडे घाला आणि त्यावर उबदार कपडे घाला. त्वचा शक्य तेवढी झाकण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला ऊबही मिळेल आणि बाहेरील पोशाखाच्या त्रासदायक तंतूंशी त्वचेचा थेट संपर्क येणार नाही. आणखी सुरक्षित राहण्यासाठी शक्य असेल तेव्हा शंभर टक्के सुती फ्लीस वापरा. 

व्यायाम : सोरायटिक आर्थरायटिसमध्ये सांधे मजबूत आणि लवचिक राखणे महत्त्वाचे आहे. या विकाराने ग्रस्त असलेल्यांना कदाचित थंड हवामानात व्यायाम करण्याची इच्छा होणार नाही. मात्र, नियमित व्यायाम केल्यास त्यांना निरोगी व क्रियाशील राहण्यात मदत होईल. घरात व्यायाम कोणीही नियमितपणे करू शकते. आपल्या क्रियाशीलतेप्रमाणे व्यायामात बदल करून घेण्यासाठी ऱ्हुमॅटोलॉजिस्ट आणि फिजिओथेरपिस्टशी चर्चा करा. 

लसीकरण : सोरायटिक आर्थरायटिक लोकांसाठी सर्वांत उत्तम मार्ग म्हणजे फ्लूची लस घेणे. हिवाळ्यात अत्यंत कमी तापमानाच्या प्रदेशात राहणाऱ्यांसाठी हे विशेष गरजेचे आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, सोरायटिक आर्थरायटिसच्या रुग्णांसाठी फ्लूची लस साधारणपणे सुरक्षित असते. अर्थात ही लस घेण्यापूर्वी ऱ्हुमॅटोलॉजिस्टचा सल्ला हा घेतलाच पाहिजे. 

आरोग्यपूर्ण आहार व पुरेशी झोप : निरोगी वजन राखण्यासाठी प्रत्येकानेच आरोग्यपूर्ण आहार घेणे आवश्यक आहे. पण विशेषत: सोरायटिक आर्थरायटिसच्या रुग्णांसाठी तर हे खूपच महत्त्वाचे आहे. वजन वाढल्यास सांधेदुखी आणि जळजळ यांसारखी सोरायटिक आर्थरायटिसची लक्षणे अधिक तीव्र होऊ शकतात. आरोग्यपूर्ण आहारामुळे रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते. हेही सोरायटिक आर्थरायटिससाठी महत्त्वाचे आहे. भरपूर ताजी फळे आणि भाज्या खा, पूर्ण धान्ये व प्रथिनांचा समावेश असलेले अन्य घ्या आणि सॅच्युरेटेड मेदाचे सेवन मर्यादित ठेवा. त्याशिवाय अपुरी झोप सोरायटिक आजाराच्या रुग्णांसाठी घातक ठरू शकते. सोरायसिस व सोरायटिक आर्थरायटिसमध्ये सुटणारी खाज तसेच यातील वेदनांमुळे झोप नीट लागत नाही असे संशोधनात दिसून आले आहे, यामुळे थकवा व ताण अधिक वाढतो व विकाराची लक्षणे अधिक तीव्र होतात. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Psoriatic arthritis article written by Dr Sushant Shinde