फुप्फुसातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा 

डॉ. अजित कुलकर्णी 
Friday, 24 January 2020

हालचालीविना बराच काळ घालवणे हे रक्तात गुठळ्या व्हायला निमंत्रण देणारे ठरू शकते. रक्ताच्या गुठळ्या फुप्फुसापर्यंत पोहोचून फुप्फुसाचे, हृदयाचे कार्य बिघडवू शकतात. त्यादृष्टीने आधीच काळजी घ्यायला हवी. 
 

हालचालीविना बराच काळ घालवणे हे रक्तात गुठळ्या व्हायला निमंत्रण देणारे ठरू शकते. रक्ताच्या गुठळ्या फुप्फुसापर्यंत पोहोचून फुप्फुसाचे, हृदयाचे कार्य बिघडवू शकतात. त्यादृष्टीने आधीच काळजी घ्यायला हवी. 
 

श्‍वसनसंस्थेतील अतिशय महत्त्वाचा अवयव म्हणजे फुफ्फुसे. वातावरणातील ऑक्सिजन रक्ताद्वारे सर्व शरीराला पुरवणे आणि शरीरात तयार झालेला कार्बन डाय ऑक्साईड लाल पेशींमधून काढून शरीराबाहेर टाकण्याचे काम फुफ्फुसांकडून होत असते. ‘पल्मनरी एम्बॉलिझम’ म्हणजे फुप्फुसातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होणे. बरेचदा पायांमधून किंवा शरीरातील इतर भागांमधून रक्ताच्या गुठळ्या फुप्फुसांपर्यंत पोहोचतात. यामध्ये शरीरात खोलवर असलेल्या नसांमध्ये रक्ताची गुठळी निर्माण होते. या रक्ताच्या गुठळ्या रक्तवाहिन्यांमधून रक्तप्रवाहाबरोबर फुप्फुसात जाऊन बसतात आणि रक्ताचा प्रवाह थांबवितात ज्याला ‘डीप वेन थ्रॉम्बोसिस’ म्हणतात. फुप्फुसाला होणाऱ्‍या रक्तपुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे ही स्थिती कधी कधी जीवघेणी ठरू शकते. फुप्फुसातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला की त्याचे परिणाम फुप्फुसाच्या आणि हृदयाच्या कार्यावरही होतात. त्यादृष्टीने या आजाराकडे पाहायला हवे. 

 

‘पल्मनरी एम्बॉलिझम’ची लक्षणे भिन्न असू शकतात. ही लक्षणे व्यक्तीच्या फुप्फुसाचा किती भाग प्रभावित झाला आहे, रक्ताच्या गुठळ्यांचा आकार व त्या व्यक्तीस फुप्फुस किंवा हदयाचा आजार आहे का? यांवर अवलंबून असतात. काही लक्षणे अशी - 
- श्‍वसनाला अडथळा निर्माण होणे 
- छातीत दुखणे 
- पायाला सूज येणे 
- ताप येणे 
- घाम येणे 
- त्वचेचा रंग बदलणे 
- हृदयाचे वेगवान किंवा अनियमित ठोके 
- डोकेदुखी किंवा चक्कर येणे 
- खोकल्याद्वारे रक्त बाहेर येणे 

उपचाराअभावी संभाव्य गुंतागुंत 
पल्मनरी एम्बॉलिझमचे निदान व उपचार योग्य वेळेत न झाल्यास रूग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते. पण जर या स्थितीचे वेळेतच निदान झाले आणि त्यावर योग्य उपचार केले गेले तर रुग्ण दगावण्याची शक्यता दुरावते. योग्य उपचारांनी रुग्ण वाचण्याची शक्यता बळावते, पण काही जणांमध्ये पल्मनरी एम्बॉलिझमचे रूपांतर ‘पल्मनरी हायपर टेन्शन’मध्ये होऊ शकते. म्हणजे अशा रुग्णांमध्ये फुप्फुसामधील रक्तदाब आणि हदयाच्या उजव्या बाजूतील रक्तदाब जास्त असतो. जेव्हा एखाद्याच्या फुप्फुसामधील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात तेव्हा त्याच्या हदयाला त्या रक्तवाहिन्यांमधून रक्त ढकलण्यासाठी अधिक जोर द्यावा लागतो. साहजिकच या जोर देण्याच्या क्रियेमुळे रक्तवाहिन्यांमधील आणि हदयाच्या उजव्या बाजूतील रक्तदाब वाढतो. असे घडले तर त्यामुळे रुग्णाचे हृदय कमकुवत होऊ शकते. काही दुर्मिळ स्थितीमध्ये छोटीशी गाठ सतत आढळते आणि वेळेनुसार मोठी होते, त्या स्थितीला ‘क्रोनिक पल्मनरी हायपर टेन्शन’ किंवा ‘क्रोनिक थ्रोम्बोएम्बोलिक पल्मनरी हायपर टेन्शन’ म्हणतात. 

जोखमीचे घटक 
- पायांमधील नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होणे 
- कौटुंबिक इतिहास 
- हृदयरोग 
- कर्करोग, विशेषत: स्वादुपिंड, अंडाशय आणि फुप्फुसाचा कर्करोग 
- कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असल्यास 
- याबरोबरच धूम्रपान, लठ्ठपणा, गर्भावस्था 
- अंथरूणाला खिळून राहणे, विशेष करून कुठल्याही शस्त्रक्रिया किंवा मोठ्या उपचारानंतर हालचाल नसल्यास रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका बळावतो 
- मोठ्या कालावधीचे प्रवास, एकाच जागी बसल्याने पायातील रक्तप्रवाह मंदावू शकतो, ज्यामुळे गुठळ्या निर्माण होण्याची शक्यता 

उपचार 
ब्लड थिनर्स : शस्त्रक्रियेपूर्वी किंवा नंतर ज्या व्यक्तींना शरीरात रक्ताच्या गाठी निर्माण होण्याचा धोका असतो, तसेच हृदयरोग, स्ट्रोक किंवा कर्करोगाची गुंतागुंत असलेल्या रुग्णावर अशा प्रकारचे उपचार केले जातात. 

कॉम्प्रेशन स्टॉकिंग्ज : शस्त्रक्रियेदरम्यान किंवा नंतर रक्ताभिसरण होण्यासाठी ‘कॉम्प्रेशन स्टॉकिंग्ज’ हा एक सोपा मार्ग आहे. यामुळे पायांना स्थिर करून पायाचे स्नायू व नसांमधील रक्तप्रवाह अधिक कार्यक्षम होण्यास मदत होते. 

लेग एलिव्हेशन (पाय उंचावणे) : शक्य असेल तेव्हा, तसेच रात्रीच्या वेळी पायाखाली किंवा तळाशी कोणतीही चार ते सहा इंच उंच वस्तू ठेवून पाय उंचावणे अत्यंत प्रभावी ठरू शकते. 

शारीरिक हालचाल : शस्त्रक्रियेनंतर शरीराची होईल तितक्या लवकर हालचाल केल्याने फुप्फुसाचा ‘एम्बोलिझम’ रोखण्यास व शरीराची त्वरित पुनर्प्राप्ती होण्यास मदत होऊ शकते. 

न्युमॅटिक कंप्रेशन : या उपचारामध्ये मांडी, पोटरीच्या आकाराचे ‘कफ’ वापरले जातात, जे आपोआप हवेने फुगतात आणि दर काही मिनिटांनी त्यातील हवा कमी होते. त्यामुळे पायांना मालीश मिळते आणि त्या व्यक्तीच्या पायांच्या नसांमधील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतात. 

लांबच्या पल्ल्याचा प्रवास करताना भरपूर पाणी पिणे, प्रवासादरम्यान ब्रेक घेणे, एकाच जागी बसण्यापासून पर्याय नसेल तर पायाची हालचाल करणे हे उपयुक्त ठरू शकते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pulmonary Embolism article written by Dr Ajit Kulkarni