दिसते त्या पलीकडचे

Quantum_Physics
Quantum_Physics

ज्या विश्वात आपण राहतो, त्याचा अनुभव घेण्यासाठी, विश्वातील भौतिक गोष्टींचे ज्ञान होण्यासाठी परमेश्वराने किंवा निसर्गाने मनुष्यप्राण्यांना पाच ज्ञानेंद्रिये दिली. डोळ्यांनी पाहण्याचे, कानांनी ऐकण्याचे, त्वचेने स्पर्शाचे, नाकाने गंधाचे आणि जिभेच्या मदतीने आपण चवीचे ज्ञान करून घेऊ शकतो. पाचही ज्ञानेंद्रियांच्या मदतीने आपल्या ज्ञानात व अनुभवात भर पडत असते. सुख-दुःखाची, चांगल्या-वाईटाची जाणीव करून देणारी मुख्यत्वे आपली इंद्रियेच असतात; मात्र फक्‍त इंद्रियांनी समजू शकेल तेच खरे असे म्हटले, तर अनवस्थाही उद्‌भवते. कारण, भौतिकाच्या पलीकडेसुद्धा अनेक गोष्टी असतात, अनेक संकल्पना असतात ज्याचा आपल्यावर सातत्याने आणि मूलगामी असा परिणाम होत असतो. आयुर्वेदातही हेच सांगितलेले आहे. चरकाचार्य म्हणतात,
 
प्रत्यक्षं हि अल्पम्‌, अनल्पं अप्रत्यक्षम्‌ । 
जे इंद्रियगम्य आहे ते फारच थोडे आहे; पण जे अप्रत्यक्ष आहे, ज्याचे ज्ञान इंद्रियांच्या मदतीने होऊ शकत नाही, ते अमर्याद आहे. 

आधुनिक शास्त्रज्ञांना हळूहळू हे जाणवू लागले. भौतिकाच्या पलीकडे जाऊन विचार करणे अपरिहार्य आहे हे समजले आणि त्यातून "क्वांटम फिजिक्‍स' ही विज्ञानशाखा उदयाला आली. शाळा-कॉलेजमध्ये शास्त्र विषयांतर्गत "फिजिक्‍स' म्हणजे भौतिकशास्त्राची ओळख आपल्या सर्वांना असते, त्याचीच एक विशेष शाखा जी अणूतील परमाणूचा अभ्यास करते, परमाणूतील केवळ जडत्वाचा किंवा भौतिकत्वाचा अभ्यास न करता त्यातील शक्‍तीचा अभ्यास करते, आसपासच्या वातावरणाचा या सूक्ष्म परमाणूवर कसा आणि का परिणाम होतो, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते ते आधुनिक विज्ञान म्हणजे "क्वांटम फिजिक्‍स'. क्वांटम म्हणजे सर्वाधिक सूक्ष्म कण किंवा परमाणू. विश्वाच्या मुळाशी असणाऱ्या सूक्ष्मातील सूक्ष्म परमाणूचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो ते शास्त्र म्हणजे "क्वांटम फिजिक्‍स'. 

जे केवळ संख्येत मोजता येत नाही, ज्याचे प्रत्येक वेळी गणिताप्रमाणे दोन अधिक दोन म्हणजे चार असे पूर्वनिश्‍चित उत्तर देता येत नाही, त्या सर्वांचा क्वांटम फिजिक्‍समध्ये समावेश होतो. म्हणून शास्त्रज्ञांनाही याचे कोडे उलगडलेले नाही, उलट आत्तापर्यंत प्रत्येक गोष्ट संख्येच्या मदतीने सिद्ध करण्याचा अट्टहास फोल होता, हे लक्षात येऊ लागले आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भारतीय ऋषिमुनींनी, प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांनी, योग-आयुर्वेदासारख्या जीवनशास्त्रांनी हजारो वर्षांपासून जे सांगण्याचा प्रयत्न केला ते आज क्वांटम फिजिक्‍सच्या मदतीने समजू शकेल, अशी परिस्थिती निर्माण झाली. 

क्वांटम फिजिक्‍स समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञ अविरत प्रयत्न करत आहेत, संशोधनातून त्याचे स्वरूप अधिकाधिक स्पष्ट होईलच; मात्र आयुर्वेदातील अनेक संकल्पना ज्या सध्या प्रचलित असलेल्या भौतिकशास्त्रात बसत नाहीत, त्या क्वांटम फिजिक्‍सच्या तत्त्वांवर समजून घेता येतात. उदा. आयुर्वेदीय औषधीकरणातील संस्कार. 
"संस्कारो हि गुणान्तराधेन' म्हणजे वस्तूच्या मूळ गुणांमध्ये संस्कारांच्या मदतीने बदल करता येतात. हा बदल कशासाठी करायचा? याचे उत्तर खालील सूत्रातून मिळते. 

दोष अपनयेन वा गुणाधानेन वा । 
1. वस्तूतील दोषांचे निवारण करण्यासाठी आणि 
2. जे गुण असतील त्यांचा उत्कर्ष करण्यासाठी. 

म्हणून आयुर्वेदिक औषध बनविताना संस्कार ही सर्वांत महत्त्वाची पायरी असते, यात भौतिकतेपेक्षाही द्रव्याच्या गुणोत्कर्षावर, द्रव्याची कार्यकारिता अधिक संपन्न बनविण्यावर भर दिलेला असतो. उदा. जेव्हा आवळ्याच्या चूर्णाला आवळ्याच्या रसाच्या भावना दिल्या जातात, तेव्हा मूळ चूर्णाच्या वजनात किंवा रूप-रंगात फारसा फरक पडत नाही; मात्र अशा भावना दिलेला आवळा अनेक पटींनी अधिक काम करतो. अधिक खुलासा करायचा तर एक किलो मूळ आवळ्याचे चूर्ण आणि त्याला दुसऱ्या एक किलो आवळ्याच्या रसाच्या भावना दिल्या, तर त्यातून तयार झालेले औषध घेण्याचा फायदा दोन किलो आवळ्यामुळे होणाऱ्या फायद्यापेक्षा अनेक पटींनी जास्त असतो. म्हणजेच सामान्य भौतिकाचा एक अधिक एक बरोबर दोन हा नियम येथे लागू होत नाही. 

अजून एक संस्कार म्हणजे दह्याचे ताक करताना केला जाणारा मंथन संस्कार. फक्‍त भौतिकाचा विचार केला तर दही आणि ताकात फरक एवढाच की दह्यापेक्षा ताकात पाणी अधिक प्रमाणात असते. परंतु मंथन संस्कार करून बनविलेले ताक आणि दह्यात गुणाचा आणि कार्याचा विचार केला, तर जमीन-अस्मानाचा फरक असतो. दही उष्ण असते, पचायला जड असते तसेच सूज वाढविणारे, रक्‍तदोष उत्पन्न करणारे असते, याउलट ताजे गोड ताक मात्र पित्त वाढवत नाही, अनेक प्रकारच्या पोटाच्या विकारांवर औषधाप्रमाणे गुणकारी असते, सूज कमी करते आणि त्वचारोगात पथ्यकर असते. अर्थात हा फरक केवळ भौतिकत्वावर न समजणारा असा आहे. 

आरोग्य टिकण्यासाठी, तसेच रोगावर उपचार करण्यासाठी आयुर्वेदाने फक्‍त औषधे, पथ्य, पंचकर्म, मनावर निग्रह एवढेच उपचार सुचवले नाहीत, तर त्याच्याही आधी "दैवव्यपाश्रय' उपचार सांगितले. दैव शब्दाचा अर्थ "नशीब' इतकाच न करता सर्व अदृष्टाचा, इंद्रियांनी ग्राह्य नसणाऱ्या सर्व सूक्ष्म शक्‍तींचा, केवळ परिणामाने अस्तित्व सिद्ध करणाऱ्या सर्व गोष्टींचा दैवात अंतर्भाव केलेला दिसतो. खालील सूत्रावरून हे स्पष्ट होते, 

दैवं अदृष्टं तद्‌ व्यपाश्रयं, तच्च यद्‌ अदृष्टजननेन व्याधिप्रत्यनीकं मन्त्रादि । 

दैवव्यपाश्रय चिकित्सेमध्ये विशिष्ट मंत्रांचे श्रवण करणे, विशिष्ट औषधी वनस्पती जवळ बाळगणे किंवा आसपास असू देणे, विशिष्ट मणी, रत्न वगैरे अंगावर धारण करणे, मंगल द्रव्ये किंवा मंगल चिन्हे पाहणे, दान करणे, विशिष्ट नियम, अनुशासन पाळणे, प्रायश्‍चित्त घेणे, उपवास करणे, स्वस्तिमंत्र म्हणणे, यज्ञयाग करणे, देव-गुरुजनांना शरण जाणे, देशाटन, तीर्थयात्रा करणे वगैरे गोष्टी उपचार म्हणून समजावल्या आहेत. उदा. औषधासाठी वनस्पती उपटण्यापूर्वी आयुर्वेदात विशिष्ट प्रार्थना म्हणायला सांगितल्या आहेत, फक्‍त उपटण्यापूर्वीच नाही तर जी वनस्पती उपटायची वा कापायची असेल तिच्याजवळ आदल्या दिवशी जाऊन प्रार्थना करायची आणि नंतर दुसऱ्या दिवशी वनस्पती काढायची असे सांगितलेले दिसते. औषध तयार करताना, औषध घेतानासुद्धा निरनिराळे मंत्र सांगितलेले दिसतात. ज्वरासारख्या रोगात औषधांच्या बरोबरीने विष्णुसहस्रनाम म्हणायला सांगितलेले आढळते. 

विषावर उपचार सांगताना विशिष्ट पद्धतीने तयार केलेले "अगद' जवळ किंवा घरात ठेवायला सांगितले आहेत. ज्या परिसरात विषबाधा होण्याची शक्‍यता अधिक असते, त्या ठिकाणी तगर, कुष्ठ, शिरीषपुष्प व तूप यांचा अग्नीवर धूप करण्यास सांगितला आहे. गर्भारपणात गर्भपात होऊ नये, यासाठी शतावरी, ब्राह्मी, दूर्वा, गुळवेल वगैरे वनस्पती घरात ठेवणे, या वनस्पतींची जोपासना करणे वगैरे उपचार सुचवलेले दिसतात. ज्या नक्षत्रावर जन्म झाला असेल, त्या नक्षत्रवृक्षाचे भरण-पोषण करण्याने आरोग्य चांगले राहते, असा उल्लेख सापडतो. 

शरीरातील विषाचा नाश व्हावा, यासाठी हिरा घालण्यास सांगितलेले आढळते. वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असला, तर कानात खरे मोती घालण्याचा उपयोग होताना दिसतो. आयुर्वेदात "अष्टमंगल' द्रव्यांचा उल्लेख आढळतो. ज्ञानी व्यक्‍ती, गाय, अग्नी, सुवर्ण, तूप, सूर्य, शुद्ध जल आणि राजा म्हणजे आपला रक्षणकर्ता या अष्टमंगल गोष्टींचे रोज दर्शन करणे हे आरोग्यदायक, शुभकारक असते, असेही सांगितले आहे. 

दान करण्याने मिळणारे मानसिक समाधान तसेच ज्याला दान मिळाले असेल त्याची सद्‌भावना ही आरोग्याला कारण ठरू शकते. विशिष्ट नियम पाळणे, शिस्तीत राहणे हे मनावर अंकुश ठेवण्यास सहायक असतात. उपवास करण्याने मनावर व इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे शक्‍य होते तसेच लंघनाचेसुद्धा फायदे मिळतात. यज्ञयागात आहुती म्हणून अर्पण केली जाणारी द्रव्ये उत्तम गुणांनी युक्‍त असतात. यातून पर्यावरणाची शुद्धी तर होतेच, पण यज्ञधूमाच्या रूपाने हे औषधी गुण अधिकाधिक क्षेत्रात पोहोचून आपले काम करू शकतात. मधुमेहासारख्या रोगात दूरदेशी पायी चालत चालत यात्रा करणे हा उपचार म्हणून सुचविलेला दिसतो. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील, की वरवर पाहता त्याकडे उपचार म्हणून पाहिले जात नाही; मात्र त्यामागचा उद्देश, त्यामागचे शास्त्र समजून घेतले तर त्यातून आरोग्यरक्षण होणार आहे हे लक्षात येते. क्वांटम फिजिक्‍सच्या मदतीने उपचारांची ही पद्धत शास्त्रीय भाषेत जगासमोर येऊ शकली, तर त्यामुळे संपूर्ण जगाचा आरोग्यस्तर उंचावेल हे नक्की !! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com