
आंब्याच्या सिझनमध्ये रोज आंबा खाल्ला तर चालतो का? कृपया आंबा कधी खावा, कसा खावा याबद्दल मार्गदर्शन करावे.
प्रश्नोत्तरे
आंब्याच्या सिझनमध्ये रोज आंबा खाल्ला तर चालतो का? कृपया आंबा कधी खावा, कसा खावा याबद्दल मार्गदर्शन करावे.
- मधुरा पाटील
उत्तर - आंबा खाताना वय, प्रकृती आणि पचन या गोष्टी ध्यानात घेणे गरजेचे असते. मधुमेह, संधिवात असणाऱ्यांना आंबा जपून म्हणजे वैद्यांच्या सल्ल्याने खाणे चांगले. अपचन, स्थौल्य, वारंवार पोट बिघडण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनीही आंबा काळजीपूर्वक खावा. आंबा शक्यतो दुपारचा खावा. अगोदर तासाभरासाठी थंड पाण्यात बुडवून मग खावा. आंब्याचा रस काढून, रसात रेषा असल्या तर त्या काढून म्हणजे गाळून घेऊन खाणे, वाटीभर रसात दोन चमचे घरी बनविलेले साजूक तूप, वेलची, दालचिनी, तमालपत्र व नागकेशर या चार वनस्पतींच्या समभाग चूर्णातील दोन चिमूट चूर्ण मिसळून आंबा खाणे उत्तम. यामुळे आंबा पचतो, अंगी लागतो व उन्हाळ्यातील शीण दूर करतो.
माझ्या मुलाचे वय ३५ वर्षे आहे. त्याला वारंवार किडनी स्टोन होण्याचा त्रास आहे. किडनी स्टोनवर सोपा आयुर्वेदिक उपाय सुचवावा ही विनंती.
- मधुकर सोळंकी
उत्तर - सध्या पाण्याचा जडपणा, पाण्यातील दोष वाढलेले असल्यामुळे वारंवार किडनी स्टोन होण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. प्यायचे पाणी २० मिनिटांसाठी उकळून घेणे हा यावरचा घरच्या घरी करता येण्याजोगा पण प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. याशिवाय महावरुणादी काढा, पुनर्नवासव, चंद्रप्रभा यासारखी औषधे घेणे, अश्मसॅन गोळ्या घेणे, हे सुद्धा उपयोगी असते. किडनी स्टोनमुळे कमरेत, कुशीत दुखत असल्यास त्यावर संतुलन रोझ ब्यूटी सिद्ध तेल लावून गरम पाण्याच्या पिशवीने शेक करण्याचा, पुनर्नवा, पळसाची फुले वगैरे द्रव्यांपासून बनविलेल्या काढ्यामध्ये कटिस्नान घेण्याचाही गुण येतो. या उपायांनी बरे वाटेलच, तरीही नेमक्या उपचारांसाठी आणि प्रवृत्ती समूळ नष्ट होण्यासाठी वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे श्रेयस्कर.
Web Title: Question And Answer 6th May 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..