Question and Answer
Question and Answer

प्रश्नोत्तरे

 ‘फॅमिली डॉक्‍टर’मधून आरोग्याविषयी खूप माहिती मिळते. माझे वय ४५ वर्षे असून, मी गृहिणी आहे. मला सतत थकवा जाणवतो, कधी कधी अंग दुखते, चिडचिड होते. जीवनसत्त्व व मिनरल्सची कमतरता आहे, असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. तरी यावर आयुर्वेदिक औषध सुचवावे. मला अजूनही मासिक पाळी नियमित येते. 
.... सीमा 

ताकद कमी पडली की चिडचिड होणे स्वाभाविक असते. या सर्व तक्रारींवर शरीराचे पोषण व स्त्री-संतुलन होणे गरजेचे आहे. यादृष्टीने सकाळ-संध्याकाळ शतावरी कल्प घेण्याचा, ‘सॅनरोझ’ रसायन घेण्याचा उपयोग होईल. रात्री झोपण्यापूर्वी अंगाला अभ्यंग म्हणजे हलक्‍या हाताने संपूर्ण शरीराला ‘संतुलन अभ्यंग तीळ सिद्ध तेला’सारखे तेल जिरवून लावण्याचा उपयोग होईल. आहारात काळ्या मनुका, अंजीर, खारीक, डिंकाचे लाडू, साळीच्या लाह्या, घरी बनविलेले साजूक तूप, पंचामृत, रात्रभर भिजविलेले बदाम यांचा नियमित अंतर्भाव केला तर कोणतीही कमतरता राहात नाही असा अनुभव आहे. सकाळी चालणे, अनुलोम-विलोम, सूर्यनमस्कार करणे हे सुद्धा श्रेयस्कर. 

पोटात वायू अडकून पोट दुखत असेल तर कोणता उपाय करावा? पित्तशांती व अन्नयोग गोळ्या जेवणापूर्वी घ्याव्यात की नंतर घ्याव्यात? कृपया मार्गदर्शन करावे. 
..... सहकारे 

पोटात वायू अडकून राहू नये यासाठी त्याचे अनुलोमन होणे गरजेचे असते. यासाठी गरम पाणी पिणे, निदान जेवताना प्यायचे पाणी अगोदर उकळलेले व गरम असताना घेणे चांगले. जेवणापूर्वी लिंबाचा रस एक चमचा, आल्याचा रस पाव चमचा, भाजलेल्या जिऱ्याची पूड पाव चमचा आणि चवीनुसार सैंधव मीठ हे मिश्रण घेण्याने वायूचे अनुलोमन होते. जेवणानंतर वाटीभर ताज्या ताकात अर्धा चमचा लवणभास्कर चूर्ण घेण्यानेही वायू सरण्यास मदत मिळते. वायूमुळे पोट दुखत असेल तेव्हा पोटावर तेल लावून वरून गरम पाण्याच्या पिशवीने शेकण्याचाही फायदा होतो. ‘संतुलन अन्नयोग’ गोळ्या नियमित घेण्यानेही पचन सुधारून वायू अडकणे, पोट दुखणे हे त्रास थांबतात असा अनुभव आहे. ‘संतुलन अन्नयोग’ गोळ्या जेवणानंतर घ्यायच्या असतात. ‘संतुलन पित्तशांती’ गोळ्या साधारणतः सकाळ-संध्याकाळ घ्यायच्या असतात, मात्र जेवणानंतर छाती-पोटात जळजळ किंवा एसि़डिटीची लक्षणे आढळत असल्यास ‘संतुलन पित्तशांती’ गोळ्या जेवणानंतर घेणे अधिक गुणकारी असते. 

साळीच्या लाह्या खाणे व साळीच्या लाह्यांचे पाणी पिणे यापैकी कोणता उपाय कोणत्या परिस्थितीत करावा? 
.... श्रीमती जोशी 

साळीच्या लाह्या पचायला सोप्या तरीही पोषक, वात-पित्तशामक, पण कफदोष न वाढविणाऱ्या आणि सर्व प्रकृतींसाठी अनुकूल असतात. पथ्यकर अन्नात साळीच्या लाह्या अग्रणी असतात. मळमळ, उलटी, भूक सहन न होणे, अवेळी भूक लागणे, जुलाब वगैरे सर्व तक्रारींवर साळीच्या लाह्या नुसत्या खाणे हे औषधाप्रमाणे गुणकारी ठरते. भुकेची वेळ झाली आहे, पण काही कारणास्तव जेवण करणे शक्‍य नसेल अशा वेळी साळीच्या लाह्या खाण्याने पोटाला आधार मिळतो, पित्त वाढत नाही, पर्यायाने डोके दुखणे वगैरे त्रास होत नाहीत. सकाळी नाश्‍त्यासाठी सुद्धा साळीच्या लाह्यांमध्ये, दूध व साखर मिसळून खाण्याने दुपारच्या जेवणापर्यंत पोटाला आधार मिळतो आणि शक्‍ती टिकून राहते. साळीच्या लाह्या भिजवून तयार केलेले पाणी हे रसक्षयावर उत्तम असते. म्हणजे शरीरात कडकी असणे, आतून कोरडेपणा जाणवणे, हाता-पायांची आग-आग होणे, कितीही पाणी प्यायले तरी तहान न शमणे, पटकन थकवा जाणवणे, लघवीला जळजळणे वगैरे तक्रारींवर मूठभर साळीच्या लाह्या एक कप पाण्यात रात्रभर, किमान तीन-चार तास भिजत घालून, गाळून घेतलेल्या पाणी नुसते किंवा थोडी खडीसाखर मिसळून पिण्याचा उपयोग होतो. 

‘फॅमिली डॉक्‍टर’मधील माहितीचा आम्हाला खूप उपयोग होतो. यासाठी प्रथम आपणास धन्यवाद. माझा प्रश्‍न असा आहे, की माझा मुलगा तेरा वर्षांचा असून त्याला नेहमी घाम येतो. तो लहान असताना वरच्या दुधावर वाढला आहे. त्यामुळे त्याची ताकद कमी आहे. तरी त्याला पौष्टिक असे काय द्यावे? 
.... प्रमिला 

 या वयात सर्व बाजूंनी परिपूर्ण पोषण मिळणे आवश्‍यक असते. या दृष्टीने मुलाला सुवर्णवर्ख, केशरयुक्‍त ‘संतुलन अमृतशर्करा’ मिसळलेले पंचामृत (म्हणजे तूप, मध, दही व अमृतशर्करा प्रत्येकी एक-एक चमचा व दूध पाच चमचे) नियमित देण्याचा उपयोग होईल. भारतीय वंशाच्या गाईचे (सध्या ए२ नावाने उपलब्ध) दूध, त्यात ‘संतुलन चैतन्य कल्प’ मिसळून देण्यानेही सप्तधातूंचे पोषण होण्यास मदत मिळेल. आठवड्यातून दोन-तीन वेळा अभ्यंग करणे, योगासने, मैदानी खेळ, पोहणे वगैरेंची आवड लावणे, रोज सकाळी च्यवनप्राशसारखे रसायन देणे हे सुद्धा आवश्‍यक. 

माझे वय ५६ वर्षे असून मला दहा वर्षांपासून मधुमेह आहे. सध्या मी इन्सुलिन व गोळ्या घेतो आहे. दोन वर्षांपासून डाव्या पायाला काळसरपणा आलेला आहे, त्या पायाच्या संवेदनाही तुलनेने कमी वाटतात. डॉक्‍टरांनी डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणून सांगितलेले आहे. तरी आपण आयुर्वेदातील काही उपचार सुचवावेत. आम्ही संपूर्ण कुटुंब ‘फॅमिली डॉक्‍टर’ वाचतो, आपल्या सूचनांचा आम्हास खूप उपयोग होतो. आपल्या लेखातून आपण सर्व जण निसर्गापासून दूर जात आहोत याची जाणीव होते. 
...... संजय जाधव 

निसर्गाचा भाग असूनही निसर्गापासून दूर जाण्याने सध्या समस्या वाढत आहेत. अजूनही पुन्हा नैसर्गिक जीवनशैलीचा अवलंब करण्याचा उपयोगच होईल. मधुमेह फक्‍त नियंत्रणात ठेवण्यापेक्षा त्याची संप्राप्ती शक्‍य तितकी सुधारणे आणि मधुमेहामुळे शरीराचे इतर नुकसान होऊ न देणे यासाठी आयुर्वेदीय उपचारांचा उत्तम फायदा होताना दिसतो. यासाठी तज्ज्ञ वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन प्रकृतिनुरूप औषधे सुरू करणे, विरेचन-बस्ती यांसारखे उपचार घेणे, त्यानंतर पिंडस्वेदन, विशेष द्रव्यांचा पायावर परिषेक, लेप वगैरे उपचार घेणे आवश्‍यक होय. तत्पूर्वी दोन्ही पायांना व छाती-पोटाला नियमितपणे अभ्यंग करणे, ‘संतुलन सुहृदप्राश प्लस’सारखे रसायन घेणे, पुनर्नवासव, ‘संतुलन दशार्जुन’सारखे आसव घेणे हे उपाय सुरू करता येतील. सकाळी पाच-दहा मिनिटांसाठी अनुलोम-विलोम करण्याचाही फायदा होईल.  

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com