प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 6 September 2019

मी माझ्या बाळासाठी ब्रह्मलीन घृत घेतलेले आहे. त्याला नुकतेच दात यायला सुरवात झालेली आहे. तर, त्याला हे घृत दिले तर चालेल का? किती मात्रेमध्ये द्यावे?       ..... ओहोळ 

मी माझ्या बाळासाठी ब्रह्मलीन घृत घेतलेले आहे. त्याला नुकतेच दात यायला सुरवात झालेली आहे. तर, त्याला हे घृत दिले तर चालेल का? किती मात्रेमध्ये द्यावे?       ..... ओहोळ 
बालकांच्या मेंदूचा विकास व्यवस्थित व्हावा, बुद्धी-स्मृती व्यवस्थित कार्यरत राहावी यासाठी आयुर्वेदाने जी अनेक रसायने सुचवली, त्यातलेच हे एक. दात येत असतानाही हे घृत देता येते. बाळ वर्षाचे होईपर्यंत एक अष्टमांश चमचा (चार- पाच थेंब) या प्रमाणात व नंतर बाळ अडीच वर्षांचे होईपर्यंत पाव चमचा, नंतर अर्धा चमचा या प्रमाणात हे तूप देता येते. बाळगुटीसह किंवा दुधामध्ये मिसळून दिले तरी चालते. दात व्यवस्थित, त्रास न होता यावेत यासाठी बदाम- खारकेसह बाळगुटी, तसेच दुधामध्ये शृंग उगाळून देण्याचा उपयोग होईल. 

माझ्या आईचे वय ४२ वर्षे असून, तिला टाचदुखीचा खूप त्रास आहे. चालताना टाच खूप दुखते. पायावर सूजसुद्धा येते. उपचार केले असता गुण येत नाही. कृपया यावर उपाय सुचवावा. ... अक्षय 
टाचदुखीवर तेल चोळून नंतर वाळू किंवा विटकरीचा शेक करण्याचा उत्तम फायदा होताना दिसतो. तेव्हा दोन्ही टाचांना व पावलांना ‘संतुलन शांती सिद्ध तेल’ लावणे आणि कढईत गरम केलेल्या वाळूच्या पुरचुंडीने शेकणे किंवा गरम विटेच्या तुकड्याने सहन होईल; पण बऱ्यापैकी गरम लागेल अशा प्रकारे शेकणे, असे एक दिवसाआड करण्याचा फायदा होईल. पायांना तेल लावून मीठ मिसळलेल्या कोमट पाण्यात पाय बुडवून ठेवण्याने पायावरची सूज कमी व्हायला, तसेच टाचदुखी बरी होण्यासही मदत मिळेल. काही दिवस ‘संतुलन वातबल’, ‘कॅल्सिसॅन’, प्रवाळपंचामृत या गोळ्या घेण्याचा, तसेच पुनर्नवासव, ‘संतुलन संदेश आसव’ घेण्याचाही फायदा होईल. 

मी ‘फॅमिली डॉक्‍टर’ची नियमित वाचक आहे. आपले मार्गदर्शन उत्तम असते. आम्हा ज्येष्ठ भगिनींचा एक छोटा ग्रुप आहे. आम्ही सर्वजणी ‘फॅमिली डॉक्‍टर’ वाचतो. आमचा प्रश्न असा आहे, की सकाळी उठल्यावर पोट साफ होण्यासाठी काय काळजी घ्यावी? दूध, ताक नियमित घेऊनही बद्धकोष्ठता, वायू सरणे हे होतेच. यासंबंधी काही उपाय सुचवावेत.   ... ज्योती इंगळे. 
 ज्येष्ठ वयात शरीरातील वात वाढतो, त्यामुळे आतड्यातील कोरडेपणाही वाढतो, तो कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कपभर कोमट पाण्यात दोन चमचे साजूक तूप व चिमूटभर सैंधव मिसळून घेण्याचा उपयोग होईल. रात्री आठ- दहा मनुका भिजत घालून, सकाळी त्या कोळून घेऊन ते पाणी पिण्याचाही फायदा होईल. रात्री झोपताना एक चमचा ‘सॅनकूल चूर्ण’ घेण्याने पचन सुधारते, पोट साफ होण्यास मदत मिळते, वायू तयार होण्यास प्रतिबंध होतो व झाला तरी सरून जातो. उकळलेले गरम पाणी पिणे, पोटावर अभ्यंग करून झोपण्यापूर्वी, तसेच सकाळी स्नानानंतर गरम पाण्याच्या पिशवीने शेकणे या उपायांचाही फायदा होईल. 

माझे बाळ दीड वर्षाचे आहे. तिला बऱ्याच आठवड्यांपासून खोकला आहे. डॉक्‍टरांचे औषध सुरू आहे, पण तरीही छातीत कफ आहे. तिच्या अन्नात आम्ही थोडे तूप मिसळतो, त्यामुळे तर त्रास होत नसेल ना? कृपया उपाय सुचवावा.     ... रेखा 
घरी तयार केलेल्या साजूक तुपामुळे खोकला, कफ होण्याची शक्‍यता नाही. बाळाला द्यायचे दूध सुंठीच्या व हळकुंडाच्या छोट्या तुकड्याबरोबर उकळून देणे चांगले. कपभर दुधात करंगळीच्या अर्ध्या पेराइतकी सुंठ व तितकेच हळकुंड थोडेसे चेचून मिसळावे, त्यात अर्धा कप पाणी मिसळावे व पाणी निम्मे उडून जाईपर्यंत मंद आचेवर उकळावे. गाळून घेऊन त्यात ‘संतुलन चैतन्य कल्प’ मिसळून प्यायला द्यावे. याव्यतिरिक्‍त बाळाला दिवसातून दोनदा पाव-पाव चमचा ‘संतुलन सीतोपलादी चूर्ण’ मधात मिसळून चाटविण्याचा उपयोग होईल. अर्धा अर्धा चमचा ‘ब्राँकोसॅन सिरप’ देण्याचाही फायदा होईल. आठवड्यातून दोन-तीन वेळा छातीला व पाठीला तेल लावून वरून रुईच्या पानांनी किंवा भाजलेल्या ओव्याच्या गरम पुरचुंडीने शेक करण्याचाही उपयोग होईल. या उपायांनी बरे वाटेलच, तरीही बऱ्याच आठवड्यांपासून खोकला आहे, त्यामुळे एकदा तज्ज्ञ वैद्यांना दाखवणे श्रेयस्कर. 

मला असे विचारायचे आहे, की तान्ह्या बाळाला बेबी मसाज तेलाने अभ्यंग कधीपासून सुरू करू शकतो?    .... सोनल शेट्ये 
संतुलनचे ‘बेबी मसाज तेल’ हे उत्तम प्रतीच्या खोबरेल तेलावर बालकाच्या पोषणाला हातभार लावणाऱ्या अनेक द्रव्यांचा संस्कार करून बनविलेले असते व त्यामुळे ते लगेच म्हणजे अगदी एक दिवसाच्या नवजात बाळासाठीही अनुकूल असते. बाळाला जितक्‍या नियमितपणे अशा संस्कारित तेलाचा अभ्यंग करावा, तितकी त्याची प्रतिकारशक्‍ती उत्तम राहते, मांसपेशी, हाडे, सांधे सुदृढ होण्यास मदत मिळते, बाळसे धरण्यासही हातभार लागतो. दहा वर्षांपर्यंत बालकाला नियमित अभ्यंग करण्याने त्याचा भविष्यातील आरोग्याचा पाया पक्का होतो. फक्‍त तेल औषधांनी संस्कारित असावे, कच्चे तेल किंवा खनिज तेल न वापरणे श्रेयस्कर.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Question and Answer article write by Dr Shree Balaji Tambe