प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 4 October 2019

जास्त लठ्ठपणामुळे रक्‍तदाब वाढू शकतो का? वजन कमी करण्यासाठी काय उपाय करावा? 
..... चाटनकर 

जास्त लठ्ठपणामुळे रक्‍तदाब वाढू शकतो का? वजन कमी करण्यासाठी काय उपाय करावा? 
..... चाटनकर 

लठ्ठपणा हे रक्‍तदाबच नाही तर मधुमेह, हृदयरोग, वाताचे त्रास वगैरे अनेक रोगांचे कारण ठरू शकते. त्यामुळे वजन वाढू नये किंवा वाढलेले असल्यास कमी करण्यासाठी प्रत्येकाने दक्ष असणे आवश्‍यक होय. शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हणजे संपूर्ण अंगाला अभ्यंग, स्वेदन, आंतर्स्नेहन वगैरे पूर्वकर्म करून नंतर विरेचन, बस्तीच्या योगे नीट शरीरशुद्धी करून घेतली, या दरम्यान पथ्य व्यवस्थित पाळले तर शरीरात वजन कमी होण्याची प्रवृत्ती सुरू होते असा अनुभव आहे. त्यामुळे पंचकर्मादरम्यान पाच-सहा किलो, काही प्रकृतींमध्ये दहा-बारा किलो वजनसुद्धा कमी होते. त्यानंतर घरी गेल्यानंतर सुद्धा प्रकृतीनुसार योग्य वजन राहीपर्यंत क्रमाक्रमाने वजन घटते असे दिसते. याबरोबरीने नियमितपणे "संतुलन अभ्यंग सिद्ध तेला'चा अभ्यंग, स्नानाच्या वेळी मेदपाचक द्रव्यांनी तयार केलेल्या उटण्याचा वापर, नियमित चालणे तसेच, सूर्यनमस्कारासारखी योगासने करणे, रात्रीचे जेवण वेळेवर आणि द्रवस्वरूपात म्हणजे केवळ सूप वगैरे असा करणे या गोष्टी मदत करतात. मेदपाचक वटी, त्रिफळा गुग्गुळ, चंद्रप्रभा अशा औषधांचे वैद्यांच्या सल्ल्याने सेवन करणे हे सुद्धा उत्तम. 

 माझे वय १६ वर्षे असून मी दहावीमध्ये आहे. आतापर्यंत मला ९० टक्के गुण मिळत होते. माझा प्रश्न असा आहे की, मला वरचेवर थकल्यासारखे वाटते, उत्साह वाटत नाही. बऱ्याच वेळा खूप आळस येतो व झोपायची इच्छा होते. त्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही. यामुळे गुण कमी पडतील का, अशा भीती वाटते. उपाय सुचवावा. 
....कु. नाईक 

अभ्यास नीट होण्यासाठी मेंदूला शक्‍ती देणे गरजेचे असते. यासाठी सकस आहार, मेंदूपोषक औषधे व रसायने, तसेच मेंदूला प्रेरणा देणाऱ्या काही गोष्टी नियमित करणे आवश्‍यक असते. यादृष्टीने पंचामृत, भिजविलेले बदाम, सुवर्णसिद्ध जल, अक्रोड, घरी बनविलेले ताजे लोणी व साखर, साजूक तूप यांचा समावेश करता येईल. शतावरी कल्प टाकून दूध घेणे, सकाळ-संध्याकाळ एक-एक चमचा "संतुलन ब्रह्मलीन सिरप' घेणेसुद्धा चांगले. अभ्यासासाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा असला तरी मेंदूला प्रेरणा मिळावी, यासाठी सकाळ-संध्याकाळ पाच मिनिटांसाठी ज्योतिध्यान करणे, दीर्घश्वसन वा अनुलोम-विलोम करणे, अधून मधून अभ्यासातून विश्रांती घेणे हेसुद्धा चांगले. मेंदूला येणारा शीण व थकवा कमी करण्यासाठी पादाभ्यंग करण्याचा, सकाळी उठणे सोपे व्हावे यासाठी नाकात "नस्यसॅन घृता'चे किंवा घरी बनविलेल्या साजूक तुपाचे दोन-तीन थेंब टाकणे, अधूनमधून अभ्यंग करणे हेसुद्धा चांगले. 

मी `फॅमिली डॉक्‍टर'चा नियमित वाचक आहे. त्यातील आपले मार्गदर्शन उत्तम असते. माझे वय ६० वर्षे आहे. सात वर्षांपूर्वी माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्याला दगडाची ठेच लागली होती. काही दिवसांनी नख पूर्णपणे निघून गेले, तेव्हापासून आजपर्यंत जे नवीन नख येते ते वरचेवर येते, म्हणजे अंगठ्याच्या कातडीला न लागता येते. त्याचा रंगही पिवळसर दिसतो. नख निर्जीव दिसते. याचा त्रास होत नाही, पण धक्का लागल्यास पुन्हा उचकटण्याची भीती वाटते. काही उपाय असल्यास कृपया सांगावा. 
.... सतीश कुंभार 

नखात मुळात शक्‍ती नसल्याचे हे एक लक्षण आहे. यासाठी हाडांना पोषक आहार व रसायने घेणे आवश्‍यक आहे. यादृष्टीने खारकेची पूड टाकून उकळलेले दूध, नाचणीसत्त्व, खसखस, डिंकाचे लाडू, बदाम वगैरे गोष्टींचा आहारात समावेश करणे आणि "कॅल्सिसॅन गोळ्या' तसेच प्रवाळयुक्‍त 'गुलकंद स्पेशल', "मॅरोसॅन' ही रसायने घेणे चांगले. त्या ठिकाणी जंतुसंसर्ग झाला आहे का, यासाठी एकदा तज्ज्ञांचा सल्ला घेणेसुद्घा चांगले. अनवधानाने नखाला धक्का लागू नये, यासाठी किमान झोपताना त्या ठिकाणी फार घट्ट नाही, फार सैल नाही अशा बेताने पट्टी बांधून ठेवणेही चांगले. 

माझ्या आईला गेल्या तीन वर्षांपासून गुडघे दुखण्याचा व त्यामुळे चालण्याचा त्रास आहे. डॉक्‍टरांनी डाव्या गुडघ्याची झीज झालेली असल्याचे सांगितले. सध्या उजवा गुडघाही दुखतो आहे. कृपया मार्गदर्शन करावे. 
.... कु. नीती 

गुडघ्यांचे दुखणे कमी होण्यासाठी झीज भरून येणे आवश्‍यक असते, यादृष्टीने हाडांना आणि सांध्यांना पोषक व वातशामक द्रव्यांनी संस्कारित "संतुलन शांती सिद्ध तेला'सारखे तेल दिवसातून दोन-तीन वेळा जिरवणे, तूप-साखरेसह "संतुलन प्रशांत' चूर्ण घेणे, "संतुलन वातबल' गोळ्या घेणे, "मॅरोसॅन'सारखे रसायन, तसेच घरच्या घरी तयार केलेले डिंकाचे लाडू घेणे चांगले. अगोदर तेल लावून वरून निर्गुडी, एरंड, शेवगा, सागरगोटा यापैकी मिळतील त्या पानांनी शेक करण्याचाही फायदा होईल. यासाठी पाने स्वच्छ धुवून वाटायची असतात व गरम करून त्याचा सोसवेल इतका गरम लेप गुडघ्यांवर तीस-चाळीस मिनिटांसाठी लावून ठेवायचा असतो. अधिक चांगला व लवकर गुण येण्यासाठी यातच दोन चमचे "सॅन वात लेप' मिसळता येतो. 

जेवणानंतर माझे पोट थोडे थोडे दुखते. अन्न नीट पचत नाही, पोट आखडल्यासारखे आणि जड झाल्यासारखे वाटते. यावर कोणते औषध घ्यावे व काय पथ्य करावे? 
..... ढेरे 

 ही सर्व पचनशक्‍ती मंदावण्याची लक्षणे आहेत. यावर चमचाभर आल्या-लिंबाच्या रसासह अर्धा चमचा लवणभास्कर चूर्ण, तसेच जेवणानंतर "संतुलन अन्नयोग' गोळ्या घेण्याचाही उपयोग होईल. सकाळ-संध्याकाळ पोटाला "संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेला'सारखे तेल लावून वरून गरम पाण्याच्या पिशवीने शेक करण्याचा उपयोग होईल. काही दिवस आहारात तेल व गहू या गोष्टी पूर्णपणे वर्ज्य करून घरी बनविलेल्या साजूक तुपात स्वयंपाक करणे, वेलीवर येणाऱ्या फळभाज्यांपासून तुपात जिरे, हळद, आले व हिंग टाकून साध्या भाज्या, ज्वारी, तांदूळ वा नाचणीची भाकरी, मुगाचे वरण, भात, खिचडी असा साधा आहार करणे हे सुद्धा श्रेयस्कर. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Question and Answer article written by Dr Shree Balaji Tambe