प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

मला तीन-चार वर्षांपासून व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास आहे. सतत चालल्यावर किंवा एका जागी फार वेळ उभे राहिल्यास पाय खूप दुखू लागतात. ‘फॅमिली डॉक्‍टर’मध्ये वाचून मी खालून वरच्या दिशेने पाय चोळतो. त्याने थोडे बरे वाटते. कृपया मार्गदर्शन करावे.
..... मनोज
उत्तर :
पाय नुसते न चोळता ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल'' लावून खालून वर या दिशेने चोळून जिरविण्याचा अजून चांगला फायदा होईल. बरोबरीने ‘संतुलन वातबल'' गोळ्या व ‘सॅनरोझ'' हे रसायन घेण्याचाही उपयोग होईल. सुवर्णसिद्ध जल पिण्याने एकंदर आरोग्य उत्तम राहतेच, तसेच व्हेरिकोज व्हेन्समध्येही सुधारणा होते असा अनुभव आहे. यासाठी साधारण पाच लिटर पाण्यामध्ये पाच ग्रॅम शुद्ध सोने टाकून ते उकळण्यास ठेवले व उकळी फुटल्यावर 20-25 मिनिटे उकळवून नंतर गाळून घेऊन प्यायले तर त्याचा उपयोग होईल. फार वेळ उभे राहणे किंवा चालणे होणार असेल तर व्हेरिकोज व्हेन्ससाठी मिळणारे खास स्टॉकिंग्ज घालणेही चांगले.

मी ‘फॅमिली डॉक्‍टर’ची नियमित वाचक आहे. माझा मुलगा २३ वर्षांचा असून, त्याची उंची व्यवस्थित आहे. पण, वजन मात्र खूपच कमी आहे. त्याचे आहाराचे प्रमाणही खूप कमी आहे. भूक सुधारण्यासाठी व तब्येत सुधारण्यासाठी काही करता येईल का? अलीकडे त्याचा चेहराही निस्तेज व आजारी असल्यासारखा वाटतो. डॉक्‍टरांकडे तपासणी केली असता काहीही दोष आढळला नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
.... प्रा. ललित
उत्तर :
भूक सुधारण्यासाठी मुलाला जेवणानंतर एक-एक चमचा बिल्वावलेह किंवा ‘बिल्वसॅन'' आणि दोन-दोन चमचे पुनर्नवासव घेण्याचा उपयोग होईल. एकदा अग्नीचे काम नीट होऊ लागले म्हणजेच पचनक्रिया सुधारली की प्रकृतीनुरूप आवश्‍यक तेवढे वजन वाढण्यास सुरुवात होईल. बरोबरीने नियमित अभ्यंग करणे, सूर्यनमस्कारासारखी योगासने करणे, रोज सकाळी पंचामृत (तूप, मध, दही व साखर प्रत्येकी एक चमचा आणि दूध चार-पाच चमचे), रात्रभर भिजविलेले चार-पाच बदाम खाणे, आहारात किमान चार-पाच चमचे साजूक तुपाचा समावेश करणे, शतावरी कल्प व ‘संतुलन चैतन्य कल्प'' टाकून दूध घेणे हे उपाय सुरू करता येतील. यामुळे निस्तेजता कमी होण्यास व एकंदर प्रकृती सुधारण्यासही मदत मिळेल. 

मी ‘फॅमिली डॉक्‍टर''ची नियमित वाचक आहे. प्रत्येक वेळी ‘फॅमिली डॉक्‍टर’ वाचताना वडीलधाऱ्या व्यक्‍तीच्या सल्ल्याचा भास होतो. मला २०१८ पासून व्हर्टिगोचा त्रास आहे. दोन वेळा व्हर्टिगोचा अटॅक आलेला आहे. अटॅक येतो तेव्हा तोल जातो. एरवी सभोवतालच्या गोष्टी गोल गोल फिरतात असा भास होतो. पुन्हा अटॅक येऊ नये यासाठी काही उपाय सुचवावा.
 सुहासिनी
उत्तर -
अटॅक तर यायला नकोच, परंतु एरवीसुद्धा गरगरण्याचा त्रास व्हायला नको यासाठी प्रयत्न करता येतात व त्याचा उत्तम उपयोगही होताना दिसतो. यादृष्टीने नियमित पादाभ्यंग करणे, पाठ-मानेला तसेच टाळूला ‘संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल’ लावून जिरवणे, रात्री झोपताना नाकात ‘नस्यसॅन घृता’चे किंवा घरच्या साजूक तुपाचे दोन-तीन थेंब टाकणे हे उपाय सुरू करता येतील, आहारात किमान दोन चमचे साखर व चार-पाच चमचे साजूक तूप यांचा समावेश असणे चांगले. रोज सकाळी एक चमचा ‘संतुलन ब्रह्मलीन घृत’, दोन्ही जेवणांनंतर ‘संतुलन पित्तशांती’ व कामदुधा या गोळ्या घेण्याचाही उपयोग होईल. या उपायांनी बरे वाटेलच, तरीही त्रासाची तीव्रता लक्षात घेता एकदा तज्ज्ञ वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे श्रेयस्कर.

माझे वय ३६ वर्षे आहे. पाळी नियमित आहे, परंतु पाळी येण्यापूर्वी छातीत जडपणा  व वेदना जाणवतात. डॉक्‍टरांच्या मते अतिताणामुळे असंतुलन झाले आहे. कृपया आयुर्वेदिक उपाय सुचवावा.
... कदम
उत्तर -
स्त्रीसंतुलनासाठी योग्य प्रयत्न केले की, असा त्रास बरा होतो असा अनुभव आहे. यादृष्टीने ‘फेमिसॅन तेला''चा पिचू नियमित वापरण्याचा उपयोग होईल. शतावरी कल्प टाकून दूध घेण्याचा, काही दिवस ‘अशोक ऍलो सॅन'' व ‘मंजिष्ठासॅन'' या गोळ्या घेण्याचाही फायदा होईल. ‘संतुलन सुहृद तेल'' हे सुद्धा स्त्रीसंतुलनासाठी प्रभावी असून ते स्नानानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी स्तनांवर जिरवायचे असते. नियमित चालणे, अनुलोम-विलोम प्राणायाम करणे, ज्योतिध्यान करणे, स्त्री-संतुलन ही स्वास्थ्यसंगीत रचना ऐकणे या सर्वांचा ताण कमी होण्यास, पर्यायाने स्त्रीसंतुलन होण्यास उत्तम उपयोग होताना दिसतो. 

माझे वय ४४ वर्षे आहे. माझी मासिक पाळी बंद होऊन पाच वर्षे झाली आहेत. लवकर पाळी जाण्याचे दुष्परिणाम होऊ नयेत यासाठी काय करता येईल? मला कोणताही आजार नाही, पण माझी झोप खूप कमी झालेली आहे आणि वजन विनाकारण वाढले आहे. कृपया काही उपाय सुचवा. 
.... सपना
उत्तर -
लवकर पाळी बंद होणे हे वातदोषाच्या असंतुलनाचे एक लक्षण असते. तेव्हा या बिघडलेल्या वाताला संतुलनात आणण्यासाठी प्रयत्न करणे भाग आहे. यादृष्टीने नियमित अभ्यंग, ‘संतुलन वातबल'' गोळ्या, ‘कॅल्सिसॅन'' गोळ्या, ‘सॅनरोझ'' रसायन घेण्याचा उपयोग होईल. रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण शरीराला ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल'' लावण्याने झोप येण्यास तसेच वजन कमी होण्यासही मदत मिळेल. घरी बनविलेल्या साजूक तुपाचे किंवा ‘नस्यसॅन घृता''चे दोन-तीन थेंब नाकात टाकण्याने, ‘निद्रासॅन'' गोळ्या घेण्यानेही बरे वाटेल. 40-45 वयादरम्यान शास्त्रशुद्ध पद्धतीने पंचकर्म करून एकदा शरीरशुद्धी करून घेणे हे सुद्धा उत्तम असते. यामुळे वजन कमी होण्यासही मदत मिळेल. 

फॅमिली डाॅक्टर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com