प्रश्नोत्तरे

Question and Answer
Question and Answer

मला पाय आणि गुडघ्याच्या खालच्या शिरा दुखण्याचा खूप त्रास होतो. तळपाय बधिर होतात. मुंग्यांमुळे चालता येत नाही. चालताना मधे मधे बसावे लागते. मी तळलेले खात नाही; पण मैद्याचे थोडे जरी खाल्ले तरी त्रास वाढतो. दोन बिस्किटे खाल्ली तरी त्रास होतो. पुष्कळ औषधे घेतली. कृपया आयुर्वेदिक उपाय सुचवावा. 
... अनामिका 
- त्रासाची तीव्रता आणि बरीच औषधे घेऊन गुण आला नाही हे लक्षात घेता यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने पंचकर्म, विशेषतः हलके विरेचन व नंतर बस्ती हे उपचार करून घेण्याचा उपयोग होईल. तत्पूर्वी पाठीला नियमित ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ लावणे. पायांना, खरे तर संपूर्ण शरीराला अभ्यंग करणे. एक दिवसाआड पादाभ्यंग करणे, हे उपाय सुरू करता येतील. ‘संतुलन वातबल’ गोळ्या, ‘सॅन रोझ’ रसायन, दशमूलारिष्ट घेण्याचाही उपयोग होईल. ज्या गोष्टींनी त्रास वाढतो ते आहारातून टाळणेच चांगले. आहारात ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, तांदूळ ही धान्ये, वेलीवर येणाऱ्या फळभाज्या, ताजे व गोड ताक, साजूक तूप, लाह्या या गोष्टी मुख्यत्वे घेणे चांगले. 

 

माझी मोठी मुलगी सात वर्षांची असून लहानपणापासून अशक्‍त आहे. प्रत्येक काम ती उत्साहाने करते; पण तिचा आहार व शक्‍ती कमी आहे. कृपया मार्गदर्शन करावे. मी दुसऱ्या बाळाच्या वेळी ‘गर्भसंस्कार’मधील सर्व गोष्टी केल्या होत्या. हे बाळ खूप शांत व निरोगी आहे. धन्यवाद. 
... स्वाती 
 - गर्भसंस्कार केल्याचे आणि उपयोग झाल्याचे कळवल्याबद्दल धन्यवाद. मोठ्या मुलीला नियमित अभ्यंग करण्याचा फायदा होईल. रात्री झोपण्यापूर्वी ‘संतुलन बेबी मसाज तेल’ संपूर्ण अंगाला लावणे यादृष्टीने उत्तम. भूक व्यवस्थित लागण्यासाठी लहान मुलांना अधूनमधून जंतांचे औषध देणे आवश्‍यक असते. मुलीला पंधरा दिवसांसाठी रोज सकाळी पाव चमचा वावडिंगाचे चूर्ण मधात मिसळून देता येईल. यानंतर एकदा रात्री झोपण्यापूर्वी पाव चमचा कपिला चूर्ण गुळाबरोबर मिसळून देण्याने सकाळी दोन-तीन जुलाब होऊन जंत पडून जाण्यास मदत मिळेल. असे दर तीन महिन्यांनी एकदा करायला हरकत नाही. अन्न अंगी लागावे, पचनशक्‍ती सुधारावी यासाठी बरोबरीने काही दिवस ‘संतुलन बाल हर्बल सिरप’ देण्याचा उपयोग होईल. शक्‍ती वाढण्यासाठी ‘संतुलन चैतन्य कल्प’ घालून दूध, सकाळी अर्धा चमचा च्यवनप्राश, रात्रभर पाण्यात भिजवलेले तीन-चार बदाम देण्याचा, प्यायचे पाणी सुवर्णसिद्ध असण्याचाही उपयोग होईल. छोट्या बाळालाही ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ पुस्तकातील ‘संतुलन बाळगुटी’, ‘संतुलन बालामृत’ ही रसायने, नियमित अभ्यंग, धुरी, ‘सॅन अंजन (काळे)’ वगैरे वापरणे उत्तम. 

मी ‘फॅमिली डॉक्‍टर’ची नियमित वाचक असून मला विचारायचे आहे, की पोटात गॅसेस का होतात व ते होऊ नयेत यासाठी काय काळजी घ्यायला हवी? औषधे व उपचार काय करावेत? 
..... जयश्री 
 - पचनक्रिया मंद असेल तर जाणवण्याइतपत किंवा त्रासदायक वाटतील असे गॅसेस होतात. त्यामुळे गॅसेस, पोट दुखणे- डब्ब होणे वगैरे तक्रारींवर पचनक्षमता सुधारणे आवश्‍यक होय. यात प्रकृतीला अनुकूल आहार घेणे, अन्न ताजे व गरम असताना व मन लावून खाणे, जेवताना अधूनमधून घोट घोट व उकळलेले व गरम पाणी पिणे, जेवणापूर्वी एक चमचा लिंबूरस, पाव चमचा आलेरस, दोन चिमूट जिरेपूड व चवीनुसार सैंधव हे मिश्रण घेणे व जेवणानंतर ‘संतुलन अन्नयोग’ या गोळ्या व पुनर्नवासव घेणे चांगले. रोज सकाळ- संध्याकाळ चालणे, सकाळी सूर्यनमस्कारादी योगासने करणे, रात्रीचे जेवण शक्‍य तितक्‍या लवकर करणे हे उपाय योजता येतील. आहारात योग्य प्रमाणात म्हणजे चार-पाच चमचे घरचे साजूक तूप समाविष्ट करणेही आवश्‍यक. 

 माझ्या आईला निद्रानाशाचा विकार असून त्यामुळे तिचे मानसिक संतुलन अधूनमधून बिघडते. यावर आयुर्वेदिक उपचार असतात का? कृपया ही औषधे कुठे मिळतील हेसुद्धा सांगावे. 
..... अनुराधा 
- मनःस्वास्थ्यासाठी, तसेच निरोगी मेंदूसाठी पुरेशी व शांत झोप आवश्‍यक असते. झोपेची गोळी घेऊन झोपेचा आभास तेवढा होतो, झोपेचे खरे फायदे मिळत नाहीत. झोप आपणहून येण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय सुचवलेले आहेत. यात संपूर्ण अंगाला अभ्यंग, टाळूवर ‘संतुलन ब्रह्मलीन तेला’सारखे तेल लावणे, नाकात ‘नस्यसॅन घृत’ किंवा साजूक तुपाचे दोन-तीन थेंब टाकणे, कानात ‘संतुलन श्रुती तेला’सारखे तेल टाकणे वगैरे मुख्य उपाय होत. बरोबरीने संध्याकाळी फार टीव्ही किंवा मोबाईल न पाहणे, रात्रीचे जेवण फार उशिरा न करणे हे सांभाळणेसुद्धा आवश्‍यक असते. नियमित चालणे, योगासने करणे, अनुलोम-विलोम करणे हेसुद्धा शांत झोप येण्यास सहायक असते. ‘योगनिद्रा’ हे संगीत रोज रात्री झोपण्यापूर्वी ऐकण्यानेसुद्धा क्रमाक्रमाने शांत झोप येण्यास मदत मिळते असा अनुभव आहे. काही दिवस ‘निद्रासॅन’ या गोळ्या व ‘सॅन रिसॅक्‍स सिरप’ रात्री झोपण्यापूर्वी घेणे हेसुद्धा उत्तम. 

 

 मी ज्येष्ठ नागरिक असून मला अलीकडे चार-पाच फूट चालले तरी खूप धाप लागते. यामुळे मी फार काही करू शकत नाही. कृपया उपाय सुचवावा. 
.... आवळे 
 - चालताना धाप लागणे हे केवळ एक लक्षण आहे. यामागे अशक्‍तपणा, रक्‍ताची कमतरता, रक्‍ताभिसरण कमी असणे, हृदयासंबंधित काही त्रास असणे अशी अजूनही अनेक कारणे असू शकतात. तेव्हा नेमके निदान होण्यासाठी लवकरात लवकर तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे श्रेयस्कर. बरोबरीने रात्री झोपण्यापूर्वी छाती-पोटाला अभ्यंग करणे, सकाळी च्यवनप्राश किंवा ‘संतुलन सुहृदप्राश’ रसायन घेणे हे उपाय सुरू करता येतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com