प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 10 January 2020

माझा मुलगा २२ वर्षांचा आहे. सहा महिन्यांपासून त्याला पाठदुखीचा त्रास होतो आहे. मणक्‍यातील चकती सरकली आहे असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. त्याला चालताना, उठता-बसताना खूप त्रास होतो. कृपया यावर काही उपाय सुचवावा. 
.... पाटील 

माझा मुलगा २२ वर्षांचा आहे. सहा महिन्यांपासून त्याला पाठदुखीचा त्रास होतो आहे. मणक्‍यातील चकती सरकली आहे असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. त्याला चालताना, उठता-बसताना खूप त्रास होतो. कृपया यावर काही उपाय सुचवावा. 
.... पाटील 
इतक्‍या तरुण वयात असा त्रास झाला आहे, तेव्हा तज्ज्ञ वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे सर्वांत चांगले. तत्पूर्वी पाठीच्या कण्यावर रोज ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ जिरवणे, तूप-साखरेसह अर्धा चमचा अश्‍वगंधा चूर्ण घेणे, ‘संतुलन वातबल’ गोळ्या, लाक्षादी घृत घेणे हे उपाय सुरू करता येतील. ज्या ठिकाणी चकती सरकलेली आहे तेथे वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लेप करून घेणे, दशमूल सिद्ध तेलाची बस्ती घेणे, एरंडमुळाचा क्षीरपाक घेणे हे सुद्धा उपयोगी पडले. तज्ज्ञांकडून विशेष व्यायाम शिकून ते नियमित करण्याचाही उपयोग होईल. 

बाळाचे जन्मनियोजन केल्यापासून मी आपल्या ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ पुस्तकातील मार्गदर्शनाचा उपयोग करून घेते आहे. सध्या माझी मुलगी दोन महिन्यांची आहे. तिच्या डाव्या डोळ्यातून पिवळे व चिकट पाणी येत असते, तसेच तिचा डोळा थोडा बारीक दिसतो. बाळाला कधी तात्पुरती सर्दी होते व थोड्या वेळात बरी होते. यासाठी काय करावे? कृपया मार्गदर्शन करावे. 
.... ढगे 
 डोळ्यातून चिकट व पिवळे पाणी येते त्यावर बाळ झोपले असताना तिच्या बंद डोळ्यांवर त्रिफळ्याच्या पाण्याच्या घड्या ठेवण्याचा उपयोग होईल. त्रिफळ्याचे पाणी करण्याची पद्धत अशी - पाव चमचा त्रिफळा चूर्ण कपभर पाण्यात तीन-चार तासांसाठी किंवा रात्रभर भिजत घालावे. सकाळी चौपदरी जाडसर सुती कापडातून गाळून घ्यावे. कापसाची घडी या पाण्याने ओली करून ती बाळाच्या बंद डोळ्यांवर ठेवावी. या घड्या दोन्ही डोळ्यांवर ठेवल्या तरी चालतील. यामुळे चिकटपणा, पाणी येणे बंद झाले, की डोळ्यांमध्ये ‘सॅन अंजन - काळे’ घालणे उत्तम. बाळाला तात्पुरती सर्दी होते त्यासाठी वेगळे काही करायची गरज नाही, मात्र आतून प्रतिकारशक्‍ती नीट तयार व्हावी यासाठी बाळाला ‘संतुलन बालामृत’, ‘संतुलन बाळगुटी’ नियमित देणे आवश्‍यक आहे. बाळ अंगावर दूध पीत असेल तर दही, थंड पाणी, सूर्यास्तानंतर दूध पिणे, सीताफळ, चिकू वगैरे कफदोष वाढविण्याऱ्या गोष्टी आईच्या खाण्यात येत नाहीत ना याकडे लक्ष देणे. आईने जेवणानंतर ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ या पुस्तकात दिलेली बाळंतिणीची सुपारी घेणे हे सुद्धा उपयोगी ठरेल. 

 

माझा मुलगा दहावीत आहे. त्याला ब्राह्मीची गोळी देणे चांगले की ब्रह्मलीन सिरप देणे चांगले? कृपया मार्गदर्शन करावे. 
..... ओंकार 
ब्राह्मी ही मनावरचा ताण कमी करणारी, मेंदूला ताकद देणारी, बुद्धी-स्मृतिवर्धनासाठी उत्तम अशी असते. ‘संतुलन ब्रह्मलीन सिरप’मध्ये ब्राह्मी तर असतेच, बरोबरीने इतरही बुद्धी-स्मृतिवर्धक द्रव्ये असतात. तसेच ब्रह्मलीन सिरप घेणे सोपे असते. दिवसातून दोन वेळा ‘संतुलन ब्रह्मलीन सिरप’, रात्री शांत झोप लागून सकाळी सहजतेने जाग येण्यासाठी रात्री ‘सॅन ब्राह्मी’ गोळ्या देता येतील. बरोबरीने रोज सकाळी रात्रभर भिजविलेले तीन-चार बदाम, पंचामृत, ‘संतुलन चैतन्य कल्प’ टाकून दूध देणेसुद्धा चांगले. मनाची एकाग्रता वाढण्यासाठी रोज पाच मिनिटांसाठी ज्योतिध्यान करण्याचाही अप्रतिम फायदा होताना दिसतो. 

मी आपले सर्व लेख नियमित वाचते. माझा मुलगा सहा वर्षांचा आहे. त्याला ‘स्वमग्नता’ (ऑटिझम) हा आजार आहे. तो स्पष्ट बोलत नाही, खूप हट्ट करतो, कधी कधी खूप ओरडतो, ढकलतो, मारतो. त्याच्या हाताला ‘ग्रीप’ नाही. लहान-लहान वस्तू तो नीट पकडू शकत नाही. यावर काही औषध सुचवता येईल का? कृपया मार्गदर्शन करावे. 
.... वेदिका 
सध्या या प्रकारचा त्रास अनेक लहान मुलांमध्ये आढळतो. योग्य आयुर्वेदिक उपचारांच्या मदतीने यावर उत्तम परिणाम मिळताना दिसतात. अशा केसेसमध्ये शारीरिक स्तरावर वातशामक आणि मानसिक व बौद्धिक स्तरावर शक्‍तिवर्धक उपचारांची गरज असते. वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यंग, शिरोपिचू, बस्ती हे उपचार करून घेणे चांगले. बरोबरीने ‘संतुलन ब्रह्मलीन घृत’, जटामांसी गोळ्या घेण्याचा उपयोग होईल. जिभेला अक्कलकरा, वेखंड, जटामांसीचे चूर्ण मधात मिसळून चोळण्याने उच्चार सुधारण्यास मदत मिळेल. घरात सकाळ-संध्याकाळ धूप करणे, संतुलनची श्रीगणेश किंवा श्रीदत्तात्रेय ही संगीतरचना लावणे, प्यायचे पाणी सुवर्णसिद्ध असणे या उपायांचाही फायदा होईल. 

मी ‘संतुलन’चे शतावरी कल्प घेते, यामुळे माझ्या बहुतेक सगळ्या तक्रारी दूर झाल्या आहेत. माझी पहिली मुलगी साडेतीन वर्षांची आहे. त्यानंतर आम्ही बाळासाठी प्रयत्न करत होतो. मला दिवसही राहिले होते, परंतु अतिश्रमामुळे, जड सामान उचलावे लागल्यामुळे गर्भस्राव झाला. आता पुन्हा असे होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? 
..... सावंत 
 पुन्हा गर्भधारणा होण्यापूर्वी गर्भाशयाची शक्‍ती सुधारण्यासाठी तसेच स्त्रीबीज व पुरुषबीज यांची शक्‍ती वाढण्यासाठी आवश्‍यक ते प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी पुरेसा वेळही द्यायला हवा. यासाठी किमान सहा महिने तरी मध्ये ठेवायला हवेत. सर्वप्रथम गर्भस्रावामुळे वाढलेल्या वातदोषाला कमी करण्यासाठी अंगाला नियमितपणे ‘संतुलन अभ्यंग तेला’सारख्या सिद्ध तेलाने अभ्यंग, ‘फेमिसॅन तेला’चा पिचू, ‘संतुलन शक्‍ती धुपा’ची धुरी घेणे आवश्‍यक. बरोबरीने उभयतांनी ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ घेणे चांगले. तुम्ही शतावरी कल्प चालू ठेवावा, यजमानांसाठी ‘संतुलन चैतन्य कल्प’ चांगला. शक्‍य असल्यास तज्ज्ञ वैद्यांकडून उत्तरबस्ती करून नंतर रोज सकाळी ‘संतुलन अशोकादी घृत’ घेण्याचा उपयोग होईल. किमान चार-पाच महिने हे उपचार घेऊन, पाळी नियमित व व्यवस्थित येते आहे याची खात्री करून मग गर्भधारणेसाठी प्रयत्न करणे चांगले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Question and Answer article written by Dr Shree Balaji Tambe