प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 17 January 2020

माझे वय ४० वर्षे आहे. काही दिवसांपासून मला चक्कर येते. काहीही खाल्ले तरी घशात जळजळ व आग होते. तसेच माझी मानही स्पॉंडिलोसिसमुळे दुखते. कृपया उपाय सुचवावा. 
... तेजस्विनी 

माझे वय ४० वर्षे आहे. काही दिवसांपासून मला चक्कर येते. काहीही खाल्ले तरी घशात जळजळ व आग होते. तसेच माझी मानही स्पॉंडिलोसिसमुळे दुखते. कृपया उपाय सुचवावा. 
... तेजस्विनी 
 बहुधा चक्कर व मान दुखणे हे दोन्ही त्रास स्पॉंडिलोसिसशी संबंधित असावेत. या दृष्टीने दिवसातून दोन वेळा ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ हलक्‍या हाताने मानेवर जिरविण्याचा उपयोग होईल. रात्री झोपताना नाकात दोन-तीन थेंब साजूक तूप किंवा ‘नस्यसॅन घृत' टाकण्याचा उपयोग होईल. रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा अविपत्तिकर चूर्ण किंवा ‘सॅनकूल' चूर्ण घेणे, सकाळ-संध्याकाळ पाच-सहा काळ्या मनुका चावून खाणे यामुळे घशात आग होणे कमी होईल. आंबवलेले, तिखट, तळलेले, मैदा किंवा चण्याच्या डाळीपासून तयार केलेले पदार्थ आहारातून टाळणे चांगले. 

 

माझी मुलगी दोन महिन्यांची आहे. मी ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ पुस्तकातील सर्व गोष्टी करते आहे. मला विचारायचे आहे की, बाळाच्या डोक्‍याला किती दिवस तूप लावायचे? बाळाला उचकी लागली तर पाणी द्यावे का? तसेच बाळंतपणानंतरही कॅल्सिसॅन, लोहित प्लस या गोळ्या घेतलेल्या चालतात का? कृपया मार्गदर्शन करावे. 
..... सहजा 
 दोन महिन्यांच्या बाळाची ‘संतुलन बेबी मसाज तेला’ने व्यवस्थित टाळू भरणे चांगले. तुपाचा पिचू जन्मानंतर लगेच आणि अगदी मोजक्‍या दिवसांसाठी ठेवणे पुरेसे असते. उचकी लागली तर बाळाला एक-दोन चमचे पाणी द्यायला हरकत नसते. पाणी वीस मिनिटांसाठी उकळून, गाळून घेतलेले असावे व वाटी-चमचा स्वच्छ असल्याची खात्री असावी. बाळंतपणानंतर बाळ अंगावर दूध पीत असेपर्यंत ‘कॅल्सिसॅन’, ‘संतुलन लोहित प्लस’ या गोळ्या घेणे उत्तम असते, यामुळे आई व बाळ असे दोघांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत मिळते. ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ पुस्तकातील या सर्व मार्गदर्शनाचा उपयोग तुम्हा दोघींना अधिकाधिक व्हावा आणि आरोग्य उत्तम राहावे ही सदिच्छा. 

 

माझे वय 30 वर्षे आहे. सत्ताविसाव्या वर्षी माझी पित्ताशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून पचनाचा थोडा त्रास होतो. पित्ताशय काढल्यावर आहार-आचरणात व इतर काय काळजी घ्यावी याची माहिती द्यावी. 
....अमृता 
 पित्ताशय काढून टाकले की त्याचा पचनसंस्थेवर दुष्परिणाम होणे स्वाभाविक असते. पित्ताचे संतुलन राहण्यासाठी आहार-आचरण व औषधांचा उपयोग करून घ्यायला हवा. यादृष्टीने सकाळ-संध्याकाळ ‘सॅनपित्त सिरप' घेणे चांगले. जेवणानंतर कुमारी आसव तसेच ‘बिल्वसॅन' अवलेह घेणे हे सुद्धा चांगले. बरोबरीने पनीर, चीज, खव्यापासून बनविलेल्या मिठाया, मांसाहार, अंडी, जड कडधान्ये वगैरे अति स्निग्ध व जड पदार्थ आहारातून टाळणे; दुपारचे जेवण अकरा ते दोन या दरम्यान आणि संध्याकाळचे जेवण सूर्यास्तानंतर शक्‍य तितक्‍या लवकर घेणे; रात्री साडेअकराच्या आत झोपणे; नियमित चालणे; अनुलोम-विलोम, शीतलीसारखा प्राणायाम करणे हे बदल करता येतील. अतिशय दुर्धर व आत्ययिक अवस्था असल्याशिवाय शक्‍यतो पित्ताशय काढण्याचा निर्णय न घेणे कधीही चांगले. आयुर्वेदिक उपचार व आहार-आचरणातील बदलांच्या मदतीने पित्ताशयातील खड्यांवर उत्तम लाभ होताना दिसतात. 

 

 माझे वय ३० वर्षे असून पाळी दर महिन्याला पाच दिवस अलीकडे येते. अधून मधून अर्धे डोके खूप दुखते. तसेच लघवीलाही वारंवार जावे लागते. कृपया मार्गदर्शन करावे. 
....... सविता 
 शरीरात, विशेषतः स्त्री-विशिष्ट अवयवांमध्ये उष्णता वाढत राहण्याने असा त्रास होऊ शकतो. यासाठी शतावरी कल्प घालून दूध घेणे, सकाळी धात्री रसायनसारखे थंड गुणाचे रसायन घेणे, आठवड्यातून दोन-तीन वेळा पादाभ्यंग करणे, सकाळी संतुलन अमृत क्रिया करणे यांचा उपयोग होईल. ‘फेमिसॅन तेला'चा पिचू वापरण्यानेही गर्भाशयातील उष्णता कमी होण्यास उत्तम मदत मिळते असा अनुभव आहे. शिवाय, यामुळे त्या ठिकाणच्या स्नायू, संधिबंधनांना शक्‍ती मिळाली की वारंवार लघवीला जावे लागणेही कमी होईल. ‘नस्यसॅन घृता'चे दोन-तीन थेंब नाकात टाकण्याने तसेच ‘संतुलन पित्तशांती', कामदुधा या गोळ्या सकाळ-संध्याकाळ घेण्यानेही बरे वाटेल. 

 

मला गेल्या २५ वर्षांपासून मधुमेह आहे. मी सकाळी सूर्यनमस्कार, प्राणायाम वगैरे करतो. तसेच ४५ मिनिटे चालायलाही जातो. सध्या माझी साखर उपाशीपोटी ९५ व जेवणानंतर दोन तासांनी १६० आहे. अजून काय करायला हवे याविषयी कृपया माहिती द्यावी. 
.... तळेकर 
रक्‍तातील साखर कमी करण्यासाठी कोणतेही औषध न घेता फक्‍त योगाच्या मदतीने असा रिपोर्ट येत असेल तर ते उत्तम आहे. २५ वर्षांपासून मधुमेह आहे, त्याची संप्राप्ती मोडण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने पंचकर्म करून घेणे, नंतर प्रकृतीनुरूप आहार घेणे हे उत्तम राहील. मधुमेह असला तरी त्यातून अजून काही समस्या उद्भवू नयेत यासाठी ‘संतुलन आत्मप्राश प्लस’ हे खास मधुमेही व्यक्‍तींसाठी बनविलेले रसायन घेण्यास, तसेच ‘संतुलन पुरुषम्‌ तेल’ वापरण्यास सुरुवात करणे श्रेयस्कर. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Question and Answer article written by Dr Shree Balaji Tambe