प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 24 January 2020

माझे वय २८ वर्षे असून, वजन जास्त म्हणजे ८७ किलो आहे. मला कोणताही आजार नाही. मला वजन कमी करायचे आहे. तरी कृपया मदत करावी. 
.... रेखा गायकवाड 

माझे वय २८ वर्षे असून, वजन जास्त म्हणजे ८७ किलो आहे. मला कोणताही आजार नाही. मला वजन कमी करायचे आहे. तरी कृपया मदत करावी. 
.... रेखा गायकवाड 
सहसा स्त्रियांच्या बाबतीत वजन वाढण्यामागे गर्भाशय किंवा एकंदर प्रजननसंस्थेशी संबंधित दोष असू शकतो. बाह्यस्वरूपी कोणतीही लक्षणे नसली तरी एकदा यादृष्टीने वैद्यांकडून तपासणी करून घेणे चांगले. बरोबरीने वजन कमी होण्यासाठी रात्रीच्या जेवणात फक्‍त द्रवाहार म्हणजे सूप घेणे, सकाळ- संध्याकाळ किंवा अधेमधे भूक लागेल तेव्हा फक्‍त साळीच्या लाह्या घेणे, दिवसभर प्यायचे पाणी वीस मिनिटे उकळलेले आणि गरम पिणे, किमान वीस मिनिटे चालायला जाणे, सकाळी दहा-बारा सूर्यनमस्कार करणे, ‘संतुलन अभ्यंग तीळ सिद्ध तेला’चा नियमित अभ्यंग करणे, स्नानाच्या वेळी अंगाला उटणे किंवा ‘सॅन मसाज पावडर’सारखे उद्वर्तन चोळून लावणे, जेवणानंतर कपभर गरम पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळून पिणे हे उपाय सुरू करता येतील. ‘फेमिसॅन तेला’चा पिचू वापरणे हेसुद्धा श्रेयस्कर. शास्त्रोक्‍त पंचकर्म करून घेतले, विशेषतः मेदपाचक द्रव्यांनी संस्कारित बस्ती करून घेतल्या, की अनेकानेक उपायांनी कमी न झालेले वजन कमी होऊ लागते, असा अनुभव आहे. 

 

आम्ही ‘फॅमिली डॉक्‍टर’ नेहमीच वाचतो. त्याचा आम्हाला खूप फायदा होतो. माझा मुलगा सतरा वर्षांचा आहे. त्याची प्रकृती उष्ण आहे. त्याला खूप गॅसेस होतात, त्यामुळे पोटही नीट साफ होत नाही. त्याने फायबर जास्त खाण्याची गरज आहे का? असेल तर ते कशातून मिळतील? शरीरातील उष्णता कशी कमी करता येईल? 
..... अनिश कुलकर्णी 
 सहसा फक्‍त मांसाहार घेणाऱ्या व्यक्‍तींनाच मुद्दाम फायबर असलेले पदार्थ घेण्याची गरज असते. एरवी पचन सुधारले, की पोटही आपोआप साफ होऊ लागते. मुलाला जेवणापूर्वी आले-लिंबाच्या रसासह पाव-पाव चमचा लवणभास्कर चूर्ण देण्याचा उपयोग होईल. रात्री झोपण्यापूर्वी चमचाभर ‘सॅनकूल चूर्ण’ किंवा अविपत्तिकर चूर्ण देणेही चांगले. दोन्ही जेवणांनंतर दोन-दोन चमचे अभयारिष्ट पाण्यात मिसळून घेणे, दिवसभर प्यायचे पाणी वीस मिनिटे उकळून व थर्मासमध्ये भरून ठेवून गरम पिणे हेसुद्धा चांगले. उष्ण प्रकृतीच्या व्यक्‍तींना पादाभ्यंग करणे, अंगाला ‘संतुलन अभ्यंग खोबरेल तेला’सारख्या तेलाचा अभ्यंग करणे हितावह असते. 

 

मला पाठीला अँकोलायझिंग स्पाँडिलायटिस आहे असे सांगितले आहे. माझे दोन्ही खुब्यांचे सांधे बदलावे लागले आहेत. कृपया मार्गदर्शन करावे. 
..... सूर्यजित पाटील 
आपण उल्लेखलेल्या दोन्ही समस्या वाताशी संबंधित आहेत. खुब्यांचे सांधे बदलले असले तरी इतर सांध्यांची झीज होऊ नये यासाठी आत्ताही प्रयत्न करायला हवेत. आयुर्वेदिक उपचारांनी अशा आजारामध्ये उत्तम परिणाम मिळतात असा आजवरचा अनुभव आहे. खुब्यांच्या सांध्यांचे शस्त्रकर्म झाले आहे तेव्हा वैद्यांचा सल्ला घेऊन शास्त्रशुद्ध पंचकर्म करून घेणे, विशेषतः विरेचन, बस्ती हे उपचार करून घेणे व नंतर पिंडस्वेदन, मेरुदंडासाठी लेप वगैरे उपचारांची योजना करणे चांगले. तत्पूर्वी ‘संतुलन प्रशांत’ चूर्ण तूप-साखरेसह, महायोगराज गुग्गुळ, दशमूलारिष्ट, ‘संतुलन आत्मप्राश’, ‘संतुलन वातबल’ गोळ्या घेण्याचा, पाठीच्या कण्याला ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’, अंगाला ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल’ नियमितपणे लावण्याचाही उपयोग होईल. 

 

माझी मुलगी सतरा वर्षांची आहे. सध्या बारावीत शिकते आहे. तिचा ताण घेण्याचा स्वभाव आहे. ती आनंदी राहावी आणि केलेला अभ्यास लक्षात राहावा यासाठी काही उपाय सुचवावा. सतत बसून असल्याने सध्या तिचे वजनही वाढते आहे. 
... अर्चना 
 मनाला, बुद्धीला, मेंदूला अधूनमधून आराम मिळणे आवश्‍यक असते, यामुळे ताणही कमी होतो. शिवाय, अभ्यासही अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहतो असे दिसते. मनापासून अभ्यास करावाच; पण एकाग्रता वाढण्यासाठी सकाळ- संध्याकाळ पाच मिनिटांसाठी ज्योतिध्यान करणे चांगले. सकाळी दहा मिनिटे वेळ काढून सूर्यनमस्कार, थोड्या वेळासाठी ॐकार म्हणणे यामुळे चित्तवृत्ती उल्हसित राहण्यासही मदत मिळते. बरोबरीने ‘संतुलन ब्रह्मलीन सिरप’ घेणे, शतावरी कल्प घालून दूध घेणे चांगले. नियमित सूर्यनमस्कार करण्याने वजनही कमी होऊ शकते, बरोबरीने अतिताणामुळे स्त्रीसंतुलनात काही बिघाड तर होत नाही ना, पाळी व्यवस्थित व नियमित येते आहे ना, याकडे लक्ष ठेवणे आणि आवश्‍यकता असल्यास योग्य उपचार घेणे आवश्‍यक. आहारात मांसाहार, जड कडधान्ये, रात्री उशिरा जेवणे बंद करणे चांगले. नियमित अभ्यंग हेसुद्धा श्रेयस्कर. 

 

 ‘संतुलन’ची औषधे खूपच परिणामकारक असतात व त्यांचा लगेच उपयोग होत असल्याचे जाणवते. ‘संतुलन’चे गोक्षुरादी चूर्ण पाण्यात घेतले तर ते नीट मिसळत नाही, त्याऐवजी ते तुपात घेतले तर चालते का? 
..... सुनील कासार 
गोक्षुरादी चूर्णात असलेल्या एका आवश्‍यक घटकामुळे ते पाण्यात नीट मिसळत नाही. म्हणून हे चूर्ण तूप- साखरेबरोबर मिसळून घेता येते. रसायन म्हणून किंवा धातुपोषणासाठी म्हणून जी औषधे असतात, ती दूध-साखरेसह किंवा तूप-साखरेसह घेणे अधिक प्रशस्त असते. साध्या साखरेऐवजी बत्तासा किंवा खडीसाखर वापरणे अधिक गुणकारी असते. मिक्‍सरच्या मदतीने पिठीसाखर करून ठेवली तर तिन्ही घटकांचे मिश्रण करणे, तसेच ते घेणेसुद्धा सोपे होते.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Question and Answer article written by Dr Shree Balaji Tambe