प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 7 February 2020

माझी मुलगी सव्वातीन वर्षांची असून, तिचे केस गळतात, विंचरताना तर गळतातच, पण रात्री झोपेतही गळतात. तरी कृपया मार्गदर्शन करावे. 
......सुनंदा 

माझी मुलगी सव्वातीन वर्षांची असून, तिचे केस गळतात, विंचरताना तर गळतातच, पण रात्री झोपेतही गळतात. तरी कृपया मार्गदर्शन करावे. 
......सुनंदा 
केस गळण्याची क्रिया शरीरातील अतिरिक्‍त उष्णतेशी, तसेच हाडांच्या अशक्‍ततेशी निगडित असते. यादृष्टीने मुलीला खारीक चूर्णासह उकळलेले दूध, त्यात शतावरी कल्प मिसळून देण्याचा उपयोग होईल. प्रवाळयुक्‍त गुलकंद तसेच ‘हेअरसॅन’ गोळी रोज एकदा घेण्याचाही उपयोग होईल. केसांना रोज, किमान आठवड्यातून तीन वेळा ‘संतुलन व्हिलेज हेअर तेला’सारखे तेल लावण्याचाही फायदा होईल. लहानपणापासूनच केस धुण्यासाठी केमिकल उत्पादनांची सवय न लागता शिकेकाई, रिठा, आवळा, जास्वंद वगैरे द्रव्यांपासून बनविलेला शंभर टक्के शुद्ध नैसर्गिक हेअरवॉश किंवा तयार ‘संतुलन सुकेशा’ वापरणे चांगले. कच्चे मीठ, फार आंबट, तिखट पदार्थ आहारातून टाळणेसुद्धा चांगले. 

माझे वय ४५ वर्षे असून, मी शिवणकामाचा व्यवसाय करते. गेल्या दोन वर्षांपासून मी सांधेदुखीने त्रस्त आहे. जास्त शिवणकाम झाले की सांधे सुजतात व खूप वेदना होतात. कधी कधी इतका असह्य त्रास होतो की बसल्या जागेवरून उठता येत नाही. औषधे घेतली की तात्पुरते बरे वाटते, पण पुन्हा पुन्हा त्रास होत राहतो. कृपया मार्गदर्शन करावे.    ..... शहापुरे 
  एकंदर वर्णनावरून हा त्रास आमवाताशी संबंधित असावा असे वाटते. तज्ज्ञ वैद्यांकडून एकदा नेमके निदान करून घेतले तर योग्य औषध योजना करणे सोपे होईल. तत्पूर्वी आम पचनाच्या दृष्टीने सकाळी सुंठ-गूळ-तूप यांची लहान सुपारीच्या आकाराची गोळी खाणे, जेवताना किंवा एरवी तहान लागल्यावर प्यायचे पाणी वीस मिनिटांसाठी उकळलेले व गरम असताना पिणे, तेल, गहू, आहारातून वर्ज्य करणे, संध्याकाळचे जेवण सूर्यास्तानंतर लवकरात लवकर आणि द्रव स्वरूपात घेणे चांगले. ‘संतुलन वातबल’ गोळ्या, ‘संतुलन संदेश’ आसव, रास्नादी गुग्गुळ घेण्याचाही उपयोग होईल. दुखणाऱ्या सांध्यांवर निर्गुडीची पाने वाफवून तयार केलेल्या पोटलीने शेक करण्याचाही फायदा होईल. दर आठ-दहा दिवसांनी रात्री झोपण्यापूर्वी दोन-अडीच चमचे एरंडेल तेल घेऊन सकाळी पोट साफ होऊ देणे हेसुद्धा चांगले. 

`फॅमिली डॉक्‍टर’मधील मार्गदर्शनाबद्दल मी आपले आभार मानतो. आमच्या घरातल्या कोणालाही काही आजार उद्भवला तर आपण सुचविलेल्या उपचारामुळे तो बराच होतो, याचा मी अनेकदा प्रत्यय घेतलेला आहे. मला गेल्या वर्षापासून डोकेदुखीचा त्रास होतो, विसरल्यासारखे वाटते, मन स्थिर राहात नाही. न्यूरॉलॉजिस्टने मायग्रेन आहे असे सांगितले आहे. परंतु मला त्यांची औषधे घ्यायची नाहीत. कृपया मार्गदर्शन करावे. 
.....चंद्रकांत 
आपल्या आभाराबद्दल धन्यवाद. आयुर्वेदिक उपचार प्रभावी तर असतातच, पण योजना करायला सोपे व घरातल्या सर्वांसाठी उपयुक्‍त असतात, हे खरे आहे. मानसिक अस्थिरता, डोकेदुखी वगैरे त्रासांवर आयुर्वेदात शतावरी, ब्राह्मी, जटामांसी वगैरे अनेक उत्तमोत्तम वनस्पती सुचवलेल्या आहेत. यादृष्टीने दुधासह शतावरी कल्प घेणे, सकाळी ब्राह्मीचा रस दोन चमचे या प्रमाणात खडीसाखर घालून घेणे, ताजी ब्राह्मी उपलब्ध नसल्यास सकाळ-संध्याकाळ ‘संतुलन ब्रह्मलीन सिरप’ घेणे हे उपाय योजता येतील. दिवसातून दोन वेळा ‘संतुलन पित्तशांती’ गोळ्या घेण्याचा, रात्री झोपण्यापूर्वी नाकात ‘नस्यसॅन घृता’चे दोन-तीन थेंब टाकण्याचा, आठवड्यातून दोन-तीन वेळा पादाभ्यंग करण्याचा उपयोग होईल. सकाळी काही खाण्या-पिण्यापूर्वी अनुलोम-विलोम, संतुलन अमृत क्रिया करण्याचा, दहा मिनिटांसाठी ॐकार म्हणण्याचा किंवा ऐकण्याचाही उत्तम फायदा होईल. तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोधारा, विरेचन, बस्ती घेणेही श्रेयस्कर. 

माझे वय ६५ वर्षे आहे. मला पचनाचा त्रास आहे. जेवणानंतर पोट गच्च होते व थोडे दुखते. तरी यावर काही आयुर्वेदिक औषध सुचवावे. तसेच काय खावे, काय खाऊ नये हेसुद्धा सुचवावे. 
.....गोरे 
 भूक लागेल तेव्हा आणि भूक लागेल त्या प्रमाणात अन्न खाणे आणि तहान लागेल तेव्हा वीस मिनिटे उकळून, गाळून घेतलेले गरम पाणी पिणे या दोन गोष्टी सांभाळल्या तर पचनाच्या बहुतांशी तक्रारी बऱ्या होतात असे दिसते. दुपारचे जेवण बाराच्या सुमारास आणि संध्याकाळचे जेवण सूर्यास्तानंतर लवकरात लवकर घेणे हेसुद्धा आवश्‍यक होय. जेवणानंतर ‘संतुलन अन्नयोग’ तसेच प्रवाळपंचामृत या गोळ्या घेणे, रात्री जेवणानंतर अविपत्तिकर चूर्ण किंवा ‘सॅनकूल चूर्ण’ घेणे, अभयारिष्ट, पुनर्नवासव घेणे हे घेण्याचाही फायदा होईल. ज्वारी, नाचणी, एक वर्षाचा जुना भाजून घेतलेला तांदूळ, मूग, वेलीवर येणाऱ्या फळभाज्या, ताक, घरी बनविलेले साजूक तूप या गोष्टींचा आहारात समावेश करणे श्रेयस्कर. 

 

घरी बनविलेल्या साजूक तुपाचा आहारात समावेश करावा असे आपण नेहमी सांगता. परंतु हल्ली गाईचे दूध चांगले मिळत नाही. पिशवीतील दुधावर साय इतकी कमी येते की त्याला दही लावून, लोणी काढून तूप तयार करणे जवळपास अशक्‍य असते. तरी यातून मार्ग कसा काढावा? 
....कु. सीमा 
गाईच्या दुधावर म्हशीच्या दुधापेक्षा कमी साय येणे स्वाभाविक असले तरी दूध शुद्ध व कोणतीही प्रक्रिया न केलेले असले तर त्यावर साय यायला हवी. सध्या ए2 म्हणून भारतीय वंशाच्या गाईचे शुद्ध दूध उपलब्ध असते, ते आणून घरच्या घरी तूप बनविणे चांगले. ए2 गाईचे दूध उपलब्ध होत नसले तर गाईच्या तुपाचा हट्ट न धरता म्हशीच्या दुधापासून घरी बनविलेले तूप वापरणेही ठीक असते. या प्रक्रियेने तूप करण्यापूर्वी किंवा कधीतरी घरचे तूप कमी पडणार असेल तर संतुलनचे आयुर्वेदिक घृत वापरता येईल. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Question and Answer article written by Dr Shree Balaji Tambe