esakal | प्रश्नोत्तरे
sakal

बोलून बातमी शोधा

Question and Answer

प्रश्नोत्तरे

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे

माझ्या भावाला घामामुळे दुर्गंध येण्याचा त्रास होतो आहे. डिओडरंट वापरण्याने उपयोग होण्याऐवजी जास्तीच विचित्र वास येतो. कृपया यावर प्रभावी उपाय सुचवावा .
...... मनोज 
 घाम हा एक प्रकारचा मल असतो व ते पित्तदोषाचे एक स्थान असते. त्यामुळे पित्तातील विस्र म्हणजे तीव्र गंध हा गुण वाढला की, त्याचे पर्यवसान या त्रासात होते. यावर सकाळ-संध्याकाळ कामदुधा, प्रवाळपंचामृत गोळ्या घेण्याचा, ‘संतुलन पित्तशांती’ गोळ्या घेण्याचा उपयोग होईल. ‘संतुलन अनंत कल्प’ घालून दूध घेणे, ‘अनंतसॅन’ गोळ्या घेणे, स्नानाच्या वेळी साबणाऐवजी ‘सॅन मसाज पावडर’ व कुळीथ पीठ यांचे समभाग मिश्रण एकत्र करून ते उटण्याप्रमाणे लावण्याचा, तसेच स्नानानंतर काख वगैरे जास्ती घाम येणाऱ्या ठिकाणी तुरटीचा खडा फिरविण्याचा उपयोग होईल. सहसा सर्व डिओडरंटस्‌ कृत्रिम द्रव्यांपासून व अनैसर्गिक सुगंधांपासून बनविलेले असतात, त्यामुळे त्यांचा वापर टाळणेच श्रेयस्कर. 

मला गेल्या दहा वर्षांपासून पित्ताचा त्रास आहे. रोज सकाळी उठल्यावर पित्ताची उलटी होते. उलटी करावीच लागते, त्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही. कृपया उपाय सुचवावा. 
...सायली पैठणकर 
ज्याप्रमाणे मातीच्या भांड्यात रोज दही जमवले तर काही दिवसांनी त्या भांड्यात नुसते दूध ठेवले तरी त्याचे दुसऱ्या दिवशी दही लागलेले दिसते. त्याचप्रमाणे आमाशयाच्या भिंतीमध्ये पित्त साठून राहिले की, पथ्यकर आहार घेतला तरी पित्त वाढत राहते. हे साठून राहिलेले पित्त काढून टाकणे गरजेचे असते. त्यासाठी विरेचन करून घेणे उत्तम. तत्पूर्वी ‘संतुलन पित्तशांती’ गोळ्या, रात्री झोपण्यापूर्वी ‘सॅनकूल चूर्ण’ किंवा अविपत्तिकर चूर्ण घेण्यास सुरुवात करता येईल. तेल, गहू, आंबट पदार्थ, कच्चे मीठ, हिरवी मिरची हे पदार्थ काही दिवस आहारातून पूर्ण वर्ज्य करणे चांगले. आठवड्यातून एकदा दोन-तीन चमचे एरंडेल घेऊन दुसऱ्या दिवशी दोन-तीन जुलाब करवणे चांगले. 

माझी मुलगी 21 वर्षांची आहे. गेल्या वर्षापासून तिला लघवी मोकळी न होण्याचा त्रास होतो आहे. डॉक्‍टरांनी लघवीचे इन्फेक्‍शन असल्याचे सांगितले. त्यांनी दिलेल्या गोळ्या घेतल्या की तात्पुरते बरे वाटते, पण पुन्हा सारखे सारखे जावे लागते. ओटीपोटातही राहून राहून दुखते. हा त्रास पूर्ण बरा होण्यासाठी काही उपाय सुचवावा. 
.... सुजाता 
सकाळ-संध्याकाळ पुनर्नवाघनवटी घेणे, जेवणानंतर दोन-दोन चमचे पुनर्नवासव घेणे, ‘फेमिसॅन तेल’ वापरणे तसेच एक दिवसाआड खालून ‘संतुलन शक्‍ती धुपा’ची धुरी घेणे हे सुद्धा चांगले. ओटीपोटीवर ‘संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल’ जिरविण्याचा उपयोग होईल. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात पाव चमचा धणे पूड, पाव चमचा जिरे पूड व अर्धा चमचा अनंतमूळ चूर्ण किंवा भरड भिजत घालून सकाळी गाळून घेऊन पिण्याने लघवी मोकळी होण्यास मदत मिळेल. कोबी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, गवार, वांगे, दही, चवळी, राजमा, वाटाणे वगैरे गोष्टी आहारातून टाळणे श्रेयस्कर. या उपायांनी बरे वाटलेच, तरीही मुळापासून उपचार होण्याच्या दृष्टीने एकदा वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे उत्तम होय. 

मी ‘फॅमिली डॉक्‍टर’चा नियमित वाचक आहे. माझे वय 44 वर्षे असून मी नियमित व्यायाम करतो. मात्र त्या दरम्यान माझा गुडघा, खांदा व कोपरा यांच्या सांध्यांमधून ‘कट’ असा आवाज येतो. कृपया उपाय सुचवावा. 
..... अनिल भागवत 
 नियमित व्यायाम करणे उत्तमच आहे. सांध्यांमधून आवाज येणे हे त्या ठिकाणची प्राकृतिक स्निग्धता कमी झाल्याचे एक लक्षण आहे. यावर सांध्यांना 'संतुलन शांती सिद्ध तेला'सारखे तेल लावणे, तूप-साखरेबरोबर ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ घेणे, आहारात चार-पाच चमचे साजूक तुपाचा अंतर्भाव करणे चांगले. काही दिवस ‘संतुलन वातबल’ गोळ्या घेणे, डिंकाचे लाडू घेणे याचाही उपयोग होईल. 

पोटातील गॅस कमी होण्यासाठी उपाय व पथ्य सुचवावे. 
... अरुण इंगळे 
 प्रकृतीनुरूप अन्न म्हणजेच जे अन्न आपण सहजपणे पचवू शकतो आणि ज्या अन्नामुळे त्रिदोष संतुलित राहतात असे अन्न. पचनासंबंधित कोणताही त्रास असला तर त्यासाठी या गोष्टीकडे लक्ष देणे अत्यावश्‍यक असते. यासाठी तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे श्रेयस्कर असते. तत्पूर्वी भाजलेले तांदूळ, ज्वारी, नाचणी, मूग, वेलीवरच्या फळभाज्या, ताजे ताक, घरचे साजूक तूप या गोष्टी आहारात ठेवण्याचा उपयोग होईल. अग्नीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी जेवणांनंतर ‘संतुलन अन्नयोग गोळ्या’ घेणे, जेवणाच्या मध्ये लवणभास्कर चूर्ण घेणे, दिवसातून दोन वेळा पुनर्नवासारखे आसव किंवा अरिष्ट घेणे हे उपाय सुरू करता येतील. सकाळी उठल्यावर पोटाला अगोदर तेल लावून नंतर गरम पाण्याच्या पिशवीने शेकणे, रोज चालायला जाणे, सूर्यनमस्कारासारखे साधे पण प्रभावी योगासन करणे, अनुलोम-विलोम किंवा प्राणायामाच्या मदतीने प्राणापानादी पंचवायूंवर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा चांगले.