प्रश्नोत्तरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diabetes and Tea

प्रश्नोत्तरे

माझे वय ४० वर्षे आहे. आमच्या घरी वडिलांच्या बाजूने मधुमेहाची प्रवृत्ती आहे... म्हणजे दोन्ही काकांना, आत्याला वगैरे सगळ्यांना मधुमेह आहे. गेल्या आठवड्यात मी तपासणी केली, त्यात सकाळी अनशापोटीची साखर ११० आली. डॉक्टरांनी वजन कमी करायला आणि साखर बंद करायला सांगितली आहे, यावर आयुर्वेदाची काही मदत होऊ शकते का?

-परेश जमादार

उत्तर - हो, अशा केसमधे आयुर्वेदाची नक्कीच मदत होऊ शकते. वंशपरंपरागत रोग असला तरी जर प्रकृतिनुरूप आहार, आचरणाची योजना केली, शास्त्रशुद्ध पंचकर्म करून शरीरातले दोष संतुलित ठेवले तर आरोग्य उत्तम ठेवता येते, असा अनुभव आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे साखर पूर्णपणे बंद न करता बाजारातील तयार मिठाया न खाणे आणि घरी साध्या साखरेऐवजी खडीसाखर वापरणे हे योग्य ठरेल. वजन कमी करण्यासाठी तसेच मधुमेहाच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सूर्यनमस्कार, अनुलोम-विलोम करणे तसेच रोज २०-२५ मिनिटे चालणे हे उत्तम होय. बरोबरीने रात्री झोपण्यापूर्वी अभ्यंग करणे, चंद्रप्रभा वटी घेणे, रात्रीचे जेवण आठ-साडेआठच्या दरम्यान करणे, आहारात दही, चीज, पनीर, सीताफळ, फणस, आंबट फळे, थंड पाणी, मांसाहार वर्ज्य करणे हेसुद्धा आवश्यक होय.

मी पुण्यात राहते. सध्या आमच्या आसपास सर्वांना सर्दी, खोकला, तापाचा त्रास होतो आहे. कोविडसदृश साथ असल्याचाच आभास होतो आहे. दोन वर्षांपूर्वीच्या साथीमध्ये आम्ही सर्व जण ‘सॅन अमृत’ चहा नियमित घेत होतो आणि त्याचा आम्हाला उपयोगही झाला होता. तर आतासुद्धा हा चहा घेतला तर चालेल का? त्या व्यतिरिक्त अजून काय काळजी घ्यायला हवी?

- अनुराधा बडोले

उत्तर - ‘सॅन अमृत’ चहा प्रतिकारशक्ती सुधारणारा असल्याने नियमितपणे घेता येईल. बरोबरीने दिवसातून दोन वेळा अर्धा चमचा संतुलन सितोपलादी चूर्ण घेणे, रोज सकाळी च्यवनप्राश किंवा आत्मप्राश घेणे हेसुद्धा चांगले. घरात सकाळ-संध्याकाळ धूप करणे, त्यासाठी कडुनिंबाची पाने, वावडिंग, ओवा, राळ वगैरे द्रव्ये किंवा तयार ‘प्युरिफायर धूप’ वापरणे चांगले. आहारात दही, पनीर, चीज, थंड पाणी, आईस्क्रीम, सूर्यास्तानंतर दूध, फणस, सीताफळ यांसारख्या  कफदोषवर्धक आणि पचायला जड गोष्टी टाळणे हेसुद्धा  श्रेयस्कर.

टॅग्स :DiabetesTeaFamily Doctor