#FamilyDoctor प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे
रविवार, 25 नोव्हेंबर 2018

फॅमिली डॉक्‍टरमधील सल्ले व औषधे बहुमोलाची आणि गुणकारी असतात. मला कंबरदुखीचा त्रास आहे. कुंडलिनी तेल लावले की बरे वाटते. मात्र मला अशक्‍तपणाही आहे. कधी कधी तोल जातो की काय असे वाटते. थंडीमध्ये एखादे वेळी अंग थरथरते. शेक घेतल्यावर कमी होते. कृपया काही उपाय सुचवावा.
...श्री. वैद्य

फॅमिली डॉक्‍टरमधील सल्ले व औषधे बहुमोलाची आणि गुणकारी असतात. मला कंबरदुखीचा त्रास आहे. कुंडलिनी तेल लावले की बरे वाटते. मात्र मला अशक्‍तपणाही आहे. कधी कधी तोल जातो की काय असे वाटते. थंडीमध्ये एखादे वेळी अंग थरथरते. शेक घेतल्यावर कमी होते. कृपया काही उपाय सुचवावा.
...श्री. वैद्य

उत्तर - नियमितपणे पाठीला ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ आणि संपूर्ण अंगाला ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल’ लावल्याने वातदोष कमी झाली की कंबरदुखी, अशक्‍तपणा, थंडी वाजणे या सर्वच तक्रारी कमी होण्यास मदत मिळेल. बरोबरीने सकाळ-संध्याकाळ च्यवनप्राश, ‘संतुलन आत्मप्राश’ १-१ चमचा घेण्याचा उपयोग होईल. १-१ चमचा ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ तूप-साखरेबरोबर घेता येईल. कपभर दुधात एक चमचा खारीक पूड व पाव कप पाणी मिसळून पाणी उडून जाईपर्यंत उकळलेले दूध घेण्याची उपयोग होईल. वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली दशमूळ सिद्ध तीळ तेलाच्या बस्ती घेण्याचा तसेच तज्ज्ञ परिचारकाकडून संपूर्ण शरीराचा अभ्यंग मसाज घेण्याचाही फायदा होईल. तोल जाण्यामागे फक्‍त अशक्‍तपणा हेच कारण आहे की इतर काही कारण आहे याची तज्ज्ञ वैद्यांकडून तपासणी करून घेणे चांगले.

माझ्या आईचे वय ४६ वर्षे आहे. तिला ६-७ महिन्यांतून एकदा मासिक पाळी येते. गेल्या दोन वर्षांपासून तिला डोकेदुखीचा खूपच त्रास आहे. सीटी स्कॅन करून पाहिला, तो व्यवस्थित आहे. वेदनाशामक गोळी घ्यावी लागते, पण त्याचे दुष्परिणाम होत असल्याने सहसा गोळी घेणे टाळते. कृपया मार्गदर्शन करावे. पूर्वीसुद्धा आईला उन्हात गेले असता पित्ताचा त्रास होत असे, म्हणजे उलट्या होत असत, असे ती म्हणते.  

उत्तर - मुळात पित्ताचा त्रास होण्याची प्रकृती आणि त्यात रजोनिवृत्तीमुळे स्त्री-संतुलनात होणाऱ्या बदलाची भर यामुळे आईला इतका त्रास होतो आहे. यावर सर्वांत उत्तम उपाय म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने अगोदर अंतर्स्नेहन, अभ्यंग, स्वेदन वगैरे करून विरेचन करून नंतर उत्तरबस्तीची योजना करणे. यामुळे पित्तदोषाची शुद्धी झाली की सध्या होणारा त्रास कमी होईल. बरोबरीने सकाळ-संध्याकाळ कामदुधा, प्रवाळपंचामृत, तसेच संतुलनच्या ‘पित्तशांती’ गोळ्या घेण्याचा उपयोग होईल. रात्री झोपण्यापूर्वी ‘सॅनकूल चूर्ण’ घेण्याचा, नाकात ‘नस्यसॅन घृता’चे किंवा घरी बनविलेल्या साजूक तुपाचे ३-४ थेंब टाकण्याचा फायदा होईल. टाळूवर तसेच मानेवर शीतल द्रव्यांच्या संस्कारातून तयार केलेले ‘संतुलन रोझ ब्यूटी तेल’ किंवा ‘संतुलन ब्रह्मलीन तेल’ लावण्याने डोके दुखण्याचे लागलीच कमी होते असा अनुभव आहे. नियमित पादाभ्यंग करण्याने आणि आहारात काही दिवस फक्‍त तांदूळ, ज्वारी व मूग ही धान्ये, वेलीवर येणाऱ्या फळभाज्या यांचा समावेश करणे, फोडणीसाठी साजूक तूप, जिरे, हळद, धणे, दालचिनी, तमालपत्र, आमसूल वगैरे पित्त न वाढविणाऱ्या द्रव्यांचा वापर करणे श्रेयस्कर.

दर शुक्रवारी येणारा ‘फॅमिली डॉक्‍टर’ नियमित वाचत असतो व साम मराठीवरील कार्यक्रमसुद्धा पाहतो. माझे वय ४८ वर्षे आहे. मला आठ वर्षांपासून मणकादुखीचा त्रास आहे. डॉक्‍टरांचे औषध, इंजेक्‍शन घेण्याने तेवढ्यापुरते बरे वाटते. मात्र पुन्हा दुखणे सुरू होते. सकाळी उठताना जास्ती त्रास होतो. कृपया मार्गदर्शन करावे.
..... श्री. काळभोर

उत्तर - पाठीच्या मणकण्याला ताकद मिळावी, त्या ठिकाणी वात वाढू नये किंवा वाढलेला वातदोष कमी व्हावा यासाठी तेल लावणे उत्तम असते. रात्री झोपण्यापूर्वी पाठीच्या कण्याला खालून वर या दिशेने हलक्‍या हाताने संतुलन कुंडलिनी तेल जिरविण्याचा उपयोग होईल. आठवड्यातून दोनदा दुखणाऱ्या ठिकाणी निर्गुडी, एरंड, शेवगा, यापैकी मिळतील त्या पानांनी शेक करण्याचाही उपयोग होईल. बरोबरीने संतुलन वातबल गोळ्या, तूप-साखरेसह ‘संतुलन प्रशांत चूर्ण’, योगराज गुग्गुळ घेण्याचाही उपयोग होईल. वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली दशमूळ सिद्ध तेलाच्या बस्ती घेण्याचाही फायदा होईल. पाठीच्या दुखण्यावर आयुर्वेदात उत्तम उपाय असतात. वेदनाशामक उपचारांची सवय व लावता मणक्‍यांना, नसांना ताकद देणारे उपचार करणे नेहमीच श्रेयस्कर होय.

माझे वय ३५ वर्षे आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी माझ्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाचे नख पिवळे पडले. आजही ते पिवळेच, नखाच्या खालच्या त्वचेपासून वेगळे व उचलले असे येते. नखाच्या थोडे पिवळसर झालेले आहे. बाकी सर्व नखे ठीक आहेत. कृपया उपाय सुचवावा.
....सौ. नीमा

उत्तर - नखांचा संबंध हाडांशी असतो, त्यामुळे या त्रासावर बाहेरून लेप वगैरे लावण्याचा फायदा होईलच; पण बरोबरीने हाडांना पोषक असे प्रवाळपंचामृत किंवा कॅल्सिसॅनसारख्या गोळ्या दोन्ही नखांवर एक दिवसाआड संतुलनचे वाय्‌ एस्‌. ऑइंटमेंट लावता येईल, तर एक दिवसाआड करंज तेलात मिसळलेले कपिला चूर्ण लावता येईल. हे दोन्ही लेप रात्रभर नखावर लावून ठेवले तरी चालतील. या उपायांचा फायदा होईलच, मात्र बऱ्याच वर्षांपासून त्रास आहे, तेव्हा एकदा तज्ज्ञ वैद्यांकडून तपासणी करून घेणे श्रेयस्कर.

मला चार वर्षांपासून थायरॉईडचा त्रास सुरू झाला आहे. त्यानंतर माझी पचनशक्‍तीसुद्धा कमी झाली व वजनही वाढले. तर थायरॉईड व पचन यांचा संबंध आहे का? यावर काय उपाय करावा?
...सौ. राणे 

उत्तर - थायरॉईड या ग्रंथीची कार्यक्षमता कमी होणे, पचन बिघडणे, वजन वाढणे या सर्व लक्षणांमागे एक कॉमन कारण असते, ते म्हणजे अग्नीमध्ये बिघाड. त्यामुळे अर्थातच या सर्वांचा एकमेकांशी संबंध असतो. यावर प्रकृतीनुरूप नेमकी औषधे घेणे सर्वांत चांगले असते. बरोबरीने ‘फेमिसॅन तेला’चा पिचू, ‘सॅनरोझ’ रसायन घेण्याचा उपयोग होईल. अंगाला नियमित अभ्यंग करणे, रोज सकाळी किमान २० मिनिटांसाठी चालणे, तुपाचे निरांजन लावून ज्योतित्राटक करणे, अनुलोम-विलोम, दीर्घश्वसनसारख्या योगक्रिया करणे यांचा उपयोग होईल. स्वयंपाकासाठी किंवा वरून घेण्यासाठी वापरायचे मीठ खडा मीठ किंवा सैंधव मीठ असणे, प्यायचे पाणी उकळलेले व गरम असताना पिणे हेसुद्धा चांगले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: question answer