प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
Friday, 18 January 2019

मी ५० वर्षांचा रिक्षाचालक आहे. मला फार थकवा जाणवतो. मला कोणताही रोग नाही किंवा कसलेही व्यसन नाही, मला शांत झोप येत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
- पांडुरंग

मी ५० वर्षांचा रिक्षाचालक आहे. मला फार थकवा जाणवतो. मला कोणताही रोग नाही किंवा कसलेही व्यसन नाही, मला शांत झोप येत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
- पांडुरंग
उत्तर -
रिक्षा चालवण्यामुळे किंबहुना कोणतेही वाहन दीर्घकाळासाठी चालवल्याने, शरीरात वातदोष वाढणे स्वाभाविक असते, यातूनच थकवा जाणवू शकतो. थकवा कमी होण्यासाठी, झोप शांत लागण्यासाठी, तसेच वातदोष कमी होण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी अभ्यंग करण्याचा उपयोग होईल. जेवणाच्या वेळा नियमित ठेवणे; दूध, तूप, लोणी, बदाम, खारीक, डिंकाचे लाडू वगैरे वातशामक गोष्टींचा आहारात समावेश असणे चांगले. प्रदूषणाचा दुष्परिणाम कमी होण्यासाठी रोज सकाळी थोड्या वेळासाठी दीर्घश्वसन करणे, अनुलोम- विलोम प्राणायाम करणे हेसुद्धा चांगले. सध्या ताजे आवळे उपलब्ध आहेत. रोज दोन ताज्या आवळ्यांचा रस खडीसाखर घालून घेतला, तर थकवा कमी होण्यास नक्की उपयोग होईल. शांत झोप लागण्यासाठी काही दिवस रात्री झोपण्यापूर्वी ‘सॅन रिलॅक्‍स सिरप’ घेता येईल.

माझ्या चेहऱ्यावर गांधी येतात, खूप खाज येते. त्वचारोगतज्ज्ञांनी दिलेले क्रीम लावले की काही दिवस बरे वाटते; पण काही दिवसांनी पुन्हा गांधी येण्यास सुरवात होते. हा त्रास मुळापासून बरा होण्यासाठी आपण काही उपाय सुचवावा.
- सुनील
उत्तर -
यावर मुळापासून करायचा उपचार म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने विरेचन व बस्ती घेणे. यामुळे पित्तशमन झाले, रक्‍ताची शुद्धी झाली आणि बरोबरीने आहाराचे पथ्यापथ्य सांभाळले, की असा त्रास पूर्ण बरा होतो असा अनुभव आहे. तत्पूर्वी रक्‍तशुद्धी व पित्तशमनासाठी ‘संतुलन पित्तशांती गोळ्या’ सुरू करता येतील, दुधातून ‘संतुलन अनंत कल्प’ घेता येईल; रात्री झोपण्यापूर्वी अविपत्तिकर चूर्ण किंवा ‘सॅनकूल चूर्ण’ घेण्याचा उपयोग होईल. पित्ताची गांधी उठेल तेव्हा त्यावर शीतल-रक्‍तशुद्धीकर द्रव्यांनी सिद्ध केलेले ‘संतुलन रोझ ब्यूटी सिद्ध तेला’सारखे तेल लावण्याचाही उपयोग होईल. आहारात काही दिवस फक्‍त तांदूळ, ज्वारी, मूग, वेलीवर वाढणाऱ्या फळभाज्या, ताजे गोड ताक, साजूक तूप, साळीच्या लाह्या, डाळिंब, अंजीर, सफरचंद, मनुका या गोष्टींचा समावेश करणे चांगले.  

माझे दात लहानपणी किडलेले होते. सध्या पाच दातांना कॅप बसवली आहे. तीन दात पूर्णपणे किडलेले आहेत. दात निरोगी राहावेत यासाठी आपण काही उपाय सुचवावेत.
- अनामिका
उत्तर -
आयुर्वेदिक पद्धतीने सुरवातीपासून दातांची काळजी घेतली तर दात, हिरड्या, मुखाचे आरोग्य उत्तम राहते असा अनुभव आहे. मात्र, अजूनही इतर दातांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रयत्न करता येतील. यादृष्टीने दात स्वच्छ करण्यासाठी ‘संतुलन योगदंती’ हे दंतमंजन वापरता येईल. टूथपेस्ट वापरायची खूपच सवय झाली असली, तर अगोदर नेहमीप्रमाणे पेस्टच्या मदतीने दात घासून त्यानंतर दात-हिरड्यांना योगदंती लावून ठेवली तरी चालेल. याशिवाय दातांच्या आरोग्यासाठी, दातांची कीड अधिक वाढू नये यासाठी गंडूष उपचार करणे चांगले असते. यासाठी इरिमेदादी तेल किंवा ‘संतुलन सुमुख तेल’ वापरता येईल. पुरेसे तेल तोंडात आठ-दहा मिनिटांसाठी धरून ठेवणे आणि अधूनमधून खुळखुळवणे असे रोज सकाळी करण्याचाही उपयोग होईल.

माझे वय ३५ वर्षे असून मला नेहमी डोके दुखण्याचा त्रास आहे. डोक्‍यात सतत विचार चालू असतात. रात्री झोपही नीट लागत नाही. तरी कृपया मार्गदर्शन करावे. कोणत्या प्रकारचा प्राणायाम करावा हेसुद्धा सांगावे.
- सोनगीर
उत्तर -
मनाचा शरीरावर मोठा प्रभाव असतो. पूर्ण आरोग्यासाठी शरीर व मन या दोघांची काळजी घेणे आवश्‍यक असते. शरीर व मन या दोघांनाही आराम मिळण्यासाठी, तसेच शक्‍ती मिळण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी अभ्यंग करण्याचा उपयोग होईल, नियमितपणे पादाभ्यंग करण्याचाही उपयोग होईल. साजूक तुपाचे किंवा औषधी सिद्ध ‘नस्यसॅन घृता’चे नाकात दोन- तीन थेंब टाकण्याचाही उपयोग होईल. काही दिवस ‘ब्राह्मीसॅन गोळ्या’, तसेच ‘सॅन रिलॅक्‍स सिरप’ घेण्याचाही फायदा होईल. डोके दुखणे कमी होण्यासाठी कामदुधा, ‘संतुलन पित्तशांती गोळ्या’ घेता येतील. विचारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दीर्घश्वसन, अनुलोम- विलोम, ॐकार म्हणणे यांचाही फायदा होईल. आहार पचायला हलका असावा, तसेच वेळेवर जेवण करण्यावर भर द्यावा.

माझे वय ३० वर्षे आहे. मला चार वर्षांची मुलगी आहे. मुलगी एक वर्षाची असताना मला दिवस राहिले होते, मात्र तेव्हा गर्भपात केला. यानंतर मला सांधेदुखीचा त्रास सुरू झाला. सध्या माझा डावा हात आखडला आहे. उजव्या पायाच्या सांध्यातून आवाज येतो. मांडी घालून बसले तर सहजपणे उठता येत नाही. कृपया मार्गदर्शन करावे. मला भविष्यात वाताच्या त्रासापासून पूर्ण मुक्‍ती हवी आहे.
- क्षीरसागर
उत्तर -
वातदोषाशी संबंधित कोणत्याही त्रासावर लवकरात लवकर योग्य उपचार करणे गरजेचे असते. बाळंतपणानंतर किंवा गर्भपातानंतर वाढलेल्या वाताकडे अजिबात दुर्लक्ष होता कामा नये. वातदोषाला नियंत्रणात आणण्यासाठी नियमित अभ्यंग हा उत्तम उपचार असतो. यादृष्टीने सांध्यांना ‘संतुलन शांती सिद्ध तेल’, संपूर्ण शरीराला ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल’ लावण्याचा उपयोग होईल. गर्भपातानंतर त्रास सुरू झाला आहे. त्यादृष्टीने ‘फेमिसॅन तेला’चा पिचू वापरणेही आवश्‍यक होय. बरोबरीने ‘संतुलन वातबल गोळ्या’, तूप-साखरेसह ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ घेण्याचा उपयोग होईल. खारीक पूड टाकून उकळलेले दूध रोज घेणे, घरी बनविलेल्या साजूक तुपाचा किमान चार- पाच चमचे प्रमाणात आहारात समावेश करणे हेसुद्धा चांगले. डावा हात आखडला आहे, त्यावर खांद्याला ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ लावण्याचा उपयोग होईल. वातदोषाला संतुलित करण्यासाठी तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने बस्ती, विरेचनासहित पंचकर्म उपचार करून घेणेसुद्धा श्रेयस्कर. जड कडधान्ये, ढोबळी मिरची, वांगे, कोबी, फ्लॉवर, मैद्यापासून बनविलेले पदार्थ, शिळे पदार्थ आहारातून टाळणे चांगले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: question answer