प्रश्नोत्तरे

question answer
question answer

मी फॅमिली डॉक्‍टरची नियमित वाचक आहे. यातून आरोग्यमय जीवन जगण्यासाठी मोलाचे सहकार्य मिळते असा माझा अनुभव आहे. माझा नातू दोन वर्षे पाच महिन्यांचा आहे. तो अतिचंचल आहे, सांगितलेले कधी ऐकतो, कधी नाही. बोलण्यात सातत्य नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
....श्री. जगदाळे

उत्तर : अशा केसेसमध्ये जितक्‍या लवकर उपचार करावे, तितका चांगला गुण येताना दिसतो. यासाठी वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे उत्तम होय, बरोबरीने नातवाला रोज सकाळी अर्धा चमचा ‘संतुलन ब्रह्मलीन घृत’, सकाळ-संध्याकाळ अर्धा-अर्धा चमचा ‘रिलॅक्‍स सॅन सिरप’, झोपण्यापूर्वी टाळूवर ‘संतुलन ब्रह्मलीन सिद्ध तेल’ लावण्याचा उपयोग होईल. पंचामृतासह ‘संतुलन अमृतशर्करा’ हा सुवर्ण, केशर, शतावरी यांनी युक्‍त कल्प देण्याचा उपयोग होईल. तसेच प्यायचे पाणी सुवर्णसिद्ध म्हणजे २४ कॅरेट सोन्याबरोबर २० मिनिटांसाठी उकळलेले असणे सुद्धा चांगले. अशा केसेसमध्ये शिरोपिचू, सर्वांगाला अभ्यंग, विशेष प्रकारची बस्ती वगैरेंचाही गुण येताना दिसतो. या दृष्टीनेही वैद्यांकडून मार्गदर्शन घेणे चांगले.

माझा मुलगा २२ वर्षांचा आहे. लहानपणापासून त्याचे केस पांढरे व्हायला सुरवात झाली. अजून केस पांढरे होऊ नयेत यासाठी काही उपाय सांगावा. शिवाय प्रकृती खूप उष्ण आहे. त्यामुळे त्याच्या डोक्‍यात कोंडा होतो, खूप खाजवतो. औषधे घेतली की थोडे दिवस बरे वाटते. तरी कृपया यावर उपाय सुचवावा.
...श्री. गेतराई

उत्तर : या सर्व तक्रारींवर शरीरातील उष्णता कमी करणे हेच आवश्‍यक आहे. यासाठी नियमित पादाभ्यंग करणे, रात्री झोपताना अविपत्तिकर चूर्ण किंवा सॅनकूल चूर्ण घेणे, सकाळ-संध्याकाळ ‘संतुलन पित्तशांती’, कामदुधा या गोळ्या घेणे, आहारात किमान ४-५ चमचे घरी बनविलेल्या साजूक तुपाचा समावेश करणे हे उपाय करता येतील. दोन आठवड्यातून एकदा दोन चमचे एरंडेल घेऊन पोट साफ होऊ देणे हे सुद्धा चांगले. केसांना ‘संतुलन व्हिलेज हेअर सिद्ध तेल’ लावणे, केस धुण्यासाठी शिकेकाई, रिठा वगैरेंचे मिश्रण किंवा ‘संतुलन सुकेशा’ हे मिश्रण वापरणे आणि ‘हेअर सॅन गोळ्या’ घेणे हे सुद्धा आवश्‍यक. आहारात मिठाचे प्रमाण मर्यादित असणे, विरुद्ध आहार व रात्रीची जागरणे टाळणे हे सुद्धा आवश्‍यक. 

मला रोज ॲसिडिटीची गोळी घ्यावी लागते. ॲसिडिटीमुळे पोट दुखते, अस्वस्थ वाटते, गॅसेस सरत नाहीत, पोट कधी साफ होते, कधी नाही, पोटात आग होते. अँटासिड घेतली की बरे वाटते. खूप तपासण्या केल्या, पण दोष सापडत नाही. कृपया उपाय सुचवावा, मी फार कंटाळले आहे.
....श्रीमती पेठे

उत्तर : पथ्य आणि औषधे यांचा योग्य समन्वय साधता आला तर ॲसिडिटीची गोळी घ्यावी लागणार नाही. औषधांचा विचार करायचा तर दोन्ही जेवणांनंतर १-१ चमचा ‘सॅनकूल चूर्ण’ घेण्याचा, तसेच प्रवाळ पंचामृत या गोळ्या घेण्याचा उपयोग होईल. दिवसातून दोन वेळा पोटावर, विशेषतः जिथे दुखते तेथे ‘संतुलन रोझ ब्यूटी सिद्ध तेल’ हलक्‍या हाताने जिरविण्याचा उपयोग होईल. पोटात आग होत असेल तेव्हा मूठभर साळीच्या लाह्या चावून खाण्याचा उपयोग होईल. आहारात काही दिवस तेल व गहू वर्ज्य करणे, त्याऐवजी स्वयंपाक करण्यासाठी साजूक तूप वापरणे, तांदळाची किंवा ज्वारीची भाकरी खाणे, वेलीवर वाढणाऱ्या पथ्यकर भाज्यांची हळद, जिरे, आले, धणे वगैरेंची फोडणी देऊन बनवलेले भाजी, मुगाचे वरण किंवा कढण या गोष्टी ठेवणे चांगले. या उपायांनी गुण येईलच, तरीही गरज वाटली तर वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे उत्तम होय. 

माझे वय ६३ वर्षे आहे. मला डॉक्‍टरांनी दोन्ही डोळ्यात मोतीबिंदूची सुरवात झाली असल्याचे सांगितले आहे. मोतीबिंदूची वाढ थांबवण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय सांगावा.
....श्री. अशोक भागवत 

उत्तर : मोतीबिंदू हा वयोपरत्वे होणारा बदल आहे, त्यामुळे तो औषधांनी पूर्ण बरा होऊ शकत नाही. आयुर्वेदाच्या संहितांमध्येही मोतीबिंदूसाठी शस्त्रकर्म हाच उपचार सुचवलेला आहे. मात्र, ज्याप्रमाणे वय वाढले तरी त्रास होऊ नयेत याची योजना करता येते, तशीच योजना मोतीबिंदू कमी वयात होऊ नये आणि त्याचा तयार होण्याचा वेग कमीत कमी असावा यासाठी आयुर्वेदात उपाय दिलेले असतात. या दृष्टीने डोळ्यात नियमितपणे अंजन (उदा. सॅन अंजन) घालण्याचा उपयोग होईल. सॅन अंजन काळे, ग्रे व क्‍लिअर अशा तीन प्रकारांत मिळते. तसेच डोळे त्रिफळ्याच्या पाण्याने धुण्याचा म्हणजे पाव चमचा त्रिफळा चूर्ण रात्री कपभर पाण्यात भिजत घालून, सकाळी चार पदरी सुती वस्त्रातून गाळून घेऊन त्या पाण्याने आय वॉशिंग कपाच्या साहाय्याने डोळे धुण्याचा उपयोग होईल. डोळ्याच्या एकंदर ताकदीसाठी आणि आरोग्यासाठी रोज सकाळी चमचाभर ‘संतुलन सुनयन घृत’ घेणेही उत्तम होय.

माझ्या नातीला रोज रात्री अंथरूण ओले करण्याची सवय आहे. तिचे खाणे-पिणे व्यवस्थित असते, मात्र तिच्या कपाळावर नेहमी घाम येतो. थंडीच्या दिवसांतही पंखा लावून झोपते. कृपया मार्गदर्शन करावे.
....श्री. दादाजी

उत्तर : लहान वयातील कडकी दूर होण्यासाठी लवकरात लवकर उपचार घेणे गरजेचे असते. या दृष्टीने तिला शतावरी कल्प टाकून दूध, ‘अनंत सॅन’ गोळ्या, तसेच ‘संतुलन पित्तशांती’ गोळ्या देण्याचा उपयोग होईल.

आठवड्यातून दोन वेळा पादाभ्यंग करण्याचाही फायदा होईल. रात्री अंथरूण ओले करण्याची सवय ही सहसा जंतांशी संबंधित असते. यासाठी तिला जेवणानंतर विडंगारिष्ट देण्याचा उपयोग होईल. तसेच आठवड्याभरासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी एक चिमूट कपिला चूर्ण व पाव चमचा गूळ याचे मिश्रण देण्याने जंत पडून जायला मदत मिळेल. असे दर महिन्यात एका आठवड्यासाठी घेण्याने क्रमाक्रमाने ही तक्रार कमी होत जाईल. घरातील वातावरण मोकळे राहील, नातीच्या मनावर दडपण येणार नाही, यासाठी दक्ष राहणेसुद्धा आवश्‍यक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com