esakal | प्रश्नोत्तरे
sakal

बोलून बातमी शोधा

balaji tambe

प्रश्नोत्तरे

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)

मी दर शुक्रवारी "फॅमिली डॉक्‍टर' या पुरवणीची आवडीने वाट पाहते आणि सगळी वाचून काढते. त्यामुळे साध्या साध्या आजारांसाठी डॉक्‍टरांकडे जावे लागत नाही. तुम्ही सांगितलेले उपाय आठ दिवस केले तरी त्यामुळे खरोखरच पूर्ण बरे वाटते. त्यामुळे "फॅमिली डॉक्‍टर'चा फार आधार वाटतो. माझा नातू आठ वर्षांचा आहे, तो खूप हुशार आहे. मात्र त्याला बाराही महिने रात्री झोपताना पंखा लागतो. याचा त्याला भविष्यात त्रास होईल असे वाटते. ही सवय कमी करण्यासाठी काय करता येईल?.... माधुरी देशपांडे
उत्तर - रात्री झोपताना अगदी डोक्‍यावर फार जोराने पंखा चालू ठेवणे हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले नाही. आयुर्वेदात "निर्वात' ठिकाणी झोपावे असे सांगितलेले असल्याने किमान वाऱ्याचा झोत सरळ अंगावर येणार नाही अशी योजना करणे चांगले. यासाठी सीलिंग पंख्याऐवजी टेबल फॅन किंवा शेजारच्या भिंतीवर फॅन लावून तो डावी-उजवीकडे फिरत राहील अशी योजना करता येईल. मात्र मुळात नातवाला सतत पंख्याची गरज लागू नये यासाठी शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी आणि श्वासोच्छ्वास प्रक्रिया नीट होण्यासाठी काही उपाययोजना करता येईल. यादृष्टीने काही दिवस "संतुलन पित्तशांती गोळ्या', "ब्रॉंकोसॅन सिरप' देण्याचा उपयोग होईल. सकाळी च्यवनप्राश देण्याचा फायदा होईल.

माझे वय 28 वर्षे आहे. माझा उजवा कान दोन-तीन वर्षांपूर्वी फुटला होता. कान दुखत नाही, मात्र कानातून बारीक आवाज येतो. तसेच माझे केस खूप कोरडे झाले आहेत, गळत आहेत. गुडघ्यातून कटकट आवाजही येत आहे. हाडांची ताकद कायम राहावी यासाठी उपाय सुचवावा..... मंजूषा भंडारे
उत्तर - हाडे, केस तसेच कानातील आवाज या सर्व गोष्टी एकमेकांशी संबंधित असतात. श्रवणासाठी कानाच्या आत जी यंत्रणा असते, त्यात बारीक तीन हाडांची साखळी असते. एकंदर हाडांची ताकद कमी झाली तर त्याचा परिणाम केसांवर, कानांवर तसेच सांध्यांवर होऊ शकतो. हाडांची ताकद कायम राहावी यासाठी रोज दूध पिणे चांगले. चमचाभर खारीक पूड टाकून थोडे उकळून घेतलेल्या दुधात शतावरी कल्प मिसळून घेणे सर्वोत्तम होय. हाडांना, सांध्यांना ताकद मिळावी यासाठी घरी बनविलेले साजूक तूप पुरेशा प्रमाणात म्हणजे किमान चार-पाच चमचे आहारात समाविष्ट करणे चांगले. हाडांना पोषक द्रव्यांपासून बनविलेल्या "कॅल्सिसॅन', प्रवाळ पंचामृत या गोळ्या घेणे, गुडघ्यांना अधून मधून "संतुलन शांती सिद्ध तेला'सारखे तेल लावणे चांगले. केसांना आठवड्यातून दोन-तीन वेळा "संतुलन व्हिलेज हेअर सिद्ध तेल' लावणे, तसेच केस धुण्यासाठी रासायनिक द्रव्यांपासून बनविलेला शांपू न वापरता शिकेकाई, रिठा, आवळा वगैरेंच्या मिश्रणाने किंवा तयार "संतुलन सुकेशा' मिश्रणाने धुणे हे सुद्धा चांगले. कानामध्ये जंतुसंसर्ग नाही तसेच कानाच्या पडद्याला छेद नाही याची तज्ज्ञांकडून खात्री करून नंतर कानात "संतुलन श्रुती तेला'चे दोन-तीन थेंब टाकणेही फायदेशीर ठरेल.

आम्ही घरातील सर्व जण "फॅमिली डॉक्‍टर' तसेच साम टीव्हीवरील माहितीनुसार आहार, विहार, औषधोपचार तसेच संतुलनची औषधे घेतो. याचा चांगला परिणाम दिसून येतो आहे. माझी नात तीन वर्षांपेक्षा थोडी मोठी आहे. तिला संतुलनचे चैतन्य कल्प चालू आहे. पण ती बऱ्याच दिवसांपासून हाताची नखे तोंडात घालून कुरतडते, कितीही प्रयत्न केला तरी तिची सवय जात नाही. कृपया मार्गदर्शन करावे.... संपतराव धस
उत्तर - नखे खाण्याची सवय ही शरीरात आवश्‍यक त्या पोषक तत्त्वांची कमतरता असल्याचे लक्षण असू शकते. "संतुलन चैतन्य कल्प' देणे चांगलेच आहे, बरोबरीने शरीरातील रसरक्‍तादी धात्‌ूंचे पोषण होण्याच्या दृष्टीने च्यवनप्राश किंवा "सॅनरोझ'सारखे रसायन देणे, "कॅल्सिसॅन गोळ्या' देणे, रोज सकाळी पंचामृत देणे, रात्रभर भिजविलेले दोन-तीन बदाम उगाळून देणे हे उपाय करण्याचा फायदा होईल. लहान मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांना नियमित अभ्यंग करणेही फार गुणकारी असते. त्या दृष्टीने धातूंना पोषक द्रव्यांनी संस्कारित "संतुलन बेबी मसाज तेल' वापरता येईल. या उपायांनी तिची सवय कमी होईलच, तरीही आवश्‍यकता वाटल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने नेमकी कमतरता शोधून काढून योग्य औषधे देणे श्रेयस्कर.

माझे वय 46 वर्षे आहे. आठ महिन्यांपासून माझ्या तळपायांची जळजळ होते आहे. रोज खोबरेल तेल चोळून लावल्यानंतरच झोप येते. या माझ्या समस्येवर उपाय सांगावा..... महादेव शेडगे
उत्तर - तळपायांची जळजळ होणे हे एक लक्षण आहे. शरीरात उष्णता वाढलेली असणे, पायांपर्यंत रक्‍ताभिसरण व्यवस्थित न होणे, रक्‍तातील साखर वाढलेली असणे अशी अनेक कारणे यामागे असू शकतात. तेव्हा नेमके निदान होण्यासाठी तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे आवश्‍यक होय. बरोबरीने तळपायांना शतधौतघृत किंवा औषधांनी सिद्ध "संतुलन पादाभ्यंग घृत' लावून दोन्ही तळपाय दहा-दहा मिनिटांसाठी शुद्ध काशाच्या वाटीने घासण्याचा उपयोग होईल.