esakal | प्रश्नोत्तरे
sakal

बोलून बातमी शोधा

please check

प्रश्नोत्तरे

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
मी "फॅमिली डॉक्‍टर' नियमित वाचते. वर्षापूर्वी माझ्या दोन्ही गुडघ्यांचे ऑपरेशन झाले, पण अजूनही खूप वेदना होतात, दोन्ही पाय सुजतात. डॉक्‍टरांचे म्हणणे आहे, की तेथील स्नायू कमकुवत झाले आहेत, त्यामुळे दुखणे कमी होणार नाही. कृपया उपाय सुचवावा...श्रीमती निगुडकर
उत्तर - हाडांची झीज असो किंवा स्नायूंची अशक्‍तता असो, योग्य आयुर्वेदिक उपचारांच्या मदतीने ती भरून काढणे शक्‍य असते. यासाठी विशेष औषधी द्रव्यांचे लेप, नियमित अभ्यंग, वातशामक द्रव्यांपासून बनविलेल्या पोटलीने शेक करणे, हाडांना पोषक औषधे घेणे, वातशामक द्रव्यांनी सिद्ध तेलाच्या बस्ती घेणे, यासारखे उपचार करता येतात. शस्त्रकर्म करूनही अजिबात बरे वाटत नाही, तेव्हा तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य उपचार योजणे सर्वांत चांगले. बरोबरीने दिवसातून दोन-तीन वेळा झीज भरून आणण्यास आणि स्नायूंची शक्‍ती वाढविणाऱ्या द्रव्यांनी संस्कारित "संतुलन शांती सिद्ध तेला'सारखे तेल गुडघ्यांच्या अवतीभोवती जिरवणे चांगले. दशमूलारिष्ट, पुनर्नवासव, किंवा "संतुलन संदेश' आसव घेण्याचाही उपयोग होईल. आठवड्यातून दोन वेळा 20 मिनिटांसाठी "सॅन वात लेप' लावणे, अधून मधून निर्गुडी, शेवगा, एरंड, सागरगोटा यापैकी उपलब्ध होतील त्या वनस्पतींची पाने वाफवून त्याचा शेक करणे चांगले. योगराज गुग्गुळ, तूप, साखरेसह "संतुलन प्रशांत चूर्ण' घेण्यानेही बरे वाटेल. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दशमूलसिद्ध तेलाची बस्ती घेणे श्रेयस्कर.

मी आपले सर्व लेख वाचते, मला आपले मार्गदर्शन फार आवडते. खूप दिवसांपासून गॅसेस होण्याचा त्रास आहे. रक्‍ताची तपासणी केली असता जेवणानंतरची साखर कमी (80) येते. तसेच कॅल्शिअमचे प्रमाण कमी राहते. मार्गदर्शन करावे..... ज्योती राऊत, सातारा
उत्तर - जेवणानंतर साखर कमी होत असली, पण त्यामुळे चक्कर येणे किंवा अशक्‍तपणा वगैरे त्रास होत नसले, तर चिंता करण्याची आवश्‍यकता नाही. मात्र एकंदर शरीरशक्‍ती चांगली राहावी, विशेषतः हृदय, मेंदू, शरीरातील मांसपेशींची ताकद चांगली राहावी यासाठी रोज तीन-चार चमचे साखर पोटात जायला हवी. रोज सकाळी पंचामृत घेतले आणि दिवसातून दोन वेळा दुधातून किंवा चहातून एक-एक चमचा साखर किंवा शतावरी कल्प, "संतुलन चैतन्य कल्पा'सारखा साखरेपासून तयार केलेला कल्प घेतला तरी हरकत नाही. गॅसेस होऊ नयेत आणि एकंदर पचन व्यवस्थित व्हावे, यासाठी काही दिवस जेवणानंतर "संतुलन अन्नयोग गोळ्या' घेणे, तसेच जेवताना गरम पाणी पिणे चांगले. गॅसेस झाल्याने पोट जड झाले असेल, फुगल्यासारखे वाटत असेल, तर पोटावर थोडे तेल लावून ओव्याच्या पोटलीने किंवा रुईच्या पानांनी शेक करण्याचा उपयोग होतो असे दिसते. तसेच आले, लिंबू आणि मधाचे चाटण थोडे थोडे चाटण्याचाही उपयोग होतो असे दिसते. कॅल्शिअमचे प्रमाणे योग्य राहण्यासाठी आहारात दूध, खसखस, डिंकाचे लाडू, बदाम, पंचामृत यांचा नियमित समावेश करणे, तसेच अधून मधून "संतुलन पित्तशांती', "कॅल्सिसॅन गोळ्या' घेणे सुद्धा चांगले.

माझे पती 30 वर्षांचे असून, त्यांचे वर्षापूर्वी मूळव्याधीचे शस्त्रकर्म झाले. या वर्षात त्यांना काहीही त्रास नव्हता, पण आजकाल त्यांना पोट जड, गच्च झाल्यासारखे वाटते. तसेच शौचाला झाल्यावर तासभर त्या ठिकाणी खूप आग होते. कृपया यावर मार्गदर्शन करावे...... अपर्णा साळवे
उत्तर ः मूळव्याध हा मुळात अपचनाशी संबंधित विकार आहे. त्यामुळे शस्त्रकर्म करून मोड काढून टाकला तरी मुळातील अपचनाची प्रवृत्ती नष्ट केली नाही, तर पुन्हा पुन्हा त्रास होऊ शकतो. पचन सुधारावे यासाठी काही दिवस नियमितपणे दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर "सॅनकूल चूर्ण' घेणे चांगले. जेवणानंतर प्रवाळपंचामृत, किंवा "संतुलन अन्नयोग गोळ्या' घेण्याचाही उपयोग होईल. एकदा वैद्यांच्या सल्ल्याने प्रकृती परीक्षण करून घेऊन तब्येतीसाठी पथ्य, अपथ्य काय याची माहिती करून घेणे व आहारात पथ्य अपथ्य सांभाळणे हे सुद्धा चांगले. पोट गच्च वाटते त्यासाठी उकळलेले गरम पाणी पिणे, जेवणानंतर वाटीभर ताज्या गोड ताकात अर्धा चमचा लवणभास्कर चूर्ण मिसळून पिणे याचाही उपयोग होईल. गुदभागी आग होत असताना चमचाभर ताजे लोणी, खडीसाखर आणि शक्‍य असल्यास पाव चमचा नागकेशर चूर्णासह घेण्याचा पटकन गुण येतो.

माझे वय 60 वर्षे असून, माझी प्रकृती चांगली आहे. फक्‍त गेल्या एक-दोन वर्षांपासून वारंवार सर्दी आणि घशात, तोंडात कफ होण्याचा त्रास होतो आहे. कफ बाहेर पडत नाही, त्यामुळे नाकात, घशात कायम कफ साठल्यासारखे वाटते व त्याचा त्रास होतो. कधी कधी कानातूनही पाणी येते. मी पथ्य सांभाळतो आहे, तरीही त्रास होत राहतो. कृपया मार्गदर्शन करावे...... श्रीकांत अत्रे
उत्तर - कफदोष तयार होऊ नये यासाठी वैद्यांच्या सल्ल्याने श्वासकुठार, "प्राणसॅन योग'सारखी औषधे घेता यातील. बरोबरीने आठवड्यातून दोन वेळा गरम पाण्यात तुळशी, ओवा, गवती चहा टाकून वाफारा घेण्याचा उपयोग होईल. रोज रात्री झोपण्यापूर्वी नाकात "नस्यसॅन घृता'चे दोन-तीन थेंब टाकणे, सकाळी उठल्यावर ईरिमेदादी तेल किंवा "संतुलन सुमुख तेला'चा गंडुष करणे म्हणजे अर्धा चमचा तेल व पाच-सहा चमचे कोमट पाणी एकत्र करून तोंडात चूळ भरल्याप्रमाणे सात-आठ मिनिटांसाठी धरून ठेवणे, वावडिंग, हळद, कडुनिंबाची पाने, तूप वगैरेंची किंवा "संतुलन प्युरिफायर धुपा'ची कानाला धुरी देणे या उपायांचा फायदा होईल. दही, थंड पाणी, शीतपेये, श्रीखंड, सीताफळ, फणस, केळी, पेरू, खव्यापासून बनविलेल्या मिठाया आहारातून वर्ज्य करणे हे सुद्धा श्रेयस्कर.