प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Friday, 17 February 2017

माझे वय 28 वर्षे असून गेल्या सहा महिन्यांपासून मला आम्लपित्ताचा फार त्रास होतो आहे. करपट ढेकर येतात. संपूर्ण छातीत कळा येतात. तरी यावर काय उपाय करावा? 
... ओंकार महाडिक 

माझे वय 28 वर्षे असून गेल्या सहा महिन्यांपासून मला आम्लपित्ताचा फार त्रास होतो आहे. करपट ढेकर येतात. संपूर्ण छातीत कळा येतात. तरी यावर काय उपाय करावा? 
... ओंकार महाडिक 

उत्तर - छातीत कळा येणे हे फक्‍त आम्लपित्ताचे लक्षण असेल असे नाही, तेव्हा एकदा तज्ज्ञ वैद्यांकडून नाडीपरीक्षण करून घेणे चांगले. बरोबरीने सहा महिन्यांमध्ये खाण्या-पिण्यात-आचरणात काही बदल झाला आहे का, हे पाहणे आवश्‍यक होय. विशेषतः आहारातून तिखट, तेलकट, खारट पदार्थ वर्ज्य करणे, रात्रीचे जागरण तसेच दुपारचे झोपणे होत असले तर ते टाळणे, दिवसातून दोन-तीन वेळा थोडे थोडे खाणे, गव्हापेक्षा तांदूळ व ज्वारी या धान्यांवर भर देणे, आहारात घरी बनविलेल्या साजूक तुपाचा किमान चार-पाच चमचे या प्रमाणात समावेश करणे चांगले. रात्री झोपण्यापूर्वी अविपत्तिकर चूर्ण किंवा सॅनकूल चूर्ण घेणे, सकाळ संध्याकाळ "संतुलन पित्तशांती', कामदुधा, प्रवाळपंचामृत या गोळ्या घेणे, आठवड्यातून एकदा दोन-तीन चमचे एरंडेल तेल घेऊन पोट साफ होऊ देणे हे उपाय करण्यानेही बरे वाटेल. 

माझ्या मुलाचे वय दहा वर्षे असून रात्री झोपायला गेल्यावर त्याच्या पायाच्या बोटांना मुंग्या येतात. तसेच कधी कधी गुडघ्यापासून खालील पायांना वाक आल्यासारखे वाटते. तरी कृपया यावर औषधे व आहार सुचवावा. ... सुनील जगदाळे 
उत्तर - इतक्‍या कमी वयात याप्रकारे वाताचा त्रास असला तर त्यावर मुळापासून योग्य उपचारच करायला हवेत. मुलाला दिवसातून दोन वेळा म्हणजे सकाळी स्नानापूर्वी एकदा आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा वातनाशक द्रव्यांनी संस्कारित तेलाचा अभ्यंग करणे चांगले होय. अभ्यंग करताना तेल शरीरात जिरविण्याचा प्रयत्न करावा. काही दिवस त्याला सकाळी "संतुलन अमृतशतकरा'युक्‍त पंचामृत, च्यवनप्राश, धात्री रसायन, "कॅल्सिसॅन', "संतुलन चैतन्य कल्प' ही रसायने देण्याचा उपयोग होईल. रसायने नीट अंगी लागावीत यासाठी एखादे जंतांचे औषध देणेही चांगले. या उपायांनी दोन महिन्यांत फरक न वाटल्यास मात्र तज्ज्ञ वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे आवश्‍यक होय, एकदा रक्‍ताची तपासणी करून हिमोग्लोबिन, कॅल्शियमचे प्रमाण योग्य असल्याची खात्री करून घेणेही श्रेयस्कर. 

मी व माझे सर्व मित्र "फॅमिली डॉक्‍टर' ही पुरवणी नियमितपणे वाचतो व त्याचा उपयोग करून घेतो. माझे वय 15 वर्षे आहे. मागच्या मार्च महिन्यापासून माझ्या चेहऱ्यावर येणाऱ्या पिंपल्सचे प्रमाण खूप वाढले आहे. मी तयार कोरफडीचा जेल चेहऱ्याला लावतो, पण उपयोग होत नाही. कृपया काही उपाय सुचवावेत. ... मयूरेश लेंडवे 
उत्तर - "फॅमिली डॉक्‍टर'मधील मार्गदर्शनाचा उपयोग करून घेता हे उत्तमच आहे. वयात येताना शरीरात जे बदल होत असतात, त्याचे एक लक्षण म्हणजे चेहऱ्यावर तारुण्यपीटिका येणे. ताज्या कोरफडीचा छोटा तुकडा तोडून त्यातून काढलेला गर चेहऱ्याला लावणे अधिक चांगले होय. बरोबरीने हळकुंड, दालचिनी, चंदन, ज्येष्ठमध, अनंतमूळ उगाळून तयार केलेल्या मिश्रणाचा लेप दहा मिनिटांसाठी लावून ठेवणे चांगले. सकाळी उठल्यावर "संतुलन सुमुख तेल' व पाण्याचे मिश्रण तोंडात चूळ धरल्याप्रमाणे आठ-दहा मिनिटांसाठी धरून ठेवणेही चांगले. काही दिवस "संतुलन पित्तशांती गोळ्या' घेणे, रात्री झोपण्यापूर्वी "सॅनकूल चूर्ण' घेणे, चेहऱ्याला तसेच संपूर्ण अंगाला साबणाऐवजी मसुराचे पीठ व "सॅन मसाज पावडर'चे मिश्रण लावणे हेसुद्धा चांगले. 

मला बऱ्याच वर्षांपासून सांधेदुखीचा त्रास आहे, विशेषतः कंबरेच्या खालचे सांधे दुखतात, घोट्यांवर सूज येते. शौचाला कधी कधी साफ होत नाही, पोटात गॅसेस होतात. कृपया औषधोपचार सुचवावेत. ... रामनाश दरंदले 
उत्तर - सांधेदुखीचा त्रास बऱ्याच वर्षांपासून आहे तेव्हा केवळ घरगुती किंवा साधे उपचार करणे पुरेसे पडतीलच असे नाही. त्यामुळे तज्ज्ञ वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे, विशेषतः वातशामक द्रव्यांनी सिद्ध तेलाच्या बस्ती घेणे, शास्त्रोक्‍त पद्धतीने हलके विरेचन घेणे हे उत्तम होय. बरोबरीने "संतुलन वातबल', "कॅल्सिसॅन गोळ्या', योगराज गुग्गुळ, प्रवाळ पंचामृत घेण्याचा उपयोग होईल. सकाळी उठल्यावर सुंठ, गूळ-तुपाच्या गोळ्या घेणे, तूप-साखरेबरोबर "संतुलन प्रशांत चूर्ण' घेणे चांगले. सांध्यांना "संतुलन शांती सिद्ध' तेल लावणे, मिठाच्या पाण्यात पाय बुडवून ठेवणे, जेवताना उकळलेले गरम पाणी पिणे, जेवणानंतर पुनर्नवासव, रास्नादी काढा घेणे हे सुद्धा उपयुक्‍त. जेवणापूर्वी आल्या-लिंबाचा रस घेणे, जेवणानंतर "संतुलन अन्नयोग गोळ्या' घेणे चांगले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: question & answer