प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Tuesday, 7 March 2017

खारकेचे दूध सिद्ध करण्यासाठी दूध व खारका यांचे प्रमाण काय असावे व ते किती वेळ उकळावे? तसेच साजूक तूप करण्यासाठी बाजारात मिळणारे लोणी आणून कढवले तर चालते का? ... पतकी 

खारकेचे दूध सिद्ध करण्यासाठी दूध व खारका यांचे प्रमाण काय असावे व ते किती वेळ उकळावे? तसेच साजूक तूप करण्यासाठी बाजारात मिळणारे लोणी आणून कढवले तर चालते का? ... पतकी 
उत्तर - एक कप दुधात खारकेचे चमचाभर चूर्ण टाकणे, त्यात दोन-तीन चमचे पाणी टाकणे आणि मग हे सर्व मिश्रण पाच मिनिटांसाठी मंद आचेवर उकळणे, या पद्धतीने खारकेचे दूध तयार करणे चांगले होय. सदर दूध न गाळता घ्यायचे असते, यातच चमचाभर शतावरी कल्प किंवा संतुलन चैतन्य कल्प मिसळता येतो. साजूक तूप म्हणजे दूध गरम केल्यानंतर दुधावर येणारी साय जमवून, तिला पारंपरिक प्राणिज बॅक्‍टेरियांचे विरजण लावून बनवलेले दही घुसळून, निघालेल्या लोण्यापासून कढवलेले तूप होय. बाजारात मिळणारे लोणी हे या प्रकारचे सर्व संस्कार केलेले असेल याची खात्री नसते, किंबहुना ते सहसा कच्च्या दुधातून निघालेल्या क्रीमपासून बनविलेले असल्याने बाजारात मिळणारे तयार लोणी साजूक तूप करण्यासाठी वापरता येत नाही. तेव्हा साजूक तूप घरी बनविणे किंवा सर्व संस्कार नीट करून बनविलेले संतुलन घृत घेणे हेच चांगले. 

मला काही दिवसांपासून व्हर्टिगोचा त्रास होतो आहे. चालता येत नाही. तोल गेल्यासारखे वाटते. तपासण्या केल्यानंतर डॉक्‍टरांनी कानाच्या नसा कमकुवत झाल्याने त्रास होतो आहे असे सांगितले. त्यांनी दिलेल्या गोळ्या घेतल्या तरी त्रास होतोच आहे. कृपया मार्गदर्शन करावे. .... सुबोध जोशी 
उत्तर - कान हा अवयव, तसेच नसासुद्धा वातदोषाच्या आधिपत्याखाली येतात आणि वातदोषाला संतुलित ठेवण्यासाठी, तसेच नसांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी संस्कारित तेलाचा उत्तम उपयोग होताना दिसतो. तेव्हा रोज रात्री झोपण्यापूर्वी तसेच सकाळी स्नानानंतर पाठीच्या कण्याला, विशेषतः मानेला आणि डोक्‍याच्या मागच्या भागाला संतुलन कुंडलिनी तेल लावणे चांगले. रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही कानात एकानंतर एक या प्रमाणे संतुलन श्रुती तेलाचे तीन-चार थेंब टाकणे हे सुद्धा चांगले. बरोबरीने संतुलन वातबल गोळ्या घेणे, आहारात चार-पाच चमचे साजूक तुपाचा समावेश करणे, नाकात घरी बनविलेल्या साजूक तुपाचे दोन-तीन थेंब टाकणे या उपायांचाही फायदा होईल. 

मी 42 वर्षांची असून मला पाच वर्षांपासून डोके दुखण्याचा त्रास आहे. डोके नेहमी गरम राहते, नीट झोप लागत नाही. कृपया काही उपाय सुचवावा. .... शेलार 
उत्तर - प्रश्नात उल्लेख केलेल्या तक्रारींचा नीट झोप न लागण्याशी फार जवळचा संबंध आहे. कारण जागरण, कमी झोपणे, मधेमधे झोप मोडणे यामुळे शरीरात उष्णता वाढून या प्रकारचे त्रास होऊ शकतात. मानसिक ताणाचाही या सर्वांशी संबंध असू शकतो. तेव्हा रात्री झोपण्यापूर्वी अंगाला अभ्यंग करणे, पादाभ्यंग करणे, टाळूला तेल लावणे, तसेच दोन चमचे "सॅन रिलॅक्‍स सिरप' घेणे हे उपाय करण्याचा उपयोग होईल. "योगनिद्रा संगीत' ऐकत झोपण्याचा प्रयत्न करण्यानेही मनावरचा ताण कमी होऊन शांत झोप लागण्यास मदत मिळते असा अनुभव आहे. बरोबरीने काही दिवस "संतुलन पित्तशांती' या गोळ्या घेणे, जेवणानंतर अविपत्तिकर चूर्ण किंवा "सॅनकूल चूर्ण' घेणे, पंधरा दिवसांतून एकदा एरंडेल घेऊन पोट साफ होऊ देणे, आहारात किमान चार-पाच चमचे साजूक तुपाचा समावेश असू देणे हे सुद्धा उत्तम होय. स्त्रियांच्या बाबतीत "फेमिसॅन तेला'चा पिचू वापरण्यानेही उष्णता कमी होण्यास, शांत झोप लागण्यास मदत मिळते, असा अनुभव आहे. 

मी बोलताना अडखळतो. काही शब्द पटकन बोलता येत नाहीत. तरी यावर आयुर्वेदिक औषधांचा उपयोग होऊ शकतो का? ... विलास मुद्‌गल 
उत्तर - आयुर्वेदिक औषधे, मनाची सकारात्मकता आणि मेंदूची सशक्‍तता यांच्या समन्वयातून वाचादोषामध्ये सुधारणा होऊ शकते. प्रश्नात आपल्या वयाचा, तसेच हा त्रास कधीपासून आहे याचा उल्लेख नाही, परंतु जर लहानपणापासून किंवा बऱ्याच वर्षांपासून त्रास असला तर वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन उपचार सुरू करणे सर्वोत्तम होय. बरोबरीने ब्राह्मी वटी, "संतुलन ब्रह्मलीन घृत' तसेच "संतुलन च्यवनप्राश' किंवा "आत्मप्राश'सारखे रसायन घेणे चांगले. अक्कलकरा, वेखंड, हिरडा वगैरे वनस्पतींचे चूर्ण एकत्र करून बनविलेल्या मिश्रणातील चिमूटभर मिश्रण मधात मिसळून जिभेवर चोळण्याचाही अशा तक्रारींमध्ये फायदा होताना दिसतो. रोज सकाळी मुखशुद्धीसाठी "संतुलन योगदंती' चूर्ण वापरणे तसेच इरिमेदादी तेलाचा किंवा "संतुलन सुमुख तेला'चा गंडूष करणे हे सुद्धा चांगले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: question & answer