प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Friday, 24 March 2017

माझे वय तीस वर्षे आहे. रोज सकाळी उठल्यावर कफ पडतो. दिवसभरसुद्धा थोडा थोडा कफ येतच राहतो. यावर काही उपाय करता येतील का? पंख्याखाली झोपल्यास कफ पडण्याचे प्रमाण वाढते. ... रेणुका भट 

माझे वय तीस वर्षे आहे. रोज सकाळी उठल्यावर कफ पडतो. दिवसभरसुद्धा थोडा थोडा कफ येतच राहतो. यावर काही उपाय करता येतील का? पंख्याखाली झोपल्यास कफ पडण्याचे प्रमाण वाढते. ... रेणुका भट 
उत्तर - रोज सकाळी पडण्याइतपत कफ घशात जमा होणे, नंतर दिवसासुद्धा थोडा थोडा कफ येत राहणे हे खरे तर अग्नीची कार्यक्षमता कमी असल्याचे लक्षण असते. यासाठी जेवणाच्या सुरवातीला आल्याचा छोटा तुकडा, किंचित सैंधव लावून चावून खाणे, जेवताना अगोदर उकळलेले गरम पाणी पिणे, दुपारच्या जेवणानंतर वाटीभर ताजे व गोड ताक जिरे पूड, ओव्याची पूड टाकून घेणे हे उपाय योजण्याचा फायदा होईल. काही दिवस दोन्ही जेवणांनंतर "संतुलन अन्नयोग गोळ्या' घेण्याचाही उपयोग होईल. बरोबरीने रोज सकाळी उठल्यानंतर "संतुलन सुमुख तेला'चा गंडुष करण्याचा म्हणजे अर्धा चमचा तेल आणि चार-पाच चमचे पाणी हे मिश्रण तोंडात दहा मिनिटांसाठी धरून ठेवण्याचा, अधून मधून खुळखुळवण्याचा फायदा होईल. झोपताना पंखा किंवा एसीचा झोत सरळ अंगावर येणार नाही याची काळजी घेणे चांगले. 

माझी नात दहा वर्षांची असून गेल्या दोन वर्षांपासून तिच्या ओठांवर चिरा पडतात. अनेक प्रकारची मलमे, औषधे, इलाज झाले, परंतु तात्पुरता फरक पडतो. आजकाल तिचा चेहराही लाल झाला आहे. कृपया मार्गदर्शन करावे.  ..... रजनी दोशी 
उत्तर - ओठांना चिरा पडणे, चेहरा लाल होणे ही शरीरात कोरडेपणा आणि उष्णता वाढल्याची लक्षणे आहेत. यावर फक्‍त स्थानिक उपचार करणे पुरेसे ठरणार नाही. कोरडेपणा व उष्णता कमी करण्यासाठी आहारात रोज किमान चार-पाच चमचे घरी बनविलेले साजूक तूप समाविष्ट करणे चांगले होय. नियमित पादाभ्यंग करणे, काही दिवस "संतुलन पित्तशांती', कामदुधा गोळ्या घेणे श्रेयस्कर. रात्री झोपण्यापूर्वी पोटाला, विशेषतः नाभीभोवती "संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेला'सारखे थंड गुणाचे व उत्तम प्रकारे आत शोषले जाणारे तेल लावण्याने ओठांना चिरा पडण्याचे थांबते असा अनुभव आहे. 

मला गेल्या दोन-तीन वर्षांपासून रक्‍तदाब कमी होण्याचा त्रास होतो. विशेषतः उन्हाळ्यात केव्हाही कुठेही एकाएकी त्रास होतो. बरोबरीने उलटीसारखे वाटणे, शौचाला जावे लागणे, गळून गेल्यासारखे वाटणे असे क्‍लेशदायक प्रकार सहन होत नाहीत. कृपया यावर उपाय सुचवावा. 
.... नाशिककर 

उत्तर - रक्‍तदाब प्रमाणापेक्षा कमी होत असल्यास दिवसातून एकदा किंवा दोनदा साध्या चहाऐवजी फक्‍त साखर व किसलेले आले टाकून तयार केलेला "हर्बल टी' घेण्याचा फायदा होताना दिसतो. एकाएकी त्रास होऊ लागल्यास आले-लिंबू-मधाचे चाटण थोडे थोडे घेण्याचाही उपयोग होतो. आठवड्यातून दोन-तीन वेळा कोमट पाण्यात खडे मीठ मिसळून तयार केलेल्या पाण्यात दहा मिनिटांसाठी पाय बुडवून ठेवण्याचा फायदा होईल. बरोबरीने रक्‍तभिसरणाला मदत करण्यासाठी "सॅन रोझ', सुवर्णमाक्षिक भस्म, "संतुलन लोहित प्लस' घेण्याचाही उपयोग होईल. 

"फॅमिली डॉक्‍टर'मधील माहितीपूर्ण लेखांचा आमच्या संपूर्ण कुटुंबाला उत्तम उपयोग होतो. माझे वय 38 वर्षे असून मी शिक्षिका आहे. गेल्या तीन वर्षांपासून मला जास्ती बोलल्यानंतर उजव्या कानात आत वेदना होतात, आग व जळजळही जाणवते. कानाच्या तज्ज्ञांना दाखवले असता त्यांनी कानात दोष नाही असे सांगितले. पण मला त्रास होतो आहे. कृपया यावर उपाय सुचवावा. .... माधवी सोमवंशी 
उत्तर - कानात काही दोष नाही हे चांगलेच आहे. शारीरक्रियेचा विचार करता कान, नाक, घसा हे सर्व एकमेकांशी जोडलेले असतात आणि म्हणून अति बोलण्यामुळे वाढलेल्या वातदोषामुळे असा त्रास होत असावा. शिक्षिका असल्याने बोलणे टाळता येणार नाही तरीही सलग फार वेळ किंवा उंच आवाजात बोलणे टाळण्याचा प्रयत्न करणे चांगले. जास्त बोलावे लागणाऱ्यांना मध्ये मध्ये खडीसाखर चघळणे तसेच सितोपलादी चूर्ण, मध व तूप यांचे मिश्रण थोडे थोडे चाटणे उत्तम असते. रोज सकाळी "संतुलन सुमुख तेला'चा गंडुष करण्याने आणि रात्री झोपण्यापूर्वी कानात "संतुलन श्रुती तेला'चे दोन-तीन थेंब टाकण्याने हा त्रास कमी होण्यास मदत मिळेल. नाकात पंचेंद्रियवर्धन घृत, घरी बनविलेले साजूक तूप किंवा वात-पित्तशामक द्रव्यांपासून बनविलेल्या "नस्यसॅन घृता'चे दोन-तीन थेंब टाकण्याचाही उपयोग होईल. या उपायांचा फायदा होईलच, तरी गरज वाटली तर वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे उत्तम. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: question & answer