प्रश्न, प्रश्न आणि प्रश्नोत्तरे 

FamilyDoctor_Questions
FamilyDoctor_Questions

जळगावहून स्नेहलता प्रश्न विचारत आहेत, की गेल्या पाच-सहा वर्षांपासून त्यांच्या तोंडाची म्हणजे जीभ, गाल, हिरड्या, ओठ यांची आग होते आहे. बरीच औषधे घेऊन पाहिली पण फरक पडला नाही. कधी कधी तर आग होण्याचे प्रमाण इतके वाढते, की असह्य त्रास होतो. तरी यावर उपाय, पथ्य-अपथ्य सुचवावे. 
जीभ, मुख हा पचनसंस्थेचा आरसा असतो. त्यामुळे पचनसंस्थेमध्ये उष्णता वाढली तर त्याचा परिणाम म्हणून असा त्रास होऊ शकतो. ही उष्णता कमी करण्यासाठी काही दिवस झोपण्यापूर्वी अविपत्तिकर चूर्ण किंवा "सॅनकूल चूर्ण' घेण्याचा उपयोग होईल, जेवणानंतर "संतुलन पित्तशांती'च्या दोन-दोन गोळ्या घेण्याचाही उपयोग होईल, आहारात घरी बनविलेल्या साजूक तुपाचा किमान चार-पाच चमचे इतक्‍या प्रमाणात समावेश करणे चांगले. दहा-पंधरा दिवसांतून एकदा दोन चमचे एरंडेल घेऊन पोट साफ करणेही उत्तम. पटकन आराम मिळावा यासाठी सकाळी उठल्यावर घरच्या घरी गंडुष करण्याचा चांगला उपयोग होईल. यासाठी अर्धा चमचा "संतुलन सुमुख तेल' आणि चार-पाच चमचे साधे प्यायचे पाणी एकत्र करून तयार झालेले मिश्रण तोंडात दहा मिनिटांसाठी धरून ठेवायचे असते आणि अधूनमधून खुळखुळवायचे असते. हिरवी मिरची, लसूण, कांद्याची पात, शेंगदाणे, वांगे, ढोबळी मिरची या गोष्टी आहारातून टाळणे चांगले. 

पुण्याहून मो. शं. देशपांडे हे प्रश्न विचारत आहेत, की ते गेल्या बारा वर्षांपासून प्राणायाम, नामजप, ध्यान-साधना करत असून याची त्यांना अद्भुत अनुभूती आलेली आहे. मात्र बऱ्याच वर्षांपासून त्यांना वारंवार खोकला होण्याचा त्रास आहे. प्रथम पडसे होऊन शिंका येऊ लागतात, मग घशात टोचल्यासारखे होऊन खोकला सुरू होतो. प्रत्येक वेळी औषधे घ्यावी लागतात, पण पुन्हा पुन्हा त्रास होत राहतो. गरम पाण्याचा वाफारा, गुळण्या वगैरे उपचार सुरू आहेत. तरी यावर कायमस्वरूपी उपचार काय करावा? 
नियमित प्राणायाम, नामजप, साधना करणे उत्तम आहेच. मात्र आजारपणाने यात खंड पडू नये यासाठी आरोग्याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. सर्वप्रथम वारंवार पडसे, खोकला होऊ नये यासाठी रोगप्रतिकारशक्‍ती चांगली राहण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. यासाठी रोज च्यवनप्राश किंवा "संतुलन आत्मप्राश', "सॅनरोझ'सारखी रसायने घेणे चांगले. रोज सकाळ-संध्याकाळ अर्धा चमचा सितोपलादी चूर्ण गरम पाण्यासह किंवा मधात मिसळून घेणे चांगले. फुप्फुसांची कार्यक्षमता सुधारावी, यासाठी काही दिवस "ब्रॉंकोसॅन सिरप' घेण्याचाही उपयोग होईल. पडसे-शिंका सुरू झाल्यावर लगेच गवती चहा, ज्येष्ठमध, बेहडा आणि अडुळशाचे पिकलेले पान यांचा काढा करून घेण्यास सुरुवात केल्यास शक्‍यतो खोकला होण्यास प्रतिबंध होईल किंवा खोकल्याची तीव्रता कमी राहील. दही, आंबट फळे, श्रीखंड, सिताफळ, फणस, चिकू, फ्रीजमधील थंड पदार्थ टाळणे चांगले. या उपायांनी बरे वाटेलच, तरीही अनेक वर्षांचा त्रास आहे त्या दृष्टीने एकदा तज्ज्ञ वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे सुद्धा श्रेयस्कर. 

निगडीहून कुमुदिनी लिहीत आहेत, की त्या "फॅमिली डॉक्‍टर'च्या नियमित वाचक आहेत. जणू मनातील प्रश्न ओळखून त्याचे साध्या शब्दांत निरसन केलेले असते, असे त्यांना अनेकदा वाटते. त्यांचे वय 46 वर्षे आहे. त्या शाकाहारी आहेत. मात्र त्यांचे तोंड आलेले आहे. तिखट तर दूरच, पण मीठसुद्धा जिभेला सहन होत नाही. शरीरातील उष्णता वाढल्याने असे होऊ शकते का? तसेच आहार कसा असावा? 
शरीरातील उष्णता वाढल्याने असा त्रास होऊ शकतो. तसेच शरीरावश्‍यक तत्त्वांची कमतरता झाल्यानेही असा त्रास होऊ शकतो. तेव्हा एकदा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रक्‍ताची तपासणी करून घेणे चांगले. बरोबरीने उष्णता कमी होण्यासाठी रोज सकाळी मोरावळा किंवा गुलकंद घेणे, रात्री झोपण्यापूर्वी "सॅनकूल चूर्ण' घेणे, काही दिवस सकाळ-संध्याकाळ कामदुधा, तसेच "संतुलन पित्तशांती गोळ्या' घेणे चांगले. आहार पचण्यास सोपा आणि तिखट, खारट, आंबट नसलेला असावा. मऊ भात, वरण, तूप किंवा मुगाची पातळ खिचडी, तांदळाचे धिरडे, साजूक तुपात जिऱ्याची फोडणी देऊन बनवलेली फळभाजी असे साधे खाणे असणे चांगले. उष्णता कमी करण्यासाठी काही दिवस नियमित पादाभ्यंग करण्याचाही उपयोग होईल. "संतुलन सुमुख तेला'चा गंडुष करण्यानेही वारंवार तोंड येण्याची प्रवृत्ती बंद होते असे दिसते. 

आजऱ्याहून परुळेकर यांनी प्रश्न विचारला आहे की, त्यांची प्रकृती चांगली आहे, पण त्यांना झोप नीट लागत नाही. जवळजवळ दीड-दोनपर्यंत ते जागे असतात. त्यानंतर थोडी झोप लागते. ते फक्‍त दुपारीच जेवण करतात. रात्री कपभर दूध घेतात. तरी शांत झोप लागण्यासाठी काही उपाय सुचवावा. 
शांत व पुरेशी झोप प्रकृती चांगली राहण्यासाठी महत्त्वाची असते. त्यामुळे इतर त्रास होत नसला तरी वेळेवर आणि चांगली झोप येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नियमित अभ्यंग, तसेच पादाभ्यंग हे शांत झोपेसाठी पूरक उपचार असतात. तेव्हा झोपण्यापूर्वी संपूर्ण अंगाला अभ्यंग करणे आणि दोन्ही पायांना दहा-दहा मिनिटांसाठी पादाभ्यंग करणे चांगले. नाकात दोन-तीन थेंब साजूक तूप किंवा "नस्यसॅन घृत' टाकल्याने, तसेच टाळूवर तीन-चार थेंब "संतुलन ब्रह्मलीन सिद्ध तेल' लावण्यानेही शांत झोप लागण्यास मदत मिळते असा अनुभव आहे. काही दिवस "निद्रासॅन गोळ्या' तसेच "सॅन रिलॅक्‍स सिरप' घेणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे योगनिद्रा (झोप आणि रिलॅक्‍सेशनसाठी) संगीत ऐकत झोपण्याचा प्रयत्न करणे सुद्धा उत्तम होय. 

सुरेश चव्हाण यांनी आपल्या मुलीबद्दल प्रश्न विचारला आहे, त्यांची मुलगी सोळा वर्षांची असून ती रात्री कूस बदलताना किंवा हालचाल झाल्यास दात खाते. हा त्रास तिला बऱ्याच वर्षांपासून होतो आहे. 
झोप अस्वस्थ असणे आणि झोपेत दात खाणे हे सहसा पोटात जंत असल्याचे लक्षण असते. जंतांचे औषध अधूनमधून सर्वांनीच घेणे चांगले असते. या दृष्टीने जेवणानंतर विडंगारिष्ट घेणे, सकाळी उठल्यानंतर अर्धा चमचा वावडिंगाचे चूर्ण मधासोबत घेणे चांगले होय. तसेच आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात कपिला किंवा कंपिल्लक चूर्ण मिळते. दर आठवड्याला एकदा रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा कपिला चूर्ण घेतल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी दोन-तीन जुलाब होऊन जंत कमी होण्यास मदत मिळते. सदर प्रयोग तीन-चार आठवड्यांसाठी करण्याने अधिक चांगला गुण येतो. दही, आंबवलेले पदार्थ, मिठाया, श्रीखंड वगैरे पदार्थ टाळणे चांगले. त्याऐवजी कारल्याची भाजी, शेवग्याच्या शेंगा, आले, मेथ्या, मोहरी, हळद वगैरेंचा अंतर्भाव नियमितपणे करणे चांगले होय. 

पुरंदर तालुक्‍यातून भरत कोलते हे प्रश्न विचारत आहेत, की त्यांचे वय 45 वर्षे आहे. त्यांना काही दिवसांपासून शौचाच्या वेळी व नंतर दिवसभर गुदभागी आग होते. तिखट, तेलकट पदार्थ खाण्यात आले की त्रास वाढतो. 
गुदभागी आग होण्याचा आहाराशी फार जवळचा संबंध असतो. त्यामुळे त्रास बरा होईपर्यंत तिखट, तेलकट पदार्थ कमीत कमी खाणे चांगले. या तक्रारीवर ताजे गोड ताक आणि घरी काढलेले ताजे लोणी या दोन गोष्टी औषधाप्रमाणे काम करतात. तेव्हा रोज दुपारच्या जेवणानंतर वाटीभर ताजे, गोड ताक घेणे आणि सकाळ-संध्याकाळ एक-एक चमचा लोणी साखरेबरोबर आणि उपलब्ध झाल्यास पाव चमचा नागकेशर चूर्णाबरोबर घेण्याचा उपयोग होईल. आतड्यातील उष्णता कमी व्हावी आणि पचन सुधारावे, यासाठी काही दिवस जेवणानंतर "सॅनकूल चूर्ण' घेण्याचाही फायदा होईल. आहारात घरी बनविलेल्या साजूक तुपाचा किमान चार-पाच चमचे इतका समावेश करणे, तसेच ढोबळी मिरची, वांगे, गवार, कोबी, फ्लॉवर, वाल, चवळी, वाटाणे, चणे यांसारख्या पचण्यास अवघड गोष्टी टाळणे हे सुद्धा श्रेयस्कर. या उपायांचा फायदा होईलच, तरीही एकदा तज्ज्ञ वैद्यांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे सर्वांत चांगले. 

कुलकर्णीबाई त्यांच्या मुलासाठी प्रश्न विचारत आहेत, की त्यांच्या मुलावर नुकतीच अपेंडिक्‍ससाठी शस्त्रक्रिया झाली आहे. तरी पुन्हा अपेंडिक्‍सचा त्रास उद्भवू नये व पचन व्यवस्थित राहावे यासाठी काय काळजी घ्यावी? मुलाचे वय 40 वर्षे आहे. 
अपेंडिक्‍स हा आतड्याचा शेपटासारखी वळचणीचा एक छोटा भाग असतो आणि त्याचा त्रास होऊ लागल्यास शस्त्रकर्माने तो काढून टाकला जातो. त्यामुळे एकदा अपेंडिक्‍सचे शस्त्रकर्म झाले की पुन्हा अपेंडिक्‍सचा त्रास होऊ शकत नाही. मात्र पचन व्यवस्थित राहावे, पोटाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी काळजी अवश्‍य घेता येते. यासाठी प्रकृती परीक्षण करून घेऊन प्रकृतीला अनुकूल आहार काय, प्रतिकूल आहार काय हे माहिती करून घेणे आणि त्यानुसार आहाराची योजना करणे हे सर्वांत चांगले. बरोबरीने दुपारच्या जेवणापेक्षा रात्रीचे जेवणाचे प्रमाण कमी व हलके असणे, जेवताना मधेमधे एक-दोन घोट उकळून घेतलेले कोमट पाणी पिणे, जेवणानंतर "संतुलन अन्नयोग' या गोळ्या घेणे, तेलाचे प्रमाण तसेच तयार खाद्यपदार्थ कमीत कमी सेवन करणे चांगले होय. अधूनमधून "सॅनकूल चूर्ण' किंवा अविपत्तिकर चूर्ण घेऊन पोट नीट साफ होण्यासाठी दक्ष राहणे सुद्धा उत्तम. 

कलावती फुले लिहितात, की त्या "फॅमिली डॉक्‍टर' पुरवणीच्या नियमित वाचक आहेत. पण कधी कधी खूप प्रश्न पडतात. म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवून काही प्रश्न तुमच्यासमोर मांडते आहे. आपण योग्य मार्गदर्शन कराल हा विश्वास मनात आहे. त्या पुढे लिहितात, की त्यांचा मुलगा सात वर्षांचा आहे, त्याला सतत सर्दी-खोकला होत असतो. डॉक्‍टरांनी बालदमा असल्याचे सांगितले आहे. तरी यावर आयुर्वेदिक उपचार सुचवावेत. 
सतत सर्दी-खोकला होणे, त्यासाठी वारंवार प्रतिजैविकांसारखी तीव्र औषधे घ्यावी लागणे हे लहान वयात खरे तर एकंदर विकासाच्या दृष्टीने चांगले नाही. असे होऊ नये यासाठी मुलाची प्रतिकारशक्‍ती सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. या दृष्टीने मुलाला रोज सकाळी च्यवनप्राश, तसेच "संतुलन अमृतशतकरा'युक्‍त पंचामृत देण्यास सुरवात करता येईल. अंगाला नियमित अभ्यंग करणे हे सुद्धा प्रतिकारशक्‍तीसाठी चांगले. छातीत कफ साठत असला तर अगोदर छाती-पाठीला तेल लावून वरून रुईच्या पानांनी शेकण्याचाही चांगला उपयोग होईल. काही दिवस नियमाने सितोपलादी चूर्ण, "ब्रॉंकोसॅन सिरप' घेतल्यास प्रतिकारशक्‍ती सुधारून वारंवार त्रास होणे कमी होईल. बरोबरीने वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली श्वासकुठार, ज्वरांकुश, "प्राणसॅनयोग' वगैरे औषधे सुरू करणेही श्रेयस्कर. 

कलावती फुले यांचा पुढचा प्रश्न स्वतःबद्दल आहे. त्यांचे वय 36 वर्षे असून त्यांच्या उजव्या पायाला मुंग्या येतात व उजव्या मांडीमध्ये दुखते. यावर काय उपाय करावा? 
मुंग्या येणे, वेदना होणे हे शरीरात वात वाढल्याचे लक्षण असते. तेव्हा अंगाला नियमित अभ्यंग करणे, विशेषतः दिवसातून दोन वेळा पाठीवर "संतुलन कुंडलिनी सिद्ध तेला'सारखे औषधांनी संस्कारित केलेले तेल हलक्‍या हाताने जिरवणे हे चांगले. बरोबरीने वातशमनासठी "संतुलन वातबल गोळ्या', "संतुलन प्रशांत चूर्ण', महायोगराजगुग्गुळ घेण्याचाही उपयोग होईल. रोज किमान वीस मिनिटांसाठी चालायला जाणे आणि दहा मिनिटांसाठी अनुलोमविलोम किंवा दीर्घश्वसन करण्याचाही शरीरातील अभिसरण नीट होण्यासाठी फायदा होत असतो. 

कलावती यांचाच अजून एक प्रश्न आहे की, त्यांचे यजमान 41 वर्षांचे असून त्यांचे पोट साफ होत नाही. तसेच त्यांच्या टाचा दुखतात. तसेच कधी कधी पाठही दुखते. यावर काय उपाय करावा? 
पोट साफ न होण्यामागे आतड्यात व एकंदर पचनसंस्थेत कोरडेपणा व उष्णता वाढणे हे मुख्य कारण असते. तेव्हा यजमानांच्या आहारात साजूक तुपाचा पुरेसा समावेश आहे ना, याकडे लक्ष देणे चांगले. रात्री झोपण्यापूर्वी कपभर गरम पाण्यात दोन चमचे साजूक तूप आणि चिमूटभर मीठ घेणे तसेच चमचाभर "सॅनकूल चूर्ण' घेणे हेसुद्धा चांगले. नियमित व्यायाम, चालायला जाणे हेसुद्धा पचनशक्‍ती नीट राहण्यास, पोट साफ होण्यास सहायक असते. पाठीला "संतुलन कुंडलिनी तेल' लावता येईल. टाचांनाही नंतर वाळूच्या गरम पुरचुंडीने टाचांवर शेक करण्याचा उपयोग होईल. आठवड्यातून दोन वेळा पादाभ्यंग करण्यानेही टाचा दुखणे कमी होते असा अनुभव आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com