प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 20 April 2018

मी ४४ वर्षांची आहे. कितीही प्रयत्न केले तरी माझे वजन वाढत नाही. अशक्‍तपणा जाणवतो. कंबर व हात-पाय दुखत राहतात. जरा चालले तरी धाप लागते. कृपया मार्गदर्शन करावे. .... मानसी

मी ४४ वर्षांची आहे. कितीही प्रयत्न केले तरी माझे वजन वाढत नाही. अशक्‍तपणा जाणवतो. कंबर व हात-पाय दुखत राहतात. जरा चालले तरी धाप लागते. कृपया मार्गदर्शन करावे. .... मानसी
उत्तर - वजन न वाढणे, अशक्‍तपणा, वेदना ही सर्व शरीरात वातदोष वाढल्याची निदर्शक लक्षणे आहेत. यावर उत्तम उपाय म्हणजे नियमित अभ्यंग करणे. वातशामक द्रव्यांनी संस्कारित केलेले ‘संतुलन अभ्यंग (तीळ) तेला’सारखे तेल यासाठी वापरणे उत्तम होय. बरोबरीने रोज सकाळी पंचामृत, शतावरी कल्प मिसळलेले दूध, रात्रभर पाण्यात भिजवलेले चार-पाच बदाम या गोष्टी सेवन करण्याचा उपयोग होईल. स्त्रियांच्या बाबतीत त्यांचा रस-रक्‍तधातू, तसेच अस्थी धातू सशक्‍त राहण्यासाठी कायम प्रयत्न करणे भाग असते. त्यादृष्टीने ‘धात्री रसायन’, ‘सॅन रोझ’ रसायन घेणे, रोज सकाळ- संध्याकाळ तूप-साखरेसह चमचाभर ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ घेणे हेसुद्धा श्रेयस्कर. आपल्या प्रश्नात पाळीच्या बाबतीत काही उल्लेख नाही. याविषयी काही तक्रार असल्यास तज्ज्ञ वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे चांगले.  

********************************************************
माझ्या यजमानांचे वय ४८ वर्षे आहे. त्यांच्या फक्‍त डाव्या पायाला व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास आहे. त्या पायाला खूप खाज येते. कधी कधी खाजवल्यामुळे त्वचेतून रक्‍तही येते. त्यांचे काम बैठे आहे. डॉक्‍टरांनी स्टॉकिंग्ज वापरायला सांगितले आहे, पण त्यामुळे खाज वाढते. कृपया मार्गदर्शन करावे. ... दीपाली करंडिले 
उत्तर - व्हेरिकोज व्हेन्सवर नियमितपणे खालून वर या दिशेने वातशामक, शिरांना ताकद देणाऱ्या द्रव्यांपासून बनविलेले तेल हलक्‍या हाताने लावण्याचा चांगला उपयोग होताना दिसतो. यजमानांना खाज येते आहे, कधी कधी रक्‍तही येते आहे, त्यादृष्टीने ‘संतुलन अभ्यंग खोबरेल तेल’ किंवा ‘संतुलन राधा फेस तेल’ वापरणे चांगले. पुनर्नवा, ज्येष्ठमध, शतावरी, गोक्षुर यांच्या कोमट काढ्यात पाय बुडवून ठेवण्याचा किंवा या काढ्यात भिजविलेल्या घड्या पायावर ठेवण्याचाही उपयोग होईल. गुडूची घनवटी, ‘समसॅन’ गोळ्या, वैद्यांच्या सल्ल्याने ‘सॅन अमृत’ गोळ्या घेण्याचा, पंचतिक्‍त घृत घेण्याचाही उपयोग होईल. वजन वाढलेले असल्यास ते कमी करणे, बैठे काम असल्याने सकाळी योगासने, विशेषतः रक्‍ताभिसरण वाढण्यास मदत करणारी योगासने करणे हेसुद्धा आवश्‍यक.

********************************************************
माझे वय ६२ असून मला अनेक वर्षांपासून दम्याचा त्रास आहे. पावसाळ्यात जास्तीच त्रास होतो. दीड महिन्यापूर्वी मला न्यूमोनिया झाला होता, तेव्हा रक्‍तातील साखरही थोडी वाढली होती. कृपया या सर्व त्रासांवर उपाय सुचवावा.  ..... पुष्पा
उत्तर - श्वासाच्या त्रासावर नियमित औषधे आणि पथ्य पाळण्याने उत्तम गुण येताना दिसतो. प्राणवहस्रोतसाची शक्‍ती वाढविण्यासाठीसुद्धा आयुर्वेदात उत्तमोत्तम औषधे असतात. अनेक वर्षांचा त्रास आहे तेव्हा वैद्यांच्या सल्ल्याने श्वासकुठार, ‘प्राण सॅन योग’, अभ्रक भस्म यांसारखी औषधे सुरू करणे श्रेयस्कर. बरोबरीने रात्री झोपण्यापूर्वी छाती-पोटाला कोमट केलेले ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल’ लावणे चांगले. आठवड्यातून दोनदा अगोदर तेल लावून वरून रुईच्या पानांनी छाती-पाठ शेकणे. प्यायचे पाणी उकळलेले व कोमट असताना पिणेसुद्धा चांगले. रक्‍तात साखर वाढू नये यासाठी, तसेच दम्यावर मुळापासून उपचार व्हावेत यासाठी पंचकर्म करून शरीरशुद्धी करून घेणे, त्यानंतर पोटली मसाजसारखे विशेष उपचार करून घेणे उत्तम.

********************************************************

माझ्या मुलीचे वय ३२ वर्षे असून, लग्नाच्या आधीपासून तिला मासिक पाळीच्या दिवसांत त्रास होण्याची समस्या आहे. आताही एक बाळंतपण होऊनही पाळी येण्यापूर्वी तिच्या चेहऱ्यावर मुरमे येतात, पायात गोळे येतात, पहिले दोन-तीन दिवस अंगावरून फार जाते. कृपया मार्गदर्शन करावे.  .... अनुजा
उत्तर - पाळीसंबंधित कोणत्याही त्रासावर खरे तर दुर्लक्ष करणे टाळायला हवे, कारण असे त्रास आपोआप बरे होत नाहीतच, उलट त्यांचे मूळ अधिकाधिक घट्ट होत जाते. मुलीला स्त्रीसंतुलनासाठी नियमितपणे ‘फेमिसॅन तेला’चा पिचू वापरण्याचा उपयोग होईल. बरोबरीने अशोकारिष्ट, ‘संतुलन फेमिफिट सिरप’, ‘अशोक-ॲलो सॅन’ गोळ्या घेण्याचाही उपयोग होईल. रोज नियमितपणे शतावरी कल्पयुक्‍त दूध घेण्याने पायात गोळे येणे थांबू शकेल. यासाठी ’कॅल्सिसॅन’ गोळ्या, खारकेच्या चूर्णाबरोबर उकळळेले दूध घेण्याचा, ‘सॅन रोझ’ घेण्याचा चांगला फायदा होईल. आठवड्यातून दोन वेळा पादाभ्यंग करण्याने, ‘संतुलन पित्तशांती’ गोळ्या घेण्याने, सकाळी गुलकंद घेण्याने शरीरातील उष्णता कमी झाली, की अतिरक्‍तस्राव, पाळीच्या आधी चेहऱ्यावर मुरमे येणे हे त्रास आपोआप कमी होतील. दही, चिंच, टोमॅटो, ढोबळी मिरची, वांगे, गवार, अननस या गोष्टी आहारातून वर्ज्य करणे श्रेयस्कर. 

********************************************************
उच्च रक्‍तदाबासाठी आयुर्वेदिक उपाय काय असतो? ....श्रीराम
उत्तर - आयुर्वेदात उपचार करताना प्रकृती, वय, शरीरात झालेले असंतुलन, जेवणा-खाण्याच्या, तसेच झोपण्याच्या सवयी, मानसिकता अशा कितीतरी गोष्टींचा विचार करायचा असतो. त्यामुळे उच्च रक्‍तदाबावर अमुक औषध, मधुमेहावर अमुक औषध असे समीकरण बांधून ठेवलेले नसते. मात्र योग्य निदान करून त्याप्रमाणे आवश्‍यक ते उपचार नीट केले तर रक्‍तदाबावर उत्तम परिणाम मिळतात, अनेकदा रोज घ्याव्या लागणाऱ्या औषधाची मात्रा कमी करता येते, क्रमाक्रमाने थांबवताही येते, असा अनुभव आहे. तेव्हा तज्ज्ञ वैद्यांकडून एकदा प्रकृती तपासून घेतली व नेमके उपचार सुरू केले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रशुद्ध पद्धतीने पंचकर्म करून शरीरशुद्धी करून घेतली, रोज चालणे, योगासने, दीर्घश्वसन यांचा दिनक्रमात अंतर्भाव केला, तर उच्च रक्‍तदाबावर उपचार होऊ शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Question Answer Family Doctor