प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

मी  ‘फॅमिली डॉक्‍टर’ ही पुरवणी नियमित वाचतो. यातील मार्गदर्शनामुळे मी व माझे कुटुंब आजारपणापासून दूर असतो. आम्ही सर्वजण फक्‍त आयुर्वेदाचेच उपचार घेत असतो. माझी तब्येत ठीक आहे, मात्र गेल्या दोन वर्षांपासून मन स्थिर नाही असे वाटते. काही वाचले तर लक्षात राहत नाही, बऱ्याचदा डोके दुखते. डॉक्‍टरांनी ‘मायग्रेन’ आहे असे सांगितले आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
.... चंद्रकांत सिंगर

उत्तर - मन शांत व स्थिर होण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे श्वासावर नियंत्रण ठेवणाऱ्या, दीर्घश्वसन किंवा अनुलोम-विलोम यासारख्या योगक्रिया. रोज सकाळी सूर्यनमस्कार करणे, दहा मिनिटे ॐ म्हणणे किंवा ऐकणे, पाच मिनिटे ज्योतिध्यान करणे या उपायांचाही उपयोग होईल. मन शांत व स्थिर झाले आणि एकाग्रतेने वाचले तर ते लक्षात राहणे शक्‍य होईल. डोकेदुखीचा त्रासही कमी होईल. बरोबरीने ‘संतुलन ब्रह्मलीन सिरप’, ‘संतुलन पित्तशांती’, कामदुधा गोळ्या घेण्याचा, आठवड्यातून दोन-तीन वेळा पादाभ्यंग करण्याचा, रात्री झोपण्यापूर्वी नाकात साजूक तुपाचे किंवा ‘नस्यसॅन घृता’चे दोन-तीन थेंब टाकण्याचा, ज्या ठिकाणी डोके दुखते तेथे ‘संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल’ लावण्याचाही उपयोग होईल. मांसाहार, तिखट, तेलकट, आंबवलेले पदार्थ खाणे आहारातून टाळणे श्रेयस्कर.

----------------------------------------------------------

मला काही दिवसांपासून अधून मधून छातीचे ठोके जलद होण्याचा त्रास आहे. कुठल्याही स्थितीत उदा. वाचताना, पूजा करताना, लिहीत असताना, चालताना वगैरे एकाएकी ठोक्‍यांची गती शंभरच्या पुढे वाढते व अस्वस्थ वाटते. अर्धा-एक तास स्वस्थ बसले की त्रास कमी होतो. डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तपासण्या केल्या, पण त्यात काहीच आढळले नाही. ताण घेऊ नका असे डॉक्‍टर सांगतात. कृपया काही उपचार सुचवावा.
.... एस. जोशी
उत्तर -
ताण न घेणे चांगलेच, बरोबरीने अशा केसेसमध्ये हृदयाला ताकद मिळेल यासाठी वातदोष संतुलित होईल अशा उपाययोजना करण्याचा उपयोग होताना दिसतो. यासाठी उत्तम उपाय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण अंगाला अभ्यंग करणे. यासाठी वातशामक आणि रक्‍ताभिसरणाला मदत करणाऱ्या द्रव्यांनी संस्कारित ‘संतुलन अभ्यंग तीळ सिद्ध तेल’ वापरणे उत्तम. हृदयाच्या आरोग्यासाठी बनविलेले रसायन घेणे, ‘संतुलन वातबल’, ‘हृद्‌सेन गोळ्या’, अर्जुनारिष्ट, दशमूलारिष्ट घेणे हे सुद्धा चांगले. आहारात चार-पाच चमचे घरी बनविलेले साजूक तूप (चांगल्या दुधाला विरजण लावून बनविलेले दही घुसळून काढलेले लोणी कढवून तयार केलेले तूप) समाविष्ट करणे, रात्रीचे जेवण वेळेवर करणे, पुरेशी व वेळेवर झोप घेणे हे सुद्धा उपयोगी पडेल. या सर्व उपायांचा गुण येईलच तरीही हृदयाशी संबंधित लक्षण असल्याने तज्ज्ञ वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे आवश्‍यक.

----------------------------------------------------------

मला ‘फॅमिली डॉक्‍टर’मधील उपायांचा खूप फायदा झाला आहे. यातील काही पुरवण्या मी जपून ठेवल्या आहेत. माझा मुलगा ४४ वर्षांचा आहे. त्याला बऱ्याच वर्षांपासून मूळव्याधीचा त्रास आहे. वेदना होतात, रक्‍तही पडते. शस्त्रक्रिया केल्यावर काही दिवस बरे वाटले होते, मात्र पुन्हा त्रास सुरू झाला. तिखट, मिरची वर्ज्य केले आहे. तरीही सध्या त्रास होतो आहे. कृपया उपाय सुचवावा.
..... बहिरट
उत्तर -
मूळव्याध गुदस्थानी होत असली तरी त्यावर उपचार करताना पचन सुधारणे महत्त्वाचे असते. ते न करता फक्‍त शस्त्रकर्म केले तर पुन्हा पुन्हा त्रास होणे शक्‍य असते. मुलाला रोज दुपारच्या व रात्रीच्या जेवणानंतर एक-एक चमचा ‘सॅनकूल’ हे पचन सुधारून, पोटातील उष्णता बाहेर काढणारे आणि सुखाने मलप्रवृत्ती होण्यास मदत करणारे चूर्ण घेण्याचा उपयोग होईल. आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात नागकेशर चूर्ण मिळेल. घरी बनविलेल्या चमचाभर लोण्यामध्ये अर्धा चमचा नागकेशर चूर्ण व चवीनुसार खडीसाखर मिसळून घेण्याने रक्‍त पडणे थांबू शकते. पोटातील, आतड्यातील उष्णता कमी होण्यासाठी जेवणानंतर कामदुधा, प्रवाळपंचामृत, ‘संतुलन पित्तशांती गोळ्या’ घेणे, रात्री झोपण्यापूर्वी कपभर गरम पाण्यात दोन चमचे साजूक तूप मिसळून घेणे, आठवड्यातून एकदा दोन चमचे एरंडेल घेऊन पोटातील उष्णता काढून टाकणे, तसेच आतड्यांना, गुदमार्गाला योग्य स्निग्धता देणे या उपायांनीही बरे वाटेल, गुदभागी कोरफडीचा ताजा गर किंवा ‘संतुलन व्रणरोपण तेल’ लावण्यानेही लगेच बरे वाटायला मदत मिळेल.

----------------------------------------------------------

मला असे विचारायचे आहे, की नेहमी कांदा-लसूण खाणाऱ्या व्यक्‍तीने तो एकाएकी खाणे बंद करण्याचे काही दुष्परिणाम होतात का? बरेच वैद्य कांदा-लसूण वर्ज्य करू नये असे सांगतात. कृपया मार्गदर्शन करावे.
..... भारती शाह
उत्तर -
आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला, तर कांदा, लसूण बंद करण्याची आवश्‍यकता नसते. कच्चा कांदा सर्व प्रकारच्या व्यक्‍तींना मानवणारा नसतो, विशेषतः शुक्ररक्षणाची आवश्‍यकता असणाऱ्यांनी कच्चा कांदा खाणे चांगले नसते. लसूणसुद्धा भाजी किंवा डाळ फ्राय वगैरे करताना फोडणीत टाकून खाणे योग्य असते. एक पाकळीचा म्हणून जो विशेष लसूण उत्तर भारतात मिळतो, तो कच्चा खाणे काही प्रकृतीच्या व्यक्‍तींसाठी अनुकूल असते. एरवी सरसकट कांदा-लसूण शिजवून, फोडणीत परतून खाणे इष्ट असते. कोणतीही गोष्ट तडकाफडकी बंद करणे आयुर्वेदाला संमत नाही. अपथ्यकर अन्न असो किंवा वाईट सवय असो, ती क्रमाक्रमाने बंद करणे आणि त्याच्याऐवजी पथ्यकर अन्न, चांगली सवय अंगी बाणवणे हेच श्रेयस्कर होय.

----------------------------------------------------------
मी  ज्येष्ठ नागरिक असून मला आजार असा काहीच नाही. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून मला थोडे चालले तरी थकायला होते, सलग अर्धा तास काम केले की विश्रांती घ्यावीशी वाटते. तसेच इतक्‍यात सायटिकाचाही त्रास सुरू झाला आहे. कृपया या समस्यांवर उपाय सुचवावा.
.... नलिनी
उत्तर -
वय काहीही असले तरी शक्‍ती टिकावी, थकवा येऊ नये यासाठी विशेष प्रयत्न करणे भाग असते. यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय सुचवलेले आहेत. नियमित अभ्यंग करण्याचा आपणात निश्‍चित फायदा होईल. रोज सकाळी पंचामृत, रात्रभर पाण्यात भिजविलेले चार-पाच बदाम, तसेच एक चमचा च्यवनप्राश, ‘सॅनरोझ‘ सारखे रसायन घेण्याचा उपयोग होईल. आहारात दूध, खारीक, साजूक तूप, साळीच्या लाह्या, मनुका, अंजीर, ऋतुपरत्वे फळे यांचा समावेश असणे हितावह. सायटिकाच्या त्रासावर दिवसातून दोन वेळा कोणाकडून तरी पाठीच्या कण्याला खालून वर या दिशेने ‘संतुलन कुंडलिनी तेल’ हलक्‍या हाताने जिरविण्याचा उपयोग होईल. काही दिवस ‘संतुलन वातबल गोळ्या’ तसेच तूप-साखरेबरोबर ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ घेण्याचाही उपयोग होईल. निर्गुडीच्या पानांचा काढा करून सात दिवस घेण्यानेही सायटिकाचा त्रास आटोक्‍यात येण्यास मदत मिळते असा अनुभव आहे. ‘संतुलन पंचकर्म थेरपी’ करण्याचाही उपयोग होईल.
----------------------------------------------------------
‘फॅमिली डॉक्‍टर’ या पुरवणीमध्ये पादाभ्यंग हा उपचार अनेकदा सुचविलेला असतो. इतर काही मासिके, वर्तमानपत्रात पादाभ्यंगासाठी मोहरीचे तेल वापरण्याचा सल्ला दिलेला वाचण्यात आला, तेव्हा हे योग्य आहे काय? 
..... सतीशकुमार 
उत्तर -
एखाद्या विशिष्ट अवस्थेत वैद्यांच्या सल्ल्याने मोहरीच्या तेलाने पादाभ्यंग करता येऊ शकतो, मात्र सरसकट सामान्य अवस्थेत पादाभ्यंग करण्यासाठी शतधौत घृत किंवा त्यावरही औषधी वनस्पतींचे संस्कार करून बनविलेले ‘संतुलन पादाभ्यंग घृत’ वापरणे उत्तम असते. क्वचित एरंडेल किंवा खोबरेल तेलाच्या साह्यानेही पादाभ्यंग करता येते. मुळात पादाभ्यंग हा शरीरातील अतिरिक्‍त उष्णता काढून टाकण्यासाठीचा उपचार आहे. याच्या योगे डोके, मेंदू शांत होण्यास, शरीरातील उत्कंठित अवस्था सौम्य होण्यास मदत मिळत असते. त्यामुळे पादाभ्यंगासाठी थंड गुणाचे शतधौत घृत, पादाभ्यंग घृत वापरणे हेच चांगले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com