प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Tuesday, 3 January 2017

प्रश्न 1 - मी 29 वर्षांचा तरुण असून मला गेल्या सहा-सात वर्षांपासून पोटातील कृमींचा त्रास आहे. मी त्यावर अनेक प्रकारचे उपचार केले. त्यामुळे सुरवातीला काही दिवस बरे वाटले तरी पुन्हा पुन्हा जंत होत राहतात. जंत झाले की ताप, घसा दुखणे, डोके दुखणे, अंग गळून जाणे असे त्रास होतात. शिवाय माझे वजनही वाढत नाही. मी सध्या विडंगासव घेतो आहे. कृपया मार्गदर्शन करावे..... महेंद्र पवार

प्रश्न 1 - मी 29 वर्षांचा तरुण असून मला गेल्या सहा-सात वर्षांपासून पोटातील कृमींचा त्रास आहे. मी त्यावर अनेक प्रकारचे उपचार केले. त्यामुळे सुरवातीला काही दिवस बरे वाटले तरी पुन्हा पुन्हा जंत होत राहतात. जंत झाले की ताप, घसा दुखणे, डोके दुखणे, अंग गळून जाणे असे त्रास होतात. शिवाय माझे वजनही वाढत नाही. मी सध्या विडंगासव घेतो आहे. कृपया मार्गदर्शन करावे..... महेंद्र पवार
उत्तर - कृमीरोग हा अतिशय चिवट रोग असतो, त्यामुळे कृमी बाहेर काढणे, कृमी पुन्हा पुन्हा होण्याची प्रवृत्ती नष्ट करणे आणि कृमी ज्यामुळे होतात ती कारणे टाळणे अशा त्रिसूत्रीवर याचा उपचार करावा लागतो. जंत पडून जाण्यासाठी तीन दिवस सलग सकाळी उठल्यावर ओवा, सैंधव आणि गूळ यांचे मिश्रण खाऊन तिसऱ्या दिवशी रात्री अर्धा चमचा कपिला चूर्ण किंवा दोन चमचे एरंडेल तेल घेता येते. जेवणानंतर ताकाबरोबर पळसपापडीचे पाव-पाव चमचा चूर्ण घेण्यानेही जंत नष्ट होण्यास मदत मिळते. जंतांची प्रवृत्ती नष्ट होण्यासाठी जेवणानंतर विडंगारिष्ट तसेच जेवणापूर्वी मधाबरोबर अर्धा चमचा वावडिंग चूर्ण घेण्याचा उपयोग होतो. ताकातून बाळंतशोपा, ओवा, बडीशोपा, हिंग यांचे बारीक चूर्ण घेण्याचाही उपयोग होईल. पुन्हा पुन्हा जंत होऊ नयेत यासाठी पचन चांगले होणे महत्त्वाचे होय. त्या दृष्टीने "संतुलन अन्नयोग गोळ्या', "सॅनकूल चूर्ण' नियमित घेणे उत्तम होय. मिठाया, बाहेरचे खाणे, आंबवलेले पदार्थ खाणे, न उकळता पाणी पिणे टाळणेही श्रेयस्कर.

ज्येष्ठ नागरिक असून माझे जेवण मोजके आहे, तरी देखील अधून मधून मला जेवणानंतर एक तासाने तीन-चार जुलाब होतात. पोट दुखणे वगैरे इतर काहीही त्रास होत नाही. तरी कृपया मार्गदर्शन करावे..... राजाराम वाघ
उत्तर - लहान आतड्याची कार्यक्षमता, अन्न धरून ठेवण्याची क्षमता कमी झाल्यामुळे अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. यावर दुपारच्या जेवणानंतर वाटीभर ताजे, गोड, लोणी काढून घेतलेले ताक जिऱ्याच्या पुडीबरोबर घेण्याचा उपयोग होतो. जेवणानंतर चमचाभर बिल्वावलेह किंवा "बिल्वसॅन' घेणे तसेच जेवणानंतर कामदुधा, प्रवाळपंचामृत या गोळ्या घेणे या उपायांचाही उपयोग होईल. तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवल्कल बस्ती घेणे, आहारात गव्हाऐवजी जुने तांदूळ, मूग, ज्वारी यांचा उपयोग करणे, साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या खाणे हेसुद्धा चांगले.

माझ्या पत्नीचे वय 59 वर्षे आहे. तिला मणक्‍यात गॅप पडल्याने व थोडी झीज झाल्याने 50-100 पावलांपेक्षा जास्ती चालता येत नाही. न्यूरॉलॉजिस्टच्या सल्ल्याने औषधे चालू आहेत. मात्र, फारसा फरक नाही. कृपया मार्गदर्शन करावे.... माधव कुलकर्णी
उत्तर - मणक्‍यातील गॅप कमी-जास्त होणे, मणक्‍यांची झीज होणे ही लक्षणे शरीरात वातदोष वाढण्याशी निगडित आहेत. तेव्हा पाठीला नियमितपणे "संतुलन कुंडलिनी सिद्ध तेला'सारखे तेल लावणे, "संतुलन वातबल गोळ्या' घेणे, तूप-साखरेसह "संतुलन प्रशांत चूर्ण' घेणे चांगले. अशा त्रासामध्ये बस्ती, वातशामक द्रव्यांनी तयार केलेल्या पोटलीने पाठीवर अभ्यंग करणे अशा उपचारांचाही फायदा होताना दिसतो. वयाचा विचार करता तज्ज्ञ वैद्यांचे मार्गदर्शन घेणे सर्वांत चांगले. चमचाभर खारीक चूर्णासह उकळलेले दूध, घरी बनविलेले तूप यांचा आहारात समावेश करणे आणि ढोबळी मिरची, वांगे, गवार, कोबी, फ्लॉवर, पावटा, राजमा, चवळी, चणे वगैरे वातूळ पदार्थ आहारातून टाळणे हेसुद्धा आवश्‍यक होय.

माझे वय 63 असून प्रकृती व्यवस्थित आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून माझ्या पोटात डावीकडे दुखते. मी बरेच रिपोर्टस्‌ केले, डॉक्‍टरांचा सल्ला घेतला पण सर्व व्यवस्थित आहे. मला कोणतेही व्यसन नाही. मी शाकाहारी आहे. नियमित व्यायाम करतो. कृपया उपचार सुचवावा.... पद्माकर नाईक.
उत्तर - पोटात दुखणे हे एक लक्षण आहे. त्यामुळे ते कशामुळे उद्भवते आहे हे शोधून काढायला हवे. रिपोर्टस्‌ व्यवस्थित आहेत म्हणजे शारीरिक पातळीवर दोष असण्याची शक्‍यता कमीत कमी आहे किंवा अजिबात नाही. मात्र, पोटात दुखते आहे याचा अर्थ शरीरक्रियेमध्ये काहीतरी दोष निश्‍चित आहे. यासाठी वैद्यांकडून नाडीपरीक्षण करून घेणे सर्वांत चांगले. बरोबरीने दुखते त्या ठिकाणी पोटावर दिवसातून दोन-तीन वेळा "संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल' हलक्‍या हाताने जिरविण्याचा फायदा होईल. जेवणापूर्वी आले-लिंबू-मध हे चमचाभर मिश्रण घेणे, जेवणानंतर "संतुलन अन्नयोग गोळ्या' घेणे, रात्री झोपण्यापूर्वी अविपत्तिकर चूर्ण किंवा "सॅनकूल चूर्ण' तसेच कोमट पाण्यात दोन चमचे घरचे साजूक तूप आणि चिमूटभर मीठ असे मिसळून घेणे चांगले. काही दिवस रात्रीच्या जेवणात गहू बंद करून त्याऐवजी तांदूळ, ज्वारीवर भर देणे चांगले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: question & answer in Family Doctor