प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
Friday, 26 January 2018

‘बालामृत’ आणि ‘सुवर्ण बिंदू प्राशन’ हे दोन्ही उपचार सारखे आहेत काय? मी माझ्या बाळाला बालामृत नियमितपणे देतो आहे, तरी सुद्धा सुवर्ण बिंदू प्राशन वेगळे द्यायला हवे का?
- सागर जाधव

‘बालामृत’ आणि ‘सुवर्ण बिंदू प्राशन’ हे दोन्ही उपचार सारखे आहेत काय? मी माझ्या बाळाला बालामृत नियमितपणे देतो आहे, तरी सुद्धा सुवर्ण बिंदू प्राशन वेगळे द्यायला हवे का?
- सागर जाधव

उत्तर - लहान मुलांची प्रतिकारशक्‍ती उत्तम राहावी, सतेज कांती, मेधा, बुद्धी, स्मृती यांचा लाभ व्हावा म्हणूून आयुर्वेदात अनेक पाठ दिलेले आहेत. यावर आधारलेले, बालकांसाठी खास तयार केलेले रसायन म्हणजे ‘संतुलन बालामृत’. हे सुवर्ण बिंदू प्राशनासारखे नसून बालकाच्या जन्मापासून ते दोन-अडीच वर्षांपर्यंत नियमित द्यायचे असते. सुवर्ण हे एक असे रसायन आहे की जे रोजच सेवन करायला हवे. त्यामुळे ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ पुस्तकातील मार्गदर्शनानुसार सहा महिन्यांसाठी शुद्ध सोने मधात उगाळून देणे आणि बाळ अडीच वर्षांचे होईपर्यंत ‘संतुलन बालामृत’ देणे चांगले. 

--------------------------------------------------------

माझी मुलगी सध्या गरोदर आहे. ती ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ पुस्तकातील मार्गदर्शन घेते आहे. तिने रोज सकाळी एक केळे खाणे योग्य आहे का? कृपया मार्गदर्शन करावे.
- गिरमे  
उत्तर -
‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ पुस्तकात गर्भवतीचा आहार कसा असावा याविषयी विस्तृत मार्गदर्शन दिलेले आहे. गर्भवतीने नाश्‍त्यामध्ये पंचामृत, रात्रभर पाण्यात भिजविलेले चार-पाच बदाम, शतावरी कल्पयुक्‍त दूध, सॅनरोझ-च्यवनप्राशसारखे रसायन या गोष्टी नक्की असाव्यात. या व्यतिरिक्‍त काही तरी ताजे व गरम म्हणजे पोहे, सांजा, उपमा, मेतकूट-भात, शिरा असे काहीतरी घेणेही चांगले असते. नुसते केळे खाऊन नाश्‍ता करण्याने गर्भारपणात मिळायला हवे ते सर्व पोषण मिळू शकत नाही. केळे आवडत असल्यास केळ्याच्या चकत्या करून त्यावर चमचाभर चांगले शुद्ध मध टाकून अधूनमधून खाणे चांगले. 

--------------------------------------------------------

मला पोटात अल्सर आहे. कधी कधी शौचावाटे रक्‍त पडते. पोट नेहमी जड वाटते व थकवाही जाणवतो. तरी कृपया यावर उपाय सुचवावा. जेवणामध्ये काय खावे काय खाऊ नये हे सुद्धा सांगावे.
- तुकाराम चव्हाण 
उत्तर -
पोटात अल्सर, शौचावाटे रक्‍त या तक्रारींवर वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणेच आवश्‍यक आहे. कारण रक्‍ताचा असा स्राव होत राहणे आरोग्यासाठी चांगले नाही. अल्सर असताना तिखट किंवा मिरची काही दिवस पूर्ण टाळणे आवश्‍यक असते. या दृष्टीने साळीच्या लाह्या-दूध, दूध-भात, मुगाचे वरण-ज्वारीची भाकरी, दुधी कोहळा, तोंडली वगैरे फळभाज्यांची तिखट न घालता तयार केलेला भाजी असा अगदी साधा आहार घेणे चांगले. औषधांमध्ये कामदुधा, प्रवाळपंचामृत, लोणी-साखर घेणे चांगले, वैद्यांच्या सल्ल्याने सूतशेखर रस घेण्याचाही उपयोग होईल. या उपायांनी अल्सर भरत आला व रक्‍त पडणे थांबले की थकवा सुद्धा कमी होईल.
--------------------------------------------------------

मला बऱ्याच वर्षांपासून छातीत कफ होण्याची प्रवृत्ती आहे. कफ पूर्णतः बाहेर पडत नाही. आत्तापर्यंत बरीच औषधे घेऊन झाली, पण पूर्णतः बरे वाटत नाही. तरी मला याविषयी मार्गदर्शन करावे.
- सदाशिव भोसले 
उत्तर
- छातीत सतत कफ राहिल्यास त्याचा परिणाम श्वासावर, रक्‍तशुद्धीच्या प्रक्रियेवर, पर्यायाने आरोग्यावर होणे स्वाभाविक आहे. यावर घरच्या घरी आणि लगेच करता येण्याजोगा उपाय म्हणजे छातीवर ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल’ लावून वरून रुईच्या पानांनी शेक करणे. काही दिवसांसाठी रोज आणि नंतर दिवसाआड या पद्धतीने शेक करण्याचा उपयोग होईल. बरोबरीने ‘ब्राँकोसॅन सिरप’ सकाळ-संध्याकाळ घेणे चांगले. वैद्यांच्या सल्ल्याने श्वासकुठार रस तसेच ‘प्राण सॅन योग’ चूर्ण मधाबरोबर रोज घेण्यानेही बरे वाटेल. छातीत साठून राहिलेला कफ सुटा होण्यासाठी अडुळसा ही वनस्पती उत्तम गुणकारी समजली जाते. यादृष्टीने अडुळशाची पिकलेली दोन-तीन पाने वाफवून त्याचा रस काढून त्यात मध मिसळून घेतला तर बरे वाटेल. अडुळशाची ताजी पाने मिळाली नाहीत, तर एक बेहडा, बोटाएवढ्या आकाराची ज्येष्ठमधाची काडी व पाव चमचा अडुळशाचे चूर्ण यांचा चार कप पाण्यात अर्धा कप शिल्लक राहीपर्यंत काढा करून घेतला तरी चालेल. 
--------------------------------------------------------

मी  ‘फॅमिली डॉक्‍टर’ पुरवणीची नियमित वाचक आहे. माझे वय ६४ वर्षे आहे. आत्तापर्यंत मला कोणताही विकार झालेला नाही, पण गेल्या तीन-चार महिन्यांपासून माझ्या दोन्ही पायांवर सूज येते आहे. इतर त्रास काही नाही. तरी यावर आपण मार्गदर्शन करावे.
- काळे 
उत्तर -
पायांवर सूज येणे हे सहसा मूत्रवहसंस्थेचे किंवा रक्‍ताभिसरणसंस्थेचे काम व्यवस्थित होत नसल्याचे निदर्शक लक्षण असते. यावर रात्री झोपण्यापूर्वी अंगाला नियमित तेल लावण्याचा, त्यासाठी ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल’ वापरण्याचा उपयोग होईल. मूत्रवहसंस्थेवर काम करण्यासाठी काही दिवस जेवणानंतर पुनर्नवासव घेण्याचा तसेच गोक्षुरादी गुग्गुळ या गोळ्या घेण्याचा उपयोग होईल. दह्यात पुरेसे पाणी घालून छान घुसळून लोणी काढून घेतलेले ताजे पातळ ताक हे सुद्धा सूज कमी करण्यासाठी उत्तम असते. असे ताक दुपारच्या जेवणानंतर घेणे हे सुद्धा चांगले. दोन-तीन आठवडे हे उपचार केल्यानंतर सूज कमी होते आहे हे लक्षात येईल, अन्यथा वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेऊन नेमके निदान करून त्यानुसार उपचार करणे श्रेयस्कर होय. 

--------------------------------------------------------

माझी पित्तप्रकृती आहे. भुकेच्या वेळी जेवण झाले नाही तर खूप चिडचिड होते. जेवण अंगी लागत नाही असे वाटते. यासाठी काय करावे?
- शरयू जोशी
उत्तर -
पित्तप्रकृतीच्या व्यक्‍तींनी वेळच्या वेळी जेवण घेणे हेच चांगले असते. काही अपरिहार्य कारणामुळे कधीतरी जेवणाची वेळ पाळता आली नाही तरी पित्तप्रकृतीच्या व्यक्‍तींनी मुगाचा लाडू, साळीच्या लाह्या, राजगिऱ्याची वडी असे काही तरी खाऊन घेणे श्रेयस्कर असते. या वस्तू कायम जवळ ठेवणे आणि भूक लागली की लगेच खाणे सहज शक्‍य असते. पित्तप्रकृती व शिवाय अंगात कडकी असे एकत्र झाले तर त्यामुळे जेवण अंगी न लागणे, वजन न वाढणे यांसारखे त्रास होऊ शकतात. यावर उपाय म्हणून मोरावळा, प्रवाळपंचामृत, ‘संतुलन पित्तशांती’ घेता येते. घरी बनविलेल्या साजूक तुपाचा आहारात समावेश करणे हे सुद्धा या दृष्टीने चांगले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: question answer family doctor