पावसाळा आणि आरोग्य

Health
Health

आकाशातून पडणाऱ्या पाण्यामुळे जमिनीतून निघणारी वाफ आणि आम्ल विपाकाचे पाणी यामुळे अग्नीची ताकद क्षीण होते, वातादी दोष बिघडतात, विशेषतः वातदोषाचा प्रकोप होतो व पित्तदोष साठण्यास सुरवात होते. याशिवाय शरीरशक्‍ती क्षीण होणे, अग्नी मंदावणे, पित्त साठणे आणि वात प्रकुपित होणे, इतक्‍या सगळ्या गोष्टी पावसाळ्यात घडत असल्याने पावसाळ्यात प्रकृतीला जपणे फार आवश्‍यक असते. 

पाऊस एका बाजूने हवाहवासा वाटतो, तर दुसऱ्या बाजूने पावसाळ्यामुळे होणारी गैरसोय नकोशी वाटते. त्यातून पावसाळ्यातील आजारपण तर अगदीच नकोनकोसे करणारे असते. मात्र, आयुर्वेदातील ‘वर्षा ऋतुचर्या’ नीट समजावून घेतली व प्रत्यक्षात आणली, तर या काळातही आरोग्य उत्तम ठेवता येते व पावसाचा आनंद घेता येतो. 

भूबाष्पान्मेघनिस्यन्दात्‌ पाकादम्लाज्जलस्य च ।
वर्षासु अग्निबले क्षीणे कुप्यति पवनादयः ।। ...चरक सूत्रस्थान

आकाशातून पडणाऱ्या पाण्यामुळे जमिनीतून निघणारी वाफ आणि आम्ल विपाकाचे पाणी यामुळे अग्नीची ताकद क्षीण होते, वातादी दोष बिघडतात, विशेषतः वातदोषाचा प्रकोप होतो व पित्तदोष साठण्यास सुरुवात होते.

याशिवाय शरीरशक्‍ती क्षीण होणे, अग्नी मंदावणे, पित्त साठणे आणि वात प्रकुपित होणे इतक्‍या सगळ्या गोष्टी पावसाळ्यात घडत असल्याने पावसाळ्यात प्रकृतीला जपणे फार आवश्‍यक असते. 

थंड हवा, वादळ-वारा, हवेत वाढलेली आर्द्रता, ढगांमुळे अडवला गेलेला सूर्यप्रकाश या सर्वांचा सामना पावसाळ्यात करावा लागतो. सर्दी, ताप, खोकला, साथीचे रोग, दम्याचा त्रास, अंगदुखी, कंबरदुखी, दूषित हवा-पाणी-अन्नामुळे निरनिराळ्या प्रकारचे जंतुसंसर्ग होऊ शकतात. भूक न लागणे, उलट्या-जुलाब, आव, कावीळ यांसारखे पचनाचे विकार, थकवा, निरुत्साह वगैरे अनेक तक्रारी उद्भवू शकतात. मूळचा वातरोग आणखीनच बळावण्याची शक्‍यता असते. मात्र, हे सर्व होऊ नये यासाठी वेळीच उपाययोजना करता येते. 

पाण्यामार्फत जंतुसंसर्ग होऊ नये, यासाठी पाणी उकळून घेण्याची पद्धत सर्वोत्तम होय. दिवसभर पिण्यासाठी, तसेच ताक वगैरे करताना आवश्‍यक असणारे पाणी उकळून घेतलेले असावे. यासाठी पाण्याला उकळी फुटल्यावर १५-२० मिनिटांसाठी उकळत ठेवावे, उकळताना त्यात वावडिंग, सुंठ, अनंतमूळ यांसारख्या जंतुनाशक, पाचक व सुगंधी वनस्पतींचे एक-दोन चिमूट चूर्ण किंवा तयार ‘जलसंतुलन’ टाकले, तर ते अधिक प्रभावी ठरते. या प्रकारे उकळलेले आणि वनस्पतींनी संस्कारित पाणी प्यायल्यास जंतुसंसर्गास प्रतिबंध होतोच, पण असे पाणी पचण्यास हलके असल्याने पचनसंस्थेसाठीसुद्धा हितावह असते. 

जंतुसंसर्ग होऊ नये, यासाठी बाहेरील अन्न, जे बनवताना स्वच्छतेची काळजी घेतलेली असेलच याची खात्री नसेल असे अन्न, शिळे अन्न टाळणेच चांगले. पावसाळ्यात सूर्यप्रकाश कमी असल्याने अन्न नासण्याची, बुरशी वगैरे येण्याची शक्‍यता अधिक असते. त्या दृष्टीने अधिक खबरदारी घ्यायला हवी. अन्न-पाण्यामार्फत जंतुसंसर्ग होऊ नये, यासाठी काळजी घेणे हे आपल्या हातात असते, सोपे असते. मात्र, हवेमार्फत होणारा जंतुसंसर्ग टाळणे त्यामानाने अवघड असते. फार गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, खेळती हवा नसणाऱ्या ठिकाणी न राहणे, प्रदूषण असणाऱ्या ठिकाणी नाका-तोंडावर आवरण (रुमाल - मास्क) घेणे वगैरे काळजी घेता येते. तसेच, घरातील हवा शुद्ध राहण्यासाठी सकाळ-संध्याकाळ विशिष्ट द्रव्यांचा उदा. ऊद, गुग्गुळ, ओवा, कडुनिंब, अगरू, चंदन, कोष्ठकोळिंजन, विडंग वगैरे द्रव्यांचा किंवा तयार ‘संतुलन प्युरिफायर’ धूप करता येतो. पावसाळ्याची चाहूल लागल्यापासून दिवसातून एक-दोन वेळा अर्धा चमचा सितोपलादी चूर्ण घेण्याने रोगप्रतिकारशक्‍ती चांगली राहण्यास मदत मिळू शकते. सितोपलादी चूर्ण उत्तम प्रतीच्या व शुद्ध नैसर्गिक द्रव्यांपासून बनविलेले आहे, याची खात्री असावी. 

सर्दी, ताप, खोकला होऊ नये, घशामध्ये जंतुसंसर्ग होऊ नये, यासाठी सितोपलादी चूर्ण उपयोगी असते, तसेच घरच्या घरी बनवता येणारा काढा-उकाळा (हर्बल टी) सुद्धा गुणकारी असतो. कपभर पाण्यात गवती चहाचे एक-दीड इंचाचे तुकडे, दोन तीन तुळशीची पाने, दोन-तीन पुदिन्याची पाने, थोडेसे किसलेले आले, अर्धा चमचा बडीशेप व चवीप्रमाणे साखर घालून एक उकळी आणावी, नंतर गॅस बंद करून दोन-तीन मिनिटे झाकून ठेवावे, नंतर गाळून घेऊन घोट घोट प्यावे. असा चहा दिवसभरात केव्हाही घेता येतो. यामुळे सर्दी-ताप-घसादुखी वगैरे पावसाळ्यातल्या त्रासांना प्रतिबंध होतो, पचन सुधारते, पोट साफ होण्यास, लघवी साफ होण्यास मदत मिळते. 

पावसाळ्यामध्ये वातदोषाला संतुलित ठेवण्याच्या दृष्टीनेही कायम प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी अभ्यंग, बाष्पस्वेदन, बस्ती हे उपचार उत्तम होत. घरच्या घरीसुद्धा रात्री झोपण्यापूर्वी अंगावर अभ्यंग तेल जिरवणे, दुसऱ्या दिवशी सकाळी स्नानाच्या वेळी साबणाऐवजी उटणे वापरणे, सांधे-पाठ-कंबर वगैरे ठिकाणी वेदना होत असल्यास रुईच्या पानांनी किंवा निर्गुडीच्या पानांनी शेकणे, रोज सकाळी सुंठ-गूळ-तूप यांची सुपारीच्या आकाराची गोळी खाणे, गरम पाणी पिणे वगैरे उपायांची योजना करता येते. 

वारंवार सर्दी-खोकला होणाऱ्यांना पावसाळ्यामध्ये खोकला होण्याची किंवा दमा असणाऱ्यांना दम्याचा अटॅक येण्याची अधिक शक्‍यता असते. अशा व्यक्‍तींनी पावसाळा सुरू होणार, अशा चिन्हे दिसू लागताच सितोपलादी चूर्ण, ‘प्राणसॅन योग (वैद्यांच्या सल्ल्याने)’, कफ सिरप वगैरे औषधे सुरू करणे चांगले. यामुळे प्रतिकारशक्‍ती चांगली राहते, फुप्फुसांची कार्यक्षमता वाढण्यास मदत मिळते. छाती व पाठीला अगोदर तेल लावून ओव्याच्या पुरचुंडीने किंवा रुईच्या पानांनी शेकल्यास त्यानेही छातीत साठलेला कफ मोकळा व्हायला आणि दम कमी व्हायला मदत मिळते. 

पावसाळ्यात एकंदर जंतुसंसर्गाची शक्‍यता वाढते त्यामुळे स्त्रियांना योनीभागी किंवा लघवीच्या ठिकाणी, मूत्राशयामध्ये जंतुसंसर्ग होण्याचाही शक्‍यता असते. यासाठीही धूप करणे उदा. संतुलन शक्‍ती धुराची धुरी घेणे उत्तम असते. चंद्रप्रभा, प्रशांत चूर्णासारखे चूर्ण घेणेही श्रेयस्कर असते. 

पावसाळ्यामध्ये खाण्याकडेही विशेष लक्ष द्यावे लागते. चातुर्मासातील व्रतांची योजना या दृष्टीनेच केलेली दिसते. पचनशक्‍ती सर्वांत कमी असण्याचा हा काळ असल्याने खाणे अतिशय हलके व वातदोषाला संतुलित करू शकणाऱ्या अन्नपदार्थांपासून बनविणे उत्तम. पचनशक्‍तीचा, भुकेचा विचार करून खाणेही तेवढेच आवश्‍यक होय. 

पावसाळ्यात मधुर, आंबट व खारट चवीचे अन्न खाणे योग्य असते. मधुर रस वात शमवतो, पित्त कमी करतो आणि ताकदही वाढवतो. पचायला जड पडणार नाही, असे मधुर चवीचे पदार्थ पावसाळ्यात खाणे योग्य असतात.

चरकसंहितेत पावसाळ्यात मध खाण्यास सांगितले आहे. मध मधुर असतोच, शिवाय पचायलाही सोपा असतो. मधात अतिरिक्‍त क्‍लेदाचे म्हणजे शरीरातील अनावश्‍यक ओलाव्याचे पचन करण्याचीही क्षमता असतो. या दृष्टीने पावसाळ्यात योग्य प्रमाणात मध खाणे चांगले असते. सकाळी उठल्यावर कपभर पाण्यात चमचाभर मध मिसळून घेणे किंवा भाकरी-पोळीसह मध खाणे शक्‍य असते. 

तूप-साखर, गूृळ-तूप, आवळ्याचा मोरांबा यांसारखे मधुर पदार्थ पावसाळ्यात खाणे चांगले असते. नारळीभात, केशरभात, पेठा, तांदळाची खीर, रव्याची खीर, मुगाचा लाडू यांसारखे गोड पदार्थ अधूनमधून आहारात ठेवण्याने वाताचेही शमन होते, पित्तदोष साठण्यास प्रतिबंध होतो आणि शरीरशक्‍ती व्यवस्थित राहण्यासही मदत मिळते. 

पावसाळ्यात आंबट पदार्थांपैकी असे पदार्थ निवडावेत की जे पित्त वाढवणार नाहीत. कोकम, लिंबू, डाळिंब, आवळा, ताक, मनुका यांसारखे पदार्थ या दृष्टीने उत्तम होत. गरम पाण्यात लिंबू पिळून व साखर टाकून बनवलेले पेय, कोकम सार, डाळिंबाचा रस, आवळ्याचे सरबत, जेवणानंतर आले-जिरे लावलेले ताक यांसारखे आंबट पदार्थ पावसाळ्यात घेणे चांगले होय. 

वीर्याचा विचार करता उष्णवीर्याचे पदार्थ पावसाळ्यात घ्यायचे असतात, कारण त्यामुळे वाताचे शमन होते, तसेच अग्नीची ताकद वाढून पचनशक्‍ती सुधारते. यादृष्टीने योग्य प्रमाणात मसाल्याचे पदार्थ खाणे चांगले असते.

आले-जिरे, धणे, हिंग, मिरी, बडीशेप, ओवा, दालचिनी, कढीलिंब, तमालपत्र, लवंग, वेलची, केशर यांसारखे मसाल्याचे पदार्थ पित्त वाढवणार नाहीत, एवढ्या मर्यादेत आहारात समाविष्ट करता येतात. मात्र, फार झणझणीत व तिखट पदार्थ पावसाळ्यात खाणे इष्ट नसते, कारण तिखट चवीमुळे वात वाढू शकतो. 

पावसाळ्यात कुळथाचे सूप वा कुळथाचे पिठलं खाणेही चांगले असते, कारण कुळीथ उष्ण असतात, पण पचायला हलके असतात. बाजरी उष्ण असल्याने बाजरीची किंवा ज्वारी-बाजरीचा मिश्र भाकरी पावसाळ्यात योग्य असते. गाजर, परवर, कर्टोली, मेथी, शेवग्याच्या शेंगा वगैरे भाज्या उष्णवीर्याच्या असल्याने पावसाळ्यात खाण्यास योग्य असतात. 

गुणांचा विचार करता पावसाळ्यात लघु म्हणजे पचण्यास हलके व स्निग्ध गुणाचे पदार्थ निवडावे लागतात. लघु गुणामुळे मंद झालेल्या पचनशक्‍तीवर अतिताण येत नाही, तर स्निग्ध गुणामुळे जाठराग्नी प्रदीप्त होण्यास मदत मिळते. यादृष्टीने पावसाळ्यात ज्वारीच्या, तसेच साळीच्या लाह्या, मुगाची खिचडी, भात-कढी, तांदळाची उकड, ज्वारी-बाजरीची भाकरी वगैरे गोष्टी तुपासह सेवन करणे, तसेच मूग, कुळीथ, रवा, नाचणी वगैरेंचे तुपाची फोडणी करून केलेले सूप सेवन करणे चांगले असते. 

पावसाळ्यात आहारपदार्थ हलके असण्याकडे लक्ष द्यायचे असतेच, तसेच आहाराच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणेही आवश्‍यक असते. भुकेपेक्षा जास्ती प्रमाणावर खाल्लेले अन्न हलके असले, तरी त्रासदायक ठरू शकते. विशेषतः रात्रीचे जेवण अगदी कमी किंवा द्रवस्वरूपात घेणे अधिक श्रेयस्कर असते. पावसाळ्यात शक्‍यतो अन्न गरम व ताजे असायला हवे. फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न खाताना गरम केले, तरी ते ताजे नसल्याने पचायला अवघड असते, फ्रीजमधले पाणी किंवा निवलेले थंड अन्न पावसाळ्यात योग्य नसते. 

पावसाळ्यात आले, सुंठ यांचा शक्‍य तेथे वापर करणे चांगले असते. उदा. आमटी, कढी किंवा सूप बनविताना मिरचीऐवजी आले टाकता येते. ताकात किसलेले आले टाकता येते. चहामध्ये किसलेले आले, गवती चहा टाकल्यास चवही उत्तम लागते व आरोग्याच्या दृष्टीनेही हितकर असते. 

अशा प्रकारे आहार, औषध व आचरणात आयुर्वेदाच्या मार्गदर्शनाचा अंतर्भाव केला, तर पावसाळ्यासारखा अवघड ऋतू कधी संपला, हे कळणारही नाही, उलट पावसाचा आनंद घेता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com