नेमेचि येतो मग पावसाळा

Rain
Rain

पावसाळ्याला नियमात आणायचे असेल, पिण्याचा पाण्याचा व अन्नाचा प्रश्न सोडवायचा असेल तर शेती करणाऱ्यांना समृद्ध करणे आवश्‍यक आहे. तसेच त्यांची उपासमार होत असेल, ते आत्महत्येला प्रवृत्त होत असतील तर निसर्गाचे नियमन कधीच साध्य होऊ शकत नाही. त्यांना त्यांच्या श्रमांची योग्य किंमत मिळायला हवी तरच शेतीचा व्यवसाय करण्यासाठी अधिकाधिक लोक आकर्षित होतील.

कुठला नेम, कुणाचा नेम, नियम काय पावसाळ्यालाच लागू असतात? माणसाने स्वतःच्या जीवनाचे सर्व नियम मोडीत काढून पर्यावरणाचा अतोनात ऱ्हास केला व तरीही सर्व सहा ऋतूंचे आगमन योग्य वेळी व्हावे अशी अपेक्षा ठेवली. ‘पाऊस दरवर्षी येतो’ हे गृहीतक ‘पाऊस येतो’ एवढ्यापुरतेच सत्य आहे, त्याला काही विशेष नियम असल्याचे दिसत नाही. पाऊस आला आला असे म्हणे म्हणे तो हुलकावणी देऊन गेला असेही होताना दिसते. पावसाऐवजी कुठलेतरी भलतेच वादळ मोठ्या गतीने भारताच्या किनारपट्टीवर आदळेल, नंतर अमुक दिशेला जाईल असे अंदाज वर्तवले गेल्यामुळे शासनाची लाखोंना सुरक्षित स्थळी हलवायची गडबड होते. कधी कधी वादळामुळे अतोनात नुकसान होते, तर कधी सर्व अंदाज चुकीचे ठरवत वादळ भलतीकडे जाते. 

शेतकरी हाच समाजाचा असा घटक आहे जो समाजधारणेसाठी, मनुष्याच्या जीवनधारणेसाठी आवश्‍यक असणारे अन्न-धान्य-दूध हे सर्व समाजाला पुरवण्याची जबाबदारी घेतो. प्रत्येक मनुष्य पैशांसाठी कुठलातरी व्यवसाय करतो. व्यवसायाची खटपट केल्यानंतर पैसा मिळणार नसेल, पोट भरण्यापुरतेही पैसे मिळणार नसतील व कर्जबाजारी व्हायची वेळ येणार असेल तर असा व्यवसाय कोण पत्करेल? सध्याच्या पिढीला शेती करावीशी वाटत नाही याचे कारण शेतीच्या व्यवसायात किती फायदा व्हावा याचा हिशोब नसतो. शेतीत नुकसान झाले तरी शेतकऱ्याला शेती करण्यावाचून पर्याय नसतो. ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’ असे म्हणतात तसे लोकांना स्वस्तात अन्न पुरवण्याची जबाबदारी सरकारकडून घेतली जाते व त्यामुळे शेवटी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही, थोडक्‍यात शेतकऱ्यांना उपाशी ठेवून समाजाचे पोट स्वस्तात भरण्याचा उद्योग केला जातो. अशा परिस्थितीत शेती करायला कोण राजी असेल? 

एक म्हणजे शेतकऱ्याला निसर्गाबरोबर जमवून घ्यावे लागते, निसर्गाशी सांभाळून घेत घेत अन्न-धान्याचे उत्पादन करावे लागते. ज्यांना टेबलावर बसून फळे कापून खायची असतात त्यांना फळे आपल्या टेबलावर येईपर्यंत काय-काय व किती कष्ट घ्यावे लागतात हे कळणार नाही. पंचतारांकित हॉटेलमध्ये असो किंवा एखाद्या मोठ्या वसाहतीत असो, लिफ्टने वर-खाली करणाऱ्यांना झाडावर चढणे किती अवघड असते याची कल्पना येणार नाही. शेतकऱ्याला स्वतःचे प्राण धोक्‍यात घालून रात्री-बेरात्री राखण करावी लागते.

शेती म्हटले की विंचू-काटा-साप आलेच. दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईशी सामना देत देत त्याला बी-बियाणे, खते वगैरे शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टी मिळविणे किती अवघड आहे याची कल्पना आपल्याला येऊ शकत नाही. कांद्याचा भाव, दुधाचा भाव, उसाचा भाव वगैरेंवर नियंत्रण ठेवले जाते, पण जीवन जगत असताना लागणाऱ्या अनेक वस्तू, कपडे, टीव्ही वगैरे वस्तू भांडीकुंडी, घरभाडे, वीजबिल वगैरेंच्या बाबतीत नियंत्रण होत नाही. अशा वेळी लोक शेतीकडे कसे वळणार? 

शहरीकरण करण्याच्या नादात आज पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे, त्यामुळे निसर्ग ताब्यात राहत नाही असे दिसून येत आहे. याला जबाबदार आहे शहरवासी, पण त्याचा फटका बसतो शेतकऱ्यांना. 

अन्नउत्पादनाचा केंद्रबिंदू असणारा पाऊस सध्या वेळी-अवेळी येतो, आला तर पूर आणतो, नाही आला तर दुष्काळ घडवतो. परमेश्वरावर किंवा निसर्गावर राग व्यक्‍त करण्याच्या नादात शेतकरी आत्महत्या करून तो राग स्वतःवरच व्यक्‍त काढतो. 
 

अन्नाद्‌ भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः । 
यज्ञाद्‌ भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ।। भगवद्‌गीता ३-१४।।

कर्मामुळे पावसाला नियंत्रणात ठेवता येते हे सत्य पिंड-ब्रह्मांड न्यायानुसार माणसाच्या शरीरालाही लागू आहे व बाहेरच्या निसर्गालाही लागू आहे. मनुष्य ज्या यम-नियमांचा व वागणुकीचा आधार घेतो त्यावर त्याचे कर्म व नशीब ठरत असते. आपल्यापेक्षा खालच्या पातळीवर असणाऱ्याला, ज्ञानवंतांना, वडीलधाऱ्यांना मान न देणे, त्यांना त्यांचे अधिकार न देणे, असे वागल्यास कर्म खराब होणे साहजिक आहे. कर्म खराब झाले तर पर्जन्याच्या समांतर मेंदूत घडणारी घटना बिघडते व पर्यायाने मेंदूचे रोग होतात व खाल्लेले अन्न शरीरधारणेला उपयोगी ठरत नाही.

स्वतःला मिळालेल्या शक्‍तीचा, शरीराचा, बुद्धीचा वापर करून शक्‍ती अधिक उत्क्रांत करून सर्वांना एकत्रितपणे जगता यावे या हेतूने केलेल्या कृतीला ‘यज्ञ’ म्हणतात. अशा यज्ञामुळे बरसतो शरीरात पर्जन्य. यामुळे अन्नाचा स्वीकार होतो. सर्वांनी मिळून पर्यावरणाचे रक्षण करणे व शेतकऱ्याने मेहनत करून अन्न तयार करणे हा यज्ञ. हा यज्ञ नीट केला तर पाऊस वेळेवर येईल, अन्न-धान्य भरपूर पिकेल, पर्यायाने प्राणिमात्रांना सुखाने जगता येईल.

पाऊस आवश्‍यक असतोच. पावसाळ्यात असुविधा असली तरी पाऊस वेळेवर व पुरेसा यावा, नैसर्गिकपणे अन्न-धान्य उत्पादित व्हावे. प्लॅस्टिक वापरायला सोपे, म्हणता म्हणता आज अन्नातही प्लॅस्टिक आढळू लागले आहे. यामुळे मनुष्याच्या आरोग्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. 
वेदाच्या एका सूक्‍तात उतामृतत्वस्येशानो यदन्नेनातिरोहति असे म्हटलेले आहे. म्हणजे हा विश्वपुरुष म्हणजे समाजपुरुष-जनताजनार्दन भूत-वर्तमान-भविष्याकाळाचे चक्र चालवतो व त्याची उत्क्रांती अन्नातूनच होते. 

श्रीमद्‌भगवद्‌गीतेतही सांगितले आहे, तामसिक अन्नापासून हलके हलके माणसाने सात्त्विक अन्नाकडे जावे. असे केले तर विचार-आचार सात्त्विक होतील. सात्त्विक आचारातून झालेल्या वागणुकीतून झालेला यज्ञ समाजाला सुख देऊ शकतो. स्वतःचा स्वार्थ व अहंकार बाजूला ठेवून सर्वांवर प्रेम करून सर्वांसाठी, सर्वांबरोबर जगल्यासच पर्यावरणाचा ऱ्हास (जनपदोध्वंस) टळू शकेल व ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्‍तीचा अनुभव येईल. 

यज्ञप्रक्रिया ही उत्क्रांतीची गोष्ट आहे. परमेश्वराचे अस्तित्व कोठे दिसत असले तर ते प्रथम वनस्पतीमध्ये, शेतामध्ये, जंगलांत दिसते. दोन शेजारी वाढणाऱ्या झाडांचा स्वभाव वेगळा असतो, त्यांच्यावर येणारी फळे वेगवेगळी असतात, काही झाडांची फळे आंबट असतात तर काही झाडांची फळे विषारी असतात, पण ही सर्व वृक्षसंपदा गुण्यागोविंदाने नांदत असते. 

एका तांदळाच्या साळीतून अनेक लोंब्या तयार होतात. पण अन्न-धान्याचे उत्पादन वाढविण्याच्या नादात रासायनिक खते वापरून, भलत्या रसायनांच्या फवारण्या करून माणसाने अन्नाचा कस घालविला. शेतात भात वर येते त्या वेळी येणारा मनमोहक सुगंध मनुष्याला शेतीकडे आकर्षित करू शकतो व त्या ठिकाणी परमेश्वराचा आशीर्वाद आपल्याला कसा लाभतो हे कळू शकते. 

एकूण पावसाळ्याला नियमात आणायचे असेल, पिण्याचा पाण्याचा व अन्नाचा प्रश्न सोडवायचा असेल तर शेती करणाऱ्यांना समृद्ध करणे आवश्‍यक आहे. तसेच त्यांची उपासमार होत असेल, ते आत्महत्येला प्रवृत्त होत असतील तर निसर्गाचे नियमन कधीच साध्य होऊ शकत नाही. त्यांना त्यांच्या श्रमांची योग्य किंमत मिळायला हवी तरच शेतीचा व्यवसाय करण्यासाठी अधिकाधिक लोक आकर्षित होतील. अमक्‍याने छोट्या शेतीत विक्रमी उत्पादन घेतले, त्यासाठी आपल्या गोठ्यात असलेल्या गोमूत्र-शेणाचा उपयोग केला व त्याला बराच फायदा झाला अशा बातम्या पाहिल्या-वाचल्यावर सेंद्रिय शेती करण्याकडे लोक वळतील. असे झाले तर भारत हा शेतीप्रधान देश उत्कर्षाच्या मार्गावर जाऊ शकेल, या नव्या युगातही सर्वांना सुख-समृद्धी अनुभवता येऊ शकेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com