कोजागरीची ‘अमृत’प्राप्ती 

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 11 October 2019

आश्विनातील पौर्णिमेला रात्रीच्या चंद्रप्रकाशाचाही विशेष परिणाम होत असतो. या दिवशी चंद्राचा प्रकाश इतर सर्व नक्षत्रांना बरोबर घेऊनच खाली उतरत असतो. त्यात असणारी शक्‍ती पांढऱ्या वस्तूंमध्ये किंवा दुधामध्ये शोषली जात असावी व त्यामुळे दुधाचा अमृताचा गुण वाढत असावा. शिवाय शरद ऋतूत पित्त वाढलेले असते. या पित्ताला शांत करण्यासाठी या अमृताचा उपयोग नक्कीच होतो. 

आश्विनातील पौर्णिमेला रात्रीच्या चंद्रप्रकाशाचाही विशेष परिणाम होत असतो. या दिवशी चंद्राचा प्रकाश इतर सर्व नक्षत्रांना बरोबर घेऊनच खाली उतरत असतो. त्यात असणारी शक्‍ती पांढऱ्या वस्तूंमध्ये किंवा दुधामध्ये शोषली जात असावी व त्यामुळे दुधाचा अमृताचा गुण वाढत असावा. शिवाय शरद ऋतूत पित्त वाढलेले असते. या पित्ताला शांत करण्यासाठी या अमृताचा उपयोग नक्कीच होतो. 

पावसाळ्यामध्ये मनुष्याच्या शरीरात साठलेला पित्तदोष बाहेर ऊन पडल्यावर अशाच तऱ्हेने उफाळून येतो. शरीरातील पित्त काढून टाकण्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेला विरेचन विधी तसा वर्षभर करता येत असला, तरी शरदात विरेचन विधी केल्यास शरीरात अनायसे प्रकोपित झालेले पित्त बाहेर टाकायला मदत होते. शरीरात झालेला अग्नीचा प्रताप म्हणजे पित्तदोष असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे संपूर्ण जीवन माणसाच्या नात्यातील उष्णतेच्या उबेवर, कर्तृत्वशक्‍तीसाठी लागणाऱ्या अग्नीच्या शक्‍तीवर, शरीराचे व्यवहार नीट चालण्यासाठी हॉर्मोन्सच्या अग्नीवर अवलंबून असते. अग्नीला जीवनात एकूणच अनन्यसाधारण महत्त्व आहे. तो अग्नी संतुलित राहावा व पित्तदोष वाढू नये, ही अपेक्षा असते. परंतु, वेगवेगळ्या प्रकारचे रोग किंवा शारीरिक, मानसिक त्रास पित्तामुळेच होत राहतात. त्वचा लाल होणे, त्यावर बारीक पुटकुळ्या येणे, गांधी येणे, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, आंबट-कडू उलट्या होणे, छोट्याशा कारणाने राग येणे, राग मस्तकात जाणे, असे अनेक त्रास पित्तामुळे होत राहतात. 
पित्तदोष वाढून त्रास होऊ नये, यासाठी अनेक नियम सांगितलेले असतात. अग्नी हा वायूचा मित्र आहे तेव्हा पित्तदोषाबरोबरच वातदोषही वाढतो व पावसाळ्यातील वातदोष पित्ताला उफाळण्यास मदत करीत असावा म्हणून वात-पित्ताची जोडी सांभाळावीच लागते, त्यासाठी आहार-विहारावर नियंत्रण ठेवावे लागते. निसर्गातील ऋतुबदल प्राणिमात्रांच्या शरीरातही परिणाम घडवतात, त्याचा फायदा घेण्याच्या दृष्टीने भारतीय परंपरेत सणावारांची योजना केलेली आहे. 
 

भारतीय तत्त्वज्ञानाने ‘अमृतप्राशन’ ही संकल्पना मांडलेली आहे. हे अमृत प्राशन केल्यावर मनुष्य अजरामर होतो. परंतु, अमृत पिऊन अजरामर झालेली माणसे आज कोठेही दिसत नाहीत; मग कोण व कसे अजरामर झाले? तेव्हा ‘अजरामर’ या शब्दाचा अर्थ शब्दशः न घेता पुनर्निमिती करणाऱ्या पेशी जास्तीत जास्त कार्यरत होणे, जास्तीत जास्त प्रमाणात उत्पन्न होतील असे पाहणे व रोगांना दूर ठेवणे, या प्रक्रियेला ‘अमृतप्राशन’ म्हटलेले असावे. या अमृत प्रक्रियेसाठी जे द्रव्य सर्वाधिक मदत करेल त्याला अमृत म्हटले गेले असावे. अमरत्व म्हणजे आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य, असे म्हणावे लागेल. 
 

पंचामृत या शब्दावरून तीही एक अमृताची कल्पना आहे, हे लक्षात येते. पंचामृताचे सर्वच घटक अमृतक्रिया वाढविणाऱ्या आहेत. पंचामृताचा शरीरातील सर्वच पेशींना शक्‍तीचा अनुभव येतो जो ताबडतोब प्रत्ययाला येतो व दीर्घकाळ टिकणारा असतो. शिवाय, पंचामृत हे सात्त्विक अन्न असल्यामुळे पेशींचे आयुष्यही वाढते. 
 

भारतीय सणांमध्ये कोजागरीचा सण अमृतासाठी प्रसिद्ध आहे. आश्विनातील पौर्णिमेला रात्रीच्या चंद्रप्रकाशाचाही विशेष परिणाम होत असतो. या दिवशी चंद्राचा प्रकाश इतर सर्व नक्षत्रांना बरोबर घेऊनच खाली उतरत असतो. त्यात असणारी शक्‍ती पांढऱ्या वस्तूंमध्ये किंवा दुधामध्ये शोषली जात असावी व त्यामुळे दुधाचा अमृताचा गुण वाढत असावा. शिवाय, शरद ऋतूत पित्त वाढलेले असते. या पित्ताला शांत करण्यासाठी या अमृताचा उपयोग नक्कीच होतो. 
 

कोजागरी पौर्णिमेला चंद्रप्रकाशात बसून चंद्राचे प्रतिबिंब ज्यात पडलेले आहे, पर्यायाने ज्यात चंद्राची शक्‍ती उतरलेली आहे, असे दूध व खीर यांचे सेवन केली जात असे, चंद्राची पूजा केली जात असे. वेगवेगळ्या मार्गाने चंद्राची पूजा सांगितलेली आहे. सूर्य हा भौतिकाचा तर चंद्र हा मनाचा अधिपती आहे. परमपुरुष परमात्म्याला स्पर्श करून सूर्यालासुद्धा स्पर्श करणारा असा हा चंद्र. चाळणीतून चंद्राकडे पाहणे, चतुर्थीचा चंद्र उगवल्यावर उपवास सोडणे (कारण विशिष्ट वेळी मेंदूत विशिष्ट तरंग असतात) वगैरे व्रते सांगितलेली आहेत. असेच एक कोजागरीचे व्रत. शहरात गर्दी असल्यामुळे चंद्रप्रकाशात बसणे अवघड होत आहे. गच्ची सर्वांची झाली पाहिजे, असा नारा पुलंनी दिला व त्या वेळी भाडेकरूंना गच्ची मिळाली. पण, प्रत्येकाच्या घरावर गच्ची असेलच, असे नाही. तेव्हा कुठेतरी बाहेर बागेत जाऊन, डोंगरावर जाऊन सर्वांनी एकत्र बसून आनंद घ्यायचा व दूध प्यायचे इथपर्यंत ठीक होते. परंतु, नंतर यानिमित्ताने धुडगूस घालणे, मोठमोठ्याने गाणी लागणे, बीभत्स नाचणे व ‘बाटली’तील दूध पिणे याला कोजागरी उत्सव साजरा केला, असे म्हणता येत नाही. 
 

भारतीय अध्यात्मशास्त्रात ‘सोम’ ही देवता व ‘सोम’ हा रस सर्वांत महत्त्वाचा समजला आहे. सोमरस हे नाव मेंदूजलाला दिलेले आहे. मेंदू व आपला संपूर्ण मेरुदंड सोमरसात बुडालेले असतात. सोमरस हाच कर्ता-धर्ता व जीवन चालविणारा महत्त्वाचा घटक असतो. या सोमरसाला कोजागरीच्या दिवशी वृद्धी मिळते. जसे झाडात असलेल्या रसावर पौर्णिमेचा म्हणजेच चंद्राचा परिणाम होतो तसे या दिवशी शरीरातील सोमरसाचीही वृद्धी होते. त्यामुळे या दिवशी खीर व दूध घेण्याने वर्षा ऋतूनंतर येणाऱ्या शरदात उत्पन्न झालेली शरीराची आग थंड व्हायला मदत होते. ही शारीरिक स्तरावरची उत्तम व्यवस्था सांगितलेली आहेत. मन आनंदित नसताना दूध घेतल्यास अशी शांती होऊ शकत नाही. कारण, प्रत्येक अन्नावर व वस्तूवर मनाचा संस्कार होत असतो. या दिवशी सर्वांनी आनंदात एकत्र बसून दूध पिणे ही शारीरिक अवस्था झाली. पण, आजच्या कोजागरीच्या दिवशी चंद्रप्रकाशात ध्यानाला बसून सोमाच्या माध्यमातून आत जाता येईल, असे पाहावे. मनाच्या पलीकडे आतमध्ये असलेल्या जिवाला स्पर्श करून, व्यक्‍तिगत आत्म्याला स्पर्श करून त्यापलीकडे असलेल्या

परमात्म्यापर्यंत पोहोचण्याची ही संधी आहे. या ठिकाणी आपल्याला आपण सर्व एक आहोत हा विश्वबंधुत्वभाव अनुभवता येतो. म्हणूनही या दिवसाचे महत्त्व आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Received nectar of Kojagri article written by Dr Shree Balaji Tambe