नैराश्‍यातून सुटका

डॉ. मृदुला होळकर-कारंडे
Friday, 24 November 2017

धावपळ, तणाव, स्पर्धा यांतून कधीतरी नैराश्‍य येते. ही तात्कालिक स्थिती असली तर ठीक. पण संवाद कमी झाल्याने नैराश्‍य वाढत असेल तर काळजी घ्यायलाच हवी. संवाद वाढवायला हवा.

संपूर्ण जग विकसित होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे प्रत्येकाच्या जगण्याला गती प्राप्त झाली आहे. पण त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला अशा स्पर्धा युगात धावपळ, दगदग, तणाव, नैराश्‍य अशा अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. रोजची दगदग, धावपळ, मानसिक आरोग्यास हानीकारक आहे. प्रत्येक व्यक्तीचा आजूबाजूच्या किंवा त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींशी होणारा संवाद दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य नक्कीच धोक्‍यात आले आहे. या गोष्टीची दखल म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने मानसिक आरोग्याविषयी जनजागृतीसाठी ‘चला बोलूया’ असे ब्रीदवाक्‍य या वर्षी प्रसारित केले आहे. 

आपण प्रत्येकजण कधी ना कधी ताणतणावातून जात असतो व त्याची तीव्रता व्यक्तिपरत्वे, त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या बऱ्यावाईट अनुभवांवर अवलंबून असते. तणाव व त्याबरोबर येणारी अस्वस्थता या दोन गोष्टींचे मनावर खोल पडसात उमटतात व अशा व्यक्तीस नैराश्‍य तसेच आत्महत्येचे विचार मनात येऊ शकतात. या व अशा अनेक गोष्टींवर त्या व्यक्तीने मनमोकळे होऊन बोलणे हा सर्वांत उत्तम पर्याय आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जर एखादी व्यक्ती तणावाखाली किंवा नैराश्‍यात असेल, तर अशा व्यक्तीच्या मनात येणाऱ्या भावना पुढीलप्रमाणे असू शकतात.

१. आपले दुखणे सहन करण्यासारखे नाही किंवा असह्य आहे.
२. आशेचा एकही किरण दिसत नाही. त्यामुळे माझ्या जगण्याला काही अर्थ नाही.
३. अशा व्यक्ती नेहमी निराशेत, चिंताजनक व त्रासदायक मनःस्थितीत वावरत असतात.
४. अशा व्यक्तींना आलेल्या अडचणी किंवा घडलेल्या घटनांवर काहीच मार्ग सापडत नाही असे वाटून आत्महत्येचे विचार मनात येऊ शकतात.
५. अशा व्यक्ती मृत्यू मिळाल्यावरच आपली यातून सुटका होऊ शकते, असे समजू शकतात. 
६. अशा व्यक्ती स्वतःला अतिशय कमी लेखू लागतात व इतर प्रत्येक व्यक्ती ही स्वतःपेक्षा श्रेष्ठ आहे, असे समजू लागतात. 
७. सगळे जग सर्व वस्तू, व्यक्ती, घटना निरुपयोगी असल्याचे सतत वाटत राहते. 
८. अशा व्यक्ती स्वतःला सर्व लोकांमध्ये म्हणजेच मित्र किंवा कुटुंबात राहूनही खूप एकएकटे समजायला लागतात. तसेच एकटेपणा हा नंतर त्यांच्या जगण्याचा भाग होऊन जातो. 
९. अशा व्यक्तीला आपण असा विचार का करीत आहोत हे समजत नाही.
नक्की लक्षात ठेवा

जर असे होत असेल तर पुढील गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
१. तुम्ही एकटे नसून तुमच्यासोबत अशा अनेक व्यक्ती आहेत. ज्या याआधी अशा परिस्थितीतून गेलेल्या असतानाही आज त्यांचे आयुष्य व्यवस्थित व्यतीत करत आहेत. 
२. तुमच्या मनात येणारे आत्महत्येचे विचार जर तुम्ही बोलून दाखवले तर तुमच्या मनावरील थोडा ताण कमी झाल्याची तुम्हाला जाणीव होईल व त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांचा मार्ग मिळेल.
३. तुमच्या आयुष्यात जर तुम्ही कधी स्वतःला शारीरिक इजा करून घेतली असेल किंवा आत्महत्या करण्याची योजना सतत मनात येत असेल, तर हे भावनिक नैराश्‍य आल्यामुळे होणारे प्रकार आहेत. जे मुख्यत्वे व स्वतःच्या आयुष्यातील अतिशय प्रिय व्यक्ती मृत्युमुखी पडल्याने, नोकरी गेल्याने किंवा त्यामुळे येणाऱ्या नैराश्‍यामुळे नाते संबंधात तणाव निर्माण झाल्याने किंवा एखादी व्यक्ती हिंसाचारास बळी पडल्याने होऊ शकते, परंतु असे पेरकार कुणासोबतही घडू शकतात हे नेहमी लक्षात ठेवावे.
४. तुम्ही नक्कीच बरे होणार आहात. 
५. असे अनेक जण आहेत जे तुम्हाला मदत करू शकतात. 

तुम्ही करू शकता 
१. तुम्हाला विश्‍वास वाटणाऱ्या व्यक्तीकडे तुम्ही आपल्या मनातले विचार बोलू शकता. संवाद मनमोकळा केल्यास यातून नक्कीच बाहेर पडाल. तुमच्या घरातील विश्‍वासू व्यक्ती किंवा मित्रमैत्रिणी असोत तुम्ही त्यांच्याशी मनमोकळे बोलू शकता. 
२. जर तुम्हाला वाटत असेल, की तुम्ही स्वतःला अचानक किंवा कधीही शारीरिक इजा पोचवू शकता, तर लगेच आपत्कालीन सेवा यंत्रणेशी संपर्क करू शकता किंवा तिथे जाऊ शकता. 
३. आपल्या नैराश्‍याबद्दल किंवा मानसिक अवस्थेबद्दल तुम्ही तज्ज्ञ डॉक्‍टर, मानसोपचार तज्ज्ञ, तसेच या विषयातील तज्ज्ञ सल्लागारांची मदत घेऊ शकता.
४. जर तुम्ही धार्मिक गोष्टींवर विश्‍वास ठेवत असाल, तर तुमच्या विश्‍वासातील तसेच समविचारी व्यक्तीसोबत तुम्ही मनमोकळे बोलू शकता. 
५. स्वतःच स्वतःसाठी मदत करण्यास विसरू नका. त्यासाठी काम करणाऱ्या ‘से हेल्प ग्रुप’ला जाऊन सामील व्हा. 

अशा अनेक संस्था आहेत, ज्या मानसिक आरोग्यावर काम करीत आहेत. तुम्ही अशा संस्थांच्या संपर्कात राहू शकता. अशा गोष्टीमुळे तुम्ही स्वतःला, तसेच अशा अनेक व्यक्तींना मानसिक नैराश्‍यातून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकता. आपल्या जीवनात नेहमी जवळच्या व्यक्तीसोबत असणारा मनमोकळा सुसंवाद, तसेच जीवनाचा सकारात्मक दृष्टिकोन, लहान गोष्टी किंवा कामामधील निर्मितीचा आनंद घेण्याची वृत्ती ठेवली तर अशा नैराश्‍यातून किंवा ताणतणावातून आपण नक्कीच बाहेर पडू  शकतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rescue from Depression