अन्नपानविधी धान्यवर्ग

डॉ. श्री बालाजी तांबे
Monday, 1 July 2019

तांदूळ जगात सगळीकडे ओळखीचा आहे. तो सर्वत्र आवडीने खाल्ला जातो. जमीन नांगरून त्यात घेतलेल्या भातपिकाचा तांदूळ धारणाशक्ती अधिक वाढवतो.

तांदूळ जगात सगळीकडे ओळखीचा आहे. तो सर्वत्र आवडीने खाल्ला जातो. जमीन नांगरून त्यात घेतलेल्या भातपिकाचा तांदूळ धारणाशक्ती अधिक वाढवतो.

सर्व धान्यांमध्ये तांदळाचे वर्णन सर्वप्रथम केलेले आहे. जगभरात सगळीकडे तांदूळ ओळखीचा असतो व आवडीने खाल्ला जातो. तांदळाच्या अनेकविध जाती पूर्वी होत्या, आजही आहेत. संहितांमध्ये ज्या जातींचे वर्णन केलेले आहे त्यापैकी काही महत्त्वाच्या जाती याप्रमाणे होत.

लोहित - म्हणजे लाल रंगाचा तांदूळ
कलम - म्हणजे बीपासून रोप तयार झाले की ते उपटून पुन्हा दुसरीकडे लावून तयार होणारा तांदूळ. 
महाशाली - जो आकाराने मोठा असतो. 
दीर्घशूक - ज्याच्या लोंब्या मोठ्या आकाराच्या असतात. 
गौर - जो वर्णाने शुभ्र असतो. 
पाण्डुक - जो वर्णाने किंचित पिवळसर, त्यामुळे फिक्‍क्‍या रंगाचा असतो.
सुगन्धक - गंधाने अतिशय सुगंधी असतो. 
याशिवाय आजकाल आंबेमोहोर, कोलम, सोनामसुरी, बासमती, जिरगा, साठेसाळ, रक्‍तशाली वगैरे जातींचे तांदूळ उपलब्ध असतात.
तांदळाचे सामान्य गुण याप्रमाणे असतात, 
शालयोः मधुराः स्निग्धा बल्या बद्धाल्पवर्चसः ।
कषाया लघवो रुच्या स्वर्या वृष्याश्‍च बृंहणाः ।।
अल्पानिलकफाः शीताः पित्तघ्ना मूत्रलास्तथा ।
...भावप्रकाश

तांदूळ चवीला गोड, गुणाने स्निग्ध व वीर्याने थंड असतात, बल वाढविणारे व मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करतात, स्वरासाठी हितकर असतात. शुक्रधातूला वाढवितात, इतर धातूंचेही पोषण करतात, पित्तशमन करतात, थोड्या प्रमाणात वात-कफाला वाढवितात, पचण्यास सोपे असतात, तसेच लघवी साफ होण्यासही मदत करतात. सर्व प्रकारच्या तांदळामध्ये लोहितशाली म्हणजे लाल रंगाचा तांदूळ उत्तम असतो. त्याखालोखाल महाशाली व बाकीचे सर्व तांदूळ त्याहीपेक्षा कमी गुणाचे असतात, असे चरकसंहितेत सांगितलेले आहे. 
रक्‍तशाली म्हणजे लाल रंगाचे तांदूळ. हे डोळ्यांसाठी चांगले असतात.
रक्‍तशालिर्वरस्तेषु बल्यो वर्ण्यस्त्रिदेषजित्‌ ।
चक्ष्युष्यो मूत्रलः स्वर्यः शुक्रलस्तृङज्वरापहा ।।
विषव्रणश्वासकासदाहनुत्‌ वपिुष्टिदः ।
...भावप्रकाश

सर्व तांदळांपैकी रक्‍तसाळ तांदूळ डोळ्यांना हितकर असतात, ताकद वाढवितात, कांती सुधरवतात व तिन्ही दोषांना संतुलित ठेवतात; आवाजासाठी हितकर असतात, लघवी साफ होण्यास मदत करतात, शुक्रवर्धन करतात. तहान, ताप, विष, व्रण, दमा, खोकला, दाह यांचा नाश करतात व अग्नीची पुष्टी करतात. 
साठेसाळी तांदूळ म्हणजे साठ दिवसांत तयार होणारे तांदूळ, यांचे गुण या प्रकारे असतात.
षष्टिकाः मधुराः शीता लघवो बद्धवर्चसः ।
वातपित्तप्रशमनाः शालिभिः सदृशा गुणैः ।।

...भावप्रकाश
चवीला मधुर, वीर्याने शीतल व पचायला हलके असतात, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करतात. वात तसेच पित्तदोषाचे शमन करतात, ताकद देतात, तसेच तापात हितकर असतात.
तांदूळ कशा प्रकारे उगवले आहेत, यावरही त्यांचे गुणधर्म बदलतात. 
  अगोदर जाळून घेतलेल्या जमिनीमध्ये लावलेले तांदूळ किंचित तुरटसर चवीचे व पचायला सोपे असतात. हे तांदूळ मल-मूत्र विसर्जनास मदत करतात, कफनाशक असतात. 

  नांगरलेल्या जमिनीतील तांदूळ विशेषतः शुक्रवर्धक असतात आणि तुलनेने कमी हलके असतात, धारणाशक्‍ती वाढवितात, ताकद देतात, या तांदळांपासून मलभाग फारसा तयार होत नाही. 
  अजिबात न नांगरलेल्या जमिनीतील तांदूळ वात वाढवितात. 
  आपोआप उगवलेले म्हणजे मुद्दाम पेरणी न करता आलेले तांदूळ गुणाने कमी प्रतीचे असतात. 

  एकदा आलेल्या तांदळाच्या लोंब्या कापून घेऊन त्याच फुटीवर पुन्हा आलेले तांदूळ गुणांनी रुक्ष असतात, पित्त वाढवितात व मलावबंध करतात. 
एक वर्ष जुना तांदूळ सेवन करण्यास योग्य असतो आणि तीन वर्षांनंतर तो हीनवीर्य होतो. तांदूळ वाफेच्या दाबावर (प्रेशर कूकरमध्ये) शिजविण्याऐवजी बाहेर पातेल्यात शिजवणे अधिक आरोग्यदायी असते. तांदूळ धुवून घेऊन, किंचित तुपावर भाजून घेऊन मग वापरले, तर ते फारच चांगले असते. मधुमेह, स्थूलता असणाऱ्यांसाठीही अशा प्रकारे बनविलेला भात वा खिचडी पथ्यकर असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rice Grain